माळढोक

माळढोक : हा गिधाडापेक्षा मोठा पक्षी असून याची उंची सु. १२२ सेंमी. असते. याचे शास्त्रीय नाव कोरिओटीस नायग्रिसेप्स आहे. शरीर उभट नसून आडवे असते. शरीराची एकंदर ढब शहामृगाच्या पिल्लाची आठवण करून देणारी असते. पाठीचा रंग गहिरा पिवळसर–तांबूस असून त्याच्यावर बारीक आडव्या काळ्या रेषा असतात. खालचा भाग पांढरा असून छातीवर थोडा खाली अर्धगोलाकृती काळा पट्टा असतो. शीर्षाग्रावर काळ्या रंगाची ठळक शिखा असते. मान पांढरी असते पाय उघडे, लांब व मजबूत असतात. नर आणि मादी दिसायला जरी सारखी असली, तरी मादी नरापेक्षा लहान असते.

भारतात पंजाबपासून कर्नाटकपर्यंत सगळीकडे हा आढळतो पण बंगाल व आसाममध्ये मात्र तो सापडत नाही. महाराष्ट्रात एकेकाळी माळढोक मोठ्या संख्येने मराठवाडा, नगर, सोलापूर, चंद्रपूर, यवतमाळ इ. भागांत आढळत असत. मधूनमधून शेते असलेल्या गवताळ आणि झुडपे असणाऱ्या मैदानी प्रदेशात राहणारा हा पक्षी आहे. या पक्ष्यांची जोडपी असतात किंवा ३-४ पक्षी लहान टोळकी करून भटकत असतात. स्वभावाने भित्रा असला, तरी हा नेहमी सावध असतो. पुष्कळदा तो उभ्या पिकात लपून बसतो. तो अतिशय जलद धावू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या मजबूत पंखांनी कित्येक किमी. लांब एकसारखा उडत जातो. टोळ, नाकतोडे, भुंगेरे आणि इतर किडे हे याचे मुख्य भक्ष्य होय. पण यांशिवाय धान्य, सरडे, पाली आणि गोमादेखील हा खातो.

संकटाचे थोडेसे जरी चिन्ह दिसले, तरी हा पक्षी मोठ्याने आवाज काढतो व तो काहीसा भुंकण्यासारखा किंवा डुरकण्यासारखा असतो.

नर बहुपत्नीक असतो. प्रियाराधनाच्या काळात माद्यांच्या घोळक्यासमोर तो आपल्या सौंदर्यांचे प्रदर्शन करतो. मान व गळा फुगवतो अंगावरची पिसेही फुगवतो शेपटी वर उचलून पंख्यासारखी पसरतो आणि पंख लोबंते ठेवून ते एकसारखे थरथरवतो अशा थाटात तो मुरडत व ठुमकत नाचत असतो आणि खोल, बारीक आर्तस्वर काढीत असतो.

माळढोक पक्ष्यांच्या विणीचा हंगाम मुख्यतः मार्चपासून सप्टेंबर पर्यंत असतो. एखाद्या झुडपाच्या बुडाशी उथळ खळगा करून त्यात थोडे गवत घातले की, याचे घरटे तयार होते. मादी या घरट्यात एकच अंडे घालते. ते फिक्या हिरवट तपकिरी रंगाचे असून त्यावर गर्द तपकिरी रंगाचे पुसट डाग असतात. फक्त मादीच अंडे उबविते.

शिकारी लोकांच्या हातून याची फार हत्या झाल्यामुळे हा पक्षी नामशेष होऊ नये म्हणून याला हल्ली कायद्याने संरक्षण दिले आहे. महाराष्ट्रात अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यांतील ७, ८१८·४७ चौ. किंमी. क्षेत्रात या पक्ष्यासाठी अभयारण्य निर्माण करण्यात आले आहे.

कर्वे, ज. नी.