बायरयोहान: (? १५७२-७ मार्च १६२५). जर्मन ज्योतिर्विद. त्यांनी पहिला पूर्ण ज्योतिषशास्त्रीय नकाशासंग्रह प्रसिद्ध केला व ताऱ्यांची नवीन नामकरण पद्धती रुढ केली. त्यांनी काही काळ वकिलीचा व्यवसाय केला व ख्रिस्ती धर्मगुरू म्हणूनही कार्य केले. मात्र हे करताना त्यांचे ज्योतिषशास्त्रीयविषयीचे अध्ययन चालूच होते. त्यांनी १६०३ साली यूरॅनोमेट्रिया हा ताऱ्यांचा पहिला ज्योतिषशास्त्रीय नकाशासंग्रह प्रसिद्ध केला. त्यामध्ये ट्यूको ब्राए यांच्या यादीतील ७७७ तारे व टॉलेमी यांचे ४८ तारकासमूह तर आहेतच शिवाय नवीन ५०० तारे व दक्षिण गोलार्धातील १२ नवीन तारकासमूह यांचाही त्यात समावेश केलेला आहे. या संग्रहात एकूण ५१ ज्योतिषशास्त्रीय नकाशे असून त्यांत 

ताऱ्यांची स्थाने व प्रतीही [ ⟶ प्रत] दर्शविल्या आहेत. नुसत्या डोळ्यांनी दिसणाऱ्या ताऱ्यांना नावे देण्याची नवीन

पद्धती रुढ करणे, हे त्यांचे दुसरे महत्त्वाचे कार्य असून ही पद्धती अजून ही वापरली जाते. पूर्वीच्या पद्धतीत तारे अरबी मूळक्षरांनी दर्शवीत असत आणि ती पद्धती गुतांगुंतीची होती. तिच्याद्वारे एकच एक तारा दर्शविला जाईल याची खात्री नसे. बायर यांच्या पद्धतीमध्ये पूर्वीपासून चालत आलेल्या तारकासमूहाच्या नावाचे षष्ठीचे रुप केले जाते व त्याच्या पुढे तारकासमूहातील ताऱ्याच्या क्रमानुसार आल्फा (α), बीटा (β) वगैरे ग्रीक मूळाक्षरे ठेवून ताऱ्याचा निर्देश केला जातो. उदा., आल्फा जेमिनोरम, बीटा स्कॉर्पी वगैरे. सामान्यपणे तारकासमूहातील सर्वांत तेजस्वी तारा आल्फा या मूळाक्षराने निर्देशित केला जातो मात्र पुढील मूळाक्षरांचा क्रम हा ताऱ्यांच्या तजेस्वीपणानुसार वापरलेला आहेच असे नाही. कधीकधी तारकासमूहाच्या गृहीत आकाराला (उदा., वृश्चिक, मिथुन इ.) अनुसरून हा क्रम ठरविलेला आढळतो. ज्या समूहात २४ पेक्षा जास्त तारे आहेत, त्यामध्ये २४ ग्रीक मूळाक्षरे संपल्यावर लॅटिन मूळाक्षरांनी तारे दर्शविण्याची सोय केली आहे. अर्थात या पद्धतीतील अडचणीही नंतर लक्षात आल्या. उदा., एकाच प्रतीच्या ताऱ्यांना वेगळी मूळाक्षरे योजिली गेली आहेत.

बायर आऊजबुग्र येथे निधन पावले.

मोडक, वि. वि.