बेर्थेओ, गोंथालोदे : (सु. ११९८ – सु. १२६५). स्पॅनिश साहित्येतिहासातील प्राचीन कालखंडातला ज्ञात असा पहिला कवी उत्तर स्पेनमधील लोग्रोन्यो ह्या शहराजवळील बेर्थेओ येथे – किंवा त्या स्थळानजिक – त्याचा जन्म झाला. ख्रिस्ती धर्मातील बेनेडिक्टीन पंथाच्या एका मठात त्याने धार्मिक शिक्षण घेतले आणि तो धर्मोपदेशक झाला. सांतो दोमीगो दे सिलोस, सान मिल्लान आणि सांता ओरीया ह्या संतांवरील त्याच्या कविता आणि कुमारी मेरीच्या स्तुत्यर्थ त्याने केलेली काही काव्य रचना प्रसिद्ध आहेत. त्याच्या काव्य रचनेसाठी त्याने मध्ययुगीन लॅटिन साहित्यकृतींचा आधार घेतलेला असला तरी त्याच्या स्वतःच्या स्वतंत्र कवित्वशक्तीचा प्रत्यय देणारी बरीच मौलिक भरही त्याने तीत घातली आहे. त्याची रचना साधी, पण उत्कट असून तीत एक प्रकारचा विलोभनीय ताजेपणा आढळतो. नाव्हारा आणि कॅस्टील  ह्यांच्या सीमांवरील ख्रिस्ती मठांच्या लहानशा जगापलीकडे बेर्थेओच्या कविता कोणास ज्ञात नव्हत्या. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात त्या प्रथम प्रकाशित झाल्या.

कुलकर्णी, अ. र.