विकिरण, फळांचे व बीजांचे : स्वतःचे व स्वजातीचे परिरक्षण करणे व सातत्य टिकविणे ही सजीवांची महत्त्वाची लक्षणे आहेत. त्यामुळे व्यक्तीचे (वनस्पतीचे) शरीर जास्तीत जास्त पण मर्यादित कालपर्यंत टिकून राहते तसेच त्या व्यक्तींची जाती व्यक्तीनंतर चालू राहून पृथ्वीवरील जीवनाचा ओघ सतत चालू राहतो. व्यक्तीचे मर्यादित जीवन (आयुष्य) संपण्यापूर्वी आपल्या जातीचे सातत्य राखण्याकरिता ती प्रजोत्पादनाचे कार्य करते. बीजी वनस्पती जी बीजे निर्माण करतात, त्यांच्यापासून नवीन वनस्पती निर्माण होऊन जातीची परंपरा (सातत्य) राखली जाते. जीवनातील धोक्यांना अनुलक्षून सर्व वनस्पती अनेक बीजे (तत्सम इंद्रिये किंवा बीजुके म्हणजे सूक्ष्म प्रजोत्पादक घटक) उत्पन्न करतात यांपैकी थोडी जरी रुजून वाढली, तरी जातीची परंपरा पुढे चालू राहते. एका व्यक्तीने निर्मिलेल्या सर्वच बिया अगदी जवळजवळ किंवा एकाच ठिकाणी पडून राहिल्या, तर पुढे त्या रूजून त्यांपासून बनणाऱ्या नवीन वनस्पतींपैकी प्रत्येकीस पूर्णपणे वाढल्यास आवश्यक तितकी जागा, प्रकाश जमिनीतील पाणी व क्षार उपलब्ध होणे कठीण असते यामुळे त्या सर्वामध्ये फार तीव्र स्पर्धा निर्माण होऊन कदाचित मूळ वनस्पतीचे सातत्य राखल्यास कोणीच उरणार नाही. यास्तव बीजनिर्मितीबरोबरच जनक वनस्पतीपासून बीजांचा दूरवर प्रसार होणेही आवश्यक असते. प्रसारामुळे निदान काही बिया जीवनावश्यक परिस्थितीच्या दृष्टीने व स्पर्धेच्या संदर्भात अनुकूल ठिकाणी पडून वाढीस लागणाऱ्या संभव अधिक असतो. साहजिकच ज्यांची बीजे प्रसारास सोयीची असतात, त्यांचा प्रसार अधिक होतो व त्यांच्या जातींचे सातत्यही अधिक खात्रीने राखले जाते. अनेक वनस्पतींच्या बिया योग्य वेळी सुट्या वा अलग होऊन त्यांचा प्रसार होतो तथापि कित्येकींची फळेच प्रसारित होतात व त्यांच्याबरोबर बीजेही दूरवर नेली जातात. या गोष्टी घडण्यास पोषक अशी रचना व साधने अनेक फळांत व बीजांत असतात. शिवाय या कार्यास आवश्यक ती बाहेरील नैसर्गिक साधनेही उपयोगी पडतात. फळे व बीजे यांच्या प्रसारास विकिरण म्हणतात. ज्या जातींत, प्रजातींत किंवा कुलांत (उदा., ग्रॅमिनी, कंपाझिटी, लेग्युमिनोजी) विकिरण अधिक उत्तम प्रकारे होते, त्यांची संख्या व प्रसार पृथ्वीतलावर अधिक असावा यात नवल नाही. वनस्पतीविज्ञानाच्या दृष्टीने त्या जाती, प्रजाती व कुले अधिक प्रगत समजली जातात. विकिरणास वारा, पाणी व प्राणी या बाहेरच्या घटकांची मदत होते, म्हणून त्यांना मध्यस्थ म्हणतात. शिवाय अशा मदतीशिवाय फळातील नियोजित विशेष प्रकारच्या यंत्रणेमुळेही विकिरण होते तसेच अनेकदा मध्यस्थ व अशी यंत्रणा यांच्या समन्वयानेही ते साधले जाते.

वायु-विकिरण : वाऱ्यांच्या मध्यस्थीने फळांचा व बीजांचा सर्वांत जास्त प्रसार होतो मात्र याकरिता फळे व बीजे यांचा आकार आणि आकारमान व वजन हवेत सहज तरंगण्यास सोयीचे असावे लागते. फक्त बियांचा प्रसार होण्यासाठी आधी फळे तडकून त्या अलग व्हाव्या लागतात. शिवाय काहींत तरंगण्यास उपयुक्त साधने असतात. (उदा., पंखा, केस इ.) व ती फलावरण, बीजावरण किंवा फुलातील व फुलाजवळच्या इतर भागांपासून [उदा., छदे, संदले ⟶ फूल]. बनवतात. फळे तडकण्यास सर्वसाधारण कोरडी हवा अनुकूल असते तथापि काही फळे (उदा., रुएलिया, अबोली) ओलसर हवेत पाणी शोषून तडकतात. वाऱ्याने काही फळे व बीजे यांच्या विकिरणाची साधने : (१) सहदेवी (फळावरील केस), (२) कुडा (बीजावरील केस), (३) सातवीण (बीजावरील केस), (४) स्पिनिफेक्स स्क्वॅरोसस (फुलोऱ्याची काटेरी छदे), (५) लसूणघास (फिरकीसारखे शुष्क फळ), (६) दुतुंडी (फळावरील छदांचे आकडे), (७) एरंड (कीटकांसारखे दिसणारे बीज), (८) आवई (फळांच्या शकलांचे पिळवटणे), (९) एरोडियम (फलांशावरील केसाळ किंजल), (१०) लिंडेन (पंखासारखे छद), (११) विंचवी (फळावरील किंजलाचे आकडे), (१२) शिसवी (पंखासारखे फलावरण).पसरविलेल्या फुलातील परागाप्रमाणे [⟶ परागण] येथे फळे व बीजे प्रसाराच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात फुकट जाण्याचा संभव असल्याने वनस्पतींना ती फार मोठ्या संख्येने निर्माण करावी लागतात. त्यांचे आकारमान जितके लहान व वजन जेवढे कमी तितका प्रसार अधिक होतो [उदा., अफू, मोहरी, राळा इत्यादींच्या बिया आणि सूर्यफूलाच्या व तृण (गवतांच्या) कुलातील अनेक वनस्पतींची फळे]. कित्येक लहान किंवा मध्यम आकारमानांच्या बिया (उदा., प्रोपटवेल, घोसाळे) व शुष्क फळे (उदा., बिबळा, वावळा, पारिजातक, शिरीष) चपटी असल्याने ती वाऱ्याने वाहून नेण्यास सोयीची असतात. तसेच वरून खाली पडताना सपाट बाजू जमिनीशी समांतर राहिल्याने ती अधिक वेळ तरंगत राहतात व तशातच वाऱ्याच्या एखाद्या जोरदार झुळकेने दूरवर नेली जातात. ⇨माधवलता व ⇨पेट्रिया यांची पंखयुक्त फळे वरून खाली पडताना गिरक्या घेत येतात. फळावरचे (उदा., सहदेवी, दुधाळ, एकदांडी) व बियांवरचे केसांचे पुंजके (उदा., रूई, सातवीण) छत्रधारी सैनिकांच्या छत्रीप्रमाणे तरंगण्यास मदत करतात, याला छत्र – यंत्रणा म्हणतात. उष्ण हवेच्या मंद प्रवाहाबरोबर ही वर जातात व नंतर मोठ्या वाऱ्यांच्या प्रवाहामध्ये सापडून खूप दूरवर नेली जातात. हे केस बियांवर तुऱ्याप्रमाणे (उदा., कुडा, लाल कण्हेरी), झुपकेदार (उदा., रूई, सातबीण) किंवा सूक्ष्म धाग्यांच्या गुंतवळींप्रमाणे (उदा., सावर, कापूस) असतात. मोरवेल व ऐरोडियम यांच्या फलाशांच्या (फळातील भागावर) केसाळ किंजल असते. केशावरणापेक्षा प्रसाराला पंख अधिक सामर्थ्यवान असल्याने अनेक क्षुपे (झुडपे), महालता (मोठ्या वेली ) व वृक्षांची फळे (उदा., कारंदा, वावळा, ॲश) किंवा बीजे पंफयुक्त व हलकी असतात (उदा., शेवगा, महॉगनी, टेटू, तून). शिसवीचे फलावरण पंखासारखे असून लिंडेनच्या फळांना पानासारखा छेद पंखाप्रमाणे उपयुक्त असतो. केस व पंखांच्या अभावी अनेक लहान मोठ्या बियांचा प्रसार वाऱ्याच्या साहाय्याने होतो. हिला धूपमात्र यंत्रणा म्हणतात. ही फळे शुष्क असून ती अंशतः तडकल्यावर आतील बिया वाऱ्यांच्या प्रत्येक झुळुकाबरोबर (धूपपात्रातील धुराप्रमाणे) थोड्या थोड्या बाहेर व जनक वनस्पतीपासून दूर फेकल्या जातात (उदा., स्नॅपड्रॅगॉन, बिशकोप्रा, पिवळा व काटे धोतरा, पोपटवेल, बचनाग, अफू), तुळस, सॅल्व्हिया यांच्या संवर्तातून (पुष्पकोशातून) त्यातील लहान सुटी फळे अशीच वाऱ्याने बाजूस केली जातात.

यांशिवाय काही वनस्पतींत गोलाकार फलयुक्त भाग किंवा सर्वच वनस्पती मुळासकट अलग होऊन वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर जमिनीसरपट चेंडूप्रमाणे गडगडत, फिरत, उशी घेत व मार्गात अनेक बिया उधळत दूरवर नेली जाते ती पाणथळ जागी थबकते व तेथे बिया बाहेर पडतात (उदा., भादली, पार्स्ले यांच्या फळांचे झुबके, स्पिनिफेक्स स्क्वॅरोसस या नावाच्या समुद्रतीरवासी गवताचा काटेरी छदयुक्त फुलोरा, अहाळीव, यवास, जेरिकोचा गुलाब इ. वनस्पती). काहींची फक्त फळे गेलाकार असल्याने फिरकीप्रमाणे गिरक्या घेत लांबवर जातात (उदा., लसूणघास) हिला लोळण यंत्रणा म्हणतात.


जल-विकिरण : काही जलवासी, नदीतीरवासी किंवा समुद्रतीरवासी वनस्पतींची फळे (उदा., नारळ, पोफळी, इंगळी, निवर) पाण्याच्या प्रवाहाने पसरविली जातात. या फळात असलेल्या सूत्रमय मध्यकवचात भरपूर वायुकोटरे (हवा पोकळ्या) असून ती फळांना तरंगण्यास उपयुक्त असतात, शिवाय अपिकवच (बाह्यावरण) जाड व बरेच जलाभेद्य असते. फळात (उदा., उंडण, केवडा, मर्यादवेल, पांगारा) व बीजात (उदा., कमळ, पोटॅमोजेटॉन) कोठे तरी एक अथवा वायु-कोटरे असल्याने अनेक जलवनस्पतींची किंवा पाण्याच्या जवळपास वाढणाऱ्या वनस्पतींची ती इंद्रिये पाण्यावर तरंगू शकल्याने पाण्याने त्यांचा प्रसार होतो. अनेक कच्छ वनस्पतींची बीजे झाडावर रूजून [अपत्यजनन ⟶ परिस्थितीविज्ञान] बाहेर पडलेले अविकसित रोप पाण्यात तरंगू शकल्याने त्याचा प्रसार पाण्यामार्फत होतो. झाडे पाण्याजवळ वाढत असल्यास काही झाडांची फळे किंवा बीजे तरंगतात परंतु तीच झाडे किनाऱ्यापासून बरीच आत (आंतर्देशीय) वाढत असल्यास फळांचे वा बीजांचे तरंगण्याचे सामर्थ्य फार कमी झालेले आढळते (उदा., उंडण, बारतोंडी, गजगा) हे अनुकूलनाचे [ बदललेल्या पर्यावरणीय परिस्थितीशी जुळवून घेण्याचे ⟶ अनुकूलन] उदाहरण मानतात. वायु-विकिरणाचे अनुकुलन असलेल्या काही फळांना व बीजांना (उदा., जखमी) जल-विकिरणाचाही फयदा होऊ शकतो कारण हवेत तरंगण्याचे साधन त्यांना येथेही उपयोगी पडते.

प्राणि-विकिरण : वाऱ्याप्रमाणे अनेक प्राण्यांचा (पक्षी, माकडे, खारी, गुरे, मेंढ्या, जंगली जनावरे व माणसे) फळांच्या व बियांच्या प्रसारात महत्त्वाचा वाटा असतो. हे कार्य मुख्यतः तीन प्रकारांनी घडून येते : (१) कोणत्याही प्राण्याच्या शरीराला त्याला नकळत बिया व फळे चिकटतात व अनवधानानेच ती प्राण्यांच्या सतत होणाऱ्या हालचालीत केव्हा तरी व कोठे तरी पसरवली जातात. (२) प्राणी फळे व बीजे खातात व बी कोठेही (बहुधा दूरवर) टाकून देतात. (३) काही फळे व बीजे आकर्षक वाटल्याने ती प्राणी घेऊन जातात परंतु पुढे ती निरूपयोगी आढळल्याने टाकून देतात. मनुष्य हा एकच असा प्राणी आहे की, जो वनस्पतींच्या प्रसाराकरिता मुद्दाम प्रयत्न करतो कारण अशी फळे, बीजे अथवा त्या वनस्पती त्याला उपयुक्त व आवश्यक वाटतात.

यांपैकी पहिल्या प्रकारच्या फळांना किंवा बीजांना प्राण्यांच्या शरीरात चिकटून राहण्यास किंवा त्यांच्या केसात अडकून राहण्यास काटे किंवा आकडे (रूपांतरित छद्रे, किंजले, उपांगे) असतात. (उदा.,दुतुंडी, आघाडा, गवते,उटकटारी, निचर्डी, विंचवी, गोखरू). कधी-कधी फळांवर चिकट पदार्थ स्त्रवणारे प्रपिंड असतात (उदा., पुनर्नवा, चित्रक). ⇨हाडमोडी, कॅसिया [⟶ अमरवेल], बांडगूळ यांच्या फळांतील चिकट मगजाने (गराने) वेढलेल्या बिया पक्ष्यांना गिळता न आल्याने त्या चोचीस चिकटून राहतात, दुसऱ्या झाडावर चोच साफ करत असता त्या तेथे चिकटतात व पुढे तेथेच रुजून वाढीस लागतात. अनेक ⇨जलवनस्पतींची फळे व बीजे चिखलामुळे पक्षी व काही इतर प्राण्यांच्या पायांना चिकटून त्यांचा प्रसार होतो. जंगलातून किंवा शेतातून फिरून आल्यावर आपल्या कपड्यास अशा प्रकारे चिकटून आलेली लहान फळे आपल्याला सहज आढळतात.

दुसऱ्या प्रकारच्या प्राणि-विकिरणात पक्व फळांचो आकर्षक रंग, वास, मगजाचा स्वाद, मधुरस इत्यादींमुळे पक्षी, माकडे, वटवाघळे वगैरे आकर्षित होतात व ती खाऊन कठीण भाग (आठळी, बिया) सहज फोडण्यास अशक्य म्हणून टाकून देतात.अनेक फळांची आकर्षक लक्षणे त्यांचे बी प्रसारयोग्य झाल्यावरच दिसतात, तत्पूर्वी फळांचा रंग हिरव्या पणसमारंभात मिसळून जातो, मगजात गोडी नसते व सुगंधही नसतो ( उदा., केळ, आंबा, चिंच, काजू, पेरू). फळातील खाद्य भाग फुलातील किंवा फळातील किंवा फळातील भिन्न भागांपासून बनलेला असतो. अनेकदा पक्षी, वटवाघळे किंवा माकडे बियांसकट फळे खातात व बियांचा प्रसार त्यांच्या विष्ठेतून (बियांतील सजीव गर्भाला धोका न पोहोचता) होतो. इतकेच नव्हे, तर या प्रक्रियेमुळे त्या बिया लवकर रुजतात.पडक्या बुरुजांवर , देवळाच्या शिखरांवर किंवा जुन्या मोठ्या इमारतींवर कोठे तरी उंबर, वड,पिंपळ किंवा कडूनिंबाची रोपटी उगवलेली आढळतात.

प्राण्यांनी प्रसारित केल्या जाणाऱ्या तिसऱ्या प्रकारात बीजे खाण्याकरिता नेली जातात. खारी, उंदीर व पक्षी त्याच्याकडून ती नेल्यावर ती बिळांत साठवली जातात, त्यांचा उपयोग खाण्यास न झाल्यास किंवा नेणाऱ्या प्राण्याच्या मत्यूने अथवा त्याच्या विस्मतीने ती तशीच राहतात व पुढे ती रुजून नवीन रोपटी वाढतात.काही बीजे (उदा., जंगली एरंड व मोगली एरंड) कीटकांसारखी दिसल्याने काही पक्षी नेतात परंतु पुढे ती फेकून देतात.

स्फोटक व क्षेपक यंत्रणा : विकिरणाच्या या पद्धतीत बाहेरच्या मध्यस्थाच्या मदतीविना फळातील संरचनेच्या साहाय्याने फळ एकदम तडकणे व त्याच वेळी बिया त्यातून दूर फेकल्या जाणे या क्रिया घडतात. याला गोफण-यंत्रणा म्हणतात. येथे एक तर फळे सुकून जाताना त्यांचे भिन्न भाग कमीजास्त प्रमाणात आकुंचन पावतात किंवा त्यातल्या काही भागांतील आत्यंतिक स्फीतता (तुडुंब भरून असण्याचा गुण) कारणीभूत होते. एरंडाची बोंडे तडकून कुड्या काही अंतरावर फेकल्या जातात, तसेच संकेश्वर ⇨आबई, गोकर्ण व रतन गुंज यांच्या शिंव (शेंगा) वाळल्यावर त्यांची शकले परस्परांपासून अलग होऊन पिळवटतात व बिया काहीशा जोराने फेकल्या जातात. ⇨तेरडा, काटेरी इंद्रायण व आंबुटी ह्यांची पक्व फळे थोडाही धक्का लागल्यास एकदम तडकतात व बी बाहेर फेकले जाते.

काही वनस्पती (उदा., भूईमूग) आपली फळे स्वतःच विकासावस्थेत जमिनीत टोकून पुरतात. काही गवतांच्या फळावरचे आर्द्रता-शोषक प्रशूक (लांब राठ केस) पाणी शोषून घेऊन पिळवटले जात असताना फळांना जमिनीत घुसवतात (उदा., कुसळी गवत), यामुळे प्रसारानंतरचा कार्यभाग उरकला जातो. एरोडियमच्या शुष्क फळातील प्रत्येक भाग (फलांश) स्वतंत्र होऊन जमिनीवर पडतो. पुढे त्यावरील किंजलाचा केसाळ भाग पाणी शोषून घेत असताना पिळवटतो व त्यामुळे मऊ जमिनीत घुसतो.

वनस्पतींच्या प्रसारात मनुष्याचा वाटा कमी महत्त्वाचा नाही. त्याने जाणूनबुजून अनेक उपयुक्त वनस्पतींचा प्रसार फळ, बीज किंवा कंद कलमे इ. स्वरूपात एका देशातून दुसऱ्या प्रदेशात नेऊन , लावून व वाढवून केला आहे. या रीतीने बटाटा,अननस ,पपइ, मका, तंबाखू, टोमॅटो, तसेच भाज्या, फळझाडे, फुलझाडे, शोभेच्या व इतर उपयोगाच्या अनेक वनस्पती बाहेरून भारतात आणून वाढवलेल्या आहेत. कित्येक तणे अनवधानाने किंवा दळणवळणाच्या अनेक साधनांमुळे आली आहेत व येथे सुस्थित झाली आहेत (उदा., गाजरी, काटे व पिवळा धोतरा, ओसाडी, दुंतुडी, घाणेरी वगैरे).

पहा : परिल्थितिविज्ञानफळ बीज वनस्पतींचे चलनवलन.

संदर्भ : Dutta, A. C. A Class-Book of Botany, Calcatta, 1959.

परांडेकर, शं. आ.