सेरो : (सरो). या हरणाचा समावेश बोव्हिडी कुलाच्या (गोकुलाच्या) रुपिकॅप्रिनी उपकुलात होत असून कॅप्रिकॉर्निस सुमात्रेन्सिस हे त्याचे शास्त्रीय नाव आहे. तैवान (फार्मोसा) येथील सेरोचे शास्त्रीय नाव कॅ. क्रिस्पस हे आहे. त्याचे वर्गीकरण वैज्ञानिक स्थान अज (बोकड) व हरिण यांच्या मधले आहे, म्हणून त्याला अजहरिण किंवा हरिणाज (गोट–अँटिलोप) म्हणतात. सेरो हे सिक्कीममधील स्थानिक मूळ (तिबेटी–ब्रह्मी) नाव आहे. त्याचा प्रसार काश्मीर ते मिश्मी टेकड्या, युनान व सेचुआन टेकड्यांच्या रांगांतून पूर्वेकडे आणि म्यानमार, मलाया द्वीपसमूह व सुमात्रा येथील टेकड्यांमध्ये आहे. या विस्तीर्ण प्रदेशांत त्याच्या अनेक प्रजाती आढळतात. हिमालयात सेरो हा प्राणी सस.पासून १,८५०–३,०५० मी. उंचीवरील प्रदेश पसंत करतो, तर म्यानमारमध्ये तो सस.पासून २००–२,४५० मी. उंचीच्या टेकड्यांच्या रांगांमध्ये आढळतो. सेरोच्या भारतात आढळणाऱ्या उपजाती थर, हुमेई पोकॉक, रोडोनी पोकॉक व जाम्राची पोकॉक या आहेत. सेरोच्या वयस्क नराची खांद्याजवळ उंची १००–११० सेंमी., वजन ९० किग्रॅ., शिंगे २३–२५ सेंमी. लांब व त्यांचा घेर १३–१५ सेंमी. असतो.

सेरो (कॅप्रिकॉर्निस सुमात्रेन्सिस )

मोठे डोके, गाढवासारखे कान, जाड मान व आखूड पाय यांमुळे सेरो बेढब दिसतो. त्याचे पुढचे पाय फाकून उभे राहण्याची सवय, खूर भरपूर पसरणे व डोके खाली घालणे यांमुळे तो अधिकच बेडौल दिसतो. नर व मादी यांची चण (बांधा) एकसारखी असते. कमी उंचीवर आढळणाऱ्या सेरोच्या अंगावरील केस जाडेभरडे व काहीसे पातळ असतात. त्यांचा रंग एवढा विविध प्रकारचा असतो की, त्याचे वर्णन करणे अवघड असते. तो करडा काळा किंवा काळसर करडा, चेस्टनटाच्या रंगाचा किंवा त्यावर करडे वा पांढरे ठिपकेदार ते तांबडा असतो. डोके, मानेचा काटा व खांदा हे भाग आयाळीने आच्छादलेले असतात. अशा गडद रंगाचे सेरो करडसर काळे असतात. खांद्यावरील, पुठ्ठ्यांवरील व मांड्यांच्या खालच्या बाजूंवरील काळा रंग तांबेऱ्यासारखा तांबडा होत जातो आणि पायाची आतील बाजू व पोटावर तो मळकट करडा होतो. मुस्कट, गळा व छाती या भागांवरील पांढरा रंग बदलत्या छटांचा असतो. हिमालयात आढळणाऱ्या प्रजातींत पायाची वरची बाजू चेस्टनटाच्या रंगाची व खालची बाजू मळकट पांढरी असते, तर मलायी सेरोचे संपूर्ण पाय काळे असतात. नर व मादीला शिंगे असतात. शिंगे मागे वाकलेली, काळी व कोनीय असून त्यांच्या तीनचतुर्थांश लांबीवर जवळजवळ वेढे असतात.

सेरो दाट जंगलयुक्त निदऱ्यांत (गॉर्जमध्ये) राहतात. इतस्ततः पडलेल्या मोठ्या दगडांच्या कपारी व उथळ गुहांमध्ये ते आसरा घेतात. सकाळी व संध्याकाळी ते जास्त उघड्या (मोकळ्या) उतारांवर चरतात. ते बहुधा एकाकी असून कधीकधी ५-६ प्राणी एकत्र चरताना नजरेस पडतात. खडक व उतारावर ते सारख्याच चपळतेने वावरतात. त्यांना बिचकावले असता ते फिसकारल्यासारखे फुरफुरत दूर पळून जातात. त्यांचा आवाज शीळ (किंकाळी) घातल्यासारखा असतो.

हिमालयात विणीचा हंगाम ऑक्टोबरच्या अखेरीस असतो. मादी २·५ वर्षांत, तर नर २·५ ते ३ वर्षापर्यंत वयात येतो. सुमारे सात महिन्यांच्या गर्भावधीनंतर मादीला एक पिलू तर कधीकधी दोन पिले मे-जूनमध्ये होतात. म्यानमारमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पिले जन्माला येतात. तेथे गर्भावधी आठ महिन्यांचा असतो. सेरोची एकूण आयुर्मर्यादा सु. २१ वर्षे असते.

कुत्र्यांच्या मदतीने सेरोची शिकार करतात. पळणे अशक्य वाटल्यास तो शिंगांनी निकराचा हल्ला करून आपला बचाव करतो. काही एतद्देशीय लोक त्यांच्या शिकारीसाठी फास व सापळे (खड्डे) यांचा उपयोग करतात. चिनी लोक त्यांची शिकार वैद्यकीय उपचारासाठी करतात. सेरोचे मांस निकृष्ट दर्जाचे असते. सेरोच्या अनेक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने त्यांना संरक्षित प्राणी म्हणून घोषित केले आहे.

पहा : गोरल.

जमदाडे, ज. वि.; जोशी, मीनाक्षी र.