दीर्घिका : परस्परांमधील गुरुत्वाकर्षणामुळे एकत्र बांधल्या गेलेल्या अब्जावधी ताऱ्यांच्या संहतीला दीर्घिका असे म्हणतात. वेगवेगळ्या दीर्घिकांमधील अंतर फार प्रचंड असते, म्हणजे दीर्घिका ही जणू काही अवकाशरूपी समुद्रातील इतस्ततः विखुरलेली बेटेच आहेत. प्रत्येक दीर्घिका हे एक स्वतंत्र विश्वच असते म्हणून दीर्घिकांना द्वीप–विश्वे (किंवा विश्वखंडे) हे नाव देण्यात येते. सूर्यमाला ही आकाशगंगा या दीर्घिकेतील एक अतिसूक्ष्म घटक आहे. आकाशगंगेत सूर्यासारखे सु. १,००० कोटी तारे आहेत.

सामान्यतः एका दीर्घिकेत १० ते १,००० कोटी तारे असतात. त्यांशिवाय तिच्यात वायुमेघ व धूलिकणही समाविष्ट झालेले असून त्यांपासून नवे तार बनत असतात तसेच जुने तारे हळूहळू लयालाही जात असतात.

इतिहास : अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत आकाशगंगा म्हणजेच संपूर्ण विश्व होय, असे मानले जात असे. १७५५ मध्ये इमॅन्युएल कांट या जर्मन तत्त्वज्ञांनी आकाशगंगेसारखीच अवकाशात इतर विश्वे असण्याची शक्यता पुढे आणली.

धूमकेतूंचा अभ्यास करताना दूरदर्शकातून पांढुरक्या मेघखंडासारख्या दिसणाऱ्या आकाशातील वस्तूंची एक यादी चार्ल्स मेसियर या फ्रेंच ज्योतिर्विदिंनी १७८१ मध्ये तयार केली (यापूर्वीही हिपार्कस यांनी इ. स. पू.२०० मध्ये अशा काही वस्तूंची यादी तयार केली होती). या वस्तूंना मेसियर वस्तू किंवा ⇨ अभ्रिका म्हणत परंतु यांतील ज्या वस्तू आकाशगंगेच्या बाहेर आहेत असे दिसून आले, त्यांना गांगेयेतर अभ्रिका असे म्हणू लागले.

मेसियर यादीतील वस्तूंचे क्रमांक एम (M) या अक्षरापुढे लिहून त्यांचे निर्देशन केले जाते. १८८८ मध्ये जे. एल्. ई. ड्रायर यांनी केलेल्या अधिक विस्तृत यादीमध्ये (न्यू जनरल कॅटलॉग) या वस्तूंना दिलेल्या क्रमांकाच्या मागे एनजीसी (NGC) ही आद्याक्षरे लिहून त्यावरूनही त्यांचे निर्देशन करता येते. उदा., देवयानी तारकासमूहातील प्रसिद्ध दीर्घिका एम ३१ व एनजीसी २२४ यांपैकी कोणत्याही पद्धतीने निर्देशित करता येते. ही दीर्घिका दूरदर्शकाशिवायही दिसू शकते व अल् सुफी या इराणी ज्योतिर्विदांनी तिची नोंद ९६४ मध्येच केलेली आढळते.

दीर्घिकांचा शोध बराच जुना असला, तरी त्यांचे खरे स्वरूप १९२० नंतरच कळून आले. १९१७ मध्ये जॉर्ज विलिस रिची या अमेरिकन ज्योतिर्विदांना एनजीसी ६९४६ या दीर्घिकेत एक नवतारा (ज्याची दीप्ती अचानकपणे १० हजार ते १·५ लक्षपट वाढते असा तारा) उदयाला आलेला सापडला. या दृष्टीने जुन्या छायाचित्रांची छाननी करता त्यांवरून एम ३१ मध्ये १९०९ साली दोन नवतारे उदित झाले होते, असे आढळले. या नवताऱ्यांच्या आत्यंतिक अंधुकपणावरून ते ज्यांत आहेत त्या दीर्घिका आपल्यापासून अत्यंत दूर असल्या पाहिजेत, हे उघड झाले. शेवटी १९२४ मध्ये एडविन पी. हबल या अमेरिकन ज्योतिर्विदांनी मौंट विल्सन वेधशाळेतील १०० इंची दूरदर्शकाच्या साहाय्याने एम ३१ व एनजीसी ६८२२ या दीर्घिकांची छायाचित्रे घेतली. त्यांमध्ये त्यांना रूपविकारी (ज्यांची तेजस्विता बदलते असे) तारे आढळले. त्याचप्रमाणे हे तारे आकाशगंगेतील रूपविकारी ताऱ्यांसारखेच आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या दीप्तीवरून या दीर्घिकांची अंतरे काढता त्या आकाशगंगेच्या बाहेर आहेत, हे स्पष्ट झाले. अशा तऱ्हेने आकाशगंगेप्रमाणेच दीर्घिका ही स्वतंत्र विश्वखंडे आहेत, हे सर्व मान्य झाले. पुढे १९४४ मध्ये डब्ल्यू. बाडे यांनी घेतलेल्या छायाचित्रांत दीर्घिकांमधील काही भागांत ताऱ्यांच्या प्रतिमाही स्पष्टपणे मिळाल्या.


वर्गीकरण : दीर्घिकांच्या आकारानुसार हबल यांनी त्यांचे ३ मुख्य वर्गांत वर्गीकरण केले. पुढे या वर्गांचे आणखी उपवर्ग पाडण्यात आले आहेत. हे वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे.

काही दीर्घिका तेजोमय गोलाभाकार (चापट गोलाकार) दिसतात. त्या सर्व E वर्गात मोडतात. संपूर्ण गोलाकार E0 उपवर्गात व चापटपणा वाढत जाईल त्यानुसार अनुक्रमे E1, E2, …, E7 उपवर्ग क्रमाक्रमाने येतात.

काही दीर्घिकांमध्ये केंद्रभागी तेजोगोल असून त्याच्याभोवती सर्पिलाकार फाटे दिसतात, यांना सर्पिलाकार दीर्घिका म्हणतात. हे फाटे जास्त घट्ट गुंडाळलेल्यांचा Sa उपवर्ग, त्यापेक्षा कमी गुंडाळलेला Sb व अगदी कमी गुंडाळलेला Sc उपवर्ग होतो. E7 व Sa यांच्या दरम्यान एक So उपवर्गही हल्ली मानतात.

दीर्घीकांचे वर्ग

ज्या दीर्घिकांत मधल्या केंद्रापासून दोन सरळ भुजा फुटून त्यांच्यापासून सर्पिल फाटे फुटलेले दिसतात, त्यांना SB उपवर्गाच्या दीर्घिका म्हणतात. फाटे कमी किंवा जास्त गुंडाळलेले असतील त्यानुसार क्रमाने SBa, SBb, SBc हे प्रकार होतात. त्याचप्रमाणे E7 व SB यांच्या दरम्यान SBo  हा उपवर्ग नव्याने घातला आहे. एकूण दीर्घिकांपैकी १७% विवृत्ताकार, ५०% सर्पिलाकार व ३०% भुजायुक्त सर्पिलाकार असतात असे दिसून येते. आकारहीन दीर्घिकांना त्यांच्या नावाप्रमाणे निश्चित असा काहीच आकार नसतो.

इ. स. १९५८ मध्ये विल्यम डब्ल्यू मॉर्गन यांनी वेगळ्या प्रकारे दीर्घिकांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. ताऱ्यांच्या वर्णपटांनुसार त्यांचे O, B, A इ. वर्गांत वर्गीकरण केले आहे [→ तारा]. त्याचप्रमाणे दीर्घिकांचेही वर्गीकरण केले आहे.

अवकाश–वितरण : विस्तृत प्रमाणावर आकाशाची छायाचित्रे घेऊन परीक्षण करता असे दिसून येते की, अवकाशात दीर्घिकांचे वितरण साधारणतः सर्व बाजूंनी समान आहे. गांगेय पातळीत त्यांची संख्या कमी असल्यासारखे दिसते, ते केवळ या पातळीतील द्रव्याकडून प्रकाशाच्या होणाऱ्या शोषणामुळेच होय.


अनेकदा दीर्घिका एकेकट्या नसून त्यांचे समूह आहेत, असे आढळते. एका समूहात दोनपासून १०,००० पर्यंत किंवा जास्त दीर्घिका असू शकतात. आपली आकाशगंगाही अशा १७ दीर्घिकांच्या एका समूहातील असून त्याला ‘स्थानिक समूह’ असे म्हणतात. देवयानीमधील दीर्घिका व ⇨ मॅगेलनी मेघ या दीर्घिकाही याच समूहात मोडतात. १९७३ पर्यंत स्थानिक समूहात मोडणाऱ्या आणखी १० दीर्घिकांचा शोध लागला आहे. मोठ्या समूहात कित्येक छोटे गट झालेलेही दिसतात. उदा., स्थानिक समूहात एम ३१, एम ३२ व एनजीसी २०५ या तिघींचा एक गट आहे, असे दिसते. हे गट व समूह कसे बनले असावेत, हा ⇨ विश्वोत्पत्तिशास्त्रात विचार करण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

अंतरे, विस्तार व वस्तुमान : दीर्घिकांची अंतरे अजमावण्यासाठी त्यांच्यामध्ये ओळखू येणारे तेजस्वी तारे, नवतारे अथवा रूपविकारी तारे यांची दीप्ती मोजतात. या दीप्तीची तुलना आकाशगंगेतील तत्सम ताऱ्याच्या दीप्तीशी करतात व आकाशगंगेतील ताऱ्याचे अंतर माहित असल्यामुळे त्यावरून दीर्घिकेचे अंतर काढता येते.

अती दूरच्या दीर्घिकांमध्ये असे कोणतेच तारे ओळखू येत नाहीत. त्यांची अंतरे काढण्यासाठी दीर्घिकेची एकूण दीप्ती, तिचा भासमान व्यास किंवा ताम्रच्युती (वर्णपटातील शोषण रेषा तांबड्या रंगाकडे सरकणे याचे अधिक स्पष्टीकरण पुढे दिले आहे) यांचा उपयोग करतात.

पृथ्वीला सर्वांत नजीकच्या दीर्घिका मॅगेलनी मेघ असून त्यांचे अंतर सु. १,५०,००० प्रकाशवर्षे (१ प्र. व = ९·५ X १०१२ किमी.) आहे. देवयानी दीर्घिकेचे अंतर सु. २२,२०,००० प्र. व. आहे. सध्याच्या दूरदर्शकांच्या साहाय्याने ‘दिसू’ शकणाऱ्या सर्वांत दूरच्या दीर्घिकांची अंतरे सु. ३ X १० प्र. व. आहेत. दीर्घिकांचे व्यास १,५०० ते ३,००,००० प्र. व. यांच्या दरम्यान आढळले आहेत व त्यांच्या निरपेक्ष प्रती [→ प्रत] –२२·५ ते – १२·५ यांच्या दरम्यान आढळतात.

आतापावेतो अजमावलेली दीर्घिकांची वस्तुमाने सूर्याच्या वस्तुमानाच्या (= ६ X १०४१ किग्रॅ.) ३ X १० ते ३ X १०११ पट यांच्या दरम्यान आहेत, असे दिसून येते.

अक्षीय भ्रमण : सर्व दीर्घिका त्यांच्या केंद्रमध्यातून जाणाऱ्या अक्षाभोवती फिरत असतात. काही थोड्या दीर्घिकांच्या बाबतीतच या गतीचे मापन करणे शक्य झाले आहे. यासाठी वर्णपटीय पद्धती वापरतात. सर्पिलाकृती दीर्घिकांच्या आकारावरूनच त्यांचे अक्षीय भ्रमण सूचित होते व त्यांच्या बाबतीत अक्षीय भ्रमणाचे मापन करता येते. या भ्रमणावरून दीर्घिकेच्या वस्तुमानाचा अंदाज करता येतो.

सर्व सर्पिलाकृती दीर्घिकांच्या भ्रमणाची दिशा अशी असते की, तीमुळे त्यांचे फाटे अधिक घट्ट गुंडाळले जातील. भुजायुक्त सर्पिलाकृतीमधील भुजांचे भ्रमण असे होते की, त्या भुजा जणू काही सलग घन पदार्थांच्या बनलेल्या आहेत. भ्रमणाचा एक फेरा पुरा करण्यासाठी लागणारा काळ (आवर्तकाल) एनजीसी ५०५५ या सर्पिलाकार दीर्घिकेच्या बाबतीत मोजता असे दिसून आले की, या दीर्घिकेच्या मध्याजवळच्या भागाचा आवर्तकाल सु. २ कोटी वर्षे तर बाह्य टोकाजवळ तो २० कोटी वर्षे आहे. तिची आयुर्मर्यादा सु. १०० कोटी वर्षे आहे. यावरून दीर्घिकेचा सर्पिलाकार हळूहळू बदलत जात असावा, असे दिसते.

एम ३१ या दीर्घिकेच्या गतीबद्दल अलीकडे करण्यात आलेल्या निरीक्षणांवरून असे दिसून आले की, दीर्घिकेच्या मध्यापासून बाहेर जाऊ लागावे तसा भ्रमणाचा वेग प्रथम २०० पार्सेकपर्यंत (१ पार्सेक = ३·२६ प्र. व.) वाढत जातो व नंतर कमी होऊ लागतो. २,००० पार्सेक अंतरावर तो किमान होतो व त्यापुढे पुन्हा वाढू लागतो.


सर्पिल फाटयामध्ये O व B जातींचे उष्ण तारे व त्यांच्याभोवती हायड्रोजन वायू आढळून येतो. मध्यापासून सु. ४०० पार्सेक अंतरापर्यंत असणारा वायू एका चपट्या तबकडीच्या आकारात प्रामुख्याने आढळतो. त्याचबरोबर या तबकडीत वायू व धूळ यांचे मेघ प्रवेश करीत असतात व केंद्रापासून वायूचे फवारे दोन दिशांनी बाहेर येत असतात. भ्रमणाच्या नियमित गतीबरोबरच दीर्घिकेमधील ताऱ्यांना एक अनियत गतीही असते, असे दिसून आले आहे.

संघटन : E वर्गाच्या दीर्घिकांत वायू व धूलिकणांचा अभाव असतो. त्याचप्रमाणे त्यांत अतिउष्ण अशा O व B प्रकारच्या ताऱ्यांचाही अभाव असतो. त्यांतील सर्वांत तेजस्वी तारे हे तांबडे महातारे असतात व या ताऱ्यांचे एकूण स्वरूप आपल्या आकाशगंगेतील तारकागुच्छांमधील ताऱ्यांसारखे असते. हे तारे म्हणजे अतिवृद्ध तारे होत. त्यांचे वय सु. १०१० वर्षे असते. उलट O व B तारे तरुण असतात. यावरून E दीर्घिकांत नवीन ताऱ्यांची उत्पत्ती थांबून हजारो वर्षे लोटली असावीत, असे अनुमान काढता येते.

सर्पिलाकार दीर्घिकांच्या केंद्रामधील परिस्थिती सामान्यतः E दीर्घिकांप्रमाणेच असते परंतु त्यांच्या सर्पिल फाट्यांमध्ये अतिउष्ण निळे महत्तम तारे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात त्याचबरोबर वायू व धूलिमेघही आढळतात. निळे महातारे आपल्यामधील ऊर्जा इतक्या झपाट्याने गमावत असतात की. त्यांचे आयुर्मान १० वर्षांपेक्षा कमी असते. यावरून या फाट्यांत नवीन ताऱ्यांची उत्पत्ती होत असली पाहिजे, हे अनुमान करता येते.

असाधारण दीर्घिका : कित्येक दीर्घिकांची अशी वैशिष्ट्ये आढळतात की, त्या वरील वर्गीकरणात कोठेच बरोबर बसू शकत नाहीत म्हणून त्यांना असाधारण दीर्घिका असे म्हणतात. रशियन ज्योतिषी बी. ए. व्हरनत्सॉव्ह–व्हेल्यिमिनॉव्ह यांनी १९५९ मध्ये अशा सु. ३५० दीर्घिकांची यादी तयार केली.

यांपैकी एका प्रकाराला संहत दीर्घिका असे म्हणतात. या आकाराने इतक्या लहान असतात की, छायाचित्रावरून त्या तारेच आहेत, असे वाटते परंतु वर्णपटीय परीक्षण करता त्या ताऱ्यांची अत्यंत दाटी असलेल्या दीर्घिका आहेत, हे समजते. दुसऱ्या काही दीर्घिकांमध्ये धुळीचे मेघ किंवा मार्ग दिसतात. आणखी काहीमधून उष्ण वायूचा फवारा बाहेर येताना आढळतो. अशा दीर्घिकांत काही तरी अत्यंत स्फोटक घटना होत असाव्यात, असे वर्णपटीय परीक्षणावरून दिसून येते.

काही सर्पिल दीर्घिकांच्या केंद्रात वायूच्या प्रचंड मेघात तारे बुडालेले असून हा मेघ प्रचंड वेगाने प्रसरण पावत असतो. या दीर्घिकांचे केंद्र आकाराने लहान पण अत्यंत तेजस्वी असते व त्यांच्या वर्णपटात रुंद उत्सर्जन रेषा दिसतात. अशा दीर्घिकांना सीफर्ट दीर्घिका (सी. के. सीफर्ट या ज्योतिर्विदांच्या नावावरून) असे म्हणतात. काही ठिकाणी दोन दीर्घिकांची टक्कर होत असावी किंवा एक दीर्घिका फुटून तिचे दोन तुकडे होत असावेत, असे दिसते. कित्येक ठिकाणी दोन लगतच्या दीर्घिका घूसर पट्ट्याने परस्परांशी जोडलेल्या आढळतात. या सर्व विचित्र किंवा असाधारण दीर्घिकांचे एकूण दीर्घिकांच्या उत्क्रांतीतील स्थान कोणते, याचा उलगडा अद्याप झालेला नाही.

रेडिओ दीर्घिका : कित्येक दीर्घिकांपासून रेडिओ तरंगांच्या स्वरूपात प्रचंड प्रमाणावर ऊर्जेचे उत्सर्जन होत असते. हंस तारकासमूहातील A व शर्मिष्ठेमधील A या अशा दोन दीर्घीका १९५४ मध्ये ओळखू आल्या. हे रेडिओ तरंग सिंक्रोट्रॉन प्रारण असली पाहिजेत, ही गोष्ट आता सर्वमान्य झाली आहे (विद्युत् भारित कण जेव्हा चुंबकीय क्षेत्रात प्रवेगित होतात तेव्हा निर्माण होणाऱ्या प्रारणाला सिंक्रोट्रॉन प्रारण म्हणतात). [→ रेडिओ ज्योतिषशास्त्र].

ताम्रच्युती व विश्वाचे प्रसरण : दीर्घिकांच्या वर्णपटातील शोषण रेषा तांबड्या रंगाच्या दिशेने सरकलेल्या दिसतात म्हणजेच त्याच्या तरंगलांब्या वाढलेल्या दिसतात, याला ताम्रच्युती असे म्हणतात. ⇨ डॉप्लर परिणामानुसार दीर्घिकेच्या मूळच्या λया तरंगलांबीत  या वेगाने ती दीर्घिका आपणापासून दूर जात असली पाहिजे (येथे c हा प्रकाशाचा वेग आहेΔλ ही वाढ असल्यास V =  c Δλ /λ). चित्रपत्र २९ मध्ये काही दीर्घिकांच्या ताम्रच्युती व त्यांवरून मिळणारे त्यांचे दूर जाण्याचे वेग दाखविले आहेत. कॅल्शियमाच्या H आणि K रेषांच्या ताम्रच्युती बाजूच्या वर्णपटात दाखविल्या आहेत. १९२९ मध्ये हबल व एम्. एल्. ह्यूमसन यांनी असा शोध लावला की, दीर्घिकांचे दूर जाण्याचे वेग त्यांच्या पृथ्वीपासूनच्या अंतरांच्या समप्रमाणात असतात.


ज्या दीर्घिकांची अंतरे इतर पद्धतीने काढता येत नाहीत, त्यांची अंतरे हबल यांचा नियम वापरून काढता येतात परंतु या शोधावरून एक महत्त्वाचा निष्कर्ष निघतो. सर्वच दीर्घिका आपल्या दीर्घिकेपासून दूर जात आहेत परंतु आपली दीर्घिका कोणत्याही दृष्टीने असामान्य नाही. तेव्हा सर्वच दीर्घिका परस्परांपासून दूर जात असल्या पाहिजेत म्हणजेच या विश्वाची व्याप्ती एकसारखी वाढत असली पाहिजे किंवा विश्वाचे प्रसरण होत आहे. विश्वात्पत्तीबद्दल चर्चा करताना हा एक महत्त्वाचा मुद्दा विचारात घ्यावा लागतो. कित्येक दीर्घिकांच्या बाबतीत व त्यापेक्षाही ⇨ क्कासारांच्या बाबतीत फारच मोठ्या ताम्रच्युती आढळून आल्या आहेत. त्यांच्या स्पष्टीकरणासाठी अशी कल्पना मांडण्यात आली की, या ताम्रच्युतीपैकी काही अंश इतर काही कारणाने निर्माण होत असला पाहिजे परंतु हे कारण काय असावे, याबद्दल अद्याप काहीच निर्णय लागलेला नाही.

उत्पत्ती व उत्क्रांती : दीर्घिकांच्या जीवनक्रमाबद्दल काही तर्क करता येतात परंतु हे सर्वच तर्क सिद्ध करता येत नाहीत. आरंभी अवकाशात सर्वत्र एकसारखा वायू (मुख्यतः हायड्रोजन) पसरला असावा. या वायूत असमानता उत्पन्न होऊन वायूचे गोल बनले, हे गोल म्हणजे दीर्घिकेची प्राथमिक अवस्था होय. या वायुगोलात पुन्हा (गुरुत्वाकर्षणामुळे) असमानता निर्माण होऊन त्यांचे तारे बनू लागले. हे पहिल्या पिढीतील तारे होत. हे तारे बव्हंशी हायड्रोजनाचेच बनलेले हाते. हे तारे दीर्घिकेच्या मध्याभोवती गोलीय सममितीत पसलेले होते. हे तारे बनून शिल्लक राहिलेला वायू त्याच्या कोनीय संवेगामुळे (निरूढी परिबल म्हणजे कोनीय प्रवेगाला पदार्थाने केलेल्या विरोधाचे परिमाण व कोनीय वेग यांच्या गुणाकाराने दर्शविल्या जाणाऱ्या राशीमुळे) तबकडीसारख्या आकारात जमा झाला म्हणूनच हा तबकडीचा आकार सर्व सर्पिल दीर्घिकांत आढळून येतो. या तबकडीत मग दुसऱ्या पिढीचे तारे होऊ लागतात. या ताऱ्यांपैकी मोठ्या वस्तुमानाच्या ताऱ्यांची उत्क्रांती [→ तारा] जास्त जलद हाेते व त्यांच्यात तयार होणारी भारी मूलद्रव्ये आंतरतारकीय वायूत उत्सर्जित केली जातात. यांपैकी काही भारी मूलद्रव्ये घन स्वरूपात जातात व अशा तऱ्हेने धूलिकण तयार होतात. तबकडीच्या मध्याजवळील भागात बरेचसे तारे निर्माण  झाल्यानंतर तिच्यात अस्थैर्य निर्माण होते व तबकडीतील ताऱ्यांचे पुंजके बनतात. अशा तऱ्हेने सर्पिलाकार फाटे तयार होतात. या फाट्यांमधील तारे व वायू हळूहळू एका फाट्यातून दुसऱ्याकडे जात असतात. या फाट्यांमध्ये नवीन तारे तयार होत असतात, असे निरीक्षणावरून दिसून यते.

या फाट्यांमध्ये अतिदीप्त नवताऱ्याच्या स्फोटासारखी घटना झाल्यास दाबामध्ये असमानता उत्पन्न होऊन एखाद्या ठिकाणी प्रचंड वस्तुमानाचा वायू एकत्रित होतो. मग गुरुत्वाकर्षणामुळे वा भोवतालच्याच चुंबकीय क्षेत्रातील फेरफारामुळे वायूचा अवपात होऊन नवा तारा तयार होतो.

फाट्यांमधील सर्वांत जास्त तेजस्वी तारे हे निळे महत्तम तारे असतात. ऊर्जाव्ययाच्या प्रचंड त्वरेमुळे त्यांचे आयुर्मान कमी असते. या दृष्टीने विचार करता या ताऱ्यांचे वय जास्तीत जास्त काही कोटी वर्षांचे असले पाहिजे. उलट सर्पिल दीर्घिकांच्या केंद्रातील तारे व विवृत्ताकार दीर्घिकांतील तांबडे महातरे असतात व त्यांच्या बरोबरीने लघुमत तारेही असतात [→ तारा]. ताऱ्यांच्या उत्क्रांतीचा विचार करता या ताऱ्यांचे वय सु. १०० कोटी वर्षे असले पाहिजे व दीर्घिकेचे वय याहून अधिकच असावयास पाहिजे. तेव्हा फाट्यातील तारे नव्यानेच जन्माला आलेले असावेत, हे उघड होते. या दृष्टीने पाहता विवृत्ताकार दीर्घिका सर्वांत वयोवृद्ध असल्या पाहिजेत व त्यांत आता नवीन तारे बनत नाहीत. ते तारे बनण्यासाठी लागणारा ‘कच्चा माल’ म्हणजे वायू व धूलिकण यांचा तेथे अभाव आहे.

एकूण विचार करता Sc व SBc प्रकारच्या दीर्घिका सर्वांत कमी वयाच्या व त्यांहून क्रमाक्रमाने जुन्या म्हणजे Sb व SBb, Sa व SBa या असाव्यात. आकारहीन दीर्घिका त्याहूनही अल्पवयाच्या असाव्यात परंतु यातील एका प्रकारचे रूपांतर दुसऱ्या प्रकारात होते का? होत असल्यास ते कसे हाेते? SB दीर्घिकांतील भुज का निर्माण झाले? अशांसारखे अनेक प्रश्न उद्याप अनुत्तरितच आहेत.

पहा : आकाशगंगा विश्वस्थितिशास्त्र विश्वोत्पत्तिशास्त्र.

संदर्भ : 1. Baade, W. Evolution of Stars and Galaxies, Cambridge, Mass., 1963.

           2. Page, T., Ed. Stars and Galaxies, Englewood Cliffs, N. J., 1962.

          3. Shapley, H.. Galaxies, Cambridge, Mass., 1961.

         4. Struve, O. Zebergs, V. Astronomy of the 20th Century, New York, 1962.

पंत, मा. भ पुरोहित, वा. ल.


‘देवयानी’ मधील सर्पिल दीर्घिका एम ३१ किंवा एनजीसी २२४ (Sb),कडेजवळ एनजीसी २२१ (E2) व दूर एनजीसी २०५ (E5)या अनुचर दीर्घिका. ‘सप्तर्षी’ मधील सर्पील दीर्घिका एनजीसी ५४५७ (Sc ) व तिच्यात आढळलेला नवतारा (बाणाने दाखविलेला).

 

‘श्यामशबला’मधील दोन परस्परांना जोडलेल्या दीर्घिका. सर्पिल एनजीसी ५१९४ व एनजीसी ५१९५ (छोटी). मोठा मॅगेलनी मेघ-एक आकारहीन दीर्घिका. ही दूरर्दशकाच्या साहाय्याशिवायही दिसू शकते.  

‘हंसा’ मधील अतिनिकट दीर्घिकांची जोडी. ही रेडिओ तरंगाचे सामर्थ्यशाली उत्सर्जन करते. या दोन दीर्घिकांची टक्कर होत असावी अशी एक कल्पना आहे.

   ‘नरतुरंगा’ मधील असाधारण दीर्घिका एनजीसी ५१२८.हिच्यापासून रेडिओ तरंगाचे उत्सर्जन होत असते.‘कन्ये’ मधील सर्पिल दीर्घिका एनजीसी ४५९४ कडेकडून अशी दिसते (मधली काळी रेघ धूलीमेघातील शोषणामुळे).

   


सर्पिल दीर्घिका उपर्वग S0 (एनजीसी १२०१) सर्पिल दीर्घिका उपर्वग Sa (एनजीसी २८११)

 सर्पिल दीर्घिका उपवर्ग Sc(एनजीसी ६२८)भुजायुक्त सर्पिल दीर्घिका उपवर्ग SBb(एनजीसी १३००)

 भुजायुक्त सर्पिल दीर्घिका उपवर्ग SBb (एनजीसी २८५९)सर्पिल दीर्घिका उपवर्ग Sb (एनजीसी ३०३१)

  भुजायुक्त सर्पिल दीर्घिका उपवर्ग SBa(एनजीसी १७५)भुजायुक्त सर्पिल दीर्घिका उपवर्ग SBc(एनजीसी १०७३)


दीर्घिकांच्या ताम्रच्युती व अंतर यांतील संबंध (अंतर प्रकाशवर्षे)