ढोक : आर्डीइडी या पक्षिकुलात या पक्ष्याचा समावेश केलेला आहे. आपल्याकडे बक वा बगळे या सर्वसाधारण नावाने ओळखल्या जाणाऱ्या पक्ष्यांचा एक समूह आहे. त्यांना इंग्रजी भाषेत हेरॉन म्हणतात, ढोक हा त्यांपैकीच एक पक्षी आहे. याचे शास्त्रीय नाव आर्डिया सिनेरिया  असे आहे.

हा पक्षी यूरोप, आशिया आणि आफ्रिका या खंडांच्या बहुतेक भागात आढळतो. हा भारतातला कायमचा रहिवाशी असून सगळीकडे आढळतो. मात्र १,५२५ मी. पेक्षा जास्त उंचीवर तो दिसून येत नाही. लव्हाळ्यांची बेटे असलेल्या लहान-मोठ्या नद्या, तळी, तलाव, ओहोळ वगैरे ठिकाणी हा रहातो.

दिसायला हा बलाकासारखा असून त्याची लांबी १०२ सेंमी. असते. शरीर सडपातळ असून पाठीचा रंग राखी करडा असतो. डोके लहान, पांढऱ्या रंगाचे व त्याच्या मागच्या भागावर लांब काळा तुरा असतो. मान लांब, बारीक, S या आकाराची व पांढरी असून तिच्या पुढच्या बाजूच्या मध्यावर काळ्या ठिपक्यांची ओळ असते डोळे सोनेरी पिवळे चोच लांब, अणकुचीदार, मळकट पिवळ्या रंगाची पाय लांब, हिरवट तपकिरी रंगाचे छातीवर लांब पांढरी पिसे व थोड्या काळ्या रेघा असतात शरीराची खालची बाजू भुरकट पांढरी असते. मादी नरासारखीच असते पण तिच्या छातीवरील पिसे आखूड आणि डोक्यावरील तुरा लहान असतो.

ढोक (आर्डिया सिनेरिया)

हे पक्षी बहुधा एकेकटेच असतात. भक्ष्य शोधण्यासाठी कधी हा मान पुढे लांबवून उथळ पाण्यातून सावकाश पावले टाकीत चाललेला दिसतो पण बहुधा पाण्याच्या काठावर निश्चल उभा राहून भक्ष्यावर पाळत ठेवतो आणि एखादा मासा किंवा बेडूक दिसल्याबरोबर चटकन खाऊन टाकतो. मासे, बेडूक, गोगलगायी, झिंगे, किडे इ. प्राण्यांवर तो आपली उपजीविका करतो.

उडत असताना हा पक्षी सहज ओळखता येतो. मान मागे दुमडून डोके दोन्ही खांद्यांमध्ये ओढून घेऊन व पाय मागच्या बाजूला लोंबकळत ठेवून आपले मोठे पंख लयबद्धतेने खालीवर करून संथपणे उडत जातो.

 

ढोकच्या प्रजोत्पादनाचा काळ मार्चपासून ऑगस्टपर्यंत असतो. मादी ४-६ समुद्री हिरव्या रंगाची अंडी घालते. घरटे काटक्याकुटक्यांचे बनविलेले असून झाडावर फार उंच ठिकाणी असते. एकाच झाडावर पुष्कळ जोडपी घरटी बांधतात. इतर बगळेही या झाडांवर घरटी बांधीत असल्यामुळे ही घरट्यांची एक वसाहतच असते.

 

कर्वे, ज. नी.