मृग : (डियर). स्तनी वर्गातील समखुरी (पायाच्या खुरांची संख्या सम असलेल्या प्राण्यांच्या आर्टिओडॅक्टिला) गणातील सर्व्हिडी या कुलात मृगांचा समावेश होतो. या कुलात एकंदर १७ प्रजाती व ५३ जाती आहेत. हे प्राणी उत्तर व दक्षिण अमेरिका, उत्तर व पश्चिम आफ्रिका, यूरेशिया, जपान, फिलिपीन्स व इंडोनेशिया या प्रदेशांत आढळतात. न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियातही हे प्राणी नव्याने नेले गेले. ग्रेट ब्रिटनमध्ये हे पूर्वी होते पण नंतर नष्ट झाले. येथेही नव्याने ते पुन्हा नेले गेले. भारतात हे सर्वत्र आढळत असले, तरी मध्य प्रदेश, हिमालयाच्या पायथ्याचा भाग, आसाम, काश्मीर या भागांत हे प्रामुख्याने आढळतात. हे मुख्यत्वे जंगलात राहत असले, तरी दलदलीचा प्रदेश, मोकळा मैदानी प्रदेश व आर्टिक टंड्रा येथेही यांचे वास्तव्य असते. हे चांगले पोहू शकतात आणि काही जातींचे मृग तर हौसेने पाण्यात शिरतात. सर्वत्र यांची शिकार फार पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात होते. काही मृगांचे मांस उत्तम अन्न म्हणून समजले जाते. आयुर्वेदात मृगाचे मांस थंड, चवदार, ग्राही, त्रिदोषशामक, सहाही रसयुक्त, बलवर्धक, पथ्यकर, लघू व हृदयाला हितकारक आहे, असे म्हटले आहे. यांचे कातडे चांगले कमावले म्हणजे मऊ होते व थंडीत याचे कपडे करून वापरण्यात येतात. भारतात पूर्वी आर्य लोक मृगाचे मांस खात व त्याचे कातडे कमावून वापरीत. ऋषी-मुनी मृगचर्म आसन (मृगाजिन) म्हणून वापरीत. कालांतराने मृगचर्मे पवित्र व धार्मिक विधीसाठी योग्य मानली जाऊ लागली. वैशिष्ट्यपूर्ण शिंगांसाठी मृगांची डोकी गृहशोभनासाठीही वापरण्यात येतात. लॅपलँडर रेनडियर या जातीचे मृग माणसाळविले आहेत. यांचा उपयोग गायी-म्हशीसारखा करतात. यांच्यापासून दूध, मांस व कातडी मिळते. घोड्यासारखे वाहन म्हणूनही हे पाळले जातात. यांच्यापैकी पेर डेव्हिड मृग ही जाती चीनमध्ये माणसाळविलेल्या स्थितीतच आढळते तरी पण ही विनाशाच्या मार्गावर आहे. भारतातील मृगांची संख्या पुष्कळच घटली असून ज्या प्रदेशात पूर्वी ते सामान्यतः आढळत असत तेथूनही ते नाहीसे झाले आहेत. जंगलतोडीमुळेही त्यांची संख्या कमी झालेली आहे.

मृगांच्या निरनिराळ्या जातींतील नर व मादी यांना इंग्रजीत निरनिराळ्या शब्दांनी संबोधिले जाते. नरांना बक, स्टॅग, हार्ट किंवा बुल तर मादीला डो, हाइंड किंवा काऊ हे शब्द वापरतात. पाडसांना यर्लिंग, नॉबर, फॉन, ब्रॉकेट, स्टॅगर्ड व काफ हे शब्द वापरतात.

शरीर वर्णन : आकारमानाने यांच्या काही जाती लहान कुत्र्याएवढ्या (मानेजवळ सु. ३२ सेंमी. उंच), तर काही मोठ्या घोड्याएवढ्या (मानेजवळ २२५ सेंमी. उंच) असतात. या दोन टोकांदरम्यानची निरनिराळी उंची असलेल्या अनेक जाती आहेत. पूर्ण वाढ झालेल्या मादीचे वजन ९ ते ८०० किग्रॅ. पर्यंत असते. काही जातींच्या मृगांचे वजन जास्तीत जास्त ८५० किग्रॅ. असू शकते. कस्तूरी मृग हा आकारमानाने सर्वांत लहान तर मूस हा अमेरिकेतील मृग (यूरोपात एल्क या नावाने ओळखला जाणारा) सर्वांत मोठा मृग होय. मृगाची मादी नरापेक्षा आकारमानाने थोडी लहान व नाजूक असते. मादीची मान सुटसुटीत असून तीवरचे केस विणीच्या हंगामात नराच्या मानेवरच्या सारखे दाट नसतात. शेपूट आखूड असते.

मृगाचे शरीर लवचिक असले, तरी सुटसुटीत असते. त्याचे शेपूट लहान असते. कान मोठे असले तरी नाजूक असतात. पाय सडपातळ असून त्यांची लांबी वैशिष्ट्यपूर्ण असते. प्रत्येक पायावर खुरांची जोडी असते. काही मृगांच्या पायांवर बाजूचे खूर असतात पण ते ऱ्हास पावलेले असतात. यांच्या कातड्यावरील केस मऊ असतात मृगांचा रंग फिक्कट पिवळसर ते गडद तपकिरी असतो. हिवाळ्यात त्यांचा रंग जास्त गडद होतो. लहान मृगांच्या अंगावर पांढरे ठिपके असतात. यामुळे त्यांना जंगलात झाडांमध्ये लपणे सोपे जाते. काही लहान आकारमानाच्या मृगांच्या जातींत प्रौढावस्थेतही हे ठिपके आढळतात.

शिंगे हे या प्राण्यांचे वैशिष्ट्य आहे. मॉस्कस या प्रजातीचा कस्तुरी मृग व हायड्रोपोटस या प्रजातीचा चीनमधील जलमृग सोडून इतर सर्व प्रजातींच्या नर मृगांत ही मृगशिंगे आढळातात. रँगिफर या प्रजातीतील मादीसही नराप्रमाणे मृगशिंगे असतात. मृगांच्या वर्गीकरणात मृगशृंगांच्या रचनेस फार महत्त्व आहे.

काही जातींत मुळात एक शृंग असून त्याला शाखा असतात, तर काहींची शृंगे द्विशाखाक्रमी किंवा जटिल शाखाक्रमी असतात. मृगाची शृंगे दरवर्षी गळून पडतात. समशीतोष्ण प्रदेशात उन्हाळ्याच्या आरंभी शृंगे येण्यास सुरुवात होते. उन्हाळा संपण्यापूर्वी शृंगांची वाढ पूर्ण झालेली असते. यानंतर शृंगांचे कार्य म्हणजे लैंगिक आकर्षण व दुसऱ्या नराशी झुंज करताना उपयोगात आणण्याचे साधन हे होय. नरमादीचा समागम झाल्यावर जानेवारी ते एप्रिलच्या दरम्यान जुनी शृंगे टाकली जातात. शृंगे टाकण्याच्या क्रियेस दोन-तीन आठवडे लागतात. मृग आपली दोन्ही बाजूंची शृंगे काही तासांच्या किंवा फारतर १-२ दिवसांच्या अंतराने टाकतो. उष्ण प्रदेशातील काही मृगांच्या विणीचा असा ठराविक हंगाम नसतो. ते आपली शृंगे केव्हाही टाकतात. मृगाची पहिली शृंगे तो एक ते दोन वर्षांचा झाल्यावर येतात. ही लहान व सरळ असतात. पुढील वर्षात मृग जसा वयात येऊ लागतो, तसा शृंगांत फरक पडत जातो व त्या त्या जातीच्या वैशिष्ट्यपूर्ण आकाराची शृंगे तो वयात आला म्हणजे त्याला प्राप्त होतात.


सर्व मृगांत डोळ्याखालच्या खळग्यात आनन (चेहऱ्यावरील) ग्रंथी असतात. हा खळगा कातडीने झाकलेला असतो. काही मृगांच्या पायांवरही ग्रंथी असतात व त्यांना अनुक्रमे गुल्फ ग्रंथी, पाद ग्रंथी किंवा अंगुली ग्रंथी म्हणतात. पायातील प्रबाहु-अंतरास्थी व बाह्य बंधास्थी ही दोन हाडे लहान असतात. पायाच्या दोन मुख्य अस्थींचे संघटन होऊन त्यांची एक अस्थी झालेली असते. तिला नालास्थी म्हणतात. प्रत्येक पायास पाचापैकी प्रत्यक्ष दिसणारी चार बोचे असतात. त्यातील तिसरे व चौथे पूर्ण वाढलेले असते, दुसरे आणि पाचवे लहान असते. मादीला स्तनांच्या दोन जोड्या असतात. कस्तुरी मृगाच्या मादीला मात्र एकच जोडी असते. यांचे उदर रवंथ करण्यास योग्य असून चार कप्प्यांचे असते. पित्ताशय नसतो. फक्त कस्तुरी मृगात तो आढळतो.

दातांची संख्या ३४ असते. त्याचे सूत्र पुढीलप्रमाणे : कृ ०/३, सु. १/१, उदा ३/३, दा ३/३ [→ दात]. वरचे सुळे वक्र तलवारीसारखे असतात. कस्तुरी मृग व हायड्रोपोटस या शिंगे नसलेल्या मृग प्रजातींत या सुळ्यांची विशेष वाढ झालेली असते. काही मृग जातींत यांचा अभावच असतो. खालील सुळे कृंतकासारखे असतात. गालातील दातांच्या पृष्ठभागावर बरेच कंगोरे असतात. यामुळे गवतासारखे शाकाहारी अन्न चावण्यास सोपे जाते. मृगांची दृष्टी, श्रवणशक्ती व घ्राणेंद्रिये उत्तम असतात.

बऱ्याचशा मृगांच्या जाती कळप करून राहतात. यास अपवाद म्हणजे मोठ्या आकारमानाचा अमेरिकेत आढळणारा मूस हा मृग. विणीचा हंगाम सोडून इतर वेळी हा एकटाच हिंडतो. मृग हे शाकाहारी प्राणी आहेत. ते झुडपांचे शेंडे, फांद्या आणि गवत खातात. विणीच्या काळात नर आपल्या भोवती माद्यांचा एक जनाना निर्माण करतो. मृगांच्या काही जाती (उदा., रँगिफर) काही हंगामांत स्थलांतरणही करतात. काही वेळा एका कळपाचा नरमृग नेता दुसऱ्या कळपातील माद्या आपल्या जनान्यास जोडण्यासाठी त्या कळपाच्या नरमृग नेत्याशी निकराने झुंजतो. या भांडणात कधीकधी या नेत्यांची शिंगे एकमेकांत गुंततात व तुटतात. उष्ण प्रदेशातील मृग वर्षातून अनेक वेळा माजावर येतात. याउलट थंड प्रदेशातील मृगांचा विणीचा हंगाम ठरलेला असतो. गर्भधारणेचा काल कस्तुरी मृगात १६० दिवसांचा असतो, तर रोडियर या जातीत तो १० महिन्यांचा असतो. मादी एका वेळी एक किंवा दोन पाडसांना जन्म देते. क्वचित प्रसंगी तीन किंवा चार पाडसे जन्म पावली आहेत. जन्मानंतर १ ते ३ वर्षांत मृग वयात येतो. मृग हा जात्याच लाजाळू प्राणी आहे व तो माणसाळविताही येतो माजावर आल्यावर तो कसा वागेल, हे सांगता येत नाही. तो आपल्या शिंगांनी व पायाच्या खुरांनी प्रतिस्पर्ध्यावर हल्ला करतो.

                                   मृगांच्या काही जाती व त्यांचा प्रसार

                    जाती 

            प्रसार 

कस्तुरी मृग (मॉस्कस मॉस्किफेरस

आशिया 

फॅलो मृग (डॅमा डॅमा

दक्षिण यूरोप, नैर्ऋत्य आशिया. 

हॉग मृग (ॲक्सिस पोरसीनस

दक्षिण आशिया 

टिमोर मृग (सर्व्हस टिमोरेन्सिस

मलाया द्वीपसमूह 

सिका मृग (सर्व्हस निप्पॉन

जपान, तैवान 

पेर डेव्हिड मृग (इलॅफरस डेव्हिडॅनस

आग्नेय आशिया 

मार्श मृग (ब्लॅस्टोसेरस डायकोटोमस

दक्षिण अमेरिका 

पंपास मृग (ओझोटोसेरॉस बेझोआर्टिकस

दक्षिण अमेरिका 

चिनी जल मृग (हायड्रोपोटस इनर्मिस

पूर्व आशिया 

रो मृग (कॅप्रिओलस कॅप्रिओलस

यूरोप, आशिया. 

व्हर्जिनिया मृग (ओडोकॉयलियसव्हर्जिनियानस

उत्तर अमेरिका 

भारतात आढळणाऱ्या कस्तुरी मृग, चितळ, बारशिंगा, भेकर, सांबर आणि हंगूल या मृगांच्या जातींवर विश्वकोशात स्वतंत्र नोंदी दिलेल्या आहेत.

काही जातींची वैशिष्ट्ये व वर्णने : कस्तुरी मृग : याची फक्त एकच जाती अस्तित्वात आहे. हे आदिमृग होत यांना शिंगे नसतात, तसेच आनन ग्रंथी व पाद ग्रंथीही नसतात. यांच्या शरीरात पित्ताशय असतो, तसेच यांचे सुळे खंजिरासारखे असतात. नराच्या बेंबीजवळ उदराच्या त्वचेखाली कस्तुरी ग्रंथी असते. या ग्रंथीतून तपकिरी रंगाचा मेणासारखा स्त्राव एका पिशवीत जमा होतो. सुरुवातीस त्याला उग्र दुर्गंधी असते पण तो वाळल्यावर त्याला सुगंध येतो. हीच कस्तुरी होय. एका नरापासून सु. २५ ते ३० ग्रॅ. कस्तुरी मिळते. कस्तुरी मिळविण्याकरिता या प्राण्यांची मोठ्या प्रमाणात शिकार होते. मंगोलिया, सायबीरिया, हिमालयाचा पायथा, ब्रह्मदेश व आसाम या भागांत डोंगराळ प्रदेशांत हे एकएकटे आढळतात.

भेकर : (म्युंटजॅक्स). यांच्या सहा-सात जाती भारत, नेपाळ, श्रीलंका, जावा, सुमात्रा, बोर्निओ, चीन व तैवान येथे आढळतात. हे आकारमानाने लहान व नाजूक मृग होत. याची लांबी ८० ते १०० सेंमी. व उंची ४५ ते ५५ सेंमी. असते. वजन १४ ते १८ किग्रॅ. असते. नराच्या डोक्यावर शिंगे असतात. वरचे सुळे लांब असतात. विणीच्या काळात हे भुंकण्यासारखा आवाज काढतात. शत्रूच्या भीतीनेही ते असा आवाज काढतात म्हणून त्यांना बार्किंग डियर असे म्हणतात. ते मुख्यतः रात्रिंचर आहेत. हे एकएकटे किंवा जोडीने हिंडतात. समागमाचा काळ जानेवारी-फेब्रुवारी हा असतो. १८० दिवसांच्या गर्भधारणेनंतर मादी दोन पाडसे प्रसवते. यांची आयुर्मर्यादा सु. १० वर्षे असावी.


फॅलो मृग : दक्षिण यूरोप व आशिया मायनरच्या भूमध्यसामुद्रिक भागात हे आढळतात. यांची लांबी १·३ ते १·६ मी., उंची १ मी. व वजन ४० ते ८० किग्रॅ. असते. नरांना शिंगे असतात. शिंगे चापट असतात. दरवर्षी शिंगे गळतात. पाचव्या किंवा सहाव्या वर्षी सर्वांत मोठ्या आकारमानाची शिंगे येतात. गर्भधारणेचा काल २३० दिवसांचा असतो. आयुर्मर्यादा सु १५ वर्षे असते.

चितळ : हा मृग भारतात आढळतो. हे मृग कळप करून राहतात. शंभर किंवा यांपेक्षाही जास्त मृगांचे कळप आढळले आहेत. या कळपात नर, माद्या व लहान पाडसेही असतात. साधारणपणे यांचे कळप सकाळ व उन्हे टळल्यावर दुपारी भटकावयास जातात. शिंगे टाकण्यापूर्वी नर या कळपातून एकटाच जंगलात जातो व शिंगे टाकल्यावर नवी शिंगे येऊ लागली म्हणजे कळपात परत येतो. हे गवत खातात व चांगले पोहू शकतात. याचा गर्भावधी सात ते आठ महिन्यांचा व आयुर्मर्यादा १० ते १५ वर्षांची असते.

तांबडा मृग : हा सर्व्हस प्रजातीतील मृग आहे. या प्रजातीच्या सु १५ जाती आढळतात. तांबडा मृग यूरोपात, तर वापिटी हा उत्तर अमेरिकेत आढळतो. तांबडा मृग कळप करून राहतो. या कळपांचे क्षेत्र ठराविक व मर्यादित असते. वर्षभरात बराच काळ नर व माद्या यांचे कळप निरनिराळे असतात. ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यांत शिंगांवरचे मखमली आवरण गळाले म्हणजे विणीचा हंगाम येतो व या सुमारास नर आपल्या माद्या जमवून स्वतंत्र कळप करतात. गर्भधारणेचा काल ७ ते ८ महिने असतो व आयुर्मर्यादा १५ ते १८ वर्षे असते.

वापिटी मृग : करड्या तपकिरी रंगाचा हा मृग आकारमानाने २·५ मी. लांब व १·५ मी. उंच असतो. याची शिंगे पूर्ण वाढ झाल्यावर उमदी दिसतात आणि यांचा उपयोग स्वसंरक्षणाकरिता होतो. गर्भधारणेचा काल ८ ते ९ महिने असतो व आयुर्मर्यादा २२ वर्षे असते.

मृगांच्या काही जाती (कंसात खांद्यापर्यंतची सरासरी उंची दिली आहे : (१) सांबर (१५० सेंमी.), (२) बाराशिंगा (१३५ सेंमी.), (३) हंगूल (१२० ते १८१ सेंमी.), (४) थॅमिन (१२० सेंमी.),(५) चितळ (९० सेंमी.), (६) मूस (१८० सेंमी.), (७) एल्क अथवा वापिटी (१५० सेंमी.), (८) कॅरिबू (१२० सेंमी.), (९) म्यूलडियर (११० सेंमी.), (१०) व्हर्जिनिया मृग (११० सेंमी.).

कॅरिबू व रेनडियर : कॅरिबू उत्तर अमेरिकेत, तर रेनडियर यूरेशियात आढळतात. रँगिफर प्रजातीच्या जातींत नर व मादी या दोघांनाही शिंगे असतात. यांचा रंग तपकिरी ते काळा असतो. हे मृग मोठाले कळप करून दूरवर स्थलांतरण करतात. यांच्या कळपात हजारो मृग असून स्थलांतरणात दररोज १६० किमी. अंतर ते पार करतात. नर आपापसांत भांडतात. प्रत्येक नरामागे सु. ४० माद्यांचा जनाना असतो. गर्भधारणेचा काल ८ महिने असतो, तर आयुर्मर्यादा १५ वर्षे असते. याचे मांस रूचकर असल्यामुळे यांची शिकार मोठ्या प्रमाणात होते.

  जल मृग : हे मृग चीनमध्ये यांगत्से नदीच्या काठी आढळतात. यांना चांगले पोहता येते. यांची वस्ती पाण्याजवळ असते. यांना शिंगे नसतात. मादी एका वेळी चार ते सात पाडसांना जन्म देते.

रो मृग : हा एक मीटर उंचीचा व दिसण्यात देखणा असा मृग आहे. हा यूरोप व आशियात आढळतो. यांचा रंग तपकिरी असून शिंगे लहान असतात. यांचे मांस खाण्यास चांगले समजले जात असल्याने यांची शिकार मोठ्या प्रमाणावर होते. मादी दोन पाडसांना जन्म देते पण ही पाडसे एकाच वेळी जन्मत नाहीत, काही अंतराने जन्मतात. मादी भीतीमुळे किंवा विणीच्या हंगामात कुत्र्यासारखा भुंकण्याचा आवाज काढते.

जीवाश्म : (गतकालीन शिळारूप अवशेष). सर्व्हिडी या मृगकुलाचा भूवैज्ञानिक काळ आशियात पूर्व ऑलिगोसीन ते रिसेंट (गेल्या सु. ३·५ कोटी वर्षांतील), यूरोपात उत्तर ऑलिगोसीन ते रिसेंट (गेल्या सु. २·५० कोटी वर्षातील), उत्तर अमेरिकेत पूर्व मायोसीन ते रिसेंट (गेल्या २ कोटी वर्षांतील) व दक्षिण अमेरिकेत प्लाइस्टोसीन ते रिसेंट (गेल्या सु. ६ लक्ष वर्षांतील) असा आढळतो. प्लाइस्टोसीन काळातील मेटॅसेर्व्हुलस या प्रजातीच्या तांबड्या मृगाचे जीवाश्म आशियात व जपानमध्येही आढळले आहेत. रानडुकरे व संलग्न आधुनिक प्राणिजाती यांच्या आक्रमणापूर्वी ही प्रजाती निर्वंश झाली यांची शिंगे तीन टोकांची व बरीच प्रगत अवस्थेतील होती. यूक्लॅडोसेरॉस हा मृग प्लाइस्टोसीन काळापासून इंग्लंडमध्ये ज्ञात आहे. याची शिंगे जटिल शाखायुक्त होती. आयर्लंडमधील मेगॅलोसेरॉस या प्लाइस्टोसीन काळातील मृगाचे अनेक पूर्ण सांगाडे सापडले आहेत. यातील नराच्या शिंगाची लांबी ३ मी. पर्यंत आढळली आहे.

पहा : एल्क कस्तुरी मृग चितळ बारशिंगा भेकर रेनडियर सांबर हंगूल.

संदर्भ : 1. Prater, S.H. The Book of Indian Animals, Bombey, 1965.

              2. Walker, E. P. Mammals of the World, Vol. II, Baltimore, 1964.

इनामदार, ना. भा. चिन्मुळगुंद, वासंती रा.