कंगवे व फण्या : केस विंचरण्याचे व त्यांना व्यवस्थित बसविण्याचे काटेदार दातांचे साधन. काही वेळा केशरचनेला शोभा आणण्यासाठीही कंगव्याचा उपयोग करतात. सामान्यत: अशा साधनाच्या एकाच बाजूवर दात असले तर त्याला कंगवा म्हणतात व दोन विरुद्ध बाजूंवर दात असले तर त्याला फणी म्हणतात. कंगव्यांचा उपयोग फार प्राचीन कालापासून चालू आहे.

भारतीय स्त्रिया फण्यांचा वापर वेदकाळापासून करीत होत्या असे दिसते. संस्कृतात फणीला कंकती व प्रसाधनी असे संबोधलेले आढळते. अथर्ववेदात शंभर दातांच्या फणीचा उल्लेख आहे. रामायण, शिशुपाल वध इ. ठिकाणीही फण्यांचे उल्लेख आलेले आहेत. मोहें-जो-दडो, तक्षशिला, नेवासे, नाशिक इ. ठिकाणी झालेल्या उत्खननात हस्तिदंताच्या फण्या मिळालेल्या आहेत. या फण्यांवर विविध प्रकारचे कोरीवकाम केलेलेही आढळते. ईजिप्तमधील लोक हस्तिदंत व बॉक्सवुडच्या फण्या वापरीत, तर ग्रीक व रोमन लोक बॉक्सवुडच्या फण्या वापरीत. स्वित्झर्लंडमधील सरोवराजवळ लाकूड, हाडे व शिंगे यांच्या कंगव्यांचे प्राचीन नमुने आढळून आले आहेत. पूर्वी श्रीमंत स्त्रिया सोन्याच्या, चांदीच्या किंवा कासवाच्या कवचाच्या फण्या वापरीत. ऐतिहासिक काळात महाराष्ट्रात पितळी फण्या वापरल्या जात होत्या असे उल्लेख आढळतात. या फणीला आरसेही जोडलेले असत.

कंगव्यांचे आकार चौकोनी, अर्धवर्तुळाकार किंवा लांबट चौकोनी असतात. काही कंगव्यांचे अर्धे दात बारीक व अगदी जवळजवळ असतात व अर्धे दात थोडे जाड व जास्त अंतरावर असतात. फणीच्या एका बाजूवर बारीक दात व दुसऱ्या बाजूवर जाड दात पाडतात. हल्लीच्या कंगव्यांकरिता व फण्यांकरिता लाकूड, हस्तिदंत, शिंग, कासवाचे कवच, धातू, इंडिया रबर, सेल्युलॉइड व इतर संश्लेषित (कृत्रिम रीतीने तयार केलेले) प्लॅस्टिक पदार्थ वापरतात. स्वस्त जातीच्या फण्या बनविण्याकरिता गाठी नसलेले कोणतेही चिवट लाकूड वापरतात. प्रथम साधारणत: ८ सेंमी. लांब, ५ सेंमी. रुंद व ५ मिमी. जाड पट्टी तयार करतात व त्यातील दोन विरुद्ध बाजूंवर कानशीने घासून दोन्ही बाजूंनी टोकाकडे उतार देतात व त्या भागामध्ये पातळ करवतीने चिरा पाडून दात तयार करतात. अशा फण्या करण्यासाठी एक दोन चांगली हत्यारे लागतात व ते काम घरगुती उद्योग म्हणून कोणालाही करता येते. चांगल्या जातीच्या फण्या करण्यासाठी लाकडाच्या ऐवजी शिंगाचा उपयोग करतात. पूर्वी उत्तम प्रतीच्या फण्यांसाठी हस्तिदंताचा उपयोग करीत असत. यांत्रिक युग सुरू झाल्यावर ॲल्युमिनियमाच्या पत्र्यातून चक्री करवतीने कापून कंगवे तयार करीत असत. या पद्धतीने ॲल्युमिनियमाचा बराच भाग चूर होऊन वाया जातो. धातू वाया न घालवता कंगवे बनविण्यासाठी दुहेरी पद्धत वापरतात. या पद्धतीत कंगव्याच्या आकाराचे मुद्रा व पंच बनवून एका रुंद पट्टीतून एका झटक्यातच एकदम दोन कंगवे बनविता येतात. या पद्धतीत एका कंगव्याच्या दातामधून तोडलेले भाग दुसऱ्या कंगव्याचे दात असतात.

कंगवे व फण्या : (१)इ. स. पू. १३०० मधील लाकडी ईजिप्शियन फणी, (२) दहाव्या शतकातील सोने व काच यांनी मढविलेली हस्तिदंती कॅरोलिंजियन कालीन फणी, (३) एकोणिसाव्या शतकातील दिल्ली येथे तयार झालेला हस्तिदंती नक्षीकाम असलेला कंगवा, (४) प्रचलित कंगवे व फण्या.

इंडिया रबराच्या कंगव्याचे दात आकारानुसार घडवितात व नंतर व्हल्कनीकरणाने (गंधक व गंधकयुक्त संयुगे व रबर यांची विक्रिया करून) सबंध कंगव्याला कठीणपणा आणतात. प्लॅस्टिकाचा उपयोग सुरू झाल्यावर मोठ्या कारखान्यात आता यांत्रिक ओतकाम पद्धतीने सर्व प्रकारचे कंगवे तयार करतात. प्लॅस्टिकाला विविध प्रकारचे आकर्षक रंग देता येतात. ते चांगले चिवट व मजबूत असते, त्याची किंमतही माफक असते, त्यामध्ये तेल जिरत नाही, ते सहज स्वच्छ करता येते. त्यामुळे प्लॅस्टिकाच्या फण्या व कंगवे लोकप्रिय झाली आहेत.

गोखले, श्री. पु.