गिनीपिग : स्तनिवर्गाच्या कृंतक म्हणजे कुरतडून खाणाऱ्या प्राण्यांच्या गणातील केव्हीइडी कुलातल्या केव्हिया  वंशाचे प्राणी. या वंशातील रानटी प्राण्यांना केव्ही व पाळीव प्राण्यांना गिनीपिग म्हणत पण हल्ली या दोन्ही प्रकारच्या प्राण्यांना गिनीपिगच म्हणतात. केव्हिया  वंशात सु. २० जाती आहेत. रानटी जाती दक्षिण अमेरिकेत कोलंबिया आणि व्हेनेझूएलापासून दक्षिणेकडे ब्राझील आणि उत्तर अर्जेंटिनापर्यंत आढळतात. हे प्राणी खडकाळ प्रदेश व गवताळ राने यांत आणि अरण्ये व दलदली यांच्या कडेने राहतात. यांचे मांस स्वादिष्ट असल्यामुळे दक्षिण अमेरिकेतील इंडियन लोकांनी त्यांना माणसाळविले.

गिनीपिग

  

याची डोक्यासकट शरीराची लांबी २२—३५ सेंमी. व प्रौढाचे वजन ०.५—०.७ किग्रॅ. असते. केव्हिया  वंशातले प्राणी मजबूत बांध्याचे असतात शेपूट नसते पाय आखूड असून पुढच्या पायांवर चार आणि मागच्यांवर तीन बोटे असतात सगळ्या बोटांवर टोकदार नखर (नख्या) असतात कान वाटोळे व लहान असून त्यांवर लव नसते रानटी जातींच्या अंगावरील केस खरखरीत व लांब असतात, पण माणसाळलेल्या गिनीपिगांचे केस नितळ व आखूड किंवा लांब असतात. माणसाळलेल्या गिनीपिगांचे रंग जरी विविध असले, तरी रानटी जाती फिक्कट करड्या किंवा तपकिरी रंगाच्या असतात.

गिनीपिग बिळात राहणारे असून ही बिळे ते स्वतः खणतात किंवा इतर प्राण्यांची वापरात नसलेली बिळे ते वापरतात. हे प्राणी गटागटाने राहणारे असून एका गटात पाच-दहा गिनीपिग असतात. धोक्याची यत्किंचित सूचना मिळताच ते पळून जातात. निरनिराळ्या प्रकारचा भाजीपाला, झाडाझुडपांचे मऊ भाग व हिरवे गवत हे खातात.

मादीची वीण वर्षातून दोनदा किंवा तीनदा होते. रानटी माद्यांना दर खेपेस एक ते चार पिल्ले होतात, पण पाळीव प्राण्यांत त्यांची संख्या आठपर्यंतही असते. गर्भावधी ६०—७० दिवसांचा असतो. जन्माच्या वेळी पिल्लांचे डोळे उघडे असून शरीरावर दाट केस असतात. जन्मल्यापासून काही तासांतच पिल्ले आईबरोबर हिंडूफिरू लागतात. सु. तीन आठवड्यांनी मादी पिल्लांचे दूध तोडते. ५५—७० दिवसांनंतर त्यांना लैंगिक पक्वता येते. गिनीपिग सु. सहा ते आठ वर्षे जगतो.

गिनीपिगांच्या अंगाला जरी घाणेरडा वास येत असला, तरी पुष्कळ लोक मोठ्या आवडीने त्यांना बाळगतात. रोग, पोषण आणि आनुवंशिकता यांसारख्या वैद्यकीय व जीववैज्ञानिक विषयांच्या अभ्यासाकरिता आणि संशोधनाकरिता प्रयोगशाळांतून गिनीपिगांचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. यांचे मांस उत्कृष्ट असल्यामुळे खाण्याकरिताही त्यांचा उपयोग करतात.

केव्हिया पोर्सेलस  या रानटी जातीपासून पाळीव गिनीपिगांचे निरनिराळा वाण तयार केलेले आहेत. 

यार्दी, ह. व्यं.