रोगप्रतिकारक्षमतान्यूनताजन्य रोग : रोगप्रतिकारक्षमता यंत्रणा तिचे नेहमीचे कार्य (म्हणजे विशेषतः सूक्ष्मजंतू, व्हायरस इ. संसर्गकारक घटक काढून टाकण्याचे कार्य) करण्यास अपुरी पडल्याने निर्माण होणारे रोग. रोगप्रतिकारक्षमतेमधील कमतरतेमुळे संक्रामक रोगांचा शिरकाव शरीरात सहज होऊ शकतो ही वैचारिक पार्श्वभूमी रोगप्रतिबंधक लशींच्या उपयोगास सुरुवात झाली त्या वेळी वैद्यकीय शास्त्रज्ञांच्या मनात होती परंतु या कमतरतेचे नक्की स्वरूप प्रतिकारक्षमता यंत्रणेतील कोशिकीय (पेशीय) व देहद्रवीय घटकांच्या भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच उघड झाले [⟶ रोगप्रतिकारक्षमता]. १९५२ मध्ये अमेरिकन बालरोगतज्ञ ओ. सी. ब्रटन यांनी प्रथमच एका बालरुग्णामध्ये गॅमा-ग्लोब्युलिनाची अल्पता [⟶ ए-गॅमा-ग्लोब्युलिनीमिया] व रोगसंक्रामण विवशता यांचा संबंध दाखवून दिला तसेच यशस्वी रीत्या त्याच्यावर उपचारही केले. त्यानंतरच्या काळात अविशिष्ट (नैसर्गिक, उपजत) तसेच विशिष्ट प्रतिकारक्षमतेच्या विविध घटकांच्या न्यूनतेमुळे निर्माण होणाऱ्या अनेक रोगांचा व लक्षणसमूहांचा अभ्यास झाला आहे. वैद्यकीय आनुवंशिकीतील आधुनिक तंत्रांमुळे अशा रोगांची कारणे स्पष्ट होण्यास मदत झाली आहे.

 

न्यूनतेची कारणे : अविशिष्ट प्रतिकारक्षमता यंत्रणेत न्यूनता असली, तरी तिचे परिणाम विशिष्ट प्रतिकारक्षमतेवरही होऊ शकतात. कारण अविशिष्ट प्रतिकारक्षमता यंत्रणेतील महाभक्षिकोशिका, पूरक पदार्थ व लघुभक्षिकोशिका या तीनही घटकांची मदत विशिष्ट यंत्रणेच्या परिणामकारक कार्यासाठी आवश्यक असते. अविशिष्ट यंत्रणेत मुख्यतः भक्षिकोशिकांच्या कार्याचा अभाव असू शकतो. (प्रस्तुत नोंदीतील भक्षिकोशिका, पूरक पदार्थ वगैरे संज्ञांच्या स्पष्टीकरणासाठी ‘रोगप्रतिकारक्षमता’ ही नोंद पहावी).

भक्षणक्रियेतील न्यूनता श्वेत कोशिकांमध्ये गुणात्मक किंवा संख्यात्मक घट झाल्याने निर्माण होऊ शकते. अस्थिमज्‍जेतील (हाडांच्या पोकळीतील मऊसर पदार्थातील) कोशिकानिर्मितिक्षम ऊतकांवर (समान कार्य व रचना असलेल्या कोशिकांच्या समूहांवर) अर्बुदाचे (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या गाठीचे) आक्रमण झाल्याने किंवा घातक रसायनांच्या परिणामाने संख्यात्मक घट होते व अशी परिस्थिती जन्मजात ⇨ कणकोशिकान्यूनत्व या रोगात आढळते. गुणात्मक न्यूनतेच्या रुग्णांमध्ये भक्षिकोशिकांकडून सूक्ष्मजंतूंचे भक्षण होते परंतु पाचक एंझाइमांची (जीवरासायनिक विक्रिया घडून येण्यास मदत करणाऱ्या प्रथिनांची) कार्यक्षमता असमाधानकारक असल्यामुळे सूक्ष्मजंतू कोशिकेच्या आत दोन तासांपेक्षा जास्त काळ अबाधित राहिलेले दिसतात. न्यूनत्व असलेल्या अशा प्रमुख एंझाइमांमध्ये हायड्रोजन पेरॉक्साइड व तज्‍जन्य सुपरऑक्साइडे निर्माण करणारी एंझाइमे, ग्‍लुकोज–६–फॉस्फेटे डीहायड्रोजनेज एंझाइम आणि मायेलोपेरॉक्सिडेज एंझाइम यांचा समावेश होतो. या रोगांपैकी ‘दीर्घकालिक कणार्बुदी रोग’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आनुवंशिक रोगात सुपरऑक्साइड निर्मिणारे एंझाइम X गुणसूत्रावरील [⟶ आनुवंशिकी] अप्रकट जीनाकडून (आनुवंशिक घटकांच्या एककाकडून) नियंत्रित होत असते त्याच्या अनुपस्थितीमुळे फक्त मुलग्यांनाच हा रोग होऊ शकतो. एनबीटी (नायट्रो ब्ल्यू टेट्राझोलियम) या रसायनाच्या ⇨क्षपणावर आधारित असलेल्या एका परीक्षेने कोशिकांमधील ही विकृती ओळखता येते. रसायनानुचलन (ज्या द्रव्यांच्या रासायनिक प्रभावाने त्यांच्या सापेक्ष दूर अथवा जवळ जाण्याची कोशिकांची हालचाल होणे) प्रवर्तक उद्दीपकांना प्रतिसाद देण्याची श्वेत कोशिकांची अक्षमता हादेखील गुणात्मक अभावाचा आणखी एक प्रकार आहे. यातून ‘आळशी श्वेत कोशिका लक्षणसमूह’ आणि ‘शेदयाक-हिगाशी लक्षणसमूह’ (फ्रेंच वैद्य एम्‌. शेदयाक व जपानी वैद्य ओ. हिगाशी यांच्या नावाने ओळखण्यात येणारा लक्षणसमूह) अशी दोन लक्षणदर्शने निर्माण होतात. शेदयाक-हिगाशी लक्षणसमूहात कण कोशिकांप्रमाणेच ⇨पोष ग्रंथी व ⇨अधिवृक्‍क ग्रंथी यांच्या काही स्त्रावक कोशिकांत मोठ्या आकारमानाचे लायसोसोम घटक आढळतात परंतु ते जंतुमारक एंझाइमे मुक्त करीत नाहीत. मेलॅनीन या वर्णकणातही दोष असतो आणि त्यामुळे केस, डोळे व त्वचा यांमध्ये विवर्णता (वर्णहीनता) निर्माण होऊ शकते.


पूरक द्रव्यांच्या न्यूनतेचे प्रमाण भक्षिकोशिकांच्या न्यूनतेच्या मानाने कमी आढळते. सी ३ या महत्त्वाच्या घटकाच्या न्यूनतेमध्ये पूरक सक्रियणाचा पर्यायी मार्ग कार्यान्वित होत नाही. रसायनानुचलन व श्वेत कोशिकामयता घडवून आणणारे सी ५ ए, सी ३ ई वगैरे घटकही अनुपस्थित असतात. अशाच प्रकारचा इतर पूरक पदार्थांचा अभावही तुरळक रुग्णांमध्ये आढळून आला आहे. 

विशिष्ट प्रतिकारक्षमतान्यूनता प्राथमिक किंवा दुय्यम स्वरूपाची असू शकते. प्रतिकारक्षमता यंत्रणेतील जन्मजात दोष जर बी अथवा टी कोशिकांमध्ये किंवा दोन्हींमध्ये अंगभूत असेल व त्यामुळे लसीकाभ ऊतकांच्या [⟶ लसीका तंत्र] सक्षम कोशिका कार्य करीत नसतील, तर तो प्राथमिक दोष समजला जातो. याउलट जर मुळात दोषहीन अशा प्रतिकारक्षमता यंत्रणेवर इतर विकारांचे (उदा., अर्बुद, सूक्ष्मजंतू वा अन्य कारकाचे संक्रामण, कुपोषण, रसायनजन्य विषाक्तता इ.) आक्रमण होऊन लसीकाभ ऊतकांची कार्यक्षमता घटली, तर तो दुय्यम दोष म्हणता येईल. दुय्यम दोषांचा आढळ प्राथमिक दोषांपेक्षा अनेक पटींनी जास्त असतो.

 

प्राथमिक दोष : (१) बी-कोशिका न्यूनता : बी-पूर्व कोशिकांच्या विकसनातील दोषांमुळे ब्रटन रोग मुलग्यांमध्ये होतो. गुणसूत्राशी संबंधित अप्रकट गुणधर्मदर्शी असलेल्या या विकारात बी-कोशिका, प्लाविका कोशिका व लसीका ग्रंथीतील जननकेंद्रे [⟶ लसीका तंत्र] अविकसित असतात. आंत्रपुच्छ (ॲपेंडिक्स) व पेयर क्षेत्रे (जे. सी. पेयर या स्विस वैद्यांच्या नावाने ओळखण्यात येणारी लहान आतड्यातील लसीका क्षेत्रे) यांतील लसीकाभ ऊतकही कमी प्रमाणात आढळते. आयजी-जी प्रतिपिंडांची पातळी /१० आणि आयजी-एम व आयजी-ए प्रतिपिंडांची पातळी /१०० इतकी कमी असते [⟶ प्रतिपिंड] परंतु या ग्‍लोब्युलीन द्रव्यांचा संपूर्ण अभाव कधीही आढळत नाही. सूक्ष्मजंतूंच्या लशींना अत्यल्प प्रतिसाद मिळतो. कोशिकीय यंत्रणा कार्यक्षम असल्याने व्हायरस संक्रामणे मात्र समाधानकारकपणे हाताळली जातात. अपुऱ्या दिवसांच्या अर्भकांमध्ये रक्तातील गॅमा-ग्‍लोब्युलिनाची अल्पता आढळते, ती एकदोन वर्षांत आपोआप सुधारते, तसेच ब्रटन रोगात होत नाही.

बी-कोशिकांच्या अंतिम प्रभेदनात (विशिष्ट कार्य करण्यासाठी होणाऱ्या संरचनात्मक बदलात) दोष निर्माण झाल्यामुळे कधीकधी प्रतिपिंडाचा एक वर्ग इतरांपेक्षा कमी किंवा जास्त प्रमाणात निर्माण होतो आणि इतरांची पातळी समाधानकारक असते परंतु कार्यक्षमता कमी असते. उदा., ‘आनुवंशिक गतिविभ्रम व केशवाहिनीविस्फार’ या लक्षणसमूहामध्ये आयजी-ए प्रतिपिंडांचा अभाव असल्याने श्वसन तंत्राची संक्रामणे वरचेवर होतात.

 (२) टी-कोशिका न्यूनता : अमेरिकन बालरोगतज्ञ ए. एम्. डीजॉर्ज यांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या डीजॉर्ज लक्षणसमूहामध्ये भ्रूणाच्या आठ ते बारा आठवड्यांच्या अवस्थेत ग्रसनीकोष्ठ (घशाच्या दोन बाजूंस असलेले बाह्यत्वचेचे कोष्ठ) या ऊतक समूहामधील काहींची वाढ नीट होत नाही. त्यामुळे त्यांपासून विकसित होणारी ⇨यौवनलोपी ग्रंथी, तसेच ⇨परावटू ग्रंथी व महावाहिन्या यांची अल्पवृद्धी होते. टी-कोशिकांचे प्रक्रियण न झाल्याने कोशिकीय प्रतिकारक्षमता यंत्रणा अविकसित रहाते. परिणामतः व्हायरस संक्रामणास मूल सहज बळी पडते. यौवनलोपी ग्रंथीच्या अकार्यक्षमतेमुळे कधीकधी कोशिकांचा साहाय्यक उपवर्ग किंवा दमनकारी उपवर्गच सदोष असतो परंतु त्यामुळेही प्रतिकारक्षमतेत न्यूनता येऊ शकते.


टी-कोशिकांच्या केंद्रकामधील (कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या गोलसर जटिल पुंजामधील) डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्‍लाच्या [डीएनएच्या ⟶ न्यूक्लिइक अम्‍ले] निर्मितीस साहाय्य करणाऱ्या ॲडिनोसीन डी अमायनेज (एडीए) व प्यूरीन न्यूक्लिओसाइड फॉस्फोरिलेज (पीएनपी) या एंझाइमांच्या अभावामुळेही कोशिकीय न्यूनता उदभवू शकते. लसीका कोशिकेच्या पृष्ठभागावर बंधक प्रतिजन प्रकट न होण्याच्या दोषामुळेही अशा कोशिकांचे इतर कोशिका पटलांशी बंधन होण्यास अडचण येऊ शकते. या प्रतिजनांचे नियंत्रण जीनवरील एचएलए [ह्युमन ल्युकोसाइट अँटिजेन ⟶ रोगप्रतिकारक्षमता]-ए, बी, सी या स्थलांकडून होत असते. या कोशिकेस उघडी कोशिका म्हणतात. एका अन्य विकारात कॅन्डिडा या कवकाच्या (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीच्या) संक्रामणास अपुरा प्रतिकार झाल्याने श्लेष्मकलेला (शरीरातील पोकळ्या व मार्ग यांच्या बुळबुळीत अस्तर-पटलाला) होणारा दीर्घकालिक मणिकवक रोग कुटुंबातील अनेक व्यक्तींमध्ये संभवतो. त्याबरोबरच ⇨अंतःस्त्रावी ग्रंथींचे  विकारही होऊ शकतात.

(३) मिश्र न्यूनता : दोन्ही प्रकारच्या कोशिकांचा अभाव असलेली आणि अलिंगी गुणसूत्राशी संबंधित असलेल्या अप्रकट गुणधर्मावर अवलंबित अशी न्यूनता प्रथम स्वित्झर्लंडमध्ये आढळली. तिलाच स्विस प्रकार किंवा तीव्र मिश्र प्रतिकारक्षमतान्यूनता (SCID सिव्हिअर कंबाइन्ड इम्युनो डेफिशियन्सी) असे नाव दिले गेले. ग्‍लोब्युलिनाचा अभाव व लसीका ऊतकाची अत्यल्पता यांमुळे सर्व प्रकारच्या संक्रामणांची शक्यता अशा न्यूनताग्रस्त मुलांमध्ये असते आणि ती दोनवर्षांपेक्षा जास्त जगत नाहीत. याच न्यूनतेबरोबर कधीकधी एडीए-न्यूनताही असू शकते. ‘जालिका दुष्प्रजनन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विकारात सर्व प्रकारच्या श्वेत कोशिकांची न्यूनता रक्तात दिसून येते. बहुक्षम स्कंधकोशिकांच्या (ज्यांच्यापासून प्रभेदनाने रक्तातील विविध प्रकारच्या कोशिका तयार होतात अशा अस्थिमज्‍जेमधील कोशिकांच्या) कमतरतेमुळे हे दोष उद्‌भवत असावेत. अशाच प्रकारच्या एका रोगात (जर्मन बालरोगतज्ञ ए. व्हिस्कॉट व अमेरिकन बालरोगतज्ञ आर्. ए. ऑल्ड्रिच यांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या व्हिस्कॉट-ऑल्ड्रिच लक्षणसमूहात) बिंबाणुन्यूनता (रक्त साखळण्याच्या क्रियेत मदत करणाऱ्या अतिसूक्ष्म चकतीसारख्या कणांची न्यूनता) व त्वचेवरील इसबही आढळतो, तसेच निरनिराळ्या ग्‍लोब्युलीन प्रकारांच्या पातळीतील चढउतार असमांतरपणे होत असतात.

दुय्यम दोष :  अविकृत प्रतिकारक्षमतेची यंत्रणा शरीरबाह्य घटकांमुळे किंवा अन्य इंद्रियांच्या विकारांमुळे काही काळ कमी कार्यक्षम होऊन संक्रामणजन्य रोग शरीरात प्रस्थापित होऊ शकतात. या रोगांमुळे कधीकधी कुपोषण, प्रथिनन्यूनता यांसारखे घटक बळावून प्रतिकारक्षमतेचा जास्तच ऱ्हास होतो. हे दुष्टचक्र योग्य चिकित्सेअभावी चालूच रहाते. उपचारासाठी वापरलेली औषधेही प्रतिकारक्षमता न्यूनताजनक ठरू शकतात. रोगसंक्रामण टाळण्यासाठी परिसरातून सूक्ष्मजीवांच्या प्रवेशाची शक्यता कमी करणे व जरूर तेव्हा प्रतिबंधक औषधे घेणे हेदेखील तितकेसे सुलभ नसते. दुय्यम दोष निर्माण करणारे प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहेत.  

(१) प्रथिनांचे अपसामान्य उत्सर्जन घडविणारे अपकर्षी वृक्कशोथ व आतड्यांचे विकार, आतड्यातील लसीकावाहिनी विस्फार व त्वचेचे विशाल क्षेत्र भाजणे या कारणांमुळे विशेषतः आयजी-जी गटातील प्रतिपिंडांचा व्यय होतो आणि रक्तातील त्यांची पातळी खालावते.  

(२) कुपोषण : विशेषतः प्रथिन कॅलरींची (ऊर्जेची) व लोहाची कमतरता कोशिकीय प्रतिकारक्षमतेस अकार्यक्षम करते. प्रतिपिंड प्रतिसाद व ग्‍लोब्युलीन पातळी तितकीशी बदलत नसली, तरी प्रतिपिंडांत गुणात्मक बदल होऊन त्यांची प्रतिजनबंधनक्षमता कमी होत असावी, असे दिसते. अविशिष्ट प्रतिकारक्षमतेस उपयुक्त लोहबंधक प्रथिने व भक्षिकोशिकांचे कार्यही असमाधानकारक होते. अशा परिस्थितीत दीर्घकाळ टिकणाऱ्या कमी तीव्रतेच्या संक्रामणांमुळे आधीच असलेल्या कुपोषणात भर पडू शकते.


 

(३) औषधे : अर्बुदाची वाढ नियंत्रित ठेवण्यासाठी वापरली जाणारी विविध कोशिका घातक औषधे लसीका कोशिकांची वाढ कमी करून प्रतिकारक्षमतान्यूनता निर्माण करू शकतात. अशाच प्रकारच्या द्रव्यांपासून विकसित केलेली ॲझाथायोप्रिनासारखी औषधे स्वयंप्रतिकारक्षमताजन्य विकारांसाठी आणि इंद्रिय प्रतिरोपण (शरीराच्या एका भागातील इंद्रियाच्या जागी दुसऱ्या भागातील वा अन्य व्यक्तीच्या शरीरातील इंद्रिय बसविणे) यशस्वी करण्यासाठी वापरली जातात. अधिवृक्कजन्य स्टेरॉइड द्रव्ये मोठ्या मात्रांमध्ये वापरल्यास असाच परिणाम दिसून येतो. प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांपैकी काही औषधे (उदा., डॅक्टिनोमायसिन, सायक्लोस्पोरीन) आपल्या कोशिकांवरील परिणांमामुळे लघुभक्षिकोशिकांचे रसायनानुचलन व महाभक्षिकोशिकांची भक्षणक्रिया कमी करू शकतात. क्ष-किरण व किरणोत्सर्गी समस्थानिकांची प्रारणेही (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या मूलद्रव्य अणूंमधून उत्सर्जित होणारे भेदक कण वा किरणही) असेच घातक परिणाम घडवितात. औषधे, किरणोत्सर्ग इत्यादींमुळे प्रतिकारक्षमता कमकुवत झालेल्या रुग्णाला दुर्बल किंवा निम्‍न पातळीवर आलेला यजमान असे म्हणता येईल.

(४) अर्बुदे : हॉजकिन आणि हॉजकिनेतर लसीकार्बुदामध्ये [⟶ लसीका तंत्र] विशेषतः कोशिकीय प्रतिकारक्षमतान्यूनता दिसून येते व संक्रमणांची शक्यता वाढते. लसीका श्वेतकोशिकार्बुदाच्या दीर्घकालीन प्रकारामध्ये याबरोबरच ग्‍लोब्युलिनाचे विविध उपप्रकारही कमी प्रमाणात निर्माण होतात. लसीकाभ व अस्थिमज्जा ऊतकांवर आक्रमण करणाऱ्या विविध अर्बुदांमध्येही अशीच प्रतिकारक्षमतान्यूनता आढळते. गुणित मज्जार्बुदात (शरीरात विविध ठिकाणी झालेल्या अस्थिमज्जेतील रक्तजनक ऊतकातील कोशिकांपासून बनलेल्या अर्बुदात) कधीकधी एका विशिष्ट कृत्तकाची (एकाच कोशिकेच्या समविभाजनाने बनलेल्या अनेक कोशिकांच्या समूहाची) किंवा प्लाविका कोशिका गटाची अनियंत्रित वाढ होऊन त्यातून निर्माण होणाऱ्या ग्‍लोब्युलिनांचे रक्तातील प्रमाणात वाढल्याचे दिसते. खालावलेल्या प्रतिकारक्षमतेपैकी अर्बुदामुळे घडून आलेला परिणाम किती व त्यासाठी देण्यात आलेल्या उपचारांचा किती हे सांगणे बऱ्याच वेळा कठीण असते.

 (५) संक्रामणे : दीर्घकाल टिकणाऱ्या सूक्ष्मजंतुजन्य रोगांमध्ये कुष्ठ, क्षय, आंदोलज्वर (ब्रूसेलोसिस) यांसारख्या रोगांनी प्रतिकारक्षमतान्यूनता निर्माण होऊ शकते. कॅन्डिडासारखी कवके, जिआर्डिया व मलेरियासारख्या रोगांचे आदिजीव (एककोशिकीय सजीव) आणि कांजिण्या, गोवर, जर्मन गोवर (वारफोड्या), परिसर्प (हरपिझ), यकृतशोथ यांसारख्या रोगाचे व्हायरसही थोडीशी तात्पुरती न्यूनता निर्माण करतात. श्वेतकोशिकार्बुद निर्मितीस कारणीभूत असल्याची शंका असणारे व्हायरस आणि संक्रामक एककेंद्रकी कोशिकामयताजनक (एम्‌. ए. एप्स्टाइन व वाय्‌. एम्‌. बार या ब्रिटिश व्हायरसतज्ञांच्या नावांनी ओळखण्यात येणारा) एप्स्टाइन-बार व्हायरस देखील सौम्य असा परिणाम घडवितात परंतु सर्वांत गंभीर व चिरकाल टिकणारा परिणाम एक एचआयव्ही (ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस) व्हायरसामुळे होणाऱ्या एड्‌स या रोगात दिसून येतो. (या रोगाचे वर्णन पुढे दिले आहे).

(६) इतर कारणे : विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, त्यांसाठी देण्यात येणारी शुद्धीहारक द्रव्ये आणि लसीकाभ ऊतकांची विपुलता असलेल्या प्लीहेसारख्या (पानथरीसारख्या) इंद्रियांचे उच्छेदन (शस्त्रक्रियेने काढून टाकणे) यांमुळे तात्पुरती प्रतिकारक्षमतान्यूनता निर्माण होते. प्रतिकारक्षमता यंत्रणेतील कोणत्या घटकांवर हा परिणाम घडून येतो, हे तितकेसे स्पष्ट नाही. न्यूनतेमुळे प्रकट होणारे दोषांचे स्वरूपही बदलते असू शकते. मंगोली मूढता या ब्रिटिश वैद्य जे. एल्‌. एच्‌. डाऊन यांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या लक्षणसमूहामध्येही [⟶ आनुवंशिकी] प्रतिकारक्षमता असमाधानकारक असते. लसीका कोशिकांविरुद्ध निर्माण केलेल्या लशींचा उल्लेखही कोशिकीय प्रतिकारक्षमतान्यूनता निर्माण करणाऱ्या पदार्थामध्ये करता येईल. श्वेतकोशिकार्बुदामध्ये वापरल्या जाणाऱ्या या लशी घोडा किंवा इतर मोठ्या प्राण्यांत मानवी लसीका कोशिका किंवा यौवनलोपी ग्रंथीतील कोशिकांची अंतःक्षेपणे (इंजेक्शने) प्रतिपिंड निर्मितीसाठी देऊन तयार करतात.


निदान : प्रतिकारक्षमतान्यूनतेमुळे प्रत्यावर्ती (पुनः पुन्हा होणारी) दीर्घकालिक, तीव्र व नेहमीपेक्षा निराळी संक्रामणे उद्‌भवतात आणि मुलांची वाढ खुंटते. उपजत न्यूनता वयाच्या सहाव्या महिन्यापासून प्रकट होऊ लागते, तर उपार्जित (प्राप्त झालेले) दोष पुढे केव्हाही दिसू लागतात. बीसीजी, बालपक्षाघात (पोलिओ) यांसारख्या जिवंत लशींमुळे सार्वदेहिक संक्रामण पसरण्याचा धोका असतो, तर मृत लशींना समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही. कुटुंबियांच्या रोगविषयक इतिहासावरून व विविध परीक्षांतून न्यूनतेची कल्पना येऊ शकते. 

प्रामुख्याने या तपासण्यांमध्ये यौवनलोपी ग्रंथिक्षेत्राचे क्ष-किरणचित्रण, रक्तातील लसीका कोशिका, बी- व टी -कोशिका यांचे गणन, साहाय्यक व दमनकारी कोशिकांचे गुणोत्तर आणि कोशिकांच्या प्रतिजनांना प्रतिसाद यांचा समावेश होतो. ⇨ऊतकसंवर्धनामध्ये विश्रामी लसीका कोशिकांचा संपर्क ज्या प्रतिजनांशी घडविला जातो त्यांत विशिष्ट (ट्युबरक्युल या सूक्ष्मजंतूपासून मिळविलेल्या निर्जंतुक द्रवाचे म्हणजे ट्युबरक्युलिनाचे शुद्धीकृत प्रथिन अनुजात) आणि अविशिष्ट (उदा., वनस्पतिजन्य कोशिका समविभाजनकारी द्रव्ये व रक्तसमूहनी-रक्तातील तांबड्या कोशिका एकत्र करून त्यांचा पुंजका करणारी-द्रव्ये) अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिजनांचा, तसेच आनुवंशिकभिन्नता असलेल्या व्यक्तीच्या लसीका कोशिकांचा समावेश असू शकतो. परिणामतः विश्रामी कोशिकेचे सक्रियण होऊन तीमधून लिंफोकाइन द्रव्ये निर्माण होतात व कोशिकेचे रूपांतर डीएनए संश्लेषण दर्शविणाऱ्या जनक कोशिकेत होते. या प्रतिसादाच्या मापनावरून न्यूनतेची तीव्रता कळू शकते. रुग्णाच्या शरीरांतर्गत असा प्रतिसाद पहाण्यासाठी धनुर्वात विषाभ, न्यूमोकॉकसाची लस किंवा अत्यंत सुरक्षित अशा सूक्ष्मजंतुभक्षी एक्स-१७४ या प्रतिजनांचा वापर करून टी-कोशिकांच्या संख्येतील वाढी मोजल्या जातात. विविध ग्‍लोब्युलीन घटकांची पातळीही ⇨विद्युत्‌ संचारणाने व प्रतिकारक्षमता विसरणाने (प्रतिपिंड व त्याच्या विशिष्ट प्रतिजन स्थलांतराद्वारे परस्परांत मिसळून त्यांच्या प्रक्रियेतून निर्माण होणारा अवक्षेप-न विरघळणारा साका-मिळविण्याच्या तंत्राने) मोजता येते. लाळेमध्ये स्त्रावित होणाऱ्या आयजी-ए चे व त्याला संरक्षक अशा मुक्त स्त्रावक खंड या घटकाचे मापनही प्रतिकारक्षमतेचे दर्शक म्हणून अभ्यासले जाते.

त्वचेच्या विलंबित अतिसंवेदनशीलता परीक्षेचा उपयोग करून प्रतिकारक्षमतान्यूनतेचे निदान करण्यासाठी चारपाच विविध प्रत्यावाहन किंवा पूर्वज्ञात प्रतिजन वापरून त्यांपैकी एखाद्याला तरी प्रतिसाद मिळतो की नाही हे पाहता येते. तसे जर न झाले, तर डायनायट्रोक्लोरोबेंझिनासारखे संपर्क प्रतिजन संवेदीकरणासाठी वापरून काही दिवसांनी त्याला अतिसंवेदनशीलता निर्माण झाली आहे का याची परीक्षा घेता येते. स्थूल परीक्षांमध्ये निर्दोष वाटणाऱ्या कोशिका व प्रतिपिंड यांच्या कार्यात्मक सक्षमतेच्या निर्धारणासाठी त्यांवरील ग्राहींसाठी (विशिष्ट रासायनिक गट, रेणू वा व्हायरस यांची आसक्ती असलेल्या रासायनिक गटांसाठी वा रेणूंसाठी) सूक्ष्मतर परीक्षाही उपलब्ध आहेत.

 

उपचार : प्रतिकारक्षमतान्यूनतेच्या उपचारामध्ये ग्लोब्युलीन द्रव्ये पुरविण्यासाठी ताजा रक्तद्रव शिरेतून किंवा त्यापासून काढलेले गॅमाग्‍लोब्युलीन स्‍नायूत अंतःक्षेपणाने दर १ ते ३ आठवड्यांनी दीर्घकाळ दिले जाते. लशी देऊन प्रतिकारक्षमता वाढविलेल्या नातेवाईकांचा रक्तद्रव वापरल्यास तयार प्रतिपिंडांचा पुरवठा होऊन अज्ञात संक्रामणाचा धोकाही टाळता येतो. याशिवाय कोशिकीय प्रतिकारक्षमतेतील उणे पडणारे विविध घटक (उदा., यौवनलोपी ग्रंथी घटक, एडीए एंझाइम, इंटरफेरॉन, इंटरल्युकीन – १ व –२) बाहेरून देता येतात. यांपैकी काही जननिक अभियांत्रिकीने तयार करणे शक्य झाले आहे. स्कंधकोशिकांची उणीव भरून काढण्यासाठी सख्ख्या भावंडाच्या अस्थिमज्‍जेचे प्रतिरोपण किंवा गर्भाच्या यकृत ऊतकाचे प्रतिरोपण वापरण्यात काहीसे यश आले आहे. दुसऱ्या तिमाहीतील गर्भाच्या यौवनलोपी ग्रंथी ऊतकाचेही प्रतिरोपण डीजॉर्ज लक्षणसमुहामध्ये यशस्वी ठरले आहे. या सर्व प्रतिरोपणांमध्ये प्रतिरोपित निरोगी ऊतक स्वीकारकाच्या ऊतकांविरुद्ध प्रतिक्रिया दाखविण्याचा धोका असतो (प्रतिरोपण विरुद्ध यजमान विकार). रक्ताधानातही असा धोका असल्याने ते शक्यतो टाळतात.


संक्रामणाच्या निर्मूलनासाठी प्रतिजैव औषधे आलटूनपालटून वापरली जातात. अशा उपचारांचा अवधी दर वेळी कमीतकमी दहा दिवस म्हणजेच इतर रुग्णांपेक्षा जास्त दीर्घ असावा लागतो. अंशतः न्यूनत्व असलेली प्रतिकारक्षमता यंत्रणा औषधक्रियेने उद्दीपित करण्यासाठी लेव्हामिसॉल या कृमिनाशक द्रव्याचा उपयोग करण्यात येत आहे. प्रतिकारक्षमतेमधील न्यूनता बऱ्याच रुग्णांमध्ये आनुवंशिक असल्याने त्या शास्त्रातील तज्ञांच्या सल्ल्याने तिचे पुढील पिढीत अवतरणे टाळण्याचा प्रयत्‍न केला जातो.

 

उपार्जित रोगप्रतिकारक्षमतान्यूनताजन्य लक्षणसमूह : (एड्‌स, AIDS ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम). दुय्यम न्यूनतेचा हा प्रकार प्रथम अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत १९७९ मध्ये आढळला. त्यानंतरच्या दशकामध्ये त्याचा जगभर झपाट्याने प्रसार होऊन सप्टेंबर १९८९ पर्यंत जागतिक आरोग्य संघटनेकडे १,७७,९५० रुग्णांची नोंद झाली आहे परंतु यापेक्षा कितीतरी जास्त म्हणजे सु. ३ लाख रुग्ण जगात असावेत असा अंदाज आहे. याच काळात रोगाची लागण झालेल्या (रक्तरस चाचणीवरून निष्कर्ष) परंतु अजून लक्षणे न दाखविणाऱ्या व्यक्तींची संख्या सु. ५० लक्ष असून त्यांपैकी १५ लक्ष स्त्रिया आहेत. अमेरिका व मध्य आफ्रिका यांना या रोगाची झळ सर्वांत अधिक पोहोचली असून आशिया खंडात सर्वांत कमी म्हणजे फक्त ४१३ रुग्ण नोंदले गेले आहेत. आफ्रिकेतील सु. १० लक्ष संसर्गग्रस्त स्त्रियांपासून जन्मलेल्या ८०,००० अर्भकांना जन्मतः एड्‌स झालेला असल्याने त्यांच्यापैकी निम्मी दोन वर्षांची होण्याच्या आतच मृत्यूमुखी पडतील, असा अंदाज आहे. जागतिक आरोग्य संघटना व अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसीझ कंट्रोल यांच्या अंदाजानुसार १९८७ सालापर्यंत जगात ७५,००० लोक या रोगामुळे मृत्यू पावले (त्यांपैकी केवळ अमेरिकेतील ४९,००० रुग्ण होते). भारतात पहिला रुग्ण मे १९८६ मध्ये आढळला व १९८९ अखेर रुग्णांची संख्या ४० होती. ऑक्टोबर १९८९ अखेर तपासलेल्या रक्तरसाच्या सु. ३,६४,००० नमुन्यांपैकी १,६५० मध्ये रोगसंसर्गाचे निदान झाले आहे.

 

एड्स हा संक्रामक रोग असून लैंगिक समागमाशी त्याचा संबंध आहे हे सुरुवातीपासून माहीत असले, तरी तो नक्की कोणत्या सूक्ष्मजीवांमुळे होतो याबद्दल विविध शक्यता मांडण्यात येत होत्या. लसीका ग्रंथींची वाढ व अर्बुदे होण्याची प्रवृत्ती यांमुळे निरनिराळ्या अर्बुदजनक व्हायरसांचा संभाव्य वाटा असावा अशी शंका होती. परंतु १९८४ मध्ये अमेरिकेतील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये एड्स व्हायरस शोधून काढण्यात आला व त्याला एचटीएलव्ही-३ (HTLV-III ह्युमन टी-सेल लिंफोट्रॉपिक व्हायरस टाइप III) असे नाव मिळाले. त्याच वर्षी फ्रान्समधील पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये तोच व्हायरस शोधून त्याला एलएव्ही (LAV लिंफॅडेनोपॅथी-ॲसोशिएटेड व्हायरस) हे नाव शास्त्रज्ञांनी दिले. आता सर्वानुमते या व्हायरसाचे एचआयव्ही-१ (HIV-I ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस) हे नाव निश्चित झाले आहे. या व्हायरसाच्या शोधाचे श्रेय अमेरिकेतील रॉबर्ट सी. गॅलो व त्यांचे सहकारी यांना द्यावे की फ्रान्समधील ल्यूक माँताग्नेर व त्यांचे सहकारी यांना द्यावे यासंबंधी वाग निर्माण झालेला आहे. पश्चिम आफ्रिकेत काही रुग्णांत आढळलेल्या याच व्हायरसाच्या दुसऱ्या एका निराळ्या प्रकाराला एचआयव्ही-२ म्हणतात. दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्र निदान परीक्षा आता उपलब्ध आहेत. भारतात दुसरा प्रकार पोहोचला आहे किंवा नाही हे अजून निश्चित सांगता येत नाही.

एड्सचे व्हायरस हे रिट्रोव्हायरस वर्गातील आरएनएयुक्त व्हायरस असून या वर्गाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या गाभ्यामध्ये आरएनएच्या दोन रेणूंबरोबरच रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज हे एंझाइम असते. आरएनएमध्ये आतापर्यंत नऊ जीन ओळखता आले आहेत व त्यांपैकी तीन व्हायरसाच्या वाढीचे नियंत्रण करतात असे दिसते. संक्रामणक्रियेच्या वेळी रक्तात प्रवेश केलेले व्हायरस आपल्या सक्रिय रूपात (व्हायरिऑन) महाभक्षिकोशिका व लसीका कोशिका यांवर आक्रमण करून प्रथम त्यांमध्ये आपल्या गाभ्यातील प्रथिने, एंझाइम आणि आरएनएरेणूचे दोन पेड सोडतात. या आरएनएपासून रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेजाच्या मदतीने दुपेडी डीएनए तयार होतो. यालाच प्रोव्हायरस म्हणतात. हा डीएनए कोशिकेच्या केंद्रकाकडे जाऊन आत प्रवेश करताच कोशिकेच्या डीएनएमध्ये आपला अंतर्भाव करून घेतो. यामुळे एकात्म झालेला व्हायरस काही काळ सुप्तावस्थेत राहतो. त्यानंतर मात्र कोशिकेच्या केंद्रकातील आरएनएमध्ये व्हायरसाच्या जीनाचे प्रतिलेखन (जननिक माहितीचे स्थानांतर) होऊ लागते. या बदललेल्या प्रतिलेखित आरएनएपासून संदेशवाहक आरएनए केंद्रकाबाहेर पडतात व रिबोसोम या कोशिकांगाकडे जातात. तेथे स्थानांतरणाने जी नवीन प्रथिने निर्माण होतात ती व्हायरस प्रथिनांसारखी असतात. आरएनएच्या आणखी काही रेणूंच्या साहाय्याने या प्रथिनांपासून व्हायरिऑन तयार होऊन ते कोशिकेच्या पटलाशी पोहोचतात. पटलाचे व्हायरिऑनासकट मुकुलन होऊन (कलिकेसारख्या वाढी निर्माण होऊन) व्हायरस कोशिकेबाहेर पडतात व दुसऱ्या कोशिकांत शिरतात. या सर्व प्रक्रियेमुळे अनेक लसीका कोशिका महाभक्षिकोशिका व एककेंद्रकी कोशिका यांची यंत्रणा व्हायरसाच्या गुणनासाठीच राबविली जाते. प्रतिरक्षात्मक कार्य करणाऱ्या कोशिकांची विशेषतः टी-कोशिकांची संख्या हळूहळू कमी होऊ लागते. संक्रामणानंतर रक्तरसात एचआयव्ही प्रतिपिंड आढळू लागतात व ते मुख्यतः एलायसा (ELISA एंझाइम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे) नावाच्या परीक्षेने ओळखता येतात. वेस्टर्न ब्लॉट या परीक्षेने हे निदान निश्चित होते. या परीक्षांतून रक्तरसधनता (रक्तरसातील प्रतिपिंडव्यक्तता) सिद्ध झाल्यावर सु. पाच वर्षांत (परंतु १ ते १० वर्षांत केव्हाही) रोगाची लक्षणे दिसू लागतात.


प्रतिकारक्षमतान्यूनतेची पूर्वी सांगितलेली लक्षणे (विविध संक्रामणे, रात्री ताप येणे, वजनात घट होणे इ.) एड्‌समध्येही दिसतात. लसीका ग्रंथींची सतत वाढ, अन्नाचे अशोषण, अतिसार, पांडूरोग (ॲनिमिया) यांमुळेही एड्‌सची शंका येणे विशिष्ट रोगक्षम गटांमध्ये अपरिहार्य असते. रक्तपरीक्षणात श्वेत कोशिकान्यूनता व बिंबाणुन्यूनता आढळतात. तोंडात व घशात कॅन्डिडा कवक संक्रामण मोठ्या प्रमाणात दिसून येते. भारतीय रुग्णांमध्ये विस्तृत प्रमाणात शरीरभर क्षयरोग पसरलेला आढळला आहे. आफ्रिकेत व अमेरिकेत एम्. कॅपोझी या हंगेरियन त्वचारोगतज्ञांच्या नावावरून ओळखण्यात येणारा कॅपोझी मांसकर्क हा त्वचेचा विकार एड्‌सच्या रुग्णात बघावयास मिळतो. यात गडद निळ्या जांभळ्या रंगाचे चट्टे किंवा गाठी हातापायांवर निर्माण होऊन झपाट्याने वाढत जातात. याशिवाय इतर अर्बुदांमध्ये लसीकार्बुदे, शल्ककोशिकाकर्क (अधिस्तरातील चपट्या खवल्यांसारख्या कोशिकांचा कर्करोग) यांचाही उल्लेख करता येईल. रुग्णात आधीच असलेल्या काही रोगांची तीव्रताही एड्‌समुळे वाढते. तंत्रिका तंत्राचा (मज्जासंस्थेचा) उपदंश व देवीच्या लशीमुळे क्वचित होणारा विकीर्ण (शरीरात व्यापक प्रमाणात पसरलेला) गोदेवी रोग ही याची उदाहरणे होत. एककेंद्रकी कोशिकांच्या संक्रामणामुळे रोगाचे जंतू मेंदूपर्यंत पोहोचून मस्तिष्कशोथ (मेंदूची दाहयुक्त सूज) व इतर तंत्रिका तंत्रीय तसेच मानसिक विकार होऊ शकतात. निदानानंतर एड्‌सचा रोगी १ ते २ वर्षांत मृत्युमुखी पडतो. स्त्रियांमध्ये हा काल सहा महिन्यांइतका कमी असू शकतो. एड्‌सची काही लक्षणे दर्शविणाऱ्या परंतु सर्व परीक्षांनी सिद्ध न झालेल्या अवस्थेस एड्‌ससंबंधित लक्षणसमुच्चय (एआरसी एड्‌स-रिलेटेड काँप्लेक्स) असे नाव देतात. काहींच्या मते ही एड्‌सचीच पूर्वावस्था असावी. एड्‌सचे व्हायरस प्रतिकारक्षमता कोशिकांखेरीज शरीरातील इतर ऊतकांवर देखील आक्रमण करू शकतात. त्यामुळे मेंदू व मस्तिष्क-मेरुद्रव (मेंदू व मेरुरज्जू यांना यांत्रिक आधार देणारा द्रव), मूत्र अश्रुजल, योनिमार्गातील स्राव, वीर्य यांत व्हायरस आढळतात. पुरुषांच्या वीर्यातून स्त्रीकडे अथवा समलिंगी जोडीदाराकडे  स्त्रीच्या रक्तातून तिच्या गर्भाकडे आणि कोणत्याही रुग्णाच्या रक्ताधानामुळे रक्त स्वीकारणाऱ्याकडे असे तीन प्रमुख संक्रामण मार्ग एड्‌सच्या प्रसारात आढळतात. प्रत्येक मार्गाने संक्रामणशक्यतेची पातळी निरनिराळी दिसते. उदा. लैंगिक संबंध १ : १००० माता-गर्भ ३०-५०% आणि रक्ताधान ९०%. अंगावर पाजलेल्या अर्भकाला दुधातून संक्रामण मात्र होत नाही.

रक्तापासून रक्तापर्यंतअसे संक्रामणाचे स्वरूप असल्यामुळे रुग्णाशी घनिष्ठ संबंध, दूषित रक्ताशी संबंध (वैद्यकीय कर्मचारी, प्रयोगशाळेत रक्ताची हाताळणी इ.), रक्त अथवा रक्तजन्य पदार्थांचे (रक्तरस, तज्जन्य लशी) अंतःक्षेपण आणि दूषित सामग्रीने दिलेली अंतःक्षेपणे हीच प्रामुख्याने संक्रामणास कारणीभूत असतात. आतापर्यंतच्या पहाणीवरून संक्रामणाला बळीपडण्याचा धोका जास्त असलेले जनसमूह असे : समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष, अनेक व्यक्तींशी वारंवार लैंगिक संबंध येणारे स्त्रीपुरुष (लैंगिक स्वैराचारी उदा., वेश्या व वेश्यागमनी पुरुष), शिरेत मादक द्रव्य टोचून घेणारे व्यसनी, रक्त व रक्तजन्य पदार्थ ज्यांना वारंवार द्यावे लागतात असे रक्तस्रावी रोग [⟶ रक्तक्लथन], तनुकोशिक पांडुरोग [⟶ पांडुरोग] यांसारख्या विकारांचे रुग्ण, धंदेवाईक रक्तदाते, अमेरिकेतील कृष्णवर्णीय आणि वेस्ट इंडीजमधील हिस्पॅनीओला बेटाच्या हैती या देशाचे रहिवासी व तेथून आलेले स्थानांतरित अमेरिकन रहिवासी. रोगाचे मारक स्वरूप, त्यामधील प्रतिकारक्षमता हानीची अव्युत्क्रमता, समाधानकारक प्रतिबंधाचा अभाव, औपधांची दुर्लभता व लैंगिक संबधांशी निगडित कलंक या सर्व घटकांमुळे प्रत्येक देशात हा रोग परकी नागरिकांकडून आपल्याकडे येईल अशी धास्ती वाटत असते. त्यामुळे परदेशी विद्यार्थी, पर्यटक, खलाशी व परदेशस्थ स्वकीय इत्यादींवर अनेक बंधने घालण्यात येतात. तसेच रुग्णांना बहिष्कृत करण्याकडे जनतेची प्रवृत्ती असते.

 भारतात या रोगासंबंधात रक्तरस परीक्षा १९८५ मध्ये सुरू झाली. जागतिक आरोग्य संघटनेच्या व्यापक संनिरीक्षण धोरणानुसार १९८६ मध्ये जगभर सर्वत्र संवेदनाशील आणि विशिष्ट निदानक्षम परीक्षा उपलब्ध झाल्या. त्यानुसार इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या मंडळाने देशभर संनिरीक्षण सुरू केले. या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात भारतात एड्‌सचा प्रवेश झाला आहे, हे समजले. १९८६ साली आढळलेल्या पहिल्या रुग्णाला अमेरिकेत हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी दिल्या गेलेल्या रक्तामधून हे संक्रामण झाले असावे दुसऱ्या रक्तस्रावी रोग्याला अमेरिकेतच ‘रक्तक्लथनकारक VIII’ चे [⟶ रक्तक्लथन] अंतःक्षेपण देण्यात आले होते. संनिरीक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात ४३ केंद्रे व ५ संदर्भकेंद्रे यांच्या मदतीने हे कार्य व्यापक प्रमाणात सुरू झाले. वेश्या, गुप्तरोग चिकित्सा केंद्रे, समलिंगी पुरुष, रक्तदाते व गरोदर स्त्रिया यांमध्ये परीक्षणाचे प्रमाण वाढविण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात नोव्हेंबर १९८७ पासून इतर सर्वांबरोबरच रक्तपेढ्या, रक्तजन्य उत्पादने यांवर जास्त लक्ष देण्यात आले. आरोग्यशिक्षण, एड्‌स रुग्णांबद्दलच्या रुग्णालयांच्या भूमिका, माता-बाल संगोपन केंद्रे, रक्तरस परीक्षेत संक्रामणाचे निदान झालेल्या व्यक्तींचा मागोवा घेणे इ. कार्यक्रमांनी या साथीच्या आव्हानाला तोंड देण्याची तयारी करण्यात येत आहे. वैद्यकशास्त्राच्या सर्व शाखांनी परिपूर्ण असे एड्‌स संशोधन केंद्र स्थापन करण्याची योजना आहे.


एचआयव्ही व्हायरसामुळे एड्‌स होतो हे समजल्यावर त्या व्हायरसाच्या बाह्य आवरणातील प्रथिनाचा प्रतिजन म्हणून वापर करून जननिक अभियांत्रिकीच्या तंत्राने लसनिर्मितीचे प्रयत्नसुरू झाले. प्रायोगिक अवस्थेतील अशा लशींच्या परीक्षा निरोगी समलिंगी पुरुषांमध्ये सुरू आहेत. एचआयव्हीचे अनेक विभेद व शरीरामध्ये या व्हायरसाची उत्स्फूर्त उत्परिवर्तन होण्याकडे (आनुवंशिक लक्षणात आकस्मिकपणे बदल होण्याकडे) प्रवृत्ती यांमुळे लशीच्या उपयुक्ततेस मर्यादा पडतील असा अंदाज आहे.

लैंगिक संक्रामणाला रबरी संरक्षक साधनाने (निरोध) चांगला आळा बसू शकतो. त्यामुळे या साधनाचा उपयोग करण्याचे ज्ञान व त्याचा मुक्त पुरवठा यांवर भर देण्यात येत आहे.

आतापर्यंत ज्ञात असलेली व्हायरसनाशक औषधे निरुपयोगी ठरल्याने नवीन औषधे शोधली जात आहेत. अँप्लिजेन व ॲझिडोथायमिडीन (एझेडटी रिट्रोव्हिर किंवा झायडोव्हुडीन) ही दोन औषधे एड्‌स व्हायरसांची वाढ थांबवणे, दुय्यम संक्रामणांची शक्यता कमी करणे व तंत्रिका ऊतकामधील दोष कमी करणे अशा परिणामांनी मृत्यूचे प्रमाण घटवतात, असे दिसते. कणकोशिका व महाभक्षिकोशिका यांच्या वाढीस उत्तेजित करणारा एक घटकही (जीएम-सीएसएफ ग्रॅन्युलोसाइट मॅक्रोफाज कॉलनी स्टिम्युलेटिंग फॅक्टर) वापरला जात आहे. याशिवाय श्वेत कोशिकांवरील ज्या ग्राहींशी व्हायरसाचा प्रथम संयोग होतो त्यांच्याशी साम्य असलेले सीडी-४ हे द्रव्य देऊन व्हायरसापासून कोशिकेचे संरक्षण करता येईल अशी शक्यता आहे. रिट्रोव्हायरसांचे वैशिष्ट्य असलेल्या रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एंझाइमाचे दमन करणारी सुरामिनासारखी जुनी औषधेही ऊतकसंवर्धनामध्ये परिणामकारक ठरल्याने रुग्णांमध्ये वापरून पाहिली जात आहेत परंतु एड्‌स संसर्गानंतर अस्थिमज्जेतील स्कंधकोशिका व तज्जन्य पूर्वकोशिका व्हायरसग्रस्त होऊन त्या व्हायरसाचा साठा म्हणून कार्य करतात. या साठ्यामुळे औषधांच्या परिणामावर मर्यादा पडते, असे दिसते.

पहा : रोगप्रतिकारकक्षमता लसीका तंत्र.

संदर्भ : 1. Altman, D. AISD in the Mind of America, 1987.

           2. Asherson, G. L. Webster, A. D. B. Diagnosis and Treatment of Immunodeficiency Disease, 1980.

           3. Britannica Book of the Year 1988, AIDS and Society, pp. 206-207.

           4. Greenwood, D. O’ Gready, F. The Scientific Basis of Antimicrobial Chemotherapy, Cambridge, 1985.

           5. Haeney, M. Introduction to Clinical Immunology, London, 1985.

           6. Hayward, A. R. Immunodeficiency, London, 1977.

           7. Indian Council of Medical Research, ICMR Bulletin, November 1989, pp. 115-129.

           8. Scientific American, October 1988, pp. 24-112.

श्रोत्री, दि. शं.