वेधयंत्र : (ॲस्ट्रोलेब). या उपकरणात धातूची एक तबकडी वापरलेली असून ती टांगून ठेवण्याची सोय असते. या तबकडीच्या आधारबिंदूपासून मध्यबिंदूतून जाणारी एक सरळ रेषा व तिला लंब असणारी मध्यबिंदूतून जाणारी एक आडवी सरळ रेषा काढलेली असते. तबकडीच्या परिघावर अंशांच्या खुणा असून त्यांचा आरंभ आडवी रेषा परिघाला जेथे छेदते त्या बिंदूपासून होतो. तबकडीला चिकटून तिच्या मध्यबिंदूभोवती फिरू शकेल, अशी एक शलाकेसारखी तबकडीच्या व्यासाइतक्या लांबीची नळी जोडलेली असते. नळीतून दिसणाऱ्या ताऱ्याचे ⇨उन्नतांश (क्षितिजसापेक्ष कोनात्मक उंची) तबकडीच्या परिघावरील नळीच्या स्थानावरून समजतात. अरबी लोक याचा उपयोग सूर्य, चंद्र व ग्रहताऱ्यांचे उन्नतांश काढण्यासाठी करीत असत. याच्या साह्याने सूर्याचे महत्तम उन्नतांश (सूर्य मध्यान्हवृत्तावर असतानाचे) काढून त्यावरून एखाद्या ठिकाणचे अक्षांश किंवा एखाद्या दिवशीची सूर्याची क्रांती यांपैकी एक राशी माहीत असल्यास दुसरी राशी पुढील सूत्रानुसार काढता येते. म्हणून पूर्वी नौकानयनात याचा उपयोग अक्षांशातील बदल काढण्यास करीत असत.

अक्षांश     = महत्तम उन्नतांश + सूर्याची क्रांती – ९०० सूर्याची क्रांती     = ९०० – महत्तम उन्नतांश + अक्षांश.

सूर्याच्या व ताऱ्याच्या उन्नतांशांवरून वेळ ठरविता येते.

सपाट जागेवर सरळ उभी केलेली ठराविक लांबीची बाणासारखी टोक असलेली काठी किंवा स्तंभ यांचाही समावेश वेधयंत्रात केला जात असे. काठीच्या छायेच्या लांबीवरून वेळ काढण्यास त्याचप्रमाणे मध्यान्ह कालच्या छायेवरून उत्तर- दक्षिण दिशा ठरविण्यास व त्या संदर्भाने पृथ्वीवरील आसपासच्या स्थळांचे ⇨दिगंश (क्षित्यांश) मोजण्यास याचा उपयोग होत असे. वर्षभरातील मध्यान्ह कालच्या छायेच्या किमान व कमाल लांबी असणाऱ्या दिवसांच्या नोंदीवरून सांपातिक वर्षाचा [→ वर्ष] कालावधी आणि लांबीवरून क्रांतिवृत्त व वैषुविक वृत्तांमधील कोन ठरविला जाई. छायेच्या दिशेवरून सूर्याची दिशा आणि काठीची उंची व छायेच्या लांबीवरून सूर्याचे उन्नतांश व त्यावरून वेळेचे मापन करीत असत.

कंकणमय  गोल हेही एक वेधयंत्र आहे. या साध्या स्वरूपाच्या यंत्रात समान मध्य असलेली दोन कडी असून आतील कडे बाह्य कड्यात फिरविता येते व त्यावरील एका व्यासाच्या दोन टोकांना दोन खुंट्या असतात. ही जोडी मध्यान्हवृत्तांच्या पातळीत उभी केली असताना सूर्य त्या वृत्तावर आल्यावर आतले कडे अशा तऱ्हेने थोडे फिरवावयाचे की, एका खुंटीची छाया बरोबर दुसऱ्या खुंटीवर पडेल. या स्थितीत खुंट्या सांधणाऱ्या व्यासाचा क्षितिजाशी होणारा कोन बाह्य कड्यावरील अंशात्मक खुणांवरून समजतो व सूर्याचे महत्तम उन्नतांश मिळतात. बाह्य कडे वैषुविक वृत्त पातळीत उभे धरल्यास संपात दिवस काढता येतात. संपात दिवशी कड्याच्या वरच्या भागाची छाया बरोबर खालच्या भागावर पडते [→ संपात].

अनेक कड्यांच्या कंकणमय गोलात कडी अंशांकित केलेली असून ती एकमेकांत फिरण्याची सोय केलेली असते. त्यांच्या साह्याने खगोलातील महत्त्वाच्या बृहत्‌वृत्तांचे दिग्दर्शन होत असल्यामुळे खगोलीय गणिते सोडविण्यास त्यांचा उपयोग होई. कोणत्याही खस्थ पदार्थाच्या दिगंशांचे व उन्नतांशांचे होरा व क्रांती किंवा शर व भोग यांमध्ये [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] रूपांतर करण्यासाठी याचा वापर केला जात असे. सतराव्या शतकाच्या पहिल्या दशकात वेधासाठी दूरदर्शकाचा उपयोग होऊ लागेपर्यंत ही उपकरणे वापरात होती. [→ कंकणमय गोल].

प्रचिनयुक्त वेधयंत्राचे प्रकाशकीय तत्त्व : (१) पाऱ्याचे क्षितिजदर्शक पृष्ठ, (२) प्रचिन, (३) वस्तुभिंग, (४) वसतुभिंगाचे केंद्रांतरदर्शक पृष्ठ, (५) नेत्रभिंग, (६) तार्या्ची भासमान गती.

प्रचिनयुक्त वेधयंत्र : एखाद्या खस्थ पदार्थाचे खगोलातील स्थान निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेले ज्योतिषशास्त्रीय वेध (निरीक्षणे) घेण्यासाठी हे उपकरण वापरतात. एक परिशुद्ध प्रचिन (काचेचा अचूक त्रिकोणी लोलक), कृत्रिम क्षितिज म्हणून वापरता येईल असे पारा असलेले थाळ्यासारखे पसरट पात्र, भिन्न वर्धनक्षमतेची दोन नेत्रभिंग असलेला दूरदर्शक, पाणसळीसारखे संतलन करणारे साधन, चुंबकीय दिक्‌सूचक (होकायंत्र) व दिगंशवृत्त [→ दिगंश], विद्युत्‌ घटमालेवर चालणारा चमक दिवा, उपकरण जुळविण्याचे स्क्रू, प्रकाशनाची तीव्रता नियंत्रित करण्यासाठी (विद्युत्‌) चलरोधक इ. या उपकरणाचे भाग आहेत. 

पक्क्या स्थितीतील प्रचिन वापरून असे उपकरण एक स्थिर उन्नतांश (बहुधा ४५०) मोजते. आकृतीत एका ताऱ्याकडून एकाच वेळी आलेले आणि क’ हे दोन समांतर प्रकाशकिरण दाखविले आहेत. किरण प्रचिनाच्या वरच्या पृष्ठातून आत प्रवेश करतो व त्याचे प्रणमन (वक्रीभवन) अशा रीतीने होते की, तो दूरदर्शकाच्या नलिकेतून नेत्रभिंगाकडे जातो. क’ हा किरण पाऱ्याच्या पृष्ठभागावरून परावर्तित होऊन प्रचिनाच्या खालच्या पृष्ठातून प्रवेश करून पहिल्या किरणाप्रमाणे नेत्रभिंगाकडे जातो.

प्रचिनयुक्त वेधयंत्र एका विशिष्ट उन्नतांशासाठी तयार केलेले असते. उगवणाऱ्या ताऱ्याचे उन्नतांश या विशिष्ट उन्नतांशाहून जास्त झाले की, ताऱ्याची प्रत्यक्ष प्रतिमा दृष्टिक्षेत्राच्या तळाकडून माथ्याकडे जाताना दिसते. पाऱ्याच्या पृष्ठावरून परावर्तित होऊन आलेल्या किरणामुळे बनलेली ताऱ्याची प्रतिमा दृष्टिक्षेत्राच्या माथ्याकडून तळाकडे जाताना दिसते. ताऱ्याचे उन्नतांश उपकरणाच्या स्थिर उन्नतांशाएवढे होण्याच्या थोडे आधी () व (अ’) या किरणांमुळे आकृतीत क्ष मध्ये दाखविल्याप्रमाणे ताऱ्याच्या प्रतिमा दृष्टिक्षेत्राच्या अनुक्रमे तळाशी वा माथ्यापाशी निर्माण होतात. तारा आणखी वर येऊ लागतो तेव्हा या प्रतिमा एकमेकींजवळ येऊ लागतात. प्रस्थापित उन्नतांशाला () व (ब’) या किरणांमुळे निर्माण होणाऱ्या ताऱ्याच्या प्रतिमा मध्ये दाखविल्याप्रमाणे दृष्टिक्षेत्राच्या मध्याशी निर्माण होतात. तारा आणखी वर येऊ लागला की, या प्रतिमांची भासमान हालचाल पुढे राहते व त्या परत अलग होतात. मावळत्या ताऱ्याच्या प्रतिमांची भासमान हालचाल याच्या विरुद्ध दिशेत होते. प्रचिन जागेवर बसविल्यावर तो दूरदर्शकाच्या अक्षाभोवती किंचित फिरवितात. यामुळे ताऱ्याने स्थिर उन्नतांश गाठल्यावर या दोन्ही प्रतिमा क्षितिजसमांतर रेषेवर एकमेकींलगत येतील. प्रमाण वातावरणीय प्रणमनात होणाऱ्या बदलामुळे उद्‌भवणारी त्रुटी (चूक) किमान होण्यासाठी स्थिर उन्नतांश वापरतात. वेधांची संख्या वाढली की, स्थानविषयक यदृच्छ (स्वैर) त्रुटी कमी होते.

पृथ्वीतील गुरुत्वविक्षेपांमुळे (गुरुत्वाकर्षणाच्या प्रत्यक्ष व सैद्धांतिक मूल्यांमधील फरकांमुळे) उदग्र (उभ्या) दिशेत विचलन होते. यामुळे या उपकरणाच्या साहाय्याने खस्थ पदार्थांच्या निश्चित केलेल्या खगोलीय स्थानात अल्प परंतु कधीकधी गंभीर स्वरूपाची त्रुटी राहते.

नेने, य. रा. ठाकूर, अ. ना.