द्यागिल्येफ, स्यिरग्येई पव्हलॉव्ह्यिच : (१९ मार्च १८७२–१९ ऑगस्ट १९२९). यूरोपीय बॅले नृत्याला नवचैतन्य देणारा रशियन कलावंत. जन्म रशियातील नॉव्हगोरॉड प्रांतात. सेंट पीटर्झबर्ग येथे कायद्याचा अभ्यास. तथापि त्याचा कल संगीत, नृत्य, रंगभूमी यांच्याकडेच अधिक होता. आधुनिक युरोपीय कलाकृतींची अनेक प्रदर्शने त्याने सेंट पीटर्झबर्ग येथे भरविली. द वर्ल्ड ऑफ आर्ट (इं. शी.) या मासिकाचा तो प्रवर्तक होता. रशियातील ‘इंपीरिअल थिएटर्स’ मध्ये साहाय्यक म्हणून काम करीत असताना त्याने १८९९ ते १९०० दरम्यान या संस्थेचे वार्षिक अहवाल संपादित केले. सेंट पीटर्झबर्ग येथे १९०५ मध्ये त्याने रशियन ऐतिहासिक व्यक्तिचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले. पुढील वर्षीच पॅरिसमध्येही असेच एक प्रदर्शन त्याने भरविले. १९०७ मध्ये पॅरिसमधील संगीत कार्यक्रमांतून त्याने रशियन संगीतकारांची ओळख यूरोपीय जगाला करून दिली. त्याने १९०८ पासून सर्वस्वी बॅले नृत्य कलेला वाहून घेतले. स्वतःच्या नावाची बॅले नृत्यसंस्था स्थापन करून १८ मे १९०९ रोजी पॅरिसमध्ये त्याने पहिला कार्यक्रम सादर केला. पुढील २० वर्षे सर्व यूरोपभर त्याने बॅले नृत्याचे कार्यक्रम नव्या नव्या स्वरूपांत सादर केले. संगीत, नृत्य, सजावट या सर्वांचे चित्तवेधक व कुशल संयोजन करण्यात द्यागिल्येफ प्रवीण होता. त्याच्या बॅले नृत्यात विकासाचे तीन टप्पे दिसून येतात : झगमगीत आशियाई स्वरूपाच्या बॅलेचा पहिला टप्पा सफाईदार फ्रेंच ठशाचा दुसरा टप्पा आणि काटेकोर, शैलीबद्ध अशा सुविहित बॅलेचा तिसरा टप्पा. १९२१ मध्ये त्याने प्रसिद्ध रशियन संगीतकार ⇨चायकॉव्हस्की याचा द स्लीपिंग ब्यूटी हा बॅले मूळ स्वरूपात सादर केला. त्यापुढील काळात संगीत सजावट आणि नृत्यालेखन या बाबतीत त्याने अनेक प्रयोग केले. आधुनिक यूरोपीय बॅले नृत्यावर द्यागिल्येफचा फार मोठा ठसा उमटला आहे. मीशेल फॉकीनसारखा प्रतिभावंत नृत्यालेखनकार तसेच पिकासो, मातीस यांसारखे श्रेष्ठ चित्रकार द्यागिल्येफच्या साहाय्यकांत होते. तो उत्कृष्ट संघटक आणि प्रदर्शक होता. व्हेनिस येथे ताे निधन पावला.
संदर्भ : Buckle, R. In Search of Diaghilev, New York, 1961.
जाधव, रा. ग.
“