योग चिकित्सा :  ज्या रोग चिकित्सेमध्ये योगोपचार वापरले जातात तिला ‘योगचिकित्सा’ म्हणतात. आयुर्वेद ,  होमिओपॅथी किंवा ॲलोपॅथी ही जशी वैद्यकीय शास्त्रे असून ,  रोगोपचार हा त्यांचा प्रमुख उद्देश आहे ,  तसा योगशास्त्राचा चिकित्सा हा प्रमुख हेतू नाही ,  हे निर्विवाद आहे  परंतु शतकानुशतके योगाचा चिकित्सेकरिता उपयोग करण्यात आलेला आहे.

  

    मूळ संस्कृत शब्द ‘युज्‌’ या जुळणे अथवा जोडणे या अर्थाच्या शब्दावरून ‘योग’ हा शब्द बनला असून ,  जीवात्मा व परमात्मा यांना जोडणे किंवा एकत्र आणणे अशा अर्थी तो योगशास्त्रात वापरला जातो. योगाचा हा हेतू व तो साधण्याचे सिद्धांत अतिप्राचीन आहेत. महर्षी पतंजलींनी इ. स. पू. सु. दुस ऱ्या  शतकात या शास्त्राची मांडणी केली. त्यांनी योगसूत्र या आपल्या ग्रंथात योगाचे शास्त्र अत्यंत मोजक्या शब्दांत संपूर्ण व मुद्देसूद मांडले आहे.

  

    पातंजल योगसूत्रा त ‘यमनियमासन-प्राणायाम-प्रत्यहारधारणाध्यान समाधयोऽष्टांगानि ’ असा उल्लेख आहेत. त्यापैकी यम ,  नियम ,  आसन आणि प्राणायाम ही पहिली चार अंगे शरीरासंबंधी असल्यामुळे त्यांचा शरीरस्वास्थ्याशी ,  तर उरलेल्यांचा मनःस्वास्थ्याशी संबंध येतो. पहिल्या चार अंगांच्या अभ्यासाने शरीराची विशिष्ट तयारी करण्यात येऊन मनाची व चित्‌शक्तीची ताकद वाढ व ण्यास मदत होते.’  ‘सुदृढ शरीर तरच सुदृढ मन ’ अशी योगाची धारणा आहे. योगशास्त्रात किंबहुना भारतीय तत्त्वज्ञानात मन व शरीर एकाच संयुगाचे घटक मानले जातात. प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र  ⇨ आयुर्वेदातही हीच संकल्पना रूढ आहे.

  

    योगशास्त्र मू ळात वैद्यकशास्त्र नाही हे प्रथम लक्षात घेऊनच त्याचा चिकित्सेकरिता उपयोग करावयास हवा. हठयोग-प्रदीपिका या ग्रंथात हुषार वैद्याने वैद्यकशास्त्रानुसार योग्य ते उपचार योजावेत आणि शिवाय योग्य ते योगोपचारही करावेत ,  असे सांगितले आहे [ ⟶ हठयोग ] .  कोणतीही चिकित्सा परिपूर्ण नाही ,  किंबहुना अपूर्णता हा प्रत्येक चिकित्सेचा स्थायीभावच आहे. योगचिकित्सेतही अपघातजन्य रोग किंवा संसर्गजन्य रोग यांवर उपचार नाहीत.

  

    योगोपचारासंबंधी अधिक माहिती देण्यापूर्वी लोणावळा येथील  ⇨ कैवल्यधाम या संस्थेचे संस्थापक  ⇨ स्वामी कुवलयानंद आणि अनेक वर्षे यांच्या सहवासात योगावर संशोधन व अभ्यास केलेले सं. ल. विणेकर यांचे काही विचार समजावून घेणे आवश्यक आहे. रोग व रोगचिकित्सा याबद्दलच्या यौगिक संकल्पनांविषयी ते म्हणतात : योगाबद्दलची सर्वसाधारण क ल्पना म्हणजे ते मन आणि चित्‌शक्ती यांसंबंधीचे एक शास्त्र आहे एवढीच आहे  परंतु पतंजलींच्या योगसूत्रांच्या सखोल अभ्यासानंतर हे सहज लक्षात येते की ,  त्यात शरीर व मन दोन्ही अखंड असल्याचेच सांगितले आहे. योगाच्या शरीरक्रिया विज्ञानविषयक संकल्पनेप्रमाणे दोन्हींमध्ये समस्थिती राखणारी यंत्रणा असून तिच्या समकालिक कार्यवाहीमुळे ( ‘समाधि’मुळे) ,  प्राकृतिक बाह्य व अंतःस्थ उद्दीपनांना ( क्लेशांना) न जुमानता ,  प्रत्येक व्यक्तीमध्ये जन्मजात अनुयोजनाची अथवा समायोजनाची शक्ती असते. शरीर व मन नेहमी कार्य संतुलनाचा प्रयत्न करीत असताना कोणतेही बाह्य किंवा अंतःस्थ प्रक्षोभक ( मग ते यांत्रिक ,  रासायनिक ,  विद्युत्‌ ,  जैविक किंवा मानसिक असले तरी) थोडाफार मनःशरीरक्रियात्मक बदल ( ‘विक्षेप’ )  घडवून आणते. हा बदल अथवा विक्षेप किती काळ टिका वायचा ते प्रक्षोभकाचा जोर आणि शरिराची मनःकायिक समस्थितीची क्षमता यांवर अवलंबून असते. योगोपचारांचा उद्देश शरीराला व मनाला समस्थिती संतुलित ठेवण्यास किंवा बिघडली असल्यास शक्य तितक्या लवकर पूर्ववत होण्यास मदत करणे हा असतो.

  रोग अथवा व्याधी हा असाच समस्थिती संतुलनाचा बिघाड आहे. योगाचा उद्देश समाधी हा आहे. समाधीच्या उलट व्याधी म्हणजे ऐकमत्याभाव अथवा बिघाड. अविरोधता व एकत्रीभवन साधणे हा योगाचा सतत हेतू असतो.

  

    रोगोपचाराकडे दोन निरनिराळ्या दृष्टिकोनांतून बघता येते  :  एकात प्रक्षोभक कारण शोधून ते नाहीसे करणे व शरीराची पूर्वावस्था येण्याकरिता दुसरे काहीही न करणे ,  तर दुस ऱ्या त शरीराला स्वतःलाच प्रक्षोभकाविरुद्ध लढा देण्यास समर्थ बनवून स्वप्रयत्नांनी रोगावर विजय मिळूवन देणे. योगाचा रोगाकडे व इतर सर्व बाबींकडे बघण्याचा दृष्टिकोन एकच आहे  :  स्वशरीर अधिक बळकट करून रोगनाश करणे ,  प्रक्षोभकाचा शोध करण्यात वेळ घालवण्यापेक्षा अधिक चांगले.

  

    योगशास्त्र वैद्यकासारखे चिकित्साशास्त्र नसले ,  तरी वैद्यकातील आरोग्यरक्षण ,  व्याधि-निवारण ,  व्यक्तिमत्वविकास यांसारख्या विषयांमुळे त्याचा व वैद्यकाचा जवळचा संबंध असल्याचे लक्षात येते. अलीकडील योगशास्त्रावरील नव्या ग्रंथांतून योगोपचार वषट्‌क्रिया यांचा संबंध दाखविण्यात येतो  परंतु या क्रिया जेव्हा हठयोगात समाविष्ट झाल्या ,  तेव्हापासूनच योगाचा चिकित्सात्मक उपयोग सुरू झाला ,  असे म्हणता येते.

  

    हठ-प्रदीपिके प्रमाणे  षट्‌क्रिया केल्याने मेदवृद्धी ( स्थूलता) नाहीशी होते ,  कफ-दोष नाहीसा होतो व मलशुद्धी वगैरे साध्य होतात  त्यानंतर केलेला प्राणायाम ( श्वसन नियंत्रण) विनासायास साध्य होतो.  षट्‌क्रियां   मुळे अन्न ,  हवा व मल यांचे मार्ग शुद्ध होतात आणि शुद्ध शरीर म्हणजेच वात ,  पित्त व कफ या त्रिदोषांचे संतुलन असलेले शरीर ,  प्राणायामास योग्य असते. ज्यांना दोषबाधा नसेल त्यांना षट्‌क्रिया  करण्याची आवश्यकता नाही ,  असेही हठयोगात स्पष्ट सांगितले आहे.

  

    षट्‌क्रिया  :  धौती ,  बस्ती ,  नेती ,  त्राटक ,  नौली व कपालभाती या शुद्धिक्रिया आहेत.

  

   ( १) धौती  : ज्या क्रियेत शरीर भाग धुवून किंवा पुसून स्वच्छ करतात तिला ‘धौती क्रिया ’ म्हणतात. निरनिराळी साधने ( वस्त्र ,  रबरी नळी इ.) वापरून शरीराचे अंतर्भाग धुता येतात. मुखापासून गुदद्वारापर्यंत अन्नमार्ग व पर्यायाने मलमार्ग शुद्ध होतो. ह्या प्रकारांमध्ये दंतमूल धौती ,  जिव्हामूल धौती ,  हृद धौती ( येथे हृद म्हणजे ‘जठर’ )  इत्यादींचा समावेश आहे.

  

   ( २) बस्ती  : बस्ती या शब्दाचा मूळ अर्थ ‘मूत्राशय’ असा आहे. बोकडाचे मूत्राशय पिशवीप्रमाणे पाणी किंवा जलमिश्रित औषधी द्रव्ये साठविण्याकरिता वापरून ,  त्या पिशवीला नळी जोडून ते द्रव्य गुदद्वारातून गुदाशयात ढकलून साफ करण्याकरिता वापरीत. या क्रियेला साधानावरून ‘बस्ती क्रिया ’असे नाव मिळाले आहे. या क्रियेचे अनेक प्रकार आहेत. बद्धकोष्ठ बरे होणे ,  मोठ्‌ या आतड्‌ याचे रुधिराभिस र ण सुधारणे ,  मूळव्याधीस प्रतिबंध इ. फायदे बस्तीमुळे होतात [ ⟶ बस्ति ] .

  

   ( ३) नेती  : नाक स्वच्छ करण्याच्या क्रियेला ‘नेती’ म्हणतात. नाकाचा आतील भाग स्वच्छ करण्याकरिता पाणी ,  सुताची दोरी वगैरे साधने वापरतात आणि त्यावरून ‘जल नेती ’ ,  ‘सूत्र नेती ’ ,  ‘रबर नेती ’ इ. नावे या क्रियेच्या प्रकारांना दिली आहेत. श्वसनमार्गातील महत्त्वाचा नासामार्ग स्वच्छ होऊन श्वसन सुधारणा ,  नाकातील मांसांकुर किंवा हाडे न वाढणे इ. फायदे होतात.


( ४) त्राटक  : डोळे उघडे ठेवून दृष्टी जवळच्या वस्तूवर सारखी ‘भिरावणे’ व तसे करताना पापण्यांची उघडझाप होऊ न देणे या कृतीला त्राटक म्हणतात. वस्तू जवळची असल्यास ‘समीप’ त्राटक आणि दूरची असल्यास ‘सुदूर’ त्राटक म्हणतात. दृष्टी स्थिर होणे ,  दृक्‌तंत्रिका ( दृक्‌ संवेदना मेंदूला पोचविणारी मज्जा) आरोग्यसंपन्न ,  डोळे शुद्ध होणे व मन स्थिर होणे हे फायदे होतात.

  

   ( ५) नौली  :  उदर भि त्तीतील उदरदंडी स्नायूंच्या विशिष्ट हालचालींना नौली म्हणतात. उदरगुहेतील महत्त्वाच्या अवयवांची कार्यक्षमता वाढवणे ,  अपचन व मलावरोध यांवर उत्तम उपाय आहे. पोटावरील मेदवृद्धी कमी होण्यास मदत होते.

  

   ( ६) कपालभाती  : ही क्रिया दोन प्रकारांनी करता येते  : ( अ) हवेचा उपयोग करून आणि ( आ) पाण्याचा उपयोग करून. यांपैकी हवेने केलेल्या क्रियेसच ‘कपालभाती’ म्हणण्याचा प्रघात आहे. या क्रियेत उच्छ्‌ वा स हा श्वसनक्रियेचा भाग विशिष्ट पद्धतीने वापरतात. अंतःश्वसनाबरोबर फुप्फुसात घेतलेली हवा नेहमीप्रमाणे संथ बाहेर पडू न देता ,  ती पोटाला जोषात आकस्मिक झटका देऊन बाहेर ढकलतात. तसे करताना तीपैकी काही भाग नाक व कपाळाजवळच्या कोटरात ( पोकळ्यांतून) शिरते व बाहेर पडते. या कोटरशुद्धीमुळे कपाळास तेज वाढते. ‘भाती’ याचा अर्थ तेज ,  म्हणून या क्रियेस ‘कपालभाती’ म्हणतात. सर्दी-पडसे व दमा या रोगांत उपयुक्त अशी ही शुद्धिक्रिया आहे. धावपटू ,  जलतरणपटू इ. क्रीडापटूंना ही क्रिया उपयुक्त असते.

  

     मूलभूत तत्त्वे  : योगचिकित्सेकरिता काही मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करणे आवश्यक आहे. कैवल्यधाम या संस्थेत १९५९ पासून योगाभ्यास व संशोधन करणारे मु. वि. भोळे यांनी याविषयी खालील तत्त्वे सांगितली आहेत.

  

   ( १) चित्त ,  बुद्धी ,  मन ,  इंद्रिय तथा शरीरगात्रांचे शिथिलीकरण यामुळे व्यक्तींमध्ये शरीरांतर्गत तणावापासून मुक्ती मिळवता येते. जवळजवळ प्रत्येक रोगामध्ये शवासन व मकरासनाद्वारे शिथिलीकरण शिकवता येते आणि शरीराच्या कुठल्याही स्थितीत त्याचा अनुभव व फायदा घेता येतो.

  

   ( २) हठयोगातील सोपी व सहजसाध्य प्रमाणात निरनिराळी आसने व्यक्तीच्या कुवतीप्रमाणे सुचविता येतात. त्यामुळे शरीरांतर्गत प्राणशक्तीच्या कार्यपद्धतीतील अडथळे दूर होऊन हळूहळू रुग्णाला निश्चित फायदा होतो. व्यक्तिविशेषावर देखील आसनाद्वारे सुसंस्कार करता येणे शक्य आहे. बरेच मनोकायिक रोग व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व बदलल्यास सहज दूर होतात.

  

   ( ३) प्रत्येक आसनाच्या वेळी श्वासोच्छ्‌ वास नैसर्गिक रीत्या चालू असणे उत्तम.

  

   ( ४) एकेका आसनाचा अभ्यास करावयाची प्रथा आहे.

  

   ( ५) डोळे बंद करून योगिक क्रिया केल्यास त्यांचा परिणाम अधिक चांगला होतो  परंतु काही रुग्णांमध्ये डोळे उघडे ठेवूनच योगिक क्रिया करणे हितावह असते.

  

 ( ६) पोटातील अवयवांशी संबंधित असलेल्या कार्यात्मक विकारामध्ये हठयोगातील  षट्‌क्रिया अत्यंत उपयोगी ठरतात. खरे म्हणजे रोगोपचार शुद्धिक्रियांनीच सुरू करावे परंतु यामुळेरुग्ण योगोपचारापासून दूर जाण्याची शक्यता अधिक असते. समजूतदार रुग्णामध्ये सुरुवात सोप्या शुद्धिक्रियांनी करण्यास हरकत नाही. अनिच्छावर्ती तंत्रिका तंत्र  (मज्जासंस्था), ⇨अंतःस्रावीग्रंथी,  चयापचय  क्रिया (शरीरात  सतत  होणाऱ्या  भौतिक  व  रासायनिक  घडामोडी)  आणि  व्यक्तीचा  जीवनविषयक  दृष्टिकोन  यांच्यावर  या  शुद्धिक्रियांचा  सूक्ष्म  परिणाम  होतो.

  

 ( ७) योगचिकित्सेत प्राणायामाचे विशेष महत्त्व आहे [ ⟶ प्राणायाम] .  प्राणायाम व श्वासायाम ( श्वसनासंबंधीचे व्यायाम) यांत शिकवण व अभ्यास या दोन्ही स्तरांवर भेद करणे आवश्यक आहे. पुष्कळ लोक प्राणायामाऐवजी श्वासायामच करतात व आसनांच्या ऐवजी फक्त व्यायामच करतात. प्राणायामात अनिच्छावर्ती तंत्रिका तंत्रावर व माणसाच्या चैतन्यावर परिणाम आहे. अनुलोम ,  विलोम व उज्जायी हे प्राणायामाचे प्रकार सुरुवातीस सर्व प्रकारच्या रुग्णांमध्ये वापरता येतात. योगोपचारामध्ये कुंभकाचा ( श्वास रोखण्याचा) वापर करू नये.

  

   ( ८) रुग्णाच्या आहार-विहारात योग्य प्रकारचे बदल करणे नेहमीच क्रमप्राप्त ठरते. पथ्याशिवाय कुठलाही उपचार परिणामकारक होणार नाही ,  असे आयुर्वेदाचे वचन आहे.

  

   ( ९) आसन-प्राणायामांच्या माध्यमातून व्यक्तीला तिच्या शरीरात व मनात चालत असलेल्या घडामोडींची जाणीव होण्यास सुरुवात होते व या प्रक्रियेमुळे मनास बेचैन करणारे काही अनुभव येऊ लागतात. ही वेळ रुग्णाला ध्यानात्मक आसनांचा अभ्यास देऊन मनातील द्वंद्वांना वाट मोकळी करून देण्याकरिता मदत करण्यास योग्य  परंतु याकरिता ध्यान-प्रक्रिया म्हणजे काय हे प्रथम समजून घेणे अत्यावश्यक आहे.

  

   ( १०) या प्रकारे रुग्णाला मदत करीत असताना यम-नियमांचे महत्त्व ,  युक्त आहार-विहार ,  चेष्टा-कर्म यांचे महत्त्व व प्रज्ञापराधामुळे उत्पन्न होणाऱ्या विकाराशी समर्थपणे मुकाबला करण्याचे ज्ञान चिकित्सकाला तथा रुग्णाला होऊ शकेल व पुढची वाटचाल सुलभ होईल.

  

   ( ११) योग्य त्या मंत्राचा ,  पूजन-हवनाचा देखील रोगोपचाराच्या दृष्टीने चांगला फायदा होतो. या माध्यमातून वेगळ्या प्रकारची वातावरणनिर्मिती होऊन ,  तीमुळे रुग्णाच्या मनावर नवीन उपयुक्त संस्कार होण्यास मदत होते.

  

   ( १२) अल्पकाळ तीर्थक्षेत्रात जाऊन राहणे ,  एखादे अनुष्ठान करणे ,  आपल्या व्यवहाराशी तथा वासनात्मक जीवनाशी असंबंधित साहित्य वाचन ,  सत्संग या गोष्टी योगोपचारांच्या कक्षेत येणाया व पूर्वजांनी वारंवार प्रतिपादन केलेल्या आहेत.

  

    योगोपचारांचा विचार करताना वरील सर्वच बाबींचा पृथक्‌ तसेच एकत्र विचार करणे भाग पडते. व्यक्ती भिन्नतेप्रमाणे भिन्न योगमार्ग व भिन्न योगप्रक्रिया डोळ्यासमोर ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

  

     साधने  : योगोपचाराकरिता उपयोगात असणा ऱ्या  विविध साधनांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येते.

  

   ( १) आसन :  शरीर व मन यांच्या स्थिरतेसाठी घेतलेली विशिष्ट अंगस्थिती [ ⟶ योगासने ].

  

   ( २) प्राणायाम :  श्वसन नियंत्रणाच्या विविध प्रक्रिया.

  

   ( ३) बंध व मुद्रा :  शरीरातील विशिष्ट स्नायूंचे आकुंचन व प्रसरण करून अनैच्छिक तंत्रिका तंत्रावर क्रमशः नियंत्रण साधण्याच्या क्रिया.

  

    (४) शुद्धिक्रिया :  शरीरशुद्धीसाठी करावयाच्या सहा प्रमुख क्रिया ( षट्‌क्रिया ).

  

   ( ५) ध्यान :  मनोनियंत्रण अथवा मनाची एकाग्रता.


  काही रोग व त्यांवर सुचविण्यात आलेले योगोपचार कोष्टक क्र. १ मध्ये दिलेले आहेत.

  

 कोष्टक क्र. १. काही रोग व त्यांवर सुचविण्यात आलेले योगोपचार  

 रोग  

 सुचविलेला योगोपचार  

 अ तिरक्तदाब  

 शवासन  

 ह्रदरोग  

 झटक्यानंतरच्या काळात सोपी अल्पकालीन आसने .  

 दमा  

 दोन झ टक्यां च्या मध्यंतरात आसने , प्राणायम व यौगिक क्रिया  

 मधुमेह  

 यौगिक क्रिया , आसने, प्राणायाम याबरोबरच आहार नियंत्रण.  

 बध्द्कोष्ठ  

 काही आसने व यौगिक क्रिया.  

 स्त्रि यांचे रोग  

 मासिक पाळी , प्रसूतीनंतरच्या तक्रारी आणि सुलभ प्रसूतीकरिता काही आसने व क्रिया.  

 अतिस्थूलता अथवा लठ्ठपणा .  

 साधी सोपी आसने , प्राणाया म , काही यौगिक क्रिया व आहार नियंत्रण.  

 निद्रानाश  

 योगासने , प्राणायाम चिंतन, पाठीच्या क ण्या वर २0 मिनिटे थंड पाण्याने स्नान झोपण्यापू र्वी ऊन पाण्याने पाय धुणे  

 कशेरुशोथ(मणक्यांचा त्रास)  

 आसने , काही मुद्रा जिव्हाबंध व प्राणायाम,  

 मनोविकार  

 आसने , प्राणाया म शुद्धिक्रिया , ध्यान.  

 सर्दी व डोकेदुखी  

 नेती , कपालभाती व प्राणायाम.  

 अ म्लपित , अग्नि मांद्य , अ न्नमा र्गाचे काही विकार  

 शवासन , प्राणायम, विशिष्ट यौगिक क्रिया,. धौती क्रिया इ.  

  

  कैवल्यधाम या संस्थेतील योगोपचार केंद्राने रोग व त्यांवरील उपचारांच्या परिणामासंबंधीची प्रसिद्ध केलेली आकडेवारी कोष्टक क्र. २ मध्ये दिली आहे.

  

 कोष्टक क्र. २.रोग अथवा विक्रूती आणि त्यांवरील योगोपचरांची परिणामकारकता यांसंबंधीची आकडेवारी (कैवल्यधाम ,लोणावळा) .

 वि कृ ती अथवा रोग

 प्रतिव र् षी उपचार केलेली सरासरी रुग्ण संख्या

 बरे झाले किंवा सुधारले  

 परिणाम झाला नाही  

 (१) श्व सन तंत्र विकार  

   

 नासाशोथ  

 ६५  

 ५  

 कोटरशोथ  

 २  

 –  

 ग्रसनीशोथ  

 ६  

 –  

 गिलायुशोथ  

 ५  

 ३  

 श्वा सनलिकाशोथ  

 ४  

 १  

 दमा  

 ६ ०  

 ५  

 (२) अन्नमार्ग व पचन तंत्र विकार  

   

 अग्निमांद्य  

 ४०  

 २  

 बृहदांत्रशोथ (अतिसार)  

 ४५  

 ५  

 यकृत विकार  

 ५  

 २  

 बद्धकोष्ठ  

 ३५  

 २  

 अम्लपित्त  

 ५  

 १  

 गुदांत्रस्खलन  

 १  

 –  

 मूळव्याध  

 २  

 १  

 (३) रूधिराभिसरण तंत्र विकार  

   

 अतिरक्तदाब  

 २०  

 ५  

 अल्परक्तदाब  

 ४  

 २  

 हृद् अतिरिक्त आकुंचने  

 १  

 –  

 हृद् अपर्याप्तता  

 १  

 १  

 (४) चयापचयात्मक विकार  

   

 अतिस्थूलता  

 ७५  

 ५  

 मधुमेह  

 ३  

 १  

 अवटू ग्रंथी विकार  

 ५  

 –  

 (५) स्नायू-कंकालतंत्र विकार  

   

 स्नायू-संधिवात  

 –  

 १  

 संधिशोथ  

 १३  

 २  

 स्नायू विकार  

 १  

 –  

 अस्थिसंधिशोथ  

 ३  

 १  

 (६) जनन – मूत्र संबंधी विकार  

   

 मासिक पाळीचे विकार  

 ५  

 १  

 गर्भाशय स्खलन  

 २  

 १  

 वांझपणा  

 २  

 २  

 वीर्य – दुर्बलता  

 ६  

 ४  

 (७) मानसिक विकृती  

   

 तांत्रिका दौर्बल्य अथवा नस-अशक्ती  

 ५०  

 १५  

 मनोमज्जा विकृती  

 ३०  

 ५  

 अपस्मार  

 २  

 २  

 (८) इतर विकार  

   

 अशक्तता  

 २०  

 –  

 अधिहृषताजन्य रोग  

 २  

 १  

 आंशिक पक्षाघात  

 ५  

 २  

                    

               (शोथ – दाहयुक्त सू ज ग्रसनी – घसा गिलायू – टॉन्सिल बृ हदां त्र मोठे आतडे गुदांत्रस्खलन – बृ हदांत्राच्या शेवटून दुसऱ्या भागाचे पातळ अस्तर सैल पडून शौचाच्या वेळी बाहेर येणे हृ द् अपर्याप्तता – हृ दयाची कार्य-अक्षमता अवटू ग्रंथी – शोषण आणि चयापचय नियंत्रण यात महत्त्वाचे कार्य करणारी, मानेच्या पुढच्या भागात असलेली अंतःस्त्रावी ग्रंथी कंकाल – अस्थींचा सांगाडा अधि हृ षता  – ॲलर्जी . )  

  योगोपचार हे तज्ञ व्यक्तीकडूनच करून घेणे हितावह असते.

  

 पहा  :  कैवल्यधाम  प्राणायाम  योग  योगासने  हठयोग.

  

 संदर्भ  : 1. Caycedo, A. India of Yogi’s, New Delhi, 1966.

              2. Choudhary, B. Bikram’s Beginning Yoga Classes, London, 1981.

              3. Jaggi, O. P. Yogic and Tantric Medicine, New Delhi, 1973.

              4. y3wuohi, K. S. Yogic Pranayama, New Delhi, 1983.

              5. Kuvalayanand Swami Vinekar, S. L. Yogic Therapy, New Delhi, 1963.

              ६. निंबाळकर ,  स. प्र. यौगिक-क्रिया-आरोग्याचा पाया ,  मुंबई ,  १९८२ ,

              ७.  मोने ,  चिं. वा. ,  संपा. ,  योगजिज्ञासा ,  कल्याण ,  १९८३.

  

  भालेराव ,  य. त्र्यं.