बिंटुराँगबिंटुराँग : हा मांसाहारी गणातील व्हीव्हेरीडी या कुलातील सर्वांत मोठा प्राणी आहे. याचे शास्त्रीय नाव आर्क्‌टीक्टीस बिंटुराँग असे आहे. याला बेअर कॅट असेही म्हणतात. या वंशातील ही एकच जाती आहे. हे प्राणी ब्रह्मदेश, इंडोचायना, थायलंड, मलाया, सुमात्रा, जावा, बोर्निओ व पालावान या प्रदेशांत आणि भारतातील आसाम व सिक्कीम तसेच भूतान व नेपाळ या प्रदेशांतही सापडतात. हे दाट जंगलात राहतात आणि हे दुर्मिळ आहेत. याचे डोके व शरीर मिळून लांबी ६० ते ९६ सेंमी. व शेपूट ५५ ते ९० सेंमी. लांब असते. वजन ९ ते १४ किग्रॅ. असते. याचे दात सापेक्षतः लहान असून शरीरावरचे केस लांब, जाड व राठ असतात. केसांचा रंग काळा व चकचकीत असतो. केसांची टोके पिवळट असतात. डोके करड्या व पिवळट रंगांच्या मिश्र केसांनी आच्छादिलेले असते. कानावर केसांचे झुबके असून त्यांच्या व तोंडाभोवतालच्या केसांची टोके पांढरी असतात. शेपूट मजबूत व परिग्राही (पकड घेऊ शकणारे) असते. अशा प्रकारचे शेपूट बिंटुराँगखेरीज कींकाजाऊ या एकाच मांसाहारी प्राण्यास आहे. ह्या प्रमाणात व बिंटुराँग या प्राण्यात बरेच साम्य आहे. बिंटुराँगला गंध-ग्रंथी असून तीतून उग्र गंध बाहेर पडतो.

हा निशाचर, वृक्षवासी व लाजाळू प्राणी घनदाट अरण्यात राहतो. त्यामुळे तो क्वचितच दृष्टीस पडतो. दिवसा झाडाच्या ढोलीत झुपकेदार शेपटीत डोके खूपसून हा झोपून राहतो आणि अंधार पडताच भक्ष्याच्या शोधार्थ बाहेर पडतो. याची चाल मंद असून हा शेपटीचा उपयोग झाडास चिकटून राहण्यास, भक्ष्य पकडण्यास अगर झाडावर चढताना तोल सांभाळण्यास करतो. याची पिलेसुद्धा शेपटीच्या साहाय्याने आपला तोल सांभाळतात.

बिंटुराँग हा सर्वभक्षी प्राणी आहे. मुख्यतः हा फळे व वनस्पती खातो मात्र याच्या आहारात लहान प्राणी (उदा., खार, वृक्षमंडुक), पक्षी, कीटक व अंडी यांचाही समावेश असून पुष्कळदा हा मेलेले प्राणीही खातो. याच्या वीणीसंबंधी काही माहिती उपलब्ध नाही. मादीला स्तनाच्या दोन जोड्या असतात. काही ठिकाणी याला माणसाळविण्यात आलेले आहे. माणसाळविलेला बिंटुराँग कुत्र्यासारखा आपल्या मालकावर प्रेम करतो, असे म्हणतात. चीनमध्ये या प्राण्याचा औषधाकरिता उपयोग करतात.

 

दातार, म. चिं.