धनिष्ठा : (श्रविष्ठा). धनिष्ठा म्हणजे श्रीमंत आणि श्रविष्ठा म्हणजे सुप्रसिद्ध. श्रवणाच्या पूर्वेस पण जरा उत्तरेला असलेले हे भारतीय नक्षत्र मालिकेतील तेविसावे नक्षत्र आहे. पाश्चात्त्य पद्धतीप्रमाणे ⇨ तिमी (डेल्फिनस) या तारकामूहातील आल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा व एप्सायलॉन हे पाच किंवा काही जण आणखी एक तारा यात समाविष्ट करून सहा तारे समजतात. या नक्षत्राचा आकार शेपटासह अगदी लहान पतंगासारखा आहे. ऑक्टोबरच्या १० तारखेच्या सुमारास रात्री ८ वाजता हे मध्यमंडलावर (जेथून पूर्वेस व पश्चिमेस रेखांश मोजतात तेथे म्हणजेच ग्रिनिच येथे) दिसते. यातील दोन तारे तिसऱ्या ⇨ प्रतीचे व तीन किवा चार तारे चौथ्या प्रतीचे आहेत. आल्फा तारा हा योगतारा असून त्याचे विषुवांश २० ता. ३७ मि. १८·७ से. व क्रांती १५° ४२ मि. ४५२ से. उ.[→ ज्योतिष शास्त्रीय सहनिर्देशक पद्धती] अशी आहे आणि त्याचे अंतर १·५ लक्ष प्रकाशवर्षे आहे. गॅमा हा तारा युग्मतारा असून त्यांतील एक सोनेरी पिवळा व दुसरा निळसर हिरवा आहे.

ख्रि. पू. ३००० च्या सुमारास धनिष्ठा नक्षत्रात सूर्य असताना उत्तरायणास (हल्ली २२ डिसेंबरला होते तशी) सुरुवात होत असे. वेदांग ज्योतिष पद्धतीत धनिष्ठा हे पहिले नक्षत्र समजण्यात आले आहे. बार्हस्पत्यसंवत्सरचक्राचा आरंभ धनिष्ठेपासून आहे. याची देवता वसू व आकृती मर्दल (ढोलके) आहे. या नक्षत्राचे पहिले दोन चरण मकर व पुढचे दोन चर कुंभ राशीत येतात. धनिष्ठापासून रेवतीपर्यंतच्या पाच नक्षत्रांना धनिष्ठापंचक म्हणतात. या पंचकात मृत्यू अनिष्ट समजला जातो.

ठाकूर, अ. ना.