आर्किॲनेलिडा : ॲनेलिडा (वलयी प्राण्यांच्या) संघाच्या तीन वर्गांपैकी एका वर्गाचे नाव. या वर्गात वलयी कृमींच्या सहा-सात वंशांचा समावेश होतो. रचनेच्या साधेपणामुळे हे आद्य वलयी प्राणी असावेत असा एकेकाळी समज होता व म्हणूनच त्यांना आर्किॲनेलिडा हे नाव दिले गेले. परंतु आता असे सिद्ध झाले आहे की, रचनेचा हा साधेपणा लघुकरणामुळे (शरीरातील कित्येक रचना लहान किंवा नाहीशा झाल्यामुळे ) उत्पन्न झालेला आहे.

आर्किॲनेलिड प्राण्यांच्या शरीराचे स्पष्टपणे खंड पडलेले असतात पण हे खंडीभवन मुख्यतः आंतरिक असते पार्श्वपाद (शरीर-

पॉलिगॉर्डियस : (अ) जीवंत प्राण्यांचे पृष्ठीय दृश्य (आ) अग्र टोकाचे अधर दृश्य : (१) संस्पर्शक, (२) अभिमुख, (३) मुख, (४) परिमुख, (५) संस्पर्शकावरील पिंडिका.

खंडांच्या बाजूंवर जोडीने असणारे व पोहण्याकरिता उपयोगी पडणारे लहान स्‍नायुमय अवयव) नसतात किंवा त्यांचा र्‍हास झालेला असतो शूक (राठ केसांसारख्या रचना) देखील नसतात अथवा साधे असतात. पुष्कळ जातींच्या शरीरावर पक्ष्माभिकांची (केसासारख्या अगदी बारीक तंतूंची) वलये अथवा पट्टे असतात आणि पक्ष्माभिकांच्या हालचालींमुळे संचलन होते अभिमुखावर (कृमींमध्ये मुखाच्या पुढे असणारा डोक्याचा भाग, प्रोस्टोमियम) कधीकधी डोळे, स्पर्शक (अभिमुखावर असणारी संवेदी उपांगे), ग्रीवापृष्ठीय अंगे (अभिमुखाच्या पृष्ठावर असलेली ज्ञानेंद्रिये) अथवा शृंगिका (स्पर्शेंद्रिये) देखील असतात बहुतेक जातीत तंत्रिका तंत्र (मज्‍जातंतू व्यूह) बाह्यत्वचेत असते पॉलिगॉर्डिडी कुल सोडून बाकीच्या कुलांत एक स्‍नायुमय ग्रसनी-कोष्ठ (घशालगतची कोठी) असतो उत्सर्जन तंत्र डायनोफायलसमध्ये आदिवृक्ककांचे (वृक्कक म्हणजे शरीरातील निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकणारे नळीसारखे इंद्रिय) व इतर सर्व कुलांमध्ये पश्चवृक्ककांचे बनलेले असते काही जातीत लिंगे भिन्न असतात पण इतर जाती उभयलिंगी असतात नेरिल्लिडी आणि डायनोफायलिडी या कुलांत विकास सरळ असतो, पण इतर कुलांत ट्रोकोफोर डिंभ(फलन झालेल्या अंड्यापासून होणाऱ्या प्राण्याच्या विकासातील एक स्वतंत्र व प्रौढ प्राण्याशी साम्य नसलेली क्रियाशील पूर्व अवस्था) उत्पन्न होतो.

हल्ली आर्किॲनेलिडांची पॉलिगॉर्डिडी, सॅक्कोसीरिडी, प्रोटोड्रायलिडी, नेरिल्लिडी आणि डायनोफायलिडी अशी पाच कुले आहेत असे मानतात.

पॉलिगॉर्डिडी कुलातील कृमी लांब व त्यांच्या शरीराचे पुष्कळ खंड पडलेले असतात अग्र टोकाशी उपांगांची एकच जोडी असते संचलन पक्ष्माभिकांमुळे होत नाही पार्श्वपाद नसतात बहुतेक प्रकारात शूक नसतात उदा., पॉलिगॉर्डियस.

 

सॅक्कोसीरिडी कुलातील कृमींच्या प्रत्येक खंडावर दोन्ही बाजूंना एकेक नलिकाकार पार्श्वपाद असून त्याच्यावर शूकांचा एकेक जुडगा असतो तंत्रिका तंत्र बाह्यत्वचेच्या खाली असते उदा., सॅक्कोसीरस.

 

प्रोटोड्रायलिडी कुलातील प्राण्यांच्या प्रत्येक खंडाभोवती पक्ष्माभिकांचे अपूर्ण वलय असते अग्र टोकाशी उपांगांची एक जोडी पार्श्वपाद किंवा शूक नसतात उदा., प्रोटोड्रायलस.

 

नेरिल्लिडी कुलात शरीराचे खंड नऊपेक्षा जास्त नसतात स्पर्शकांची एक आणि मुखपूर्व संस्पर्शकांच्या (लांब, लवचीक स्पर्शेंद्रियांच्या) तीन जोड्या पार्श्वपादांची थोडीफार वाढ झालेली असून प्रत्येकावर एका रोमाने (ताठ केसासारख्या रचनेने) विभक्त झालेले शूकांचे दोन जुडगे असतात उदा., नेरिल्ला.

डायनोफायलिडी कुलातील कृमी आखूड असतात पुढच्या उपांगांची जोडी, पार्श्वपाद अथवा शूक नसतात परंतु शरीराभोवती पक्ष्माभिकांची अपूर्ण वलये असतात उदा., डायनोफायलस.

 

बहुतेक आर्किॲनेलिड प्राणी समुद्रात वाळूमध्ये राहतात, परंतु काही मचूळ पाण्यात व गोड्या पाण्यातही असतात.

कर्वे, ज. नी.