ओल्डॅम, टॉमस : (४ मे १८१६ — १७ जुलै १८७८). ब्रिटिश भूवैज्ञानिक. त्यांचा जन्म डब्‍लीनला व शिक्षण डब्‍लीन व एडिंबरो येथे झाले. १८३९ साली त्यांची ऑर्डनन्स सर्व्हेच्या भूवैज्ञानिक विभागात प्रमुख सहाय्यक म्हणून नेमणूक झाली.तेथे त्यांनी लंडनडेरीच्या भूविज्ञानासंबंधीचा अहवाल तयार करण्यास मदत केली. ते १८४५ साली डब्‍लीन विद्यापीठात प्राध्यापक, १८४६ साली सर्व्हे ऑफ आयर्लंडचे संचालक व १८४८ साली रॉयल सोसायटीचे फेलो झाले. १८४८ साली त्यांना ब्रेहेड येथील कँब्रियन (सु. ६० ते ५१ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) खडकांमध्ये सापडलेल्या एका जीवाश्माला(जीवाच्या अश्मीभूत अवशेषाला) त्यांच्या नावावरून ओल्डॅमिया हे नाव देण्यात आले आहे. १८५० साली त्यांची भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या संचालकपदी नेमणूक झाली. १८६४ साली त्यांनी भारतातील दगडी कोळशाच्या साठ्यांसंबंधीचा अहवाल सादर केला. ते १८७६ साली सेवानिवृत्त झाले व १८७८ साली रग्बी (इंग्लंड) येथे मृत्यू पावले.

ठाकूर, अ. ना.