विद्यासागरांकडून प्रेरणा घेतलेल्या संस्कृत कॉलेजमधील काही शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी बंगाली गद्याचे दालन नानाविध प्रकारची ग्रंथरचना करून समृद्ध केले. त्यांच्यापैकी उल्लेखनीय ग्रंथकार म्हणजे ताराशंकर तर्करत्न, रामगती न्यायसत्न, गिरीशचंद्र विद्यारत्न, आनंदराम विद्यावागीश, कालीमय घटक, द्वारकानाथ विद्याभूषण इ. होत.

हिंदू कॉलेजशिक्षित लेखकांनी इंग्रजी साहित्याचे ‘वाघिणीचे दूध’ पचवून बंगाली साहित्यात युरोपीय धर्तीची निर्मिती करण्याचा चंग बांधला. लवकरच कविता, नाटक आणि कादंबरी या क्षेत्रांत या मनसुब्याचे फलित दिसूही लागले. संस्कृत कॉलेज-गटानेही या कार्यास नितान्त सहकार्य दिले. हिंदू कॉलेजीय साहित्यिकांच्या प्रयत्नांना या पंडितांनी सार्थकतेच्या वाटेने नेले. मायकेल मधुसूदन दत्तांनी नवीन कविता लिहिली तर काव्यात नवीन प्राण फुंकले बिहारीलाल चक्रवर्तींनी. हरचंद्र घोष व गोविंदचंद्र गुप्त यांनी पहिलीवहिली नाटके लिहिली, तर तोच धागा नेटाने पुढे नेला रामनारायण तर्करत्न यांनी.

एकोणिसाव्या शतकाच्या चवथ्या दशकात कनिष्ठ पातळीवरील सरकारी कामकाजासाठी व जमीनमहसूल इ. कारभारासाठी फार्सीऐवजी बंगाली भाषेचा वापर करण्याचा फतवा कंपनी सरकारने काढला. त्यामुळे बंगाली भाषेचा सर्वदूर प्रसार होण्यास मदत झाली. बंगाली भाषेचे शिक्षणातील महत्त्व वाढले. बंगाली पुस्तके अधिक संख्येने निघू लागून साहित्यनिर्मितीस प्रोत्साहन लाभले. ‘द स्कूल सोसायटी’, ‘द स्कूलबुक सोसायटी’, ‘अकॅडेमिक असोशिएशन’, ‘बेथ्यून सोसायटी’ इ. संस्थांचे कार्य या संदर्भात संस्मरणीय आहे. मुलामुलीच्या, खास करून स्त्रियांच्या शिक्षणासाठी सरकारने १८५१ मध्ये ‘व्हर्‌नॅक्युलर लिटररी सोसायटी’ ही एक निमसरकारी संस्था स्थापन केली. या संस्थेने पुष्कळ चांगली पुस्तके स्वतंत्रपणे लिहवून घेऊन किंवा इंग्रजी, संस्कृत इ. भाषांतून अनुवाद करवून ‘गार्हथ्य पुस्तक संग्रह’ या मालेत सचित्र छापून अल्पमोलाने विक्रीस उपलब्ध करून दिली. या मालेस कमालीची जनप्रियता लाभली. आरंभीच या संस्थेने राजेंद्रलाल मित्रांसारख्या पंडिताच्या साहाय्याने एक सचित्र ‘पेनी मॅगेझिन’ सुरू केले. आधुनिक बंगाली साहित्याच्या इतिहासात या विविधार्थसंग्रह मासिकाच्या उपक्रमाचे महत्त्व वादातील आहे. याच मासिकाचे बांधीव खंड वाचून बालपणी रविंद्रनाथांनी स्वतःचे शिक्षण संपादन केले होते.

संवाद प्रभाकर साप्ताहिकांचे संपादक ईश्‍वरचंद्र गुप्त यांनी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास बंगाली साहित्याचा कायापालट घडून येत असताना मध्यस्थाची कामगिरी बजावली. ते एकीकडे भारतचंद्रांच्या कवितेचे भोक्ते होते आणि दुसरीकडे ‘कवीवाला’ फडातील कवनांतही रस घेत. त्यांनी इंग्रजी शिक्षित तरुणांच्या नवनिर्मितीकडेही कानाडोळा केला नाही उलट समंजस अशी आस्थाच दाखविली. त्यांच्या स्वतःच्या कवितेतही नवयुगाची झुळूक जाणवते. भारजचंद्रप्रभृती जुन्या लहान-थोर कवींची चरित्रे लिहून त्यांनी बंगाली साहित्येतीहासाची पायाभरणी केली. संवाद प्रभाकरच्या स्तंभांतून त्यांनी नवशिक्षित युवकांच्या कविता नियमित प्रकाशित केल्या. स्वतः सनातनी गटात जमा होत असले, तरी समाजसुधारणेबाबत ते उदासीन नव्हते. नकली विलायती वळणाची त्यांनी चीड असे व त्यांच्या उपरोधिक कवितांत ती झणझणीतपणे व्यक्त होई. प्रबोधचंद्रोदय (१८५७) या अनुवादीत नाटकातील त्यांची स्वरचित पदे उत्कृष्ट आहेत.

नवकवितेचे पहिले उल्लेखनिय पथप्रदर्शक ⇨ रंगलाल बंदोपाध्याय (१८२६ – ८६) हे संवाद प्रभाकर पत्रास ईश्‍वरचंद्र गुप्त यांचे सहकारी होते. ईश्‍वरचंद्रासारखेच स्वशिक्षित असूनही त्यांनी इंग्रजी साहित्याचा दांडगा व्यासंग केला. सरकारी नोकरीनिमित्त ओरिसा प्रांतात वास्तव्य केल्याने तेथील ओडिया भाषेशी त्यांची ओळख झाली. टॉडच्या ॲनल्स ऑफ राजस्थान ग्रंथाने बराच काळ बंगाली प्रतिभावंतांना मोहिनी घातली होती. रंगलाल यांचे पद्‌मिनी उपाख्यान (१८५८) हे काव्य नव्या आख्यान कवितेचे पहिले आणि चांगले उदाहरण राजस्थानी विरगाथेवरच आधारित असून नंतरही कर्मादेवी (१८६२) व सुरसुंदरी (१८६८) ही काव्य राजपूत इतिहासातील घटनांवर आधारीत होती. कांची – कावेरी (१८७९) या आपल्या काव्यात त्यांनी पुरुषोत्तम दास या ओडिया कवीच्या जुन्या कवितेचा आधार घेतला. कुमारसंभवाचाही पद्यानुवाद त्यांनी केला (१८७२).

बंगाली काव्येतिहासात प्रथम मनू पालटविला तो ⇨ मायकेल मधुसूदन दत्त (१८२४ – ७३) यांनी. कलकत्त्यातील खिदिरपूर (किदरपूर) भागात ते रंगलाल बंदोपाध्याय यांच्या शेजारीच राहत व उभयतांची दोस्तीही होती. मधुसूदनांचा प्रथम काव्यग्रंथ म्हणजे तिलोत्तमा संभव (१८६०). त्यात त्यांनीच जुळविलेला ‘अमित्राक्षर छंद’ प्रथम प्रयोजित झाला. त्यांचे मेघनादवध काव्य (१८६१) हे बंगालीतील प्रथम प्रौढ आणि श्रेष्ठ महाकाव्य होय. या सबंध काव्यावर त्यांच्या परिणतप्रज्ञ प्रतिभेचा सुस्पष्ट ठसा जाणवतो. त्यांनी गीतिकवितेचीही उपेक्षा केली नाही. त्याच्या ब्रजांगना काव्याचा विषय पदावली-साहित्याचा परिशिलनातून स्फुरला असला, तरी रचना इंग्रजी ‘ओड’च्या (उद्देशिका) धर्तीने केला आहे. अतिशय सरस आणि आस्वाद्य असे हे काव्य आहे. अखेरीस त्यांनी-परदेशी असताना -काही सुनीतेही लिहिली. ती त्यांच्या चतुर्दशपदी कवितावलि (१८६५) या ग्रंथात संकलित झाली. त्यांनी प्रचलित केलेले ‘सॉनेट’ बंगाली साहित्यातील त्यांची यशस्वी आणि संस्मरणीय कामगिरी ठरते.

हिंदू कॉलेजीय साहित्यिकांनी बंगाली नाटकांचा पायंडा पाडला. ही पहिली बंगाली नाटके म्हणजे ताराचरण शिकदार यांचे मद्रार्जुन नाटक आणि गोविंददत्त गुप्त यांचे कीर्तिविलास. १८५२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या दोन नाटकांपैकी पहिले सुखान्त असून दुसरे शोकान्त आहे. यांच्यानंतर हिंदू कॉलेजच्या हरचंद्र घोष यांनी व संस्कृत कॉलेजच्या रामानारायण तर्करत्न यांनी काही नाटके लिहिली. तर्करत्नांचे पहिले नाटक कुलीनकुल सर्वस्व (१८५४) रंगभूमीवरही अवतीर्ण झाले. मात्र नाट्यरचना म्हणून ते ढिसाळ वाटते. चांगली नाटके लिहिण्याचे मानाचे पान पुन्हा एकवार द्यावे लागते ते मायकेल मधुसूदन दत्त यांनाच. ऐतिहासिक नाटक, प्रहसन, रम्य सुखान्तिका आणि शोकान्तिका यासर्वच प्रकारात त्यांनी सरस लेखन केले. दुसरे मानकरी म्हणजे ⇨ दीनबंधू मित्र (१८२९ – ७४).


मधुसूदनांनंतरचे महत्वाचे कवी म्हणून ख्याती पावलेल्यांपैकी ⇨ हेमचंद्र बंदोपाध्याय (१८३८ – १९०३) यांनी दघिची मुनीच्या त्यागाची गाथा गाणारे वृत्तसंहार काव्य हे सयमक महाकाव्य लिहिले (पूर्वार्ध १८७५ व उत्तरार्ध १८७७). चिंतातरंगिणी काव्य (१८६१), बिरबाहु काव्य (१८६४), टेंपेस्टरोमिओ अँड ज्युलिएट नाटकांचे अनुवाद (१८६८, १८९५), भारतसंगीत (१८७०), कवितावलि (१८७०) इ. त्यांच्या अन्य रचना प्रसिद्ध आहेत (मधुसूदन व रंगलाल यांच्या शेजारीच ते राहत असत व आज या कवी त्रिकूटाचे हे वास्तव्यस्थल ‘कवितार्थ’ म्हणून ओळखण्यात येते). दान्तेच्या दिव्हीना कोम्मेदिआच्या अनुकरणाने त्यांनी छायामयी काव्य (१८८०) लिहिले. त्यांच्या स्फुट रचनांपैकी स्वदेशभक्तीने रसरसलेल्या कविता व उपहासउपरोधाने नटलेल्या व्यंगकविता उल्लेखनीय आहेत. हेमचंद्रांची शब्दसंपत्ती व छंदोलालित्य प्रशंसनीय होते. त्यांच्या उत्तरसूरींत यशस्वी कवी म्हणून ⇨ नवीनचंद्र सेन (१८४६-१९०९) यांचे नाव प्रथम घ्यावे लागेल. त्यांच्या काव्यसंभारापैकी पलाशीर युद्ध (१८७५) सर्वांत लोकप्रिय ठरले. महाभारतीय कथाभागावर आधारित त्यांचे त्रिखंडात्मक महाकाव्य ही गाजले. रैवतक (१८८६), कुरुक्षेत्र (१८९३) आणि प्रभास (१८९६) या तीर्थाच्या त्रिकोणात त्यांनी भारतधारा कौशल्याने खेळविली आहे.

एकोणिसाव्या शतकात बंगाली साहित्य आणि संस्कृतीत प्रबोधनाची एक विराट लाट उसळली. या नवजागरणात अनेक मनीषींच्या व धनिक परिवारातील वा मध्यमवर्गीय कुटुंबांतील मंडळींचा व्यक्तिगत आणि सामायिक हातभार लागला. त्यात कलकत्त्यातील महर्षी ⇨ देवेंद्रनाथ टागोर (१८१७ – १९०५) यांचा, किंबहुना जोडासांको भागातील टागोर (ठाकूर) परिवाराचा बहुमुखी कार्यकलाप सर्वाधिक व्यापक व प्रभावी ठरला. १८३९ साली स्थापन झालेल्या ‘तत्त्वबोधिनी सभा’ या संस्थेचे मुखपत्र म्हणून देवेंद्रनाथांनी, तत्त्वबोधिनी पत्रिका हे मासिक सुरू केले. स्वतः देवेंद्रनाथ, राजनारायण बसू, ईश्‍वरचंद्र विद्यसागर, ⇨ अक्षयकुमार दत्त (१८२० – ८६) प्रभृतींनी या ⇨ ब्रह्मोसमाजाच्या मुखपत्रास लेखसहाय्य केले. अक्षयकुमार बारा वर्षे याचे संपादक होते. त्यांच्या पत्रिकेतील लेखांचे संग्रह पुढे पुष्कळ पिढ्यांना पाठ्यपुस्तके म्हणून अभ्यासावे लागले. विज्ञानाचे अध्ययन करून लिहिणारे तेच पहिले भारतीय असावेत. भारतवर्षीय उपासक संप्रदाय (दोन खंड, १८७० व १८८३) हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या अदम्य उद्यमाची साक्ष देतो. स्वतः देवेंद्रनाथांचे लेख, भाषणे, पत्रे यांतूनही बंगाली गद्यांच्या उत्क्रांतीचे एक निर्व्याजमनोहर रूप समोर येते. हाच वारसा त्यांच्या प्रतिभावंत पुत्रांनी उचलला.

बंगालच्याच नव्हे तर नवभारताच्या सांस्कृतिक आणि औद्योगिक उत्कर्षाचा उगम या टागोर परिवाराच्या पुरातन आणि नूतन यांचा समन्वय साधणाऱ्या भावधारेतून झालेला आढळतो. देवेंद्रनाथांचे दृढचित्त, उदात्त व्यक्तिमत्त्व, स्वदेशप्रीती, ईश्‍वरभक्ती इ. गुणांचा विचार करता उपनिषदातील जनक राजाची प्रतिमा मनश्‍चक्षूंपुढे उभी राहते. देवेंद्रनाथांचे पुत्र, कन्या, पुतणे, जामाद, नातवंडे या सर्वांनी साहित्य, संगीत, चित्रकला, व्यवसाय-वाणिज्य, स्वदेशोन्नती, शिष्टाचार इ. विविध क्षेत्रांत नवे मानदंड प्रस्थापित केले आणि देशभर रसबोधाची, रसज्ञतेची नवी जाणीव निर्माण केली. त्यांचे श्रेष्ठ पुत्र ⇨ द्विजेंद्रनाथ टागोर (१८४० – १९२६) तत्त्वचिंतक म्हणून विशेष प्रसिद्ध असले, तरी स्वप्नप्रयाण (१८७५) या त्यांच्या अभिनव व अद्वितीय रूपक महाकाव्यामुळे त्यांचे नाव बंगाली साहित्यात चिरकाल टिकून राहील. संगीत, चित्रकला, हस्तशिल्प, विनोद, गणित अशा विविध विषयांत लीलया संचारणारी त्यांची प्रतिमा तत्वज्ञानात स्थिरावली. गीतापाठ (१९१५) ही त्यांची भगवद्‌गीतेवरील मौलिक टीका अनेकांच्या मते आजही सर्व गीताटीकांत उच्चासनाचा बहुमान मिळवेल. रेखाक्षर लघुलिपीची संपूर्ण कल्पना विशद केली आहे. रविंद्रनाथांच्या विवाहाप्रसंगी आहेरादाखल लिहिलेली ‘जौतुक ना कौतुक’ ही त्यांची दीर्घ उपहासिका निर्मळ विनोदासाठी वाचनीय ठरते.

मधले चिरंजीव ⇨ सत्येंद्रनाथ टागोर (१८४२ – १९२३) हे आय्. सी. एस्. उत्तीर्ण होणारें प्रथम भारतीय अंमलदार यांची नोकरीची कारकीर्द तत्कालीन मुंबई इलाख्यात गेली. महाराष्ट्राला त्यांनी दुसरी मातृभूमीच मानले. तुकारामांचे काही अभंग त्यांनी बंगालीत अनुवादीत केले व त्याच्यावर एक इंग्रजी निबंधही लिहिला. तरुणपणी त्यांनी सुशीला वीरसिंह हे नाटक ही शेक्सपिअरच्या आधाराने लिहिले. काही गीतेही त्यांनी लिहिली. देवेंद्रनाथांचे पाचवे पुत्र ⇨ ज्योतिरिंद्रनाथ टागोर (१८४८ – १९२५) हे तर सरस्वतीचे वरदपुत्र म्हणता येतील अशा अलौकिक प्रतिमेचे धनी होते. संगीत, वादन, चित्रकला, साहित्य, नाट्य, अभिनय, भाषाभ्यास, अनुवादकार्य, तत्वज्ञान अशा विविध विषयांत त्यांना गती होती. किंचित जलयोग (१८७२) ही त्यांची उपहासपर एकांकिका आजही आस्वाद्य वाटते. पुरुविक्रम (१८७४), सरोजिनी (१८७५, न. चि. केळकर यांनी याच नाटकाचा मराठीत अनुवाद करून आपल्या साहित्यसाम्राज्याचा पाया घातला), अलीकबाबू (१८७७), अश्रुमती नाटक (१८७९), मानमयी (१८८०) इ. त्यांची नाटके गाजली. स्वप्नमयी (१८८२) हे त्यांचे अखेरचे स्वतंत्र नाटकही उल्लेखनीय आहे. फ्रेंच आणि संस्कृत भाषांतून त्यांनी अनेक वाङ्‌मयकृती बंगालीत आणल्या. वयाच्या सतराव्या वर्षी लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्याचा त्यांनी मूळ मराठीवरून अनुवाद केला.

महर्षी सातवे पुत्र ⇨ रवींद्रनाथ टागोर (१८६१ – १९४१) यांनी बंगालमध्ये एक युगांतर घडवून आणले. काव्ये, कविता, गीते, संगीतरचना, कथा, कांदबऱ्या, निबंध, नाटके, प्रहसने, संगीतिका, चित्रकला, समीक्षा, पत्रलेखन, अभिनय, शिक्षणविचार, राजनीती इ. दशदिशांनी त्यांची प्रतिमा सदैव बहरत राहिली. १९१३ साली साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाल्याने जगभर त्यांच्या साहित्याविषयी कुतूहल जागृत झाले. त्यांच्या बहुगुणी सर्जनशीलतेस भारतात तरी तुलना नाही. देवेंद्रनाथांच्या कन्यांमध्ये ⇨ स्वर्णकुमारी देवी (१८५५-१९३२) यांनी साहित्याच्या विविध दालनांत सहज विहार केला. त्यांचे कादंबरीलेखन विशेष नजरेत भरते. बंगाली स्त्रीकादंबरीकारांत त्याच पहिल्या आणि महत्वाच्या. देवेंद्रनाथांचे दोघे पुतणे गगनेंद्रनाथ (१८६७ – १९३८) आणि ⇨ अवनींद्रनाथ टागोर (१८७१ – १९५१) या उभयतांनीही आधुनिक कालखंडात भारतीय चित्रकलेच्या इतिहासात क्रांती घडवली. अवनींद्रनाथांनी कुंचल्याइतकेच सफाइने कलमही चालवून बंगाली साहित्य समृद्ध केले. राजकाहिनी (१९०८), भूतपतरीर देश (१९१५), खतांचिर खाता (१९१६), पथेविपथे (१९१९), बागेश्‍वरी शिल्पप्रबंधावलि (१९४१), भारतशिल्प, घरोया (१९४१), जोडासांकोर धारे (१९४४) ही त्यांची पुस्तके साहित्याची भूषणे आहेत.

त्याकाळी टागोर परिवाराने सकल स्वदेशी व विधायक उपक्रमांचा हिरिरीने पाठपुरावा केला. ‘राष्ट्रीय’ (नॅशनल) ही कल्पनाच टागोरवाडीचा प्रसाद आहे व तेथील विचारवंतांच्या आशीर्वादाने आणि आश्रयाने ती परिपुष्ट झाली आहे, असे म्हणता येईल. ज्योतिरिंद्रनाथांभोवती या परिवारातील प्रतिभावंतांनी एक स्वतःचे असे साहित्यसंस्कृतिकेंद्र आकारास आणले होते. त्यातूनच भारती (१८७७-१९२७) या साहित्यपत्राचा जन्म झाला. याचे प्रथम संपादक होते द्विजेंद्रनाथ टागोर. नंतर दीर्घकाळ स्वर्णकुमारी देवींनी ती धुरा सांभाळली. खुद्द रवींद्रनाथांनीही एक वर्ष (१८९८) संपादकपदाची जबाबदारी वाहिली. भारती मासिकाने बंकिमचंद्रांच्या बंगदर्शन (१८७२) चीच वाट चोखाळली असली, तरी भारतीचा सुहृदपरिवार फार विस्तृत होता. किंबहुना उभय नियतकालिकांच्या नामकरणातच त्यांची व्याप्ती ध्यानी येते. भारतीमधील साहित्याचा परीघ अमर्याद होता, समग्र भारतवर्ष त्याचा आदर्श होता, तर बंगदर्शनने आपली सीमा माफकपणे अवतीभोवती आखून घेतली होती. परिणामी भारतीच्या पृष्ठांत विविधता, वैचित्र्य आणि वेधकता जाणवते.

मधुसूदनांनंतर ⇨ बंकिमचंद्र चतर्जी (१८३८-९४) यांचे नाव आधुनिक बंगाली साहित्याचे श्रेष्ठ शिल्पकार म्हणून आदराने घ्यावे लागेल. संस्कृत कादंबरीचा आदर्श मानावा की फार्सी साहित्याचा आयना न्याहाळावा अशा द्विधा मनःस्थितीत सापडलेल्या बंगाली कादंबरीस युगोचित असा आधुनिक आरसा बहाल केला तो बंकिमचंद्रांनी. बंकिमचंद्रांपूर्वीच बंगाली कादंबरीची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. भूदेव मुखोपाध्याय (१८२५-९४) या हिंदू कॉलेजीय साहित्यिकाने बंगाली ऐतिहासिक कादंबरीचा ओनामा केला. त्यांच्या ऐतिहासिक उपन्यास (१८६२) या ग्रंथात जे. एच्. चावन्टरच्या रोमान्स ऑफ हिस्टरीमधून घेतलेल्या कथाभागावर आधारित कादंबरिका आहे. अंगूरिकाविनिमयची कथाही त्यांनी चावन्टरकडूनच उसनी घेतली. त्यात शिवाजी आणि औरंगजेबाची शाहजादी यांचा प्रणय सूचित केला आहे. ऐतिहासिक वातावरण निर्मितीत भूदेव यशस्वी ठरले, तरी त्यांची कथनशैली अवजड असल्याने त्यांचे लेखन फारसे लोकप्रिय ठरले नाही, पुढे बंकिमचंद्रांनी बंगालीतील पहिली स्वच्छंदतावादी कादंबरी दुर्गेशनंदिनी (१८६५) लिहिताना भूदेवांचाच फसलेला आराखडा घेऊन त्यात प्राण भरला, हे पाहता भूदेवांचे अपयशही नजरेत भरते.


बंगाली जनजीवनाचे यथार्थ चित्रण करणारी मौलिक बंगाली कादंबरी लिहिली प्यारीचॉंद मित्र (१८१४-८३). यांनी. ‘टेकचॉंद ठाकूर’ या टोपणनावानेही त्यांनी लेखन केले. स्त्रियांना विद्यामृत पाजण्याच्या उद्देशाने १८५४ मध्ये त्यांनी आपले लेखन सुरू केले व स्वाभाविकच हेतुपुरस्पर सुबोध, व्यावहारिक अशी भाषाशैली अंगीकारली. आलालेर घरेर दुलाल (१८५५-५७, म. शी. बड्या घरचा लाडका बेटा) ही त्यांची पहिली कादंबरी बंगालीतील पहिली सामाजिक कादंबरी मानण्यात येते. मधुसूदनांनी कवितेच्या प्रांतात जे मन्वंतर घडवले तेच काही अंशी कादंबरीच्या क्षेत्रात प्यारीचॉंद मित्रांनी घडवले, असे म्हणता येईल. संस्कृत, फार्सी, उर्दू आणि इंग्रजी भाषांतून उचललेल्या किस्से-कहाण्यांपासून मित्रांनी बंगाली वाचकांची मुक्तता केली आणि त्याला अवतीभवतीच्या अस्सल आणि नित्यानुभवाच्या वास्तव परिसरात रमविले. बंगाली गद्यशैलीत ईशरचंद्रांच्या प्रौढप्रसन्न भाषेचा दबदबा होता. मित्रांच्या अलाली शैलीने विद्यासागरी शैली लगोलग नाहीशी केली नाही हे खरे परंतु कालिप्रसन्नसिंह (१८४०-७६) यांनी हुतोम पँचार नक्शा (१८६२) हा उपरोधिक लेखसंग्रह लिहिताना मित्रांपासून स्फूर्ती घेतल्याचे जाणवते. कालिप्रसन्नबाबूंनी कलकत्त्याचे समकालीन लोकजीवन कलकत्त्यातील प्रचलित लोकभाषेत रंगविले. त्यातील सुखद शिवराळपणा आजही जाणवतो. एकोणिसाव्या शतकाच्या सातव्या व आठव्या दशकांत सिंहांच्या या शैलीचे बरेच अनुकरण झाले. विशेषेकरून रेनल्ड्झच्या धर्तीवर ‘गुप्तकथा’ लिहिणाऱ्या कादंबरीकारांनी या लोकभाषेचा स्वीकार केल्याने बंगाली गद्य जोमदार झाले. या पार्श्‍वभूमीवर बंकिमचंद्रांची कामगिरी अधिक उजळपणे उठून दिसते. राजमोहन्स वाइफ (१८६४) ही इग्रजी कादंबरी लिहुन साहित्यसेवेचा श्रीगणेशा केलेल्या बंकिमचंद्रांनी लवकरच आपला मोहोरा बंगालीकडे वळविला व दुर्गेशनंदिनी ही कादंबरी लिहून खऱ्याखुऱ्या आधुनिक बंगाली कादंबरीचे बीजारोपण केले. यानंतर अनेक ऐतिहासिक, सामाजिक व वैचारिक कादंबऱ्या लिहून त्यांनी बंगाली साहित्याचीच नव्हे तर अनुवादांद्वारा संमस्त भारतीय साहित्याची वाट प्रशस्त करून सोडली. जनमनरंजनाचा प्रधान हेतू बळी न देताही त्यांनी जनजागृती साधली. त्यांची शैली, त्यांच्या कथावस्तू, स्वभावचित्रण, नर्मविनोद, इतिहासातून स्फूर्ती घेण्याची त्यांची वृत्ती, त्यागी, निःस्वार्थी, कर्मनिष्ठेची तरफदारी, व्रती लोकशिक्षकाची त्यांची भूमिका या साऱ्या गुणांमुळे त्यांच्या कादंबऱ्या अतोनात लोकप्रिय ठरल्या. अनुगामी साहित्यिकांना एक नवीन मानदंड लाभला. अनेक कवींनी व कथाकारांनी त्यांच्या साहित्यातून स्फूर्ती घेतली. हेमचंद्र, नवीनचंद्रांसारखे कवी किंवा रमेशचंद्र दत्तांसारखे कादंबरीकार बंकिमचंद्रांच्याच पावलावर पाऊल टाकून पुढे सरसावले. रवींद्रनाथांचे युग प्रस्थापित झाल्यानंतरही बराच काळपावेतो साधारण बंगाली कादंबरीकारांवरचा ‘बंकिमी’ ठसा पुसला गेला नव्हता.

बंगाली नाटक जन्मले ते काहीसे अधांतरीच परंतु त्याचा विकास मात्र रंगमंचाच्या उदार आधारामुळेच घडून आला. विलायती नाटकाचा पहिला बंगाली अवतार कलकत्ता येथे प्रथम २७ नोव्हेंबर १७९५ रोजी ग्येरास्यिम ल्येब्येद्यकनामक भारतप्रवासी रशियन पंडिताने सादर केला. त्याने स्वतः एका तत्कालीन जनप्रिय इंग्रजी प्रहसनाचा आपल्या एतद्देशीय मदतनीसाच्या (गोलकनाथ दास) साहाय्याने बंगाली अनुवाद केला होता. हेच ते पहिले बंगाली नाटक छद्मवेष. पुढे १८३२ साली बंगाली मंडळींनी या कामी प्रथम पुरस्कार घेतलेला आढळतो. १८५८ साली ईश्वरचंद्र सिंह व प्रतापचंद्र ‌सिंह यांनी पुष्कळ द्रव्य खर्चून त्यांच्या कलकत्त्यातील विलास वाटिकेत रामनारायण तर्करत्नलिखित रत्नावलि नाटकाचा प्रयोग करविला. तो खेळ पाहून मायेकल मधुसूदनांना नाट्यलेखनाची स्फूर्ती लाभली. त्यांचे प्रथम नाटक शर्मिष्ठा (१८५९) याच प्रकारे उभे राहिले व त्याच्या प्रयोगापासूनच आधुनिक बंगाली रंगभूमीची खरीखुरी सुरुवात झाली असे म्हणता येईल. १८७२ साली डिसेंबर महिन्यात काही नाट्यानुरागी मंडळींनी एकत्र येऊन कलकत्त्यात ‘पब्लिक थिएटर’ वा सार्वजनिक रंगमंचाची स्थापना केली. ‘नॅशनल थिएटर’ या नावानेही ही संस्था ओळखली जाई. चार-दोन वर्षांतच आणखी काही सार्वजनिक नाट्यसंस्थांची भर पडली. आरंभी आरंभी दिनबूंधू मित्र, मायकेल मनोमोहन बसू अशा नाटककारांची नाटके-प्रहसने, मायकेलांसारख्या कवींच्या काव्याची नाट्यरूपांतरे अथवा बंकिमचंद्रांच्या कादंबऱ्यांची नाटके यांवर या नाट्यसंस्थांची मदार असे. पुढे नावीन्याच्या हौसेमुळे अभिनयासाठी नवीन नाटकांची मागणी होऊ लागली आणि ही मागणी पुरी करण्यासाठी नाटककारच नव्हे, तर प्रतिभाशाली नटही उत्साहाने पुढे सरसावून नाटके लिहू लागले. या उपक्रमामुळे दोन-तीन समर्थ नाटककारांचा लाभ बंगाली रंगभूमीस झाला. त्यात ⇨ गिरीशचंद्र घोष (१८४४-१९११) हे प्रथम नट म्हणून व नंतर नाटककार म्हणून अग्रगण्य ठरले. त्यांच्यानंतरच्या नाटककारांत राजकृष्ण राय (१८५२-९४), ⇨ अमृतलाल बसू (१८५१-१९२९) व उपेंद्रनाथ दास (१८४८-९५) यांची नावे उल्लेखनीय ठरतात. गि‌रीशचंद्र आणि राजकृष्ण यांनी नाटकांत भक्तिरसाची भागीरथी आणली, तर अमृतलालांनी हास्यरसाचा धबधबा आपल्या प्रहसनांतून खेळवला. उपेंद्रनाथ दास यांच्या राणा ‌भीमदेवी थाटाच्या नाटकांत पिस्तुल-बंदुकांची खणाखणी प्रथम गाजली.

दीनबंधू मित्र यांचे नीलदर्पण (१८६०) नाटक म्हणजे अंकल टॉम्स कॅविन आणि ऑलिव्हर टि्‌वस्ट या ग्रंथांच्या तोडीची सामाजिक परिणाम साधणारी महान साहित्यकृती ठरली. निळीची लागवड करणारे इंग्रज मळेकरी मजुरांचा नि रयतेचा जो अनन्वित छळ करीत त्याचे प्रक्षोभक चित्र या नाटकात कुशलतेने चितारले आहे. या नाटकाने तत्कालीन वातावरणात चैतन्य निर्माण केले. नाटक या माध्यमाकडे प्रेक्षक, लेखक, पुढारी आणि राज्यकर्ते यांचे लक्ष वेधून घेणारी ही घटना ठरली. मायकेल मधुसूदन दत्तांनी याचा इंग्रजीत अनुवादही केला. नवीन तपस्विनी (१८६३) व अन्य चार-पाच प्रहसनात्मक नाटके दीनबंधूंनी लिहिली. नाटक या ‌साहित्यप्रकारापेक्षा रंगमंचावरील यशस्वी प्रयोगांशी त्यांच्या कृतीचे नाते अधिक जुळते.

मनमोहन बसू (१८३१-१९१२) यांनी जुन्या ‘जात्रा’ पद्धतीच्या लोकनाट्याची कास धरून नवीन पौराणिक नाटके लिहिली. त्यांतील संवादांवर पारंपारिक हरदासी कथनशैलीचा पगडा जाणवतो. रामाभिषेक (१८६७) हे त्यांचे नाटक रामकथेवरील प्रथम स्वतंत्र बंगाली नाटक होय. सती (१८७३) या प्रसिद्ध नाटकाखेरीज त्यांनी प्रणयपरीक्षा, हरिश्चंद्र, सतीर अभिमान इ. अनेक नाटके लिहिली.

उपेंद्रनाथ दास हे ‘ग्रेट नॅशनल थिएटर’ (१८७५-७६) या संस्थेशी नट व दिग्दर्शक म्हणून संबंधित होते. १८७५ च्या अखेरीस प्रिन्स ऑफ वेल्स (नंतर बादशाह ७ वे एडवर्ड) यांच्या कलकत्ता भेटीस अनुलक्षून उपेंद्रनाथांनी लिहिलेल्या एका उपहासिकेवरून वादळ माजले ‘ड्रॅमॅटिक पर्‌फॉर्मन्सेस ॲक्ट’चा जन्म झाला. त्यांची शरत्‌-सरोजिनी (१८७४) व सुरेंद्र विनोदिनी (१८७५) ही दोन नाटकेही रंगभूमीवर झंझावातासारखी गाजून गेली. बंगाली रंगभूमीवर त्यांनी नवे वारे खेळवले. राजकृष्ण राय या नाटककाराचे नाव स्मरणीय ठरते ते नाटकांत त्यांनी रूढ केलेल्या मुक्तछंद संवादांमुळे. विसाहून अधिक कवितासंग्रह नावे जमा असणाऱ्या या कवीने मायकेलांनी प्रवर्तित केलला मुक्तछंद नाटकांत प्रथम यशस्वी रीतीने हाताळला. पुढे गिरीशचंद्र घोषांनी त्यांचेच अधिक उजळ अनुकरण केले. पतिव्रता (१८७५) व नाट्यसंभव (१८७६) या राजकृष्णांच्या नाटकांत संगीताची रेलचेल होती. नंतर त्यांनी कित्येक पौराणिक नाटके लिहिली.

गिरीशचंद्र घोष म्हणजे बंगाली रंगभूमीचा आद्य युगपुरुषच होता. अन्य साहित्यकृतींच्या नाट्यरूपांतरांतून झुळझुळ वाहू लागलेली त्यांच्या नाट्यसाहित्याची गंगोत्री लवकरच खळाळणारी स्त्रोतस्विनी ठरली. ऐतिहासिक, पौराणिक, कौटुंबिक, सुखान्त, शोकान्त, देशभक्तिप्रेरक अशी विविध धर्तीची जवळजवळ ऐंशी नाटके त्यांनी लिहिली. तत्कालीन नाट्यप्रेक्षकांच्या नानाविद रुचीस एकत्र समाराधना घालणारी अशीच त्यांची नाटके होती यात वाद नाही. विशेषतः त्यांची अखेरची नाटके (१९०५-११) समकालीन स्वदेशी आंदोलनाच्या भारलेल्या वातावरणात भर घालणारी ठरली.


अमृतलाल बसू यांचे नाव त्यांच्या विनोदासाठी स्मरणीय ठरते. त्यांनी ज्योतिरिंद्रनाथांपासून स्फूर्ती आणि इंद्रनाथांकडून विनोद घेतला असला, तरी त्यांची प्रहसने त्यांच्या स्वायत्त विनोदबुद्धीने प्रसन्न ठरली. चोरेर उपर बाटपाडी (१८७६) व कुपणेर दान (१९००) यांवर मोल्येर व बोकाचीओ यांची छाप स्पष्ट आहे. विवाहबिभ्राट (१८८४) या प्रहसनात त्यांनी समकालीन बंगाली समाजजीवनातील इंग्रजाळलेल्या दांभिक दाखवेगिरीची भंबेरी उडविली आहे. हीरकचूर्ण (१८७५) हे त्यांचे नाटक गायकवाड विषप्रकरणावर आधारित आहे. गिरीशचंद्रांची गंभीर हेतुपूर्वकता अमृतलालांच्या नाटकांत विदूषकाचा विडंबक वेष धारण करून अवतरते.

पुन्हा काव्यक्षेत्राकडे वळून पाहता दृष्टीस पडते ⇨ बिहारीलाल चक्रवर्ती (१८३४-९४) यांची मूर्ती. वर्णनात्मक आणि आख्यानक (बॅलड) कविताक्षेत्रात स्वयंभू कवित्वाचा नवीन सूर आणि सहज, सुलभ शब्दकळा आणली बिहारीलाल यांनी. इंग्रजी साहित्यापेक्षा संस्कृत व बंगाली वाड्‌मयावर पोसलेली त्यांची भावधारा समकालीनांपेक्षा आपल्या पृथगात्मतेने उठून दिसते. टागोर परिवारापैकीच एक मानता येईल एवढे त्यांचे तेथे घनिष्ट संबंध होते. पूर्णिमाअबोधबंधू या स्वतःच्याच दोन मासिकांद्वारा त्यांनी आपली कविता प्रसिद्ध करण्यास प्रारंभ केला. पुढे बंधुवियोग (१८६३), प्रेमप्रवाहिनी (१८६३), निसर्ग-संदर्शन (१८६९), वंगसुंदरी (१८६९) इ. काव्ये त्यांनी प्रकाशित केली. १८७९ मध्ये पूर्ण केलेले त्यांचे शारदा मंगल हे काव्य प्रतिभेच्या कल्लोळाचे उत्तम उदाहरण वाटते. त्यात उत्स्फूर्त कल्पनांचा उद्रेक आहे परंतु बांधेसूद रचनेचा अभाव जाणवतो. १८८८-१८८९ मधील साधेर आसन हे काव्य दहा सर्गांत असून टागोर परिवाराशी जडलेल्या स्नेहबंधनाशी निगडित असल्याने स्मरणीय ठरले. रवींद्रनाथांनी बिहारीलालांच्या छायेत असूनही त्यांचा प्रभाव टाळला आणि बंगाली गीतिकवितेत आपली स्वतःची स्वतंत्र वाट चोखाळली. बिहारीलालांच्या प्रभावाने ज्यांची कविता फुललेली आढळते अशा कवींत सुरेंद्रनाथ मुजुमदार (१८३८-७८) ⇨ देवेंद्रनाथ सेन (१८५५-१९२०), गोविंदचंद्र दास (१८५५-१९१८) व अक्षयकुमार बडाल (१८६५-१९१८) यांचा निर्देश करता येईल. या सर्व कवींनी भावकविता व प्रेमगीते लिहिली. याच काळात गिरींद्रमोहिनी दत्ता (१८५४-१९२४), कामिनी राय (१८८४-१९३३) व स्वर्णकुमारी देवींसारख्या कवि‌यित्रींनीही लक्षणीय काव्यलेखन केले.

एकोणिसाव्या शतकाचे नववे दशक संपण्यापूर्वीच र‌वींद्रनाथांची कविकीर्ती सुस्थिर झाली होती. बंकिमचंद्रांच्या मृत्यूनंतर गद्यलेखक म्हणून त्यांचे अप्रतिद्वंद्वी आसन निश्चित झाले होते. १८९१ साली त्यांनी साधना पत्रिका सुरू केली. तीत त्यांच्या लेखणीचा अष्टपैलू आविष्कार दिसू लागला. त्यांच्या नवीन धर्तीच्या लघुकथा साधनेत येऊ लागल्या. बंगाली साहित्याची क्षितिजे विकसू लागली. नवीन लेखक पुढे आले आणि त्यांची ताज्या दमाची प्रतिभा साहित्याचे नवे धुमारे प्रकट करू लागली. या नव्या साहित्यिकांतील नामवंत मोहरा म्हणजे ⇨ प्रभातकुमार मुखोपाध्याय (१८७३-१९३२). रवींद्रांनंतर उत्तम कथाकार म्हणून त्यांचेच नाव घ्यावे लागते. नवीन संन्यासी (१९१२), रत्नदीप (१९१५) इ. त्यांच्या कादंबऱ्या व दहा-बारा कथासंग्रह वाचकांत प्रिय ठरले. घटनाप्रधान कथानक आणि गोष्टीवेल्हाळ निवेदन यांमुळे त्यांचे वाङ्‌मय वाचनीय ठरते. मात्र रवींद्रनाथांची अंतदृष्टी आणि मर्मवेध घेण्याचे सामर्थ्य यांचा तेथे अभाव आहे.

बंगाली साहित्यात एव्हाने अनेकविध लेखकांची भर पडू लागली आणि यानंतर निरनिराळ्या क्षेत्रांत आपला ठसा ठेवून जाणाऱ्या ग्रंथकारांची नामावळी नमूद करणे अवघड ठरत जाते. ⇨ रामेंद्रसुंदर त्रिवेदी (१८६४-१९१९) हे उत्कृष्ट निबंधकार आणि तत्त्वचिं‌तक होते. वैज्ञानिक आणि तात्त्वीक विषय त्यांनी सुगम शब्दांत समजावून दिले. जोगेशचंद्र राय विद्यानिधी (१८५९-१९५६) यांनी भाषाशास्त्र आणि ज्योतिर्विज्ञान यांवर लिहिले. अक्षयकुमार मैत्रेय (१८६१-१९३०) यांनी इतिहास सुखपाठ्य करून सोडला. ⇨ सखाराम गणेश देउसकर (१८६९-१९१२) यांनी इतिहास आणि देशभक्ती यांची साहित्याशी सांगड घालून बंगाली तरुणांना स्फूर्ती दिली. त्यांचा देशेर कथा (१९०४) हा ग्रंथ स्वदेशी आंदोलनाच्या काळात क्रांतिकारकांची गीता ठरला. उमेशचंद्र बटब्याल (१८५२-९८), बलेंद्रनाथ टागारे (१८७०-९९), जतींद्रमोहन सिंह (१८५८-१९३७), शरत्‌कुमारी चौधुराणी (१८६१-१९२०), सुधींद्रनाथ टागोर (१८६९-१९२९), कथाकार सुरेंद्रनाथ मजुमदार (मृ. १९३१), सुरेशचंद्र समाजपती (१८७०-१९२१), ⇨ ब्रह्मबांधव उपाध्याय (१८६१-१९१०), प्रियंवदा देवी (१८७१-१९३५) इ. अनेक लेखक-लेखिका या काळात आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनाने साहित्यगगनात चमकून गेल्या.

एकोणिसाव्या शतकाच्या चवथ्या चरणात भारताच्या एकराष्ट्रीयत्वाचा आणि स्वातंत्र्यकामनेचा साक्षात्कार सुशिक्षित बंगाली जनतेस तीव्रतेने झाला. हिंदू मेळा, राष्ट्रीय सभा (कॉंग्रेस) इ. आदोलनांमुळे या मंडळींची मने दुर्दम्य स्वातं‌त्र्यलालसेने भारून गेली. त्यांच्या आकांक्षा जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत उंचावू लागल्या. साहित्यही याला अपवाद नव्हतेच. जोडासांको ठाकूरवाडीतील प्रतिभावंतांची कलासृष्टीसुद्धा या राष्ट्रीय विचारांच्या झंझावाताने प्रभावित झाली. हेमचंद्र बंदोपाध्यायांसारख्या कवींच्या काव्यरचनेत हा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. बंकिमचंद्रांनी आयुष्याच्या अखेरीस हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास आरंभला आणि विशेषकरून भगवद्‌गीतेचे परिशीलन करण्याकडे लक्ष दिले ही घटना सूचक आहे. मात्र बंकिमचंद्रांचे अनुगामी साहित्यिक या हिंदुधर्मप्रवण व्यासंगामुळे त्या काळी ब्राझोमतविरोधी व प्रतिक्रियाशील गणले गेले. रवींद्रनाथांनी उपनिषदादी प्राचीन दर्शनग्रंथांतून प्रकट होणाऱ्या मूलभूत भारतीय दर्शनाचा आधार घेऊन सनातनी, रूढिप्रिय, पुनरुज्जीवनास विरोध करणारे अनेक विचारपूत निबंध त्या काळी साधनेतून प्रसिद्ध केले. एकोणिसाव्या शतकाच्या या अंतिम पादात पुराणमतवादी मंडळींच्या उदार आश्रयाने जी एक प्रगतिपराड्‌मुखता पोसली गेली, पूर्वगौरवाचे पोवाडे गाण्याची जी वृत्ती भल्या भल्या सुशिक्षितांत बळावली त्याचे परिणाम साहित्यात तात्काळ ठळकपणे दृग्गोचर न झाले, तरी सामाजिक जीवनात आणि कर्मक्षेत्रात त्यांची प्रतिक्रिया अटळ होती. ही परागती स्वातंत्र्याच्या बलवत्तर स्पृहेमुळे व स्वदेशी आंदोलनाच्या रेट्यामुळे काही काळ दबून राहिली. १९०५ साली वंगदेशाचे विभाजन केल्याचा फतवा निघाला आणि भारतभर संतापाची लाट उसळली. हे प्रक्षेाभाचे निखारे सतत धुमसत राहिले. या ना त्या स्वरूपात हा अंगार अवघे राष्ट्रजीवन प्रज्वलित करू लागला. बंगाली ‌साहित्यात कविता, कथाकादंबरी, नाटक, निबंध, पत्रकारिता इ. सर्व क्षेत्रांत नवे चैतन्य सळसळले. विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांत तर हा प्रभाव चांगलाच जोरकस ठरला.

विसावे शतक उजाडले ते रवींद्रनाथांच्या नैवेद्य (१९०१) या शंभर सुनीतांच्या संग्रहाने. रवींद्रनाथांच्या उत्तम साहित्यकृतींत या कवितासंग्रहाची गणना होते. जगभर झांकोळून येणाऱ्या अ‌निष्ट प्रवृत्तींच्या अरिष्टाची कृष्णछाया त्यांच्या क्रांतदर्शी दृष्टीने हेरली होती. युद्धपिपासू राष्ट्रांची निर्लज्ज महत्त्वाकांक्षा, जेत्या राज्यकर्त्यांची सत्तांध सुलतानी आणि पराधीन देशबांधवांना स्वतःच्या मूलभूत शाश्वत मूल्यांचा विसर पडून तात्कालिक यशासाठी चाललेली त्यांची असहाय धडपड या सर्वांचा इशारा देणारा हा महाकवी या काळात एखाद्या उर्ध्ववाहू प्रेषितासारखा आवाहन करताना आढळतो. त्यांच्या प्रतिभेच्या आणि परिणतप्रज्ञेच्या प्रकाशात बहुसंख्य बंगाली लेखकांनी आपली वाटचाल केली. काही मोजक्या मंडळींनी मात्र रविकिरणांना सदैव सन्मुख असणारी सूर्यफुले बनण्याचे नाकारले व स्वतःची अस्मिता प्रमाण मानून आत्माविष्कार केला.

अशा तडफदार अपवादांत कवी ⇨ सत्येंद्रनाथ दत्त (१८८२-१९२२) यांचा समावेश होतो. रवींद्रनाथांपेक्षाही समकालीन कवीमंडळावर सत्येंद्रनाथांची दाट छाया जाणवते. याचे कारण रवींद्रनाथ हे अनुकरणास अवघड होते. तुलनेने सत्येंद्रनाथांची कविपरंपरा सुलभ व लाभदायकही होती. बंगाली भाषेची पिंडप्रकृती उमजून उपयोजिलेल्या शब्दसंपत्तीत सत्येंद्रनाथांची असमान्य दक्षता दिसून आली. आजोबा अक्षयकुमार दत्त यांच्याकडून लाभलेला ‌साहित्यिक वारसा त्यांनी इमानाने सांभाळला. बेणु ओ बीणा (१९०६) व होमशिखा (१९०७) हे त्यांचे सुरुवातीचे दोन कवितासंग्रह समकालीन अग्नियुगास साजेसे आहेत. त्यावर देवेंद्रनाथ सेन व अक्षयकुमार बडाळ या ज्येष्ट कवींचा प्रभाव जाणवतो. यानंतर रवींद्रसाहित्याशी त्यांचा परिचय झाला. मात्र आपली शक्ती आणि ‌तिच्या मर्यादा यांचे भान ठेवून त्यांनी रवींद्रनाथांचे फसवे अनुकरणे करण्याचे टाळले. शब्दमाधुर्य आणि छंदझंकार यांची कास धरून त्यांची कवितारती पदन्यास करते. त्यांच्या तिसऱ्या फुलेर फसल (१९११) या संग्रहात विचारांची अधिक प्रौढता आहे. कुहु ओ केका (१९१२), तुलीर लिखन (१९१४) व अभ्र अबीर (१९१६) या सर्व संग्रहांत त्यांच्या छंदोविलासाचा स्वच्छंद आविष्कार आहे. त्यांच्या नर्म विनोदी कवितांचा हसन्तिका (१९१७) हा संग्रहही आल्हाददायक आहे. बेलाशेषेर गानबिदाय आरती या मरणोत्तर (१९२२) प्रकाशित दोन संग्रहांत त्यांच्या अखेरच्या आठ वर्षांतील कविता येतात. त्यांच्या काही सर्वोत्तम कविता याच अंतिम पर्वांतील आहेत. यांखेरीज त्यांनी जागतिक काव्यभांडारातून श्रेष्ठ कवितांचा सतत अनुवाद केला. तीर्थसलिल (१९०८), तीर्थंरेणु (१९१०) व मणिमंजुषा (१९१५) या तीन संग्रहांत त्या एकत्रित आहेत. ते स्वतः बहुभाषाकोविद होते. याखेरीज नाट्य, कथा, कादंबरी, निबंध व विनोद या क्षेत्रांतही त्यांनी लेखणी चालविली.


सत्येंद्रनाथ दत्तांच्या आगेमागे काव्यक्षेत्रात संस्मरणीय कामगिरी करणारांत द्विजेंद्रनारायण बागची (१८७३-१९२७), जतींद्रमोहन बागची (१८७८-१९४८), ⇨ करुणानिधान बंदोपाध्याय (१८७७-१९५५), कुमुदरंजन मल्लिक (१८२२- ), कालिदास राव (१८८९- ) व किरणधन चतर्जी (१८८७-१९३१) यांची गणना आवश्यक ठरते. मात्र सत्येंद्रनाथांचा कित्ता गिरवूनच ज्यांनी कवितालेखनास सुरुवात केली व लवकरच स्वतःचे स्वतंत्र स्थान पक्के केले असे दोन कवी म्हणजे ⇨ काजी मजरुल इस्लाम (१८९९ – १९७६) आणि मोहितलाल मजुमदार (१८८८-१९५२).

‘बंगाली ‌रेजिमेंट’ मधील ‌शिपाईगडी म्हणून मेसोपोटेमियातील आघाडीवर पहिल्या महायुद्धात दाखल झालेल्या नज्रुल इस्लामनी १९१८ मध्ये ⇨ हाफीज या फार्सी कवीच्या काही कवितांचा बंगालीत छायानुवाद करून आपल्या साहित्यसेवेचा ओनामा केला. १९२२ मध्ये त्यांचा अग्निवीणा हा संग्रह प्रसिद्ध झाला आणि समस्त बंगाली भाषिक जनतेने या कवीस जणू डोक्यावर घेतले. न भूतो न भविष्यती अशी जनप्रियता या कवितासंग्रहाने मिळविली. दुर्दम्य उत्साह, उसळती कल्पनाशक्ती आणि भावभावनांचा कल्लोळ शब्दांच्या प्रपांतातून श्रोत्यांच्या कर्णकुहरात ओतण्याची अनावर इच्छा यांमुळे नज्रुल आपल्या सर्व समकालीनांपेक्षा अधिक लोकप्रिय ठरले.

मोहितलाल मजुमदार पेशाने शिक्षक होते. देवेंद्रनाथ सेन या ज्येष्ठ (आणि आप्तेष्टही) कवीला अर्ध्य वाहणारी देवेंद्रमंगल (१९२२) ही पुस्तिका लिहून त्यांनी काव्यांगणात पदार्पण केले. आरंभी त्यांनी सत्येंद्रनाथ दत्तांचा प्रभाव ग्रहण केला असला, तरी नज्रुल यांच्या सहवासात त्यापासून ते लवकरच मुक्तही झाले. स्वपनपसारी (१९२२), विस्मरणी (१९२९), स्मरगरल (१९३६) आणि हेमंतगोधुलि (१९४१) या चार प्रमुख कवितासंग्रहांखेरीज छंदचतुर्दशी (१९४४) हा त्यांचा सुनीतसंग्रहही उल्लेखनीय आहे. त्यांच्या प्रथम पर्वातील कवितांत क्वचित उमर खय्यामचा आभास जाणवतो. रवींद्रप्रभाव जाणीवपूर्वक टाळायचा ठरवल्याने ते वयाने ज्येष्ठ असूनही तरुण साहित्यिकांच्या कल्लोल मासिकाच्या वर्तुळानिकट आले. उत्तरपर्वात मात्र ते माघारी वळून (पुनश्च रवींद्र ओलांडून) थेट मायकेल मधुसूदन दत्त आणि बंकिमचंद्रांकडे झेपावताना आढळतात. बांग्ला साहित्य (१९३६), साहित्यकथा (१९३८), साहित्यवितान (१९४२) इ. त्यांच्या लेखसंग्रहांत त्यांचा हा वैचारिक प्रवास नजरेस पडतो.

विसाव्या शतकाचा आरंभ आणखी एका घटनेने संस्मरणीय ठरला. रवींद्रनाथांनी चोखेर बाली (१९०१) कादंबरी लिहून बंगाली कादंबरीस नवे वळण दिले. मानवी जीवनात, संसारात वा समाजात बाह्य घटना तेवढ्याच महत्त्वपूर्ण असतात असे नसून माणसामाणसांच्या मनांची जडणघडण आणि मनोव्यापार व त्यांचे परस्पर भावबंध, भावविनिमय यांतून जो विराट व्यवहार आकारत असतो, जो अनुभव प्रतीत होत असतो त्याचे मूल्य द्रष्ट्या साहित्यिकाचे लेखी मोठे असते, हे रवींद्रनाथांनी दाखवून दिले. त्यांच्या विचारांची महती उमजण्यास काही काळ जावा लागला. परंतु बंगाली कादंबरीस मनोविश्लेषणाची दीक्षा त्यांनीच प्रथम दिली हे निर्विवाद.

यानंतर रामानंद चतर्जी यांच्या प्रवासी मासिकात आधुनिक बंगाली जीवनाचे महाभारत गणता येईल अशी त्यांची गोरा (१९१०) ही श्रेष्ठ कादंबरी क्रमशः (१९०७-९) प्रसिद्ध झाली. १९१६ साली त्यांच्या घरे बाईंरे कादंबरीने तर अभूतपूर्व खळबळ उडविली. या दोन्ही कादंबऱ्यांत भारताच्या सामाजिक आणि राजकीय समस्यांचे चिकित्सक विश्लेषण आढळते.

नाटक व गीतनाट्य या क्षेत्रांत रवींद्रनाथांच्या अंतर्दृष्टीचे इंगित उमजल्याचे वा अनुकरण करण्याचे साहस कुणी केल्याचे आढळत नाही. नाटककारांत क्षीरोदप्रसन्न विद्याविनोद (१८६३-१९२७) आणि ⇨ द्विजेंद्रलाल राय (१८६३-१९१३) या उभयतांनी नावीन्याची कास धरली. खास करून भाव व भाषा सामान्य प्रेक्षकांपावेतो पोहोचविण्यात दोघेही यशस्वी ठरले. रसायनशास्त्राचे प्राध्यापक असणाऱ्या विद्याविनोदांनी १८९४ मध्ये संगीत नाटके लिहून साहित्यक्षेत्रात पाऊल टाकले. १८९७ मध्ये अवतीर्ण झालेल्या त्यांच्या अलिबाबा या नाटकाने बंगाली नाटकांच्या इतिहासात अभूतपूर्व जनप्रियता मिळविली. आजही ते ८० वर्षांचे चिरतरुण नाटक आहे. त्यांनी ऐतिहासिक, संगीत, विनोदी, प्रणयप्रधान, भक्तिरसपूर्ण अशी सर्व धर्तीची नाटके लिहिली. सामाजिक नाटकांच्या वाटेस मात्र ते गेले नाहीत. नाटकाच्या कथानकाचा चित्तवेधक परिपोष साधण्यात ते सिद्धहस्त असल्याने फुलशय्या (१८९४) पासून रत्नेश्वरेर मंदिरे (१९२२) पर्यंतची त्यांची सर्वच नाटके कमीअधिक प्रमाणात यशस्वी ठरली.

द्विजेंद्रलाल राय (डी. एल्‌. राय म्हणूनच ते अधिक परिचित आहेत) हे शेतकीखात्यात अधिकारी होते. अमृतलाल बसूंच्या अनुकरणाने त्यांनी प्रथम कल्कि अवतार (१८९५) हे प्रहसन लिहिले. संपूर्ण प्रहसन बाळगण्यांच्या धर्तीवर कवनांत गुंफले होते. पाषाणी (१९००) व सीता (१९०२) ही त्यांची नाटकेही काव्यबद्ध आहेत. पात्रनिर्मिती गिरीशचंद्र घोषांच्या नमुन्याप्रमाणे केलेली जाणवते, तर पद्यरचना रवींद्रानुसारी आहे. ताराबाई (१९०३), सोराबरुस्तम (१९०८) यांसारख्या त्यांच्या कृतींना नाट्यकाव्ये म्हणावे लागेल. त्यांच्या नंतरच्या चंद्रगुप्त (१९११) आदी गद्य नाटकांवर भारताच्या गौरवमय इतिहासाची गडद छाया आहे. भावनांना उत्तेजित करणारी देशभक्ती या काळातील त्यांच्या नाटकांत भरपूर आहे. शाजाहान (१९१०) सारखे त्यांचे एखादेच ऐतिहासिक नाटक बरेचसे निर्दोष आहे. ते स्वतः उत्तम संगीतकार होते व त्यांच्या नाटकांतील पदांच्या चालीही ते स्वतः बांधत. द्विजेंद्रलालांच्या नाटकांतूनच नटश्रेष्ठ शिशिरकुमार भादुडी (१८८९-१९६०) यांची कारकीर्द सुरू झाली. कलकत्ता शहरात रवींद्रनाथांच्या फाल्गुनीचा प्रयोग (१९१७) आणि भादुडींनी अभिनय केलेल्या जोगेशचंद्र चौधुरी (१८८७-१९४८) यांच्या सीता नाटकाचा प्रयोग (१९२४) या विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील नाट्यविषयक सर्वाधिक उल्लेखनीय घटना ठरतात. याच कालखंडातील आणखी एक नामांकित नाटककार म्हणजे अपरेशचंद्र मुखोपाध्याय (१८७५-१९३४).

याच ठिकाणी बंकिमेतर बंगाली कादंबरीचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरेल. ⇨ तारकनाथ गंगोपाध्याय (गांगुली, १८४३-९१), ⇨ रमेशचंद्र दत्ता (१८४८-१९०९), स्वर्णकुमारी देवी, शिवनाथ शास्त्री (१८४७-१९१९) व श्रीशचंद्र मजुमदार ( ? – १९०८) हे बंकिमचंद्रांच्याच आगेमागे प्रसिद्धीस आलेले काही कादंबरीकार. तारकनाथ गंगोपाध्यायांची स्वर्णलता (१८७४) कादंबरी कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या संसाराचे, त्यातील ऊनपावसाचे चित्रण करणारी, पहिली सामाजिक कादंबरी. अपूर्ण जनप्रिय ठरलेली पहिली ‘बेस्टसेलर’ कादंबरी म्हणूनही तिचा नामनिर्देश करण्यात येतो. कलकत्त्यात ‘स्वर्णलता स्ट्रीट’ आहे. कल्पित कथेच्या नायिकेचे असे नागरिक स्मारक इतरत्र कुठे क्वचितच असेल. इतिहासावर आधारित अशा वंगविजेता माधवीकंकण (१८७७), महाराष्ट्र जीवन प्रभात (१८७८) आणि राजपुत जीवनसंध्या (१८७९) अशा चार कादंबऱ्या लिहून रमेशचंद्र दत्त यांनी वाचकांची मने जिंकली. संसार (१८८६) व समाज (१८९४) अशा दोन सामाजिक कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या. त्यांची इतर कामगिरीही स्मरणीय आहे.


याखेरीज बंकिमचंद्रांचे वडीलबंधू संजीवचंद्र चतर्जी (१८३४-८९), प्रतापचंद्र घोष (? -१९२०), दामोदर मुखोपाध्याय (१८५३-१९०७), नगेंद्रनाथ गुप्त, जोगेंद्रचंद्र बसू (१८५४-१९०७) व त्रैलोक्यनाथ मुखोपाध्याय (१८४७-१९१९) या कादंबरीकारांची निर्मिती लक्षणीय आहे.

विसाव्या शतकात नावारूपास आलेल्या कादंबरीकारांत अर्थातच रवींद्रनाथांनंतर ⇨ शरत्‌चंद्र चतर्जी (१८७६-१९३८) यांचे नाव सर्वांआधी घ्यावे लागेल. त्यांच्या खेरीज प्रभातकुमार मुखोपाध्याय, ⇨ अनुरूपा देवी (१८८२-१९५८), ⇨ निरुपमा देवी (१८८३-१९५१), ⇨ राखालदार बंदोपाध्याय (१८८५-१९३०), हरिसाधन मुखोपाध्याय (१८६२-१९३८), ⇨ चारूचंद्र बंदोपाध्याय (१८७६-१९३८), हेमेंद्रकुमार राय (१८८८-१९६३), सौरींद्रमोहन मुखोपाध्याय (१८८४-१९६६), ⇨ नरेश्चंद्र सेनगुप्त (१८८२-१९६४), ⇨ शैलबाला घोषजाया (१८९४-१९७३), ⇨ शैलजानंद मुखोपाध्याय (१९००–७६), ⇨ ताराशंकर बंदोपाध्याय (१८९८-१९७१), ⇨ बलाइचाँद मुखोपाध्याय (१८९९-१९७९), ⇨ अन्नदाशंकर राय (१९०४-), ⇨ शरदिंदू बंदोपाध्याय (१८९९-१९७०), ⇨ माणिक बंदोपाध्याय (१९०८–५६), ⇨ बिभूतिभूषण बंदोपाध्याय (१८९९-१९५०), अचिन्त्यकुमार सेनगुप्त (१९०३–७६), ⇨ बुद्धदेव बसू (१९०८-७४) हे प्रमुख आहेत. विशेष म्हणजे यांपैकी बहुतेकांनी कथा आणि कादंबरी हे उभय वाङ्‌मयप्रकार सव्यसाचित्वाने हाताळले.

शरत्‌चंद्रांनी आपली पहिली कथा (१९०३) आपले मामा सुरेंद्रनाथ गांगुली यांच्या नावे प्रसिद्ध केली. १९०७ साली भारतीमध्ये दोन हप्त्यांनी प्रसिद्ध झालेली बडदिदी ही त्यांची स्वतःच्या नावे प्रसिद्ध झालेली प्रथम रचना. १९१३ पासून जमुना, साहित्य आणि भारतवर्ष या नियतकालिकांतून त्यांचे कथासाहित्य ओघाने प्रसिद्ध होऊ लागले. बंगाली वाचकांची मने एवढ्या मोठ्या प्रमाणावर जिंकणारा आद्य लेखक शरत्‌चंद्रच. साहजिकच केवळ लेखनावर उपजीविका करू शकलेले तेच प्रथम साहित्यिक ठरतात. देवदास (१९०१ मध्ये लिहिलेली कथा प्रसिद्ध झाली १९१७ मध्ये), परिणीता (१९१४), बिराज बउ (१९१४), पल्ली समाज (१९१६) यांसारख्या त्यांच्या आरंभीच्या कृतींत बंकिमचंद्रांचा प्रभाव जाणवतो, विशेषतः विषयवस्तू आणि विषयपरिपोष या बाबतींत. वेगळेपण आहे ते वातावरणात, अधिक सहजसरळ भाषेत आणि नेमक्या निवेदनशैलीत. बिंदुर छेले (१९१३), रामेर सुमती (१९१४) किंवा अरक्षणीया (१९१६) यांसारख्या कृतींत त्यांची मूलभूत वास्तव दृष्टी आणि नितळ प्रांजलता प्रकर्षाने जाणवते. रवींद्रनाथांचा प्रभावही त्यांच्या नंतरच्या रचनांत दृग्गोचर होतो. जीवनात संपन्न अनुभव त्यांच्या कादंबऱ्यांना मानवजीवनाच्या महाकाव्याची वेगवेगळी उत्तुंग पर्वे ठरावीत अशी उंची बहाल करतो. मंदिर (१९०४), श्रीकांत (४ भाग, १९१७-३३), चरित्रहीन (१९१७) इ. रचनांतून त्यांचा हा स्वानुभव डोकावतो. पथेर दाबी (१९२६) मध्ये त्यांनी तत्कालीन क्रांतीप्रयत्नांची पार्श्वभूमी चित्रित केली आहे. शरत्‌चंद्रांच्या महत्तेचे यथार्थ मूल्यमापन एखाद्या परिच्छेदात करणे खरोखरच अवघड आहे. त्यांची भावोत्कटता, त्यांचा प्रखर जीवनानुभव आणि तो व्यक्त करण्याची कळकळीची शैली या गुणांमुळे ते जनप्रिय ठरले. त्याचप्रमाणे त्यांच्यातील ध्येयवाद आणि निश्चित मूल्यबोध सदैव जागृत असे. माणूस अखेरीस माणूस असतो, पशुहून पुष्कळ अधिक असतो, त्याच्यावर आपत्ती कोसळतील, तो कुमार्गाला लागेल, कचरेल, कोसळेल, पण तरीही धूळ झटकून ताठ मानेने माणूस म्हणून अखेरीस उभा राहील, ही त्यांची आंतरिक श्रद्धा त्यांच्या लेखनाची उंची वाढवते. आधुनिक टीकाकारांनी त्यांच्या साहित्याचे मूल्यमापन करताना अनेक आक्षेप घेतले आहेत परंतु शरत्‌चंद्र अजूनही सर्वजनप्रिय कादंबरीकार आहेत, याचे रहस्य त्यांच्या वरील वैशिष्ट्यांत आढळते.

पहिल्या महायुद्धास तोंड लागले त्याच वर्षी म्हणजे मे १९१४ मध्ये सबुजपत्र (हिरवे पान) मासिकाचा जन्म झाला. बंकिमचंद्रांच्या बंगदर्शन मासिकाची परंपरा पुढे चालविणारी भारती, साहित्य, प्रवासी, भारतवर्ष, जमुना, विचित्रा आदी मासिके यापूर्वी प्रचारात होती व प्रत्येक मासिकाचा विशिष्ट लेखकपरिवारही होता. तरीसुद्धा विसाव्या शतकातील दुसऱ्या व तिसऱ्या दशकांत नवोदित नियतकालिकांभोवती नवीन लेखकांचा जसा गुंजारव होऊ लागला तसा पूर्वी झाला नव्हता. सबुजपत्र, कल्लोल, कालि-ओ-कलम, नारायण, परिचय इ. मासिकांनी साहित्याच्या क्षेत्रात काही निश्चित भूमिका घेऊन पदार्पण केले आणि वाङ्‌मयीन प्रगतीस हातभार लावला. विसाव्या शतकाची पहिली पंचवीस वर्षे म्हणजे अनेक दूरगामी परिणामाच्या घटनांची कोंदाकोंदी असणारा कालखंड आहे. वंगभंग, स्वदेशी चळवळ, सशस्त्र क्रांतिकारकांचे आंदोलन, महायुद्ध, जालियनवालाबाग, नोबेल पारितोषिक, राजधानी म्हणून कलकत्त्याऐवजी दिल्लीची निवड, विशाल बंगाल इलाख्यातून बिहार प्रांताचे विभक्तीकरण, रशियातील क्रांती, असहकार आंदोलन इ. विविध घटना बंगालच्या जीवनावर व पर्यायाने जनमानसावर व साहित्यावर प्रभाव पाडणाऱ्या होत्या. सबुजपत्र मासिक या विलक्षण चंचल कालखंडाची चाहूल देणारे ठरते. या मासिकाचे संपादक ⇨ प्रमथ चौधुरी (१८६८-१९४८) हे स्वतंत्र विचाराचे बुद्धिमान आणि धारधार लेखणीचे साहित्यिक होते. रवींद्रनाथांची पुतणी इंदिरा हिचे ते यजमान. रवींद्रांच्याच प्रेरणेने पूर्वी त्यांनी भारतीमध्ये लेखन केले होते. आता पुन्हा रवींद्रांच्याच पाठपुराव्याने हे नवे पाऊल त्यांनी टाकले. समकालीन बंगाली साहित्याच्या गळ्यात लोढणे होऊन बसलेल्या भाव व भाषागत गतानुगतिक रीतीगतींना विरोध करणे, हे या मासिकाने आपले धोरण मानले व अल्पावधीतच एक जोमदार साहित्यिक आंदोलने उभे केले. लिहिणे म्हणजे परंपरेने पढलेल्या पोथ्यांची पोपटपंची नव्हे, तर उमाळ्यांची समुचित अभिव्यक्ती, स्वानुभवाच्या प्रचीतीचे बोलणे असा पक्ष सबुजपत्राने घेतला. लेखकाने स्वतःचे विचार, भावानुभव, अंतःप्रेरणा उत्स्फूर्त शब्दांत प्रकट कराव्यात या उद्देशाने प्रमथबाबूंनी चलित शैलीचा जोरदार पुरस्कार चालविला. त्यांचे स्वतःचे गद्यलेखन सहज, समर्थ चलित शैलीचा आदर्श ठरावे एवढे सुभग होते. स्वतः रवींद्रनाथांनी सबुजपत्राच्या जन्मानंतर चलित शैलीचा स्वीकार केला व त्यांच्या कवितांतील नवे वळणही यानंतरचे आहे, ही गोष्ट महत्त्वाची आहे. बलाका (१९१६) या त्यांच्या संग्रहात या नव्या कविता पुढे एकत्रित झाल्या.

पहिले महायुद्ध संपले आणि महात्मा गांधींनी असहकाराची चळवळ सुरू केली. स्वातंत्र्याच्या आकांक्षेस पुन्हा टवटवी लाभली. रशियन क्रांती आणि साम्यवादी विचारांची चाहूल याच सुमारास लागली. दलितांच्या दुःखाची कणव, श्रमिकांच्या हक्कांची जाणीव आणि समाजातील बहुसंख्य वंचित वर्गाच्या दुःस्थितीची दखल घेण्याची आवश्यकता वाटू लागली. रशियन साहित्याचे वाचन वाढले. तेल्यातांबोळ्यांना स्वराज्याचा अर्थ समजू लागला. जुन्या रूढी, जुने विचार, जुने जाचक निर्बंध यांना आव्हान मिळू लागले. कला आणि साहित्य या क्षेत्रांतही पाश्चात्त्य प्रतिभावंतांनी बेडरपणे मांडलेले नवे संप्रदाय इकडे पडसाद उमटवू लागले. प्रस्थापित मूल्यांचा पुनर्विचार होऊ लागला. नवयुवकांच्या नियतकालिकांतून या विचारांना हिरिरीने पुरस्कार सुरू झाला. बर्नार्ड शॉ वाचून प्रभावित झालेल्या या होतकरू लेखकांनी तोच बेदरकार पवित्रा घेतला. रविंद्रांच्या तोडीचे उत्तुंग वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्व यांच्यात नसल्याने एकेकाने एकाकी झुंज घेण्याऐवजी गटागटाने मोर्चे बांधण्याची स्वाभाविक प्रक्रिया सुरू झाली. साहित्यसागरावरील नवी लाट, नवे तांडव निर्दिष्ट करणारे कल्लोल हे नाव घेऊन नवे मासिक निघाले (१९२३). कालि-ओ-कलम (शाई लेखणी, १९२६) या मासिकानेही पुढचे पाऊल टाकले. नंतरही प्रगति, परिचय इ. नियतकालिकांनी ही प्रागतिक पताका यथाशक्ती सांभाळली व पुढील ३०-४० वर्षांत साहित्यात नवे वारे खेळविले. कल्लोल-गटाने बुद्धिवादाची कड घेऊन देवाधर्मात नि कर्मकांडात गुंतून पडलेल्या रूढीग्रस्त, पोथीबंद समाजरचनेवर हल्ला चढविला. स्त्रीपुरुषसंबंधाची उघड नि वास्तवाभिमुख चर्चा सुरू केली. कथाकादंबऱ्यांतून वैचारिक चर्चा येऊ लागल्या. भाषा आणि अभिव्यक्तीचे नवे घाट व आगळे थाट येऊ लागले. परिचय-गटाने समाजवादी क्रांती, साम्यवादी वास्तवता, आहेरे आणि नाहीरे यांच्या मधील भीषण भेदभाव विशद करणारे लेखन प्रकाशित केले. वास्तवतेच्या नावाने याच काळात लैंगिक भावनांच्या अभिव्यक्तीस ललित वाङ्‌मयात प्राधान्य मिळू लागले.


या नवकल्लोळापूर्वीच जुन्या पिढीतील चारुचंद्र बंदोपाध्याय, नरेश्चंद्र सेनगुप्त, जगदीश गुप्त (१८८६-१९५७), मणिलाल गंगोपाध्याय (१८८८-१९२९) यांसारख्या साहित्यिकांनी पूर्वसूरींनी घालून दिलेल्या परंपरांच्या मर्यादा सांभाळून यूरोपीय समकालीनांचे अनुकरण करण्याचा, नव्या वास्तवतेचा कानोसा घेण्याचा प्रच्छन्न प्रयत्न आपल्या कादंबऱ्यांतून केला होता व त्यावर कुजबुज व कुरबूरही होत होती. अशा वेळी नव्या दमाच्या लेखकांनी अधिक उघडपणे आणि आवेशाने आपले लेखन आरंभले.

आधुनिक युगाच्या या अध्वर्यूंपैकी बहुतेक साहित्यिकांच्या मोजक्या कृतीच कसदार होत्या. सातत्याने सत्त्वसंपन्न साहित्य प्रसृत करीत राहण्याचे सामर्थ्य फारच थोड्या लेखण्यांत होते. कादंबरीकारांत विभूतिभूषण, माणिक आणि ताराशंकर ही बंदोपाध्यायत्रयी आपल्या श्रेष्ठ कामगिरीने वंद्य ठरली. बंकिम-रवींद्र-शरत् या त्रिमूर्तीच्या वाङ्‌मयाची नाळ घेऊनच जन्मलेल्या आधुनिक बंगाली साहित्यात ते सूत्र तोडून नवे गोत्र पुकारण्याचा अट्टाहास चालू असतानाच या त्रयीने आपले लेखन केले व पूर्वजांनी उभारलेल्या इमल्यावर नवा मजला चढविला.

बिभूतिभूषणांनी ग्रामीण वंगभूमीचे चित्रण नव्या नजाकतीने साधले. निसर्ग हा त्यांचा जणू आप्तच असावा, अशा जिव्हाळ्याने त्यांनी ऋतुचक्राचे फेरे, जलजंगलादी सृष्टीची संपन्नता व माणसांच्या दैनंदिन जीवनात गुंतलेले तिचे धागेदोरे आपल्या कादंबऱ्यांत कलावंताच्या हळुवार नजरेने टिपले. पथेर पांचाली (१९२९) व अपराजिता (१९३२) सारख्या कादंबऱ्यांत त्यांनी बंगाली मनाची भाववशता, हर्षामर्ष व आरोह-अवरोह कुशलतेने रेखाटले. आरण्यक (१९३८), इच्छामती (१९४९) सारख्या त्यांच्या कादंबऱ्यांत निसर्गच जणू नायक आहे. बंगालच्या खेड्यापाड्यांतील माणसे त्यांच्या कादंबऱ्यांत पृथ्वीच्या पाठीवर कुठेही राबणाऱ्या मनुष्यमात्राची प्रतिनिधी ठरतात. आधुनिक टीकाकारांच्या चष्म्यातून गवसलेला त्यांचा दोष म्हणजे माणसांच्या अंतर्मनाचा तपास घेणारी पाताळवेधी नजर वा वासनांचे वास हुंगत जाणारी तीव्र नासिका त्यांच्यापाशी नव्हती.

वयाने कनिष्ठ असूनही माणिक बंदोपाध्यायांनी (त्यांचे खरे नाव होते प्रबोधचंद्र) वयोसुलभ भावुक विवशता टाळून परिपक्व लेखन केले. त्यांच्या ४० कादंबऱ्यांपैकी पुतुल नाचेर इतिकथा (१९३६), पद्मा नदीर माझी (१९३६), सोनार चेय दामी (२ खंड, १९५१, ५२) इ. दहाबारा तरी चिरस्मरणीय ठरतील अशा आहेत. जीवनकलहाची अवघी जटिलता त्यांना स्पष्टपणे जाणवली होती. त्यांची अनलंकृत, कमालीची साधी शब्दशैली त्यांचे भाषेवरील असाधारण प्रभुत्व सांगते. अनुकरणास अवघड अशी ही कठोर, नेमका परिणाम साधणारी शब्दकळा पारंपारिक पुष्पभाषेच्या पीठिकेवर ठसठशीतपणे उठून दिसते. त्यांच्या सखोल नजरेने व्यामिश्र जनजीवनाचा वेध घेतला. विशेषतः समाजाच्या तळाचा ठाव घेतला आणि बंगाली कादंबरीस प्रौढ स्तरावर नेऊन ठेवले.

तिसरे बंदोपाध्याय ताराशंकर हे आपल्या नामबंधूंपेक्षा भाग्यवान ठरले. एकतर दीर्घकाळ साहित्यसेवेची संधी त्यांना लाभल्याने मनातील नियोजित नकाशे ते कथाकादंबऱ्यांद्वारा शब्दांकित करू शकले. दुसरे म्हणजे साहित्यिकास लाभणारे बरेचसे मानसन्मान त्यांना लाभले (ज्ञानपीठ पुरस्कार, १९६६). मायकेलअँजेलोसारख्या पल्लेदार प्रतिभेच्या कलावंताने विराट पटभूमीवर एखादा गडद, गुंतागुंतीचा, गर्दीदार देखावा चितारावा तसे ताराशंकरांनी गणदेवता (१९४२) सारख्या कादंबऱ्यांतून बीरभूम जिल्ह्यातील बंगाली ग्रामजीवनाची विराट चित्रे कुशलतेने रेखाटली. समग्र चित्रण जेवढे प्रत्ययकारी तेवढेच त्यातील अगणित अंशभाग, दीनदुःखितांचे आणि अस्पृश्यांचे प्रश्न, भारतीय जीवनमूल्यांचे आकलन आणि त्यांचे भान ठेवून साधलेले सुजाण चित्रण, स्वदेशी, स्वातंत्र्य आदी आंदोलनांचा अर्थ उमजून कादंबऱ्यांतील त्यांचे नियोजन आणि बंगालच्या या तीस-चाळीस वर्षांचा जणू अनुबोधपट उलगडावा अशा कुशलतेने केलेले समकालीन जीवनाचे शब्दचित्रण, हे ताराशंकरबाबूंच्या लेखनाचे विशेष सांगता येतील. समसामायिक साहित्यिकांत पाश्चात्त्य प्रेरणा प्रमाण मानून निर्मिती करण्याची लाट आली असता, निश्चयी भूमिकेवर उभे राहून सत्त्वस्थ, व्रतस्थ निर्धाराने त्यांनी साहित्यसर्जनाचा वसा सांभाळला.

अन्य नामवंत कादंबरीकारांची कामगिरी एकूण बंगाली साहित्य संपन्न करणारी असली, तरी तिचा विस्तृत आढावा घेणे या लेखाच्या मर्यादेत अवघड आहे. बंगाली साहित्यात या काळात गुणात्मक वाढ झाली तशीच संख्यात्मक वाढही झाली. दर्जेदार लेखक म्हणून गणना करावी अशी कितीतरी नावे पुढे येतात. काळाच्या कसोटीवर टिकावी अशी काही ना काही कलाकृती त्यांच्यापैकी बहुधा प्रत्येकाची सांगता येईल. विचारवंत अन्नदाशंकर राय यांची सत्यासत्य ही सहा खंडांची (१९३२-४२) कादंबरीमालिका आधुनिक बंगालची महागाथाच आहे. कवी बुद्धदेव बसूंची तिथिडोर (१९४९), धूर्जटीप्रसाद मुखोपाध्याय (१८९४-१९६१) यांची आवर्त (१९३७), मोहना (१९४३) व अंतःशीला (१९३५) ही कादंबरीत्रयी, गोकुळचंद्र नाग (१८९५-१९२५) यांची पथिक (१९२५), मनीष घटक (‘युवनाश्च’ १९०२-) यांची पटलडांगार पाँचाली, शैलजानंद मुखोपाध्याय (१९००- ) यांची सोलोआना (१९२५), प्रबोधकुमार सान्याल (१९०७-) यांच्या महाप्रस्थानेर पथे (१९३३) वा प्रिय बांधवी, मनोज बसू (१९०१- ) यांची भुली नाई (१९४३) किंवा निशिकुटुंब, प्रेमांकुर आतर्थी (१८९०-१९६५) यांच्या महास्थविर जातक (२ भाग, १९४४-४७) आणि झडेर पाखी (१९२३), बिभूतिभूषण मुखोपाध्याय (१८९६-) यांच्या राणूर प्रथम भाग (१९३७), राणूर द्वितीय भाग (१९३८), राणूर कथामाला (१९४१), हाते खडि (१९४७), नीलांगुरीय (१९४२), कुशीप्रांगण, प्रमथनाथ बिशी (१९०१–) यांची जोडा दीधीर चौधुरी परिवार (१९३७), रमेशचंद्र सेन (१८९५–१९६३) यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी प्रथम लिहिलेली शताब्दी (१९४५) ही कादंबरी किंवा नंतरच्या कुरषाला (१९४६) अथवा काजल (१९४९) सारख्या कलाकृती, मणींद्रलाल बसू (१८९७–) यांच्या रमला (१९२३) व जीवनायन (१९३६) अशी नामावली नमूद करावी तेवढी थोडीच आहे. बंगाली गद्याचा जादूगार शरदिंदू बंदोपाध्याय यांच्या कथा, कादंबऱ्या आणि रहस्यकथा, गजेंद्रकुमार मित्र (१९०८–) आणि समुथनाथ घोष (१९१२–) यांच्या गोष्टीवेल्हाळ रचना, बहुप्रसू साहित्यिक अचिन्त्यकुमार सेनगुप्त (१९०३–) यांच्या रसाळ कथा-कादंबऱ्या, सजनीकांत दास (१९००–६२) व सरोजकुमार रायचौधुरी (१९०२–७२) यांच्या कादंबऱ्या व लघुकथा याच कालखंडात वाचकांचे लक्ष वेधून गेल्या. प्रेमेंद्र मित्र (१९०४–) यांनी पंक ही झोपडपट्टीमधील जीवनाचे वास्तव चित्रण करणारी कादंबरी १९२५ मध्ये लिहिली. शैलजानंद मुखोपाध्याय यांच्या कयलाकुठी (१९३०) मध्ये कोळशाच्या खाणीतील भीषण वास्तवता प्रथम चित्रित झाली. गोपाल हालदार (१९०२–) यांच्या पंचाशेर पथे (१९४४) इ. संज्ञाप्रवाही कादंबऱ्यांनी नवे दालन खुले केले. उपनिबेश (१९४२), यैतालिक (१९४७), पद-संचार (१९५५) इ. कादंबऱ्या व अनेक उत्कृष्ट लघुकथा लिहिणारे नारायण गंगोपाध्याय (१९१९–७१) यांचे नाव माणिक बंदोपाध्यायांनंतरचे श्रमजीवी आणि दलित जनतेची सुखदुःखे जिव्हाळ्याने चितारणारे कथा-कादंबरीकार म्हणून घ्यावेच लागेल, तर सतीनाथ भादुडी (१९०६–६५) यांच्या जागरी (१९४५) व डोंडाँई चरितमानस (२ भाग, १९४९–५१) या कादंबऱ्यांत ग्रामीण भारताचे खरेखुरे प्रतिबिंब उतरल्याने कोणत्याही वस्तुनिष्ठ सर्वेक्षणात त्यांचा नामनिर्देश अटळ ठरतो.

या काळातील लघुकथाक्षेत्राकडे वळून पहाता कादंबरीशी समांतर अशीच विकासधारा स्पष्ट दिसून येते. बंकिमचंद्र चतर्जीचे थोरले बंधू संजीवचंद्र चतर्जी, ⇨ इंद्रनाथ बंदोपाध्याय (१८४९–१९११), ⇨ नगेंद्रनाथ गुप्त (१८६१–१९४०), स्वर्णकुमारी देवी यांनी बंगाली लघुकथेची पहिली वहिली वळणे घेतली. तीच वाट प्रशस्त करून सोडली रविंद्रनाथांनी. १८९१ पासून अव्याहत पन्नास वर्षे तरी कधी द्रुत लयीत तर कधी विलंबित लयीने त्यांनी लघुकथा लिहिल्या. लघुकथेसाठी ‘छोटो गल्प’ हा शब्द त्यांनीच रूढ केला. अभिजात क्रांतदर्शी मनीषा त्यांच्या कथांना एकदम श्रेष्ठ पातळीवर नेऊन ठेवते. ‘मिनीएचर महाकाव्ये’च अशा त्या कथा आजही अभ्यसनीय ठरतात. ज्या काळात त्या लिहिल्या जात होत्या, त्या काळात त्या चमत्कार ठरल्या यात नवल नाही. रवींद्रनाथांनंतर शरत्‌चंद्र चतर्जी, त्रैलोक्यनाथ मुखोपाध्याय, प्रभातकुमार मुखोपाध्याय, चारुचंद्र बंदोपाध्याय, सुधींद्रनाथ टागोर, दीनेंद्रकुमार राय (१८६९–१९४३), मणिलाल गंगोपाध्याय, सौरींद्रमोहन मुखोपाध्याय आदी कथाकारांची नावे संस्मरणीय आहेत. प्रमथ चौधुरी ‘बिरबल’ यांचा उल्लेख वर आलाच आहे. केदारनाथ बंदोपाध्याय (१८६३–१९४९) यांच्या प्रसन्न विनोदाचे गुलाबपाणी शिंपडलेल्या आल्हादक लघुकथा एकेकाळी अतिशय गाजत होत्या.


कल्लोल-युगात जगदीश गुप्त यांनी लघुकथेत आधुनिकतेचा अंगरखा चढवला. मनोविश्लेषणावर भर देण्यात येऊ लागला. सनातन प्रेमत्रिकोण आणि आदि-मध्य-अंत यांच्या तिकाटण्यात आवळलेली कथा आता मोकळी झाली. शैलजानंद मुखोपाध्यायांनी उपेक्षितांची अंतरंगे उलगडून, खाणकामगारांच्या खंती आणि बाऊलबैराग्यांच्या व्यथांना वाचा फोडली. प्रेमेंद्र मित्रांनी आपल्या कविसुलभ कल्पनाशक्तीचे मोजके पण ठसठशीत साज कथेवर चढवून रवींद्रनाथांच्या कथाशिल्पाचा वारसा काही काळ चांगला सांभाळला. कवी, कादंबरीकार नि चरित्रकार म्हणून प्रख्यात असलेल्या अचिन्त्यकुमार सेनगुप्तांचे कथाकार म्हणून स्थान अनेकांच्या मते अधिक मानाचे आहे. न्यायदानाच्या कामातील मनुष्यस्वभावाचा उदंड अनुभव, प्रयोगशील लेखणी व गद्य शैलीचा गोडवा यांमुळे ते लोकप्रिय ठरले. कवी बुद्धदेव बसूंच्या ‘रजनी हलो उतला’ (रात्र झाली उतावीळ) या कथेने बंगाली साहित्यसृष्टीत नीतिमूल्यांवर अपूर्व वादळ माजवले. त्यांच्या बुद्धिदीप्त, इंगितपूर्ण कथांनी बंगाली लघुकथा एकदम अग्रेसर झाली. आपल्या विचक्षण मनन-चिंतनाची छाप असणाऱ्या कथांनी अन्नदाशंकर राय यांनीही लघुकथा प्रगत केली. माणसाच्या मनातील अंधारवाटांचा वेध माणिक बंदोपाध्यायांच्या कथांत आढळतो. ⇨ राजशेखर बसू ‘परशुराम’ (१८८०–१९६०) यांनी नर्म विनोदी, मिस्कील, उपहासगर्भ कथा लिहून बंगालीत फारशा समृद्ध नसलेल्या विनोदवाटिकेची मशागत केली. बलाइचाँद मुखोपाध्याय ‘बनफूल’ यांची समर्थ लेखणी मोजक्या शब्दांत आणि आटोपशीर आवाक्यात परिणाम साधणाऱ्या ललितरम्य लघुकथांसाठी प्रसिद्ध आहे. शरदिंदू बंदोपाध्याय यांनी (बंगालपासून खूप दूर पुण्यात राहून) आपल्या खेळकर, सुललित व संस्कृत शब्दांचे ईषत् सिंचन करून प्रसन्नता साधलेल्या शैलीने सुंदर कथा लिहिल्या. आजही वाचकांचा कौल घेतला तर दिवंगत साहित्यिकांत शरदिंदूंना सर्वाधिक मते पडतील. विभूतिभूषण बंदोपाध्यायांनी रानावनातील अनोख्या फुलांसारख्या आपल्या कथांनी वाचकांना रिझविले. ताराशंकर बंदोपाध्यायांनी उत्तरराढ परगण्याचा माणूस, त्याची लोकसंस्कृती, मानवी प्रयत्न नि निष्ठुर नियती यांचा संघर्ष यांचे अंतदृष्टीने चित्रण केले. मनोज बसू, सरोजकुमार राय चौधुरी, प्रबोधकुमार सान्याल हेदेखील याच काळात नावारूपास आलेले श्रेष्ठ कथाकार, बंगाली लघुकथेच्या विकासाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे बहुतांश कथाकार हे प्रवृत्तीने कवी असल्याने घाट कथेचा घेतला तरी काव्यात्मतेचा स्पर्श तिथे असतोच, किंबहुना एकंदरीतच बंगाली साहित्यावर काव्यात्मतेचा पगडा विशेष जाणवतो.

कथा-कादंबरीकडून आता पुन्हा कवितेकडे वळावयास हवे. १९१३ मध्ये रवींद्रनाथांच्या गीतांजलि (१९१०) या कवितासंग्रहाला साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले. या अपूर्व यशाचे परिणाम देशी-विदेशी साहित्य व साहित्यिक मनोधारणेवरही झाले. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात, इंग्रजी साहित्यामध्ये ‘इमेजिझम’ (प्रतिमावाद) ही एझरा पाउंडप्रणीत नवकाव्याची चळवळ भरात असताना व टी. एस्. एलियट आणि डब्ल्यू. बी. येट्स हे खंदे कवी काव्यजगत हादरवून टाकत असताना रवींद्रनाथांच्या गीतांजलीमध्ये पाश्चात्त्य वाचकांना व समीक्षकांना कोणते वैशिष्ट्य जाणवले असेल ? या प्रश्नाचे उत्तर कवी डब्ल्यू. बी. येट्स यांनीच गीतांजलीला लिहिलेल्या इंग्रजी प्रस्तावनेत सापडते. या कवितांमधील सहजता, निसर्गनिर्भर प्रतिभा, भारतीय जीवनातील काठिण्यासकट त्यांतील सोज्वळ सोशिकता टिपणारी नाट्यमयता ही गीतांजलीची प्रमुख वैशिष्ट्ये होत. रवींद्रनाथांच्या या कवितांमध्ये वैष्णवांच्या मधुराभक्तीची झलक आहे पण तरीही रवींद्रनाथांना ‘मिस्टिक पोएट’ म्हणणे अन्यायकारक ठरेल. नदी, फुलांची परडी, शय्येवरील प्रियेशेजारी तरवार ठेवून जाणारा पती, दाराशी वाजणारी पाऊले, अंतःपुरातून येणारे बिल्वरांचे नाद, निसर्गातून उद्‌भवणारे स्वर या सर्व प्रतिमा कोणत्याही प्रकारचे पारलौकिक तत्त्वज्ञान सांगणाऱ्या नसून भोवतालचे जिवंत नाट्य चिमटीत पकडणाऱ्या आहेत. पत्नी, मुलगी व मुलगा यांच्या लागोपाठ चिरविरहामुळे (अनुक्रमे – १९०२, ३, ७) या काळातील रवींद्रनाथांचे गाढ एकटेपण आणि मृत्यूवरील विदग्ध चिंतन गीतांजलीत शब्दबद्ध झाले आहे. ऋतू बदलतात तसेच तितक्याच सहज स्वाभाविकतेने रवींद्रनाथांनी जीवनातील क्षणोक्षणींचे अनपेक्षित बदल स्वीकारले व भारतीय प्रतिमांच्या मुशीतून वैश्विक अनुभूतीचे ‘वज्रादपि कठोराणि, मृदूनि कुसुमादपि’ असे स्वरूप जगाला दाखविले.

नवकवितेची चळवळ या पार्श्वभूमीवर सुरू झाली. रवींद्रनाथांना टाळणेही अशक्य आणि स्वीकारणेही अशक्य, अशा प्रकारच्या विचित्र कोंडीत नवी पिढी अडकली होती. भोवतालची बदलती राजकीय व सामाजिक परिस्थिती, हेच या अवस्थेचे कारण होते. त्यामुळे कालि-ओ-कलम, कल्लोल, परिचय इ. नवनियतकालिकांच्या युगात बंगाली कवितेला नवनवीन धुमारे फुटत असतानाही रवींद्रनाथांची बहुमुखी प्रतिभा बहुसंख्य रसिकांना आकर्षित करीतच होती. कविजनांना एक मोठा गट रवींद्रनाथांच्या काव्याचे बाह्यानुकरण करीत असतानाच काजी नज्रुल इस्लाम, मोहितलाल मजुमदार, सत्येंद्रनाथ दत्त, यतींद्रनाथ सेनगुप्त, अचिन्त्यकुमार सेनगुप्तप्रभृतींनी वेगळा सूर लावला. रक्तमांसात भिनलेले रवींद्रनाथ झुगारून त्यांनी स्वांतरीच्या प्रवृत्तींना प्रमाण मानले आणि आपल्या उमाळ्यांची प्रामाणिक अभिव्यक्ती केली. त्यांच्या उत्तरसूरींनी त्यांच्यावरही कडी केली. त्यांत बुद्धदेव बसू, सुधींद्रनाथ दत्त, बिष्णू दे, जीवनानंद दास, अमिय चक्रवर्ती, प्रेमेंद्र मित्र, हुमायून कबीर, अन्नदाशंकर राय, अजित दत्त, संजय भट्टाचार्य, दिनेश दास, समर सेन, हरप्रसाद मित्र आदी कवींची गणना होते.

रवींद्रांच्या काव्यसंसारातून विभक्त होऊन हे नवे कवी आपली वेगळी चूल मांडत होते. नव्या जगाची जटिलता, शंकाकुशंका, विषाद आणि अस्वस्थता, उतावीळपणा आणि असमाधान यांमुळे हे कवी व्याकुळ झाले होते. संशय, तर्ककाठिण्य, ग्लानता, बंडखोरी, बेफिकिरी, जुन्या जगाचा विध्वंस करण्याची अनावर इच्छा, मुक्त मनास काचणारे, जाचणारे सर्व निर्बंध नष्ट करून नवे निर्भय, निरोगी, निःशंक जग निर्माण करण्याची उत्कट मनीषा बाळगून हे लेखक साहित्याच्या प्रांगणात उतरले होते. पाश्चात्त्य कविमनीषींचा त्यांच्यावरील प्रभाव स्पष्ट आहे. महायुद्धोत्तर जीवनकलहाची भीषणता, समरोत्तर समाजसंकराची भेसुरता प्रत्यक्ष अनुभवास आली नसली, तरी ती त्यांच्या संवेदनाशील मनानी टिपली होती. भारतीय तत्त्वज्ञानातून काहींना जागृती, जीवनानंद, श्रद्धा, चिदानंद, ईश्वरशरणता इत्यादींचा आसरा लाभला होता. त्यामुळे एकाच वेळी विश्वास व विच्छिन्नता, उत्साही प्रयोगशीलता आणि हताश विफलता, आवेग आणि उद्‌वेग यांच्या काव्यात आढळतात. मात्र सनातन, शाश्वत, चिरंतन यांचा वेध घेण्याऐवजी आता क्षणिकाची व वर्तमानाची दखल घेतली जाऊ लागली. प्रतीकापेक्षा त्यांना सांप्रतिकाचे कौतुक आहे. ओंकारापेक्षा आजमितीच्या हुंकारांचा त्यांना ध्यास आहे.

समीक्षकांनी दर्शविल्याप्रमाणे या काळातील कवितांत बहिराश्रित (एक्झोटेरिक) व अंतराश्रित (एसोटेरिक) अशा दोन प्रवृत्ती उदयास आल्या व अखेरीस अंतराश्रित प्रवृत्तीने बहुसंख्य कवींचा कब्जा घेतला. विशेषतः स्वातंत्र्योत्तर वा रवींद्रोत्तर युगात जी काव्याची अस्मिता चहू अंगांनी फुलून आलेली दिसते तिचे बीजारोपण या काळातील कवींनी केली.


बुद्धदेव बसू यांच्या आरंभीच्या मर्मवाणी (१९२५), बंदीर वंदना (१९३०) इ. रचनांत रवींद्रप्रभाव टाळण्याचा बुद्धिपुरस्सर प्रयत्न उघडा पडतो परंतु पृथ्वीर पथे (१९३३), कंकावती (१९३७), दमयंती (१९४३), द्रौपदीर साडी (१९४८) इ. नंतरच्या कृतींत त्यांची कविता परिणतप्रज्ञतेची छाप दाखवते. कविता या त्यांच्या मासिकाने १९३५ पासून बजावलेली कामगिरीही मोलाची आहे. नव्याची तरफदारी आणि जुनाटाचा नायनाट अशी दुहेरी भूमिका त्यांनी घेतली.

अनेक समीक्षक ⇨जीवनानंद दास (१८९९–१९५४) यांना रवींद्रनाथांनंतरचा सर्वश्रेष्ठ बंगाली कवी मानतात. त्यांच्या नवशिक्या रचनांवर सत्येंद्रनाथ दत्त आणि नज्रुल इस्लाम यांची छाप असली, तरी लवकरच ते अंतराश्रित, केवल काव्याच्या आराधनेस लागले व अल्पावधीतच विशुद्ध काव्याचे अध्वर्यू म्हणून नावारूपास आले. झरा पालक (१९२८) या संग्रहाने ते प्रथम रसिकांपुढे आले. नंतरच्या काळातील त्यांच्या अंतर्मुख, अंतर्लीन कवितांनी वादाचे एवढे मोहोळ उठवले, की त्यामुळे त्यांना महाविद्यालयीन प्राध्यापकीसही मुकावे लागले. एझरा पाउंड व टी. एस्. एलियट यांच्या वाचनाने त्यांच्या मनातील मन्वंतर घडून आले असे म्हणतात. धूसर पांडुलिपि (१९३६), बनलता सेन (१९४२), महापृथिवी (१९४४), सातटि तारार तिमिर (१९४८) इ. कवितासंग्रहांत त्यांच्या प्रतिभेचे संचित उपलब्ध आहे. कवितार कथा (१९५६) या लेखसंग्रहात त्यांच्या काव्यविषयक चिंतनाची झलक मिळते. ‘बनलता सेन’सारखी त्यांची कविता आधुनिक बंगालची आवडती गीतिका आहे.

उर्वशी ओ आर्टेमिस (१९३३) या कवितासंग्रहापासून ⇨ विष्णू दे (१९०९– ) यांनी आरंभिलेली आपली जययात्रा आजतागायत अखंडपणे चालू ठेवली आहे. समस्त ज्ञानगगन दो बाहूंनी कवळणारा हा महाकवी जगात जिथे जिथे सुकविता आढळली तिथे तिथे तिचा आस्वाद घेतो. विद्या आणि कला, वाद आणि विज्ञान, विचार आणि विलोकन, चिंतन आणि मंथन अशा सर्व प्रक्रियांत अहर्निश रमणारा हा कवी निरलसपणे काव्यनिर्मितीत रत असतो. त्यांच्या साहित्यामुळे बंगाली भाषा, साहित्य आणि संस्कृती गौरवान्वित झाली.

शांतिनिकेतनच्या निवांत वातावरणात वाढलेले आणि रवींद्रनाथांचे चिटणीस म्हणून त्यांच्या सान्निध्यात वावरलेले कवी ⇨ अमिय चक्रवर्ती (१९०१ –) हे होत. खसडा (१९३८), एकमुठो (१९३९), पारापार (१९५३), पालाबदल (१९५५) इ. कवितासंग्रहांतून त्यांनी आपले पृथगात्म काव्यचित्र रेखाटले. महाकवीच्या छायेत राहूनही स्वतःची स्वतंत्र अभिव्यक्ती त्यांनी ठामपणे जोपासली आणि बंगाली कविता आशयसंपन्न केली.

सुधींद्रनाथ दत्त (१९०१–६०) यांनी वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी आपला काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. मात्र त्यांचे नाव झाले ते त्यानी काढलेल्या परिचय (१९३१) या नवनियतकालिकामुळे. परिचयमध्ये प्रसिद्ध झालेल्या (१९३२) त्यांच्या ‘ऑर्केस्ट्रा’ या कवितेने रसिकांचे लक्ष वेधून घेतले. ऑर्केस्ट्रा (१९३५), क्रंदसी (१९३७), उत्तराफाल्गुनी (१९४८) व संवर्त (१९५३) या काव्यसंग्रहांमुळे त्यांची कविकीर्ती सुस्थिर झाली. स्वगत (१९४८) या निबंधसंग्रहात त्यांचा साहित्यविचार संकलित आहे. बंगालीइतकेच इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. कोमलकान्तपदावलीच्या नादाने आपली कविता शब्दमधुर करण्याचे त्यांनी नाकारले. परिणामी ती अनेकदा पांडित्यकंटकित, दुर्बोध व जडजंबाल शब्दाने लगडलेली दिसते. बंगाली नवकवितेच्या पाच आघाडीच्या कवींत त्यांची गणना होते.

नव्या कवींतही नवयुवक ठरतील असे समर सेन (१९१६–) यांची कविता शहरातील कनिष्ठ व मध्यम वर्गांच्या हताश आणि तरीही तोल सांभाळण्याची धडपड करणाऱ्या जीवनाचा सूर पकडणारी आहे. उपरोध आणि छद्म यांचा ते सुरेख वापर करू शकतात. कयकटि कविता (१९३७), ग्रहण (१९४०), नाना कथा (१९४२), तीन पुरुष (१९४४) इ. त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. हुमायून कबीर (१९०४–६९) यांचे स्वप्नसाध (१९२७) व साथी (१९३२) सारखे संग्रह लोकप्रिय असून चतुरंग (१९३९) या त्यांच्या दर्जेदार त्रैमासिकामुळे त्यांची साहित्यिक कर्तबगारी दीर्घकाळ संस्मरणीय ठरेल. अजित दत्त (१९०७–) हे प्रगति मासिकाचे एक संपादक होते. कुसुमेर मास (१९३०) या संग्रहाने त्यांची कविता प्रथम रसिकांस सादर झाली. पातालकन्या (१९३८), नष्टचाँद (१९४५), पुनर्नवा (१९४७) इ. नंतरच्या काव्यसंग्रहांतूनही त्यांच्या मृदुमवाळ, संयत शब्दकळेचे सुभग दर्शन घडते. जनांतिके (१९४९) मध्ये त्यांचे ललित निबंध एकत्रित असून मन पवनेर नाव (१९५०) मध्ये त्यांचे ‘रैवत’ या टोपणनावाने पूर्वप्रकाशित गद्यलेख संग्रहीत आहेत. प्रेमेंद्र मित्र हे चतुरस्त्र प्रतिभेचे धनी असून प्रथमा (१९३२), सम्राट (१९४०), फेरारी फौज (१९४८), सागर थेके फेरा (१९५६) इ. त्यांचे काव्यसंग्रह रसिक वाचक व टीकाकारांच्या प्रशंसेस पात्र ठरले आहेत. त्यांच्या कवितेत कुठेही आक्रस्ताळा आक्रोश आढळत नाही. दलितांची आणि वंचितांची व्यथा-वेदना त्यांच्या कवितेत अवतरते ती कवीच्या कळवळ्याने. अचिन्त्यकुमार सेनगुप्त यांची पल्लेदार लेखणी विविध क्षेत्रांत झेंडा मिरवीत हिंडली, तरी कवी म्हणून त्यांचा लौकिक अधिक होता. आमरा (१९३३), प्रिया ओ पृथिवी (१९३६), नील आकाश (१९५०) इ. संग्रहांतून त्यांची मोहक कविता रसिकांच्या पसंतीस उतरली.

पूर्वीच उल्लेख केल्याप्रमाणे रवींद्रनाथांच्या छायेत वावरूनही या काळातील बंडखोर कवींनी रवींद्र कवितेच्या जोरदार प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे पत्करले. प्रेम, धर्म, सौंदर्य इ. पारंपारिक प्रतिष्ठित काव्यमूल्यांचा त्यांनी निडरपणे पुनर्विचार केला. शारीरिक वासनांचा विटाळ न मानता काव्यात त्यांची उघड अभिव्यक्ती केली. नीतीचा डोलारा ढासळतो आहे हे डोळ्यांना दिसत असता डोळ्यांवर कातडी ओढून कवितेच्या हस्तिदंती मनोऱ्यात मश्गूल होण्याचे नाकारून त्यांनी विचारगर्भ, विश्लेषक अशी कविता लिहिली. कवितेच्या आंगिक शैलीत तर त्यांनी नित्य नवे प्रयोग केले. कविता मुक्तछंद होतीच, ती आता मुक्तबंधही झाली. रूढ संकेत, कल्पना, अलंकार, रूढार्थ साऱ्यांची मोडतोड करून त्यांनी भाषा हवी तशी वाकवली. जुन्या शब्दांना नव्या छटा दिल्या. प्रास आणि यमकांची नवी मांडणी केली. त्यांत अर्थघनता आणली. तर्काधिष्ठित विचारांची साखळी प्रमाण न मानता अंतःकरणात उचंबळणाऱ्या भावनांची उच्छृंखल शृंखलाच त्यांनी उचलून धरली. परिणामी भावभावनांचा अवघा कल्लोळ त्यांनी यथार्थपणे शब्दांकित केला. जुन्या स्वच्छंदतेशी (रोमॅंटिकतेशी) त्यांनी फारकत घेतली आणि समकालीन वास्तवतेच्या भीषण, कराल रूपाशी घरोबा केला. युद्धोत्तर उद्ध्वस्त, समाजपुरुषाच्या देहावर चर्मरोगासारख्या चरत जाणाऱ्या झोपडपट्ट्या, दारिद्र्य, शोषण, वैताग, विफलता आदी सर्व भयानक समस्यांकडे डोळेझाक न करता तोही मानवजातीचा समाईक वारसा आहे, हे अप्रिय सत्य त्यांनी डोळसपणे स्वीकारून कवितेत त्याची अभिव्यक्ती केली. जगातील सर्व श्रेष्ठ साहित्य ही आपलीच बापकमाई आहे असे मानल्याने त्यांच्या कवितांत विविध देशांचे संदर्भ सहोदर असल्यासारखे वावरतात. पण अशी प्रासंगिक दुर्बोधता पतकरूनही त्यांनी आपली काव्यसाधना अविरत चालू ठेवली. त्यांच्या या अदम्य उद्यमाचा एकंदर बंगाली साहित्यावरच दूरगामी परिणाम झाला असून, आज मितीसही त्यांचे वारसदार बंगाली साहित्य विश्वसाहित्याच्या पंक्तीत मानाचे आसन प्राप्त करील या आत्मविश्वासाने साहित्यनिर्मिती करीत आहेत.


या कालखंडातील नाट्यलेखन मात्र नवतेच्या या लाटेपासून कोरडे राहिलेले दिसते. अपरेशचंद्र मुखोपाध्याय (१८७५–१९३४) हे जुन्या धर्तीच्या नाटकाचे अखेरचे पाईक होते. त्यांच्यानंतर मन्मथ राय (१८९९), शचींद्रनाथ सेनगुप्त (१८९२-), निशिकांत बसुराय, जलधर चतर्जी (१८९०-१९६४), बिधायक भट्टाचार्य (१९१०-), महेंद्र गुप्त (१९१०-), अयस्कांत बक्षी (१८९९-१९६१), प्रमथनाथ बिशी इ. नाटककार पुढे आले. परंतु त्यांच्या प्रयत्नांनी रंगभूमी तारली एवढेच म्हणता येईल. बाह्यांगदृष्ट्या त्यांच्या नाटकांत आधुनिकता आली असली, तरी श्रेष्ठ नाट्यकृतींची निर्मिती या काळात (रवींद्रनाथांचा अपवाद सोडता) कुणालाच साधली नाही. मन्मथ राय यांच्या देवासुर (१९२८), कारागार (१९३०), अशोक (१९३४) इ. नाटकांत (खाडीलकरांच्या कीचकवधासारखी) समकालीन राजकारणाची रूपके ऐतिहासिक व पौराणिक कथावस्तूंतून खेळविली होती. निशिकांत बसुराय यांनी भावोद्दीपक नाटके लिहिली. देवलादेवी (१९१८), पथेर शेषे (१९२८) यांसारख्या प्रसिद्ध नाटकांखेरीज त्यांचे बंगे बोर्गी (१९२२) हे नाटक बंगालवरील मराठ्यांच्या स्वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर चितारले असल्याने लोकप्रिय ठरले. शचींद्रनाथ सेनगुप्तांची दोन गाजलेली नाटके म्हणजे गैरिक पताका (१९३०) व सिराजद्दौला (१९३८). त्यांच्या रक्तकमल (१९२९), झडेर राते (१९३१), स्वामी-स्त्री (१९३७) इ. नाटकांनीसुद्धा रंगमंचावर खूपच यश मिळविले. नर्सिंग होम (१९३३), तटिनीर बिचार (१९३९) इ. नाटकांत त्यांनी सामाजिक समस्या जनाभिरूचीच्या कलाने मांडल्या होत्या. बिधायक भट्टाचार्य यांची मेघमुक्ति (१९३८), माटिर घर (१९३९), बिशबछर आगे (२ री आवृ. १९४८) इ. नाटके कौटुंबिक करमणुकीचे परिवेशन करणारी असल्याने लोकप्रिय ठरली. महेंद्र गुप्त यांनी अनेक नाटके लिहिली. त्यात कंकावतीर घाट (१९४१), राणी भवानी (१९४२), टिपू सुलतान (१९४४) इ. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. प्रमथनाथ बिशी, बलाइचाँद मुखोपाध्याय, ताराशंकर बंदोपाध्याय, मनोज बसू, शरदिंदू बंदोपाध्याय इ. साहित्यिकांनीही नाटके लिहिली अथवा आपल्याच कथा कादंबऱ्यांना नाट्यरूप दिले. रवींद्रनाथ मैत्र (१८९६-१९३३) यांचे मानमयी गर्ल्स स्कूल (१९३२) हे अशा नाटकांतून सदाबहार म्हणून टिकलेले एक नाटक. अयस्कांत बक्षींचे मोला मास्टर (१९४३) हेही असेच मंचसफल नाटक. या सर्व नाटकांनी रंगभूमीस टेकू दिला खरा, परंतु बंगाली नाट्यसाहित्याचा खऱ्या अर्थाने विकास केला असे म्हणणे अवघड ठरेल.

सेन, सुकुमार (बं.) जोशी, श्री. बा. (म.)

पुढील माहिती बंगाल-३ या शिर्षकात पहाणे