नाडीव्रण : (नालव्रण). त्वचेवर व्रण असून त्याच्या तळापासून आत कमीअधिक खोलवर जाणाऱ्या अरुंद नलिकाकार मार्गाला किंवा दोन पोकळ अवयवांना जोडणाऱ्या विकृत मार्गाला नाडीव्रण किंवा नालव्रण म्हणतात. इंग्रजी भाषेतील सायनस (Sinus) आणि फिस्चुला (Fistula) या दोन्ही संज्ञांचा अर्थ यात सामाविलेला आहे कारण दोन्हीमध्ये अत्यल्प फरक असतो.

नाडीव्रणाची नलिकावजा पोकळी कणोतकाने (नवीनच तयार झालेल्या व तंतुमय ऊतकाने ऊतक म्हणजे समान कार्य व रचना असलेल्या पेशींचे समूह) किंवा उपकलेने (पातळ अस्तराने) आच्छादिली गेल्यामुळे, तसेच तीच्यातून अधूनमधून किंवा एकसारखा मल, मूत्र, स्राव इत्यादींचा निचरा होत गेल्यामुळे ती इतर जखमांप्रमाणे भरून येणे अशक्य असते.

स्थानपरत्वे नाडीव्रणाचे प्रकार ओळखले जातात. अश्रू ग्रंथीमध्ये विद्रधी (पू असलेला फोड) होऊन तो फुटल्यास पापणीच्या आतील कोपऱ्यात जो नाडीव्रण बनतो त्याला ‘नासूर’ वा ‘लासूर’ म्हणतात. लाला ग्रंथींपैकी अनुकर्ण ग्रंथीच्या (बाह्यकर्णाच्या पुढे गालावर असणाऱ्या ग्रंथीच्या) विद्रधीपासून वा आघातामुळे लालानलिका तुटल्यामुळे जो नाडीव्रण तयार होतो त्याला ‘अनुकर्ण ग्रंथी नाडीव्रण’ म्हणतात. गंडमाळा [मानेतील लसीका ग्रंथींच्या क्षयरोगजन्य विकृतीचा परिणाम →गंडमाळा] या विकृतीत मानेवर एकापेक्षा अधिक नाडीव्रण तयार होतात. ⇨ किरणकवक रोगातही नाडीव्रण उत्पन्न होतात.

गुदांत्र आणि मूत्राशय यांना जोडणाऱ्या नाडीव्रणाला गुद-मूत्राशय नाडीव्रण, तसेच स्त्रियांमध्ये योनिमार्ग व मूत्राशय यांना जोडणाऱ्या नाडीव्रणाला ‘मूत्राशय-योनी नाडीव्रण’ म्हणतात. नाडीव्रण ज्या पोकळीपर्यंत किंवा अंतस्त्यापर्यंत (छाती व पोट यांतील एखाद्या इंद्रियापर्यंत) गेला असेल त्यावरूनही त्यास नावे देतात, उदा., ‘उदरगत नाडीव्रण’, ‘मूत्रनलिकांतर्गत नाडीव्रण’, ‘पैत्तिक नाडीव्रण’, वगैरे. गुदद्वारासभोवती विद्रधी फुटून जो नाडीव्रण होतो त्याला ⇨ भगंदर म्हणतात व तो सर्व प्रकारच्या नाडीव्रणांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो.

काही नाडीव्रण जन्मजात असतात व ते गर्भवाढीतील दोषामुळे उद्‌भवतात. त्यांना ‘जन्मजात नाडीव्रण’ म्हणतात. मानेवरील अशा प्रकारचे नाडीव्रण ग्रसनी (घसा), स्वरयंत्र, श्वासनाल किंवा फुप्फुसापर्यंत गेलेलेही आढळतात.

बहुतेक नाडीव्रण शस्त्रक्रियेशिवाय बरे होत नाहीत. शरीरस्थानपरत्वे साधी किंवा विशेष आणि जटिल (गुंतागुंतीची) शस्त्रक्रिया करावी लागते.

ढमढेरे, वा. रा. भालेराव, य. त्र्यं.