हार्टमान फोन औए : (बारावे ते तेरावे शतक ). मध्ययुगीन जर्मन कवी. दरबारी कवितेचा श्रेष्ठ रचनाकार. त्याच्या जन्म-मृत्यूच्या निश्चित तारखा ज्ञात नाहीत. काहींच्या मते ११६०–१२१० ह्या कालखंडात तो होऊन गेल्याचा संभव आहे. ११७०–१२२० आणि ११९०–१२१० असेही त्याचे कालखंड सांगितले जातात. तो स्वतःला स्वेबियन म्हणवतो. त्याच्या ग्रंथांतील उल्लेखांवरून असेही दिसते, की एका ख्रिस्ती मठशाळेत तो शिकला. त्याने मध्ययुगीन यूरोपमध्ये मुस्लिम सत्तेच्या ताब्यात गेलेली ख्रिस्ती धर्मीयांची पवित्र भूमी परत मिळविण्यासाठी जी धर्मयुद्धे झाली, त्यांतील एका धर्मयुद्धात भाग घेतला होता तथापि हे धर्मयुद्ध ११८९ चे की ११९७ चे, ह्याबद्दल मतभेद आहेत.

 

हार्टमानच्या उपलब्ध साहित्यात चार कथनकाव्ये आहेत : एरेक, ग्रेगोरिउस, डर आर्म हाइन्रिख आणि इवाइन. एरेक आणि इवाइन ही कथनकाव्ये आर्थर राजावर रचलेली आहेत. सुबोध शैली आणि प्रभावी निवेदन ही या महाकाव्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये. आर्थर राजाच्या अद्भुत कथांना आपला काव्यविषय करणाऱ्या महत्त्वाच्या जर्मन कवींत हार्टमानहा पहिला कवी होय. जातिवंत सरदारात शौर्य आणि सात्त्विक वृत्ती तर असायला हवीच परंतु त्याच्यात संयम आणि नेमस्तपणाही असला पाहिजे, हा बोध ह्या दोन कथनकाव्यांत आहे. हे दोन गुण असतील, तर सरदाराकडून अतिरेक होत नाही आत्मा आणि शरीर, लढवय्याची कर्तव्ये आणि सांसारिक जबाबदाऱ्या ह्यांत योग्य तो समतोलपणा निर्माण होतो. एरेक आणि इवाइन ह्यांच्याकडून ह्या तत्त्वाचे पालन होत नाही. त्यांच्याह्या चुकीचे त्यांना प्रायश्चित्तही मिळते. ग्रेगोरिउसकडून जे पाप घडते, ते अजाणता. भाऊ आणि बहीण ह्यांचा पुत्र होण्याचा आणि पुढे स्वतःच्या आईचाच पती होण्याचा दुर्भाग्ययोग त्याच्या आयुष्यात येतो तथापि त्याच्याकडून अजाणता झालेल्या पापाबद्दलही कठोर प्रायश्चित्त घेऊन तो ईश्वराची क्षमा प्राप्त करून घेतो. डर आर्म हाइन्रिखमध्ये हार्टमानने एका महारोग्याची कथा सांगितली आहे. हाइन्रिख हा सरंजामशाहीचा आदर्श आणि गर्विष्ठपणा हा त्याचा दुर्गुण. ह्या दुर्गुणामुळेच त्याला महारोग जडलेला असतो. शुद्ध अंतःकरणाच्या एखाद्या तरुण मुलीच्या हृदयाचे रक्त तिच्या पूर्ण संमतीने तुला मिळाल्यास तुझी ही व्याधी नाहीशी होईल, असे त्याला एका वैद्याने सांगितलेले असते. त्याच्याच खंडकऱ्याच्या मुलीनेदेऊ केलेले रक्त घेण्याच्या मनःस्थितीत असताना आणि तिच्या बलिदानाची तयारी सुरू असताना त्याच्या मनात तिच्याबद्दल सद्भावना निर्माण होते आणि त्याचा अहंकार गळून पडतो. नम्रतेचा महिमा त्याला कळतो आणि परमेश्वर त्याला क्षमा करतो. त्याची व्याधी नाहीशी होते आणि त्या शुद्ध, सदाचारी मुलीबरोबर तो विवाह करतो. हार्टमानच्या कथनकाव्यांतून बोधवादाचा सूर स्पष्टपणे प्रत्ययास येतो.

 

वरील चार कथनकाव्यांखेरीज हार्टमानच्या उपलब्ध साहित्यात दोन लहान रूपकात्मक प्रेमकविता, तेरा भावकविता आणि तीन धर्मयुद्ध- विषयक कविता ह्यांचा समावेश होतो.

 

हार्टमानच्या कवितेत त्याची उत्कट धर्मभावना आणि क्षात्रधर्माचे चित्रमय शैलीतील दर्शन घडते. त्यामुळेच मध्ययुगीन जर्मन दरबारी कवितेच्या इतिहासात त्याचे नाव ठळकपणे घेतले जाते.

 

दरबारी कविता समृद्ध करण्याचे श्रेय जर्मन कवी व्होल्फ्राम फोन एशेनबाख (११७०–१२२०) आणि गोट्फ्रीट फोन स्ट्रासबुर्ग ( तेरावे शतक) ह्यांच्या बरोबरीने हार्टमानकडे जाते.

 

कुलकर्णी, अ. र.