क्षार-२ :आयुर्वेदातील क्षार हे झरवून किंवा झिजवून काढणारेद्रव्य आहे. ते चूर्णरूप किंवा घनरूप असते. आयुर्वेदीय चिकित्सेत उपचारा-साठी क्षाराचा उपयोग करतात. शल्यतंत्रांतर्गत व्याधीची चिकित्सा करताना शरद्य व अनुशरद्य (शरद्य कर्मात वापरण्यात येणारे उपकरण) चिकित्से-पेक्षा क्षारचिकित्सा अतिशय महत्त्वाची आहे. कारण छेदन, भेदन, लेखन (खरवडणे) या शरद्यक्रिया करण्यात शरद्ये व अनुशरद्ये यांच्यापेक्षा क्षाराचा उपयोग अधिक चांगल्या प्रकारे होतो. औषध, क्षारकर्म, रक्तावसेचन, शरद्यकर्म या सर्वसाधारण क्रमाने शल्यतंत्रांतर्गत व्याधीची चिकित्साकरतात. काही व्याधींमध्ये क्षारकर्मच प्रधान कर्म मानले आहे. सर्व शरद्ये व अनुशरद्ये यांच्यामध्ये क्षार हे द्रव्य अत्यंत श्रेष्ठ आहे. कारण ज्याठिकाणी शरद्यक्रिया करणे अशक्य असते तेथे, तसेच अवघड ठिकाणी जाऊन छेदन, भेदन, लेखन या तिन्ही क्रिया क्षार करू शकतो ( उदा., नासार्श – नाकातील मूळव्याध) . तसेच चामखीळ, भगंदर, नाडीव्रण यांच्यासारख्या कष्टसाध्य रोगांवर प्रत्यक्ष क्षार लावून कार्य होते. मुतखडा, मूळव्याध, जलोदर इ. विकारांमध्ये क्षार पोटात देतात. अशा पोटात देण्याच्या पिण्यास योग्य क्षाराला पानीय क्षार म्हणतात. बाहेरून लेप लावण्यास उपयुक्त असणाऱ्या क्षाराला प्रतिसारणीय क्षार म्हणतात. याचे मृदू, मध्य व तीक्ष्ण हे तीन प्रकार आहेत. कुष्ठ, गजकर्ण, कोड इ. विकारांवर प्रतिसारणीयक्षार उपयुक्त आहेत. व्रणावर लेप केल्याने व्रणाचे शोधन होऊन व्रण लवकर भरून येतो. म्हणून येथे ‘रोपण करणे’ हे क्षाराचे अप्रत्यक्ष कार्य होते. सौम्य असलेला पानीय क्षार उष्ण, तीक्ष्ण गुणांचा व तिखट रसांचा असल्यामुळे जखम चिघळविणारा, सूज कमी करणारा आहे. तो शरीरातील आमदोष, कफदोष, मेद, विष, कृमी यांचा नाश करतो. गरविष, गुल्म, उदर, अजीर्ण इ. रोगांवर पानीय क्षार उपयुक्त आहे. मराठी विश्वकोशा त ⇨ शल्यतंत्र व शालाक्यतंत्र या नोंदीत क्षारकर्माची, तरऔषधिकल्प या नोंदीत चूर्णस्वरूप क्षार तयार करण्याचा सामान्य विधी व घनरूपी क्षार तयार करण्याचा विधी सविस्तर दिला आहे.

जोशी, वेणीमाधवशास्त्री