हुबेल, डेव्हिड हंटर : (२७ फेब्रुवारी १९२६–२२ सप्टेंबर २०१३). कॅनडात जन्मलेले अमेरिकन तंत्रिका-जीववैज्ञानिक. मस्तिष्क (मेंदू) कार्याविषयी संशोधन केल्याबद्दल त्यांनाटॉर्स्टन निल्स वीझल आणिरॉजर वॉलकॉट स्पेरी यांच्यासमवेत १९८१ सालचे शरीरक्रियाविज्ञान किंवा मानवी वैद्यक या विषयाचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. हुबेल आणि वीझल यांनी एकत्रितपणे मुख्यतः दृष्टि-प्रणालीतील अवगम प्रक्रियेविषयी संशोधन केल्याबद्दल दोघांत मिळून नोबेल पारितोषिकाची अर्धी रक्कम देण्यात आली. 

 

डेव्हिड हंटर हुबेल
 

हुबेल यांचा जन्म विंडसर (आँटॅरिओ, कॅनडा) येथे झाला. त्यांनी माँट्रिऑल येथील मॅक्गिल विद्यापीठात १९४७ मध्ये पदवी आणि १९५१ मध्ये एम्.डी. संपादन केली. १९५२ मध्ये त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. त्यांनी माँट्रिऑल न्यूरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, जॉन्स हॉपकिन्स मेडिकल स्कूल आणि द वॉल्टर रीड आर्मी इस्टिट्यूट ऑफ रिसर्च (वॉशिंग्टन) या ठिकाणी विविध पदांवर काम केले. जॉन्स हॉपकिन्स मेडिकल स्कूल येथे हुबेल यांचे वीझेल यांच्या सोबतचे साहचर्य सुरूझाले. १९५९ मध्ये त्या दोघांनी हार्व्हर्ड विद्यापीठाच्या मेडिकल स्कूलमध्ये संशोधनाला सुरुवात केली. हुबेल १९६५ मध्ये शरीरक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक आणि १९६८ मध्ये तंत्रिकाजीवविज्ञानाचे जॉर्ज पॅकर बेरी प्राध्यापक झाले.  

 

हुबेल यांनी दृक्पटलापासून (डोळ्याच्या पडद्यापासून) मेंदूतील संवेदी आणि प्रेरक केंद्रापर्यंत वाहणाऱ्या तंत्रिका आवेग प्रवाहांचे विश्लेषण केले. अत्यंत सूक्ष्म विद्युत् प्रस्थांचा वापर करून त्यांनी प्रकाश पडल्यावर दृक्पटलाद्वारा दिला गेलेला विद्युत् प्रतिसाद आणि अवगम संरचनेवर प्रक्रिया होऊन मेंदूपर्यंत होणारे वहन यांच्यामुळे प्रत्येक तंत्रिका तंतूतआणि मेंदूतील कोशिकांत उद्भवणाऱ्या विद्युत् विसर्जनाचा माग घेतला. 

 

हुबेल यांनी वीझल यांच्यासोबत ब्रेन मेकॅनिझम्स ऑफ व्हिजन (१९९१) आणि ब्रेन अँड व्हिज्युअल पर्सेप्शन : द स्टोरी ऑफ २५-इयर कोलॅबरेशन (२००४) हे ग्रंथ लिहिले. त्यांच्या इतर ग्रंथांत द व्हिज्युअल कॉर्टेक्स ऑफ द ब्रेन (१९६३), द ब्रेन (१९८४ सहलेखक फ्रॅन्सिस क्रिक) आणि आय, ब्रेन अँड व्हिजन (१९८८) यांचा समावेश होतो. 

 

हुबेल व वीझल यांनी सूक्ष्म दृष्टीसाठी कारणीभूत असलेल्या घटकांवर म्हणजे प्रमस्तिष्काच्या पश्चकपाल खंडांवर असणाऱ्या दृष्टी बाह्यकाच्या संरचना व कार्य यांवर संशोधन केले. या कार्याबद्दल त्या दोघांना लूईस ग्रॉस हॉर्वित्झ पारितोषिक १९७८ मध्ये मिळाले.

 

हुबेल यांचे लिंकन (मॅसॅचूसेट्स) येथे निधन झाले. 

वाघ, नितिन भरत