गुड-फ्रायडे : ख्रिस्ती धर्मातील हा एक अत्यंत पवित्र व महत्त्वाचा दिवस असून तो ⇨ईस्टरच्या अगोदर आणि लेंटच्या (ॲश वेन्सडेपासून ईस्टर-ईव्हपर्यंतचे चाळीस दिवस चालणारा ख्रिस्ती उपवासाचा काल) शेवटी जो शुक्रवार येतो, त्या दिवशी पाळतात. ह्या शुक्रवारी रोमन गव्हर्नर पिलाता याच्या हुकुमावरून येशू ख्रिस्ताला गुन्हेगाराप्रमाणे दोन चोरांच्या मध्ये क्रुसावर चढविण्यात आले. तीन वाजता येशूचे प्राणोत्क्रमण झाले. क्रुसावर तीन तास मरणयातना सहन करीत असताना त्याने सात वाक्ये उच्चारली. हा शुक्रवार शुभ मानला जातो आणि दर वर्षी ह्या दिवशी सर्व ख्रिस्ती लोक चर्चमध्ये एकत्र जमून येशूने भोगलेल्या मरणयातनांचे भक्तिभावे स्मरण करतात आणि त्याने उच्चारलेल्या सात वाक्यांचे मनन करतात. ह्या दिवशी कडक उपवास करतात. मद्यमांससेवन ह्या दिवशी वर्ज्य मानले जाते.               

आयरन, जे. डब्ल्यू. साळवी, प्रमिला