विपर्ययी आवरण : सूर्याच्या दीप्तिगोलाच्या (दृश्य गोलाच्या) लगत वर असलेल्या आणि वर्णगोलाच्या तळाकडील वायुस्तरास विपर्ययी आवरण म्हणतात. या स्तराची जाडी सु. ५०० किमी. असून यामध्ये दीप्तिगोलाचा वरचा विभाग वर्णगोलात सावकाश विलीन होत असल्यामुळे याला स्पष्ट सीमा नसतात. यामध्ये उंचीनुसार वायुदाब कमी होत असतो. त्याचप्रमाणे तापमानही सु. ६,००० के. पासून ४,००० के. पर्यंत कमी कमी होत जाते. यामुळे दीप्तिगोलापासून उत्सर्जित झालेल्या प्रारणास (तरंगरूपी ऊर्जेस) सापेक्षतेने थंड स्तरातून जावे लागते व त्या स्तरातील अणूंकडून त्यांच्या अंतर्गत रचनेनुसार विशिष्ट तरंगलांबीचे प्रारण शोषले जाते आणि दीप्तिगोलाकडून येणाऱ्या प्रकाशाच्या सलग वर्णपटावरील काही वर्णरेषा क्षीण होतात. या क्षीण वर्णरेषा योझेफ फोन फ्राउनहोफर या जर्मन शास्त्रज्ञांनी १८१४ मध्ये प्रथम पाहिल्या म्हणून त्यांना फ्राउनहोफर रेषा हे नाव पडले. या विपर्ययी वायुस्तरात विविध तरंगलांबीच्या प्रारणाचे उत्सर्जन व शोषण सतत चालू असते. फरक एवढाच की, खालच्या विभागात प्रारण उत्सर्जनाचे प्रमाण अधिक असते व वरती प्रारण शोषण अधिक प्रमाणात होते.

खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्रबिंबाने दीप्तिगोल जेव्हा संपूर्ण झाकला जातो त्या वेळी मिळणाऱ्या विपर्ययी आवरणाच्या वर्णपटात नेहमी क्षीण दिसणाऱ्या वर्णरेषा स्पष्ट दिसतात. इतर ताऱ्यांनाही यासारखे विपर्ययी आवरण असते. 

पहा : सूर्य  

गोखले. मो.ना.