बर्सेरेसी : (गुग्गुळ कुल). उष्ण कटिबंधात आढळणारे फुलझाडांचे [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक कुल. एकूण सु. १३ वंश व ६०० जाती (जी. एच्. एम्, लॉरेन्स यांच्या मते २० वंश व ५००-६०० जाती) यात समाविष्ट असून बहुतेक सर्व अमेरिकेतील पानझडी वृक्ष व क्षुपे (झुडपे) आहेत. पाने संयुक्त, बहुधा एकाआड एक व तैल प्रपिंडयुक्त (ग्रंथियुक्त) मध्यत्वचेत राळ-नलिका फुले लहान, बहुधा एकलिंगी, त्रि-पंच-भागी केसरदले (पुं-केसर) परिदलांच्या दुप्पट किंवा तितकी व सुटी आणि त्यांच्या किंवा बिंबाच्या तळाशी चिकटलेली किंजपुट ऊर्ध्वस्थ (इतर पुष्पदलांच्यापेक्षा वरच्या पातळीत) व अनेक कप्प्यांचा आणि प्रत्येक कप्प्यात दोन एकमेकांशेजारी असलेली बीजके [→फूल]. अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळात किंवा बोंडात २-५, अपुष्प (गर्भाबाहेर अन्नांश नसलेली) बीजे असतात. यातील अनेक वनस्पतींपासून सुगंधी राळ, धूप व वोळ यांसारखे उपयुक्त पदार्थ मिळतात. ⇨ सालई, ⇨ गुग्गुळ, ⇨काकड, ⇨राळधूप इ. वनस्पती याच कुलातील आहेत. ह्या कुलाचा अंतर्भाव ⇨रूटेलीझ गणात केला जातो.

पहा : रूटेलीझ

संदर्भ : Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

चौगले, द. सी.