आयफेल, आलेक्सांद्र ग्यूस्ताव्ह: (१५ डिसेंबर १८३२-२७ डिसेंबर १९२३). फ्रेंच अभियंता. पॅरिस येथील मनोऱ्याच्या बांधकामाकरिता सुप्रसिद्ध. त्यांचा जन्म दीझाँ येथे झाला. पॅरिस येथे १८५५ पर्यंत शिक्षण घेऊन पदवीधर झाल्यावर थोड्याच दिवसात त्यांनी लोखंडी पूल बांधण्याच्या कामात नाव कमाविले व यूरोप, आफ्रिका, इंडोचायना येथे अनेक पूलांचे बांधकाम केले. १८५८ मध्ये त्यांनी फ्रान्समध्ये बोर्डोमधील गाराँ नदीवरील आगगाडीचा पूल बांधला त्याकरिता वायूधारी कुसुले [→ पाया] उपयोगात आणून पाया भरला. १८६७ च्या पॅरिसमधील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या वेळी त्यांनी एका विशाल दालनाकरिता प्रचंड पोलादी सांगाडा बनविला. १८७७ मध्ये त्यांनी पोर्तुगालमधील डोरू नदीवरील द्विकीली कमानीचा १६० मी. गाळ्याचा व ६० मी. उंचीचा पूल व दक्षिण फ्रान्समधील गॅरॅबिट कालव्यावरील १६५ मी. गाळ्याचा व १२५ मी. उंचीचा कमानीचा पूल ही अवघड कामे केली. न्यूयॉर्क बंदरातील स्वातंत्र्य-देवतेच्या पुतळ्यातील व त्याच्या चौथऱ्यातील पोलादी सांगड्याचा अभिकल्प (आराखडा) व उभारणी त्यांनी १८८५ मध्ये केली. १८८९ मधील पॅरिसच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी त्यांनी ३०४·८ मी. उंचीचा मनोरा उभारला व त्यामुळे त्यांचे नाव अजरामर झाले.

पनामा कालव्यावरील काही प्रचंड जलपाशांचे अभिकल्प त्यांनी तयार केले. त्यांची बांधणी त्यांच्याकडून पुरी होण्यापूर्वी १८९३ मध्ये तेथील दुर्घटनांत व लोकापवादात सापडून त्यांना दोन वर्षे कारावास व वीस हजार फ्रँक दंड झाला. त्यानंतर त्यांनी आपले लक्ष वातावरणविज्ञानाकडे bळविले. पॅरिसच्या ओटुई भागात त्यांनी स्वत:ची प्रयोगशाळा उभारली व हवेचा अत्यंत गतिमान कृत्रिम झोत उत्पन्न करण्याकरिता वातविवर (विमानांच्या प्रतिकृतींच्या चाचण्या घेण्याची बंदिस्त खोली) तयार केले. प्रयोगशाळा, वातविवर व आयफेल मनोरा यांद्वारा प्रयोग करून त्यांनी वायुगतिकीमध्ये (हवेमधील गतिमान पदार्थांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्याच्या शास्त्रामध्ये) विस्तृत संशोधन केले व त्याचा वैमानिकशास्त्रात बहुमोल उपयोग केला. आपली प्रयोगशाळा नंतर त्यांनी फ्रेंच सरकारला दिली. त्यांना अमेरिकेतील स्मिथसोनिअन इन्स्टिट्यूटच्या लँग्ली पदकाचा सन्मान मिळाला. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.

कानिटकर, बा. मो.