मनोदौर्बल्य (मनोविकलता) : ह्या मस्तिष्क विकारांची संज्ञा संकल्पना आणि वर्गीकरण ह्यांबद्दल मानसोपचारज्ञात अजूनही एकमत झालेले नाही. निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या संज्ञा त्यासाठी वापरात आहेत. भारतात मेंटल डेफिशियंशी वा डिफेक्ट (मनोदौर्बल्य) ही इंग्लंडच्या १९२७ च्या कायद्यानुसार चालत आलेली संज्ञा अजूनही कायद्याच्या क्षेत्रात प्रचलित आहे. वैद्यकीय क्षेत्रात जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यू.एच.ओ.) आंतरराष्ट्रीय मनोविकारांच्या नवव्या (१९७८) वर्गीकरणानुसार (आय.सी.डी.-९) प्रचलित असलेल्या संज्ञा मेंटल रिटार्डेशन (मनोविकलता) ह्या वापरात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने एकंदर विकारसमूहाला मानसिक अधःसामान्यता ही संज्ञा दिलेली आहे. त्यात मनोविकलता आणि मनोदौर्बल्य ह्या दोन्ही संज्ञा समाविष्ट आहेत. मनोदौर्बल्य ही संज्ञा कायद्याच्या क्षेत्रात मनोविकलता ही संज्ञा प्रचलित केली आहे. मतिमांद्य (फीबलमाईडेडनेस) ही संज्ञा अमेरिकेत जुन्या काळात वापरात होती. आपल्या येथील कायद्याच्या भाषेत मतिमांद्य ही संज्ञा सौम्य स्वरूपाच्या मनोदौर्बल्याला उद्देशून वापरली जाते. सध्या अमेरिकेत मेंटल रिटार्डेशन म्हणजे मनोविकलता हीच संज्ञा प्रचलित आहे. इंग्लंडच्या मनोविकलतेच्या १९७८ च्या कायद्यातील बदलात मानसिक अपंगत्व (मेंटल हँडिकॅप) ही नवीन संज्ञा सुचविली आहे. तेथील तीव्र मनोविकल तेचा प्रादुर्भाव साधारण दर हजारी चार असतो (जे. डिझार्ड). भारतात याबाबत विश्वसनीय अशी रोगविज्ञानपरिस्थितीची पाहणी झालेली नाही.

हे विकार उपजतच किंवा बाल्यावस्थेत होतात आणि बुध्दीची वाढ मंदगतीने होऊन अपूर्ण रहाते. त्यामुळे प्रौढावस्थेतसुध्दा बुध्दी १२ वर्षाखालील प्राकृत मुलांएवढी असते आणि सरासरी बुध्दी सामान्यांच्या बुध्दीला ७०टक्क्यांहून कमी असते. ह्या विकारांचे वर्गीकरण बुध्दीच्या पातळीप्रमाणे केले आहे (आय.सी.डी.-९) हे वर्गीकरण पुढीलप्रमाणे (१) सौम्यमनोविकलता–बुध्दिगुणांक (बु.गु.) ५१ ते ७० (२) मध्यममनोविकलता –बु.गु. ३६-५० (३) तीव्रमनोविकलता–बु.गु. २०ते ३५ आणि (४) अत्यंत तीव्रमनोविकलता –बु.गु. ० ते १९ पूर्वी सीमांत मनोविकलता ह्या संज्ञेने ओळखला जाणारा वर्ग (बु.गु. ७१ ते ८५) आता अ विनिर्देशित मनोविकलता (अनस्पेसिफाइट मेंटल रिटार्डेशन) ह्या नवीन वर्गात समाविष्ट केला आहे.बुध्दीगुणांक म्हणजे खरे वय मात्र १६ वर्षाच्या वर धरले जात नाही. कारण सर्वसाधारण माणसाची बौध्दिक वाढ १६ वर्षानंतर होत नसते. मानसिक वय म्हणजे तेवढीच बुध्दी असलेल्या सरासरी बुध्दीच्या मुलाचे वय. मानसिक वय निरनिराळ्या बुध्दिमापनाच्या कसोट्यांमार्फत बुध्दीची क्षमता ठरवून मोजले जाते. बु.गु. आयुष्यभर तेवढाच राहतो. विशेषतः १६ वर्षानंतर तो बदलत नसतो.

भारतात प्रचलित असलेल्या कायद्याप्रमाणे (इंडियन ल्यूनसी अँक्ट१९१२) केलेले तीन वर्ग असे आहेत. (१) मतिमंद ऊर्फ मनोदुर्बल (फीबलमाईंडेड), (२) क्षीणमती (इमबेसाईल) आणि (३) मूढमती (इडियट).

(१) मतिमंद ऊर्फ मनोदुर्बल ह्या वर्गातल्या मनोविकल व्यक्तीचे मानसिक वय ७ ते १२ वर्षे असून बु.गु. ५० ते ७० असतो. अमेरिकेतल्या जुन्या वर्गीकरणानुसार अशांना मोरॉन असे संबोधले जायचे. इंग्लंडच्या प्रचलित कायद्यानुसार त्यांना मेंटली हँडिकॅपड (मानसिक अपंग) असे संबोधितात. कायद्यातल्या व्य़ाख्येनुसार अशांना त्यांच्या स्वतःच्या आणि निकटवर्तियांच्या रक्षणासाठी काळजी .देखरेख नियंत्रण यांची गरज असते.

 (२) क्षीणमती ह्या वर्गातील व्यक्तींचे मानसिक वय २ ते ७ वर्षे असते आणि बु.गु. २० ते ४९ पर्यंत असतो. कायद्यातील व्याख्येनुसार क्षीणमती व्यक्तींना स्वतःची काळजी घेता येत नाही आणि शिकवूनही ती घेणे जमत नाही.

(३) मूढमती ह्या अत्यंत अल्पबुध्दीच्या मुलांना (प्रौढत्वापर्यंत ते जगतच नाहीत) कायद्याच्या संकल्पनेनुसार स्वतःच्या दैनंदिन जीवनातल्या धोक्यांपासून सांभाळून रहाणे हे देखील जमत नाही. त्यांचे मानसिक वय २ वर्षापेक्षा कमी असते. व बु.गु. १९ च्या आत असतो. 

ह्या विकारांची मुख्य लक्षणे म्हणजे–एकतर बुध्दीची शरीरासमान वाढ होत नाही. त्यामुळे व्यक्तिमत्वविकासाची वाढ मंदावते व विकाराचे टप्पे (माइल्टस्टोन्स) उशिरा दिसून येतात. उदा. आधाराशिवाय चालणे, स्पष्ट बोलणे, मूत्रविसर्जनावर ताबा मिळवणे, स्वतःकपडे घालणे वगैरे. शिक्षणातील प्रगती फारच सावकाश होते. समाजात कसे वावरावे व वागावे हे समजत नाही. एकंदर वागणूक वयापेक्षा बर्याच लहान मुलांसारखी असते.

शारीरिक लक्षणे प्रामुख्याने जनुक दोषांमुळे होणार्याप अनुवांशिक मनोविकलतेच्या अनेक प्रकारांत दिसून येतात. त्यांतील प्रमुख प्रकार आणि त्यांची लक्षणे अशी आहेत. (१) मंगोलीमूढता (मोंगॉलिझम) चेहरा पौर्वात्य लोकांसारखा ,जीभ जाड व भेगा असलेली, केस जाड, करंगळी लहान व वक्र आणि तळहातावर नेहमीच्या दोनऐवजी एकच घडीची आडवी रेषा. (२) लघुशीर्ष (मायक्रोसेफॅली) डोके अत्यंत लहान म्हणजे त्याचा व्यास १७ इंचापेक्षा कमी बाजूने पाहिल्यास डोक्याचा आकार पक्ष्यासारखा .(३) जलशीर्ष (हायड्रोसेफॅलस) डोके बरेच मोठे, आकार उलट्या कमंडलसारखा (४) जडवामनता (क्रेटीनिझम) उंची खुंटलेली ,पोट मोठे, जीभ मोठी असून तोंडाबाहेर कातडी कोरडी व खरखरीत जाडजाड बोटे.


इतर कमी प्रचलित प्रकारांत शारीरिक दोषांची निरनिराळी लक्षणे दिसून येतात ती अशी. हातापायांना ५ पेक्षा जास्त बोटे, लहान आकाराची जननेंद्रिये काणे डोळे, तोकडे किंवा लांबलचक हातपाय, जाडपणा, कुबड, आंधळेपणा, बहिरेपणा, कातडीवर डाग, अपस्माराचे झटके, अर्धागवात, प्लीहा वा यकृत वगैरे आंतरिक इंद्रियांची बेसुमार वाढ. मानसिक लक्षणांमध्ये मंदपणा, लहरीपणा, कमालीचे अस्वास्थ्य, उनाडपणा अथवा निश्चलता तसेच विक्षिप्त अनिवार्य हालचाली (झटके) आढळतात.

ह्या अल्पबुध्दीच्या ले ढण्यामुळे रूग्ण मुले सुलभ व यशस्वी पणे सामाजिक संपर्क ठेऊ शकत नाहीत व त्यामुळे ती प्रतिक्रिया म्हणून चिडखोर, हट्टी व उनाड बनतात तसेच भावंडांपासून व समवयस्क मुलांपासूनही ती बरीच दुरावतात. ह्या सर्वांचा मनावर बराच ताण पडायचा संभव असतो. शेवटी मानसिक विकारही जडू शकतो. अशा मुलांचा भार आईवडिलांवर अतिशय पडून त्यांच्या सुखसमाधानाला बाधा येते तसेच अशा मुलांचे शारीरिक आरोग्यही काळजी न घेतली गेल्यामुळे पुढे बिघडते. अत्यंत तीव्र मनोविकलता असलेली मुले तर वयाच्या १० वर्षापुढे सहसा जगतच नाहीत.

कारणमीमांसा : मनोविकलतेची कारणे मुख्यतेवेकरून दोन वर्गात मोडतात. (अ) प्राथमिक कारणे . ही गर्भधारणेपूर्वीची म्हणजेच जनुकांच्या आनुवंशिक दोषामुळे आढळतात. त्यांचे दोन प्रमुख प्रकार आहेत. (१) रंगसूत्रातील विकृतीमुळे होणारे विकार आणि (२) चयापचयी विकृतीमुळे होणारे विकार.

(आ) दुय्यम कारणे. ही गर्भधारणेनंतर उदभवाणारी असतात. ह्यांचे जन्मापूर्वीची व जन्मानंतरची असे दोन उपवर्ग केलेले आहेत.

जन्मापूर्वी आईला होणारे विकार : रक्तातील र्हिउसस गुणक असंयोज्यता (र्हीरसस फॅक्टर इनकॉम्पॅटीबिलीटी), संक्रामण, विषबाधा,गर्भावस्थेत (विशेषतः पहिल्या ३ महिन्यांत) घेतलेल्या अतिअपायकारी (टॉक्सीक) औषधांचा दुष्परिणाम, क्ष-किरणांचा अतिसंसर्ग ,प्रसूतिकालीन अडचणी-उदा. प्रसूतिवेदना थांबल्यामुळे मुलाचे डोके अडकणे-इत्यादी.

जन्मानंतर होणारे विकार . नवजात कावीळ (निओनेटल जाँडिस) डोक्याला इजा,मेंदूचा ताप, अपस्माराचे सतत झटके, शारीरिक व भावनिक आवाळ (आई वडिलांपासून वियोग, भावनिक धक्का, शिक्षणाचा पूर्ण अभाव इ.) दृष्टी अथवा श्रवणेंद्रियाचे तीव्र दोष इत्यादी. 

वरील कारणांची रूग्णातील टक्केवारी खालीलप्रमाणे आहे- अनुवंशिकता ४०% जनुक दोष ५% इतर प्रसूतिपूर्व कारणे १०% जन्मानंतरची इतर कारणे १०% व इतर ३५%.

लक्षणे : मनोविकलतेच्या निरनिराळ्या वर्गातील रूग्णांत दिसून येणारी विशेष व भिन्न लक्षणे पुढे दिलेली आहेत. तीव्र मनोविकलता असलेल्या मुलांना नीट बोलताही येत नाही व त्यांचे बहुतेक दैनंदिन व्यवहार त्यांना दुसर्याबच्या मदतीने करावे लागतात. उदा. शौचाला जाणे, तोंड धुणे, आंघोळ करणे, कपडे बदलणे, जेवण घेणे वगैरे. त्यांना स्वतःचे संरक्षण करता येत नसल्याने त्यांना लहान मुलांसारखे जपावे लागते. अत्यंत तीव्र मनोविकलतेच्या रूग्णांना तर अर्भकासारखे सांभाळावे लागते.

मध्यमनोविकलता असलेली मुले दैनंदिन व्यवहार उशिरा शिकतात. ते स्वतःची काळजी नीटशी घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर सतत नजर ठेवावी लागते. भाषा पूर्ण बोलता येते, पण नीट लिहिता येत नाही. त्यामुळे शालेय शिक्षण अक्षर ओळखीपलीकडे शक्य होत नाही.समज कमी असल्यामुळे त्यांना साधे कामही शिकवता येत नाही. मोठेपणी त्यांना संभाळणे जड जाते. 

सौम्यमनोविकलता असलेल्या मुलांची देखील बौध्दिक वाढ उशिरा होते. पण शेवटी अशी मुले स्वतःच्या शरीराची काळजी स्वतः घेऊ शकतात. त्यांना शालेय शिक्षण प्राथमिक शाळेपलीकडे घेणे अवघड जाते. साधे व श्रमिक व्यवसाय ती शिकू शकतात. पण तसे काम देखरेखीशिवाय व्यवस्थितपणे त्यांना करता येत नाही. समवयस्क मुले त्यांना दूर ठेवतात किंवा त्यांची चेष्टाटिंगल करतात. त्यामुळे अशी मुले एकलकोंडी बनतात किंवा भटकत राहतात. रस्त्यावरच्या उनाड मुलांच्या संगतीमुळे त्यांना व्यसने लागतात व वर्तणूक विघडते, त्यांच्या अल्पबुध्दीचा गैरफायदा समाजकंटक घेतात व त्यांना चोर्या, व इतर गैरकृत्ये करायला शिकवतात. अस्वस्थता, चिडचिडे.पणा, हट्टीपणा तसेच काही मुलांत हिंसकता व समाजद्रोही वर्तनही दिसून येते. अशा मुलांना इतर मानसिक विकार जडायचाही संभव असतो. उदा. ⇨छिन्नमानस. बहुसंख्य मनोविकल रूग्ण (८७%) ह्या वर्गात मोडतात.

निदान : पूर्णंरूग्णवृत्तान्त रीतसर उतरवून घेतल्यावर मनोविकलतेचे निदान करणे कठिण नाही. शिवाय मानसशास्त्रीय तपासणीत बावळट चेहरा, गबाळेपणा, पोरकट वर्तणूक हे सर्व बहुधा आढळून येते. असलेले बौध्दिक मांद्य विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलेल्या असमाधानकारक उत्तरांवरून लक्षात येते. दैनंदिन वस्तूंचे नाव, रंग व उपयोग सांगणे, नीणी ओळखणे व त्यांचा हिशोब ,बेरीज वजाबाकी सारखी सोपी गणिते करणे, सर्वसामान्य ज्ञान ह्या सर्व बाबीवरून बौध्दिक पातळीचा अंदाज करता येतो. त्यांत समवयस्कांपेक्षा मनोविकल बरेच उणे पडतात.


व्ही.व्ही. कामत व सी.एम. भाटीया यांच्या बुध्दीमापन कसोट्या तसेच एफ.गुडइनफची मनुष्यचित्र बुध्दीमापन कसोटी वगैरेंमार्फत मनोविकलतेचे निदान होऊ शकते. शिवाय आनुवंशिक जनुकदोषांमुळे होणाऱ्या काही विशिष्ट विकारांचे निदान रक्त व मूत्रतपासणी, क्ष-किरण,नेत्रपटलतपासणी वगैरे मार्गाने करता येते. 

इतर विकारांपासून निदान करणेही महत्वाचे असते.कारण ज्ञानेंद्रियांचे दोष, वाचादोष, तीव्र अपस्मार, तीव्र भावनिक विकार, अर्भकीय इच्छावर्तता (इनफनटाईल ऑटिझम) आणि बाल्यावस्थेतील छिन्नमानस ह्या विकारांमुळे तात्पुरते बुध्दिमांद्य येते. निदान तसा आभास होतो. 

उपचार : ह्या विकारांवर उपचार फारच मर्यादित आहेत. त्यांतील प्रमुख असे.

 (१)औषधोपचार : बुध्दीची वाढ जलद व्हावी म्हणून ग्लुटॉमिक अँसिड, पायरीथियॉक्झिन तसेच पायरॅसिटॅम ह्या औषधांचा वापर केला जातो. पैकी पहिले निष्प्रभ व कालबाह्य ठरले आहे. दुसरी औषधे वय लहान असताना नियमित व दीर्घकाळ (अनेक वर्षे) दिल्यास (विशेषतः सौम्यमनोविकलतेच्या बाबतीत) अंशता गुणकारी ठरतात.

(२) शैक्षणिक उपचार : मध्यम व सौम्य मनोविकलतेच्या मुलांना शालेय शिक्षण जड जात असल्यामुळे खास शिक्षण दिले जाते. ह्या शिक्षणात दृक-श्वाव्य साधनांचा वापर जास्त केला जातो तसेच त्यांतील अधिक बुध्दीच्या मुलांना हस्तकलाव्यवसाय व सोपे धंदेशिक्षण दिले जाते आणि पुस्तकी ज्ञान मर्यादित ठेवले जाते.

(३)खास संस्था व रूग्णालये : अशी मुले मनोरूग्णालयांत ठेवणए त्यांच्या आणि पालकांच्याही हिताचे होत नाही. म्हणून त्यांच्या संगोपनाच्या विशेष गरजा पुरविणार्या खास रूग्णालयांतच त्यांची जोपासना करणे योग्य होते.

(४)संगोपन : अशा रूग्णांचे सर्वात उत्तम संगोपन घरात व कुटूंबात राहूनच होऊ शकते व त्यासाठी पालकांना नियमित आणि विशेष मार्गदर्शन केले जाते.

(५)पुनर्वसन : शिक्षण वा प्रशिक्षण घेण्याची क्षमता असलेल्या रूग्णांच्या उपजीविकेसाठी तसेच समाजात स्थान मिळविण्यासाठी सुरक्षित यंत्रशाळा (शेल्टर्ड वर्कशॉप) आणि सुरक्षित सेवायोजना ह्या विशेष सोयी विकसित राष्ट्रांत उपलब्ध आहेत. 

पहा : मानसिक आरोग्य.

संदर्भ : 1. Dutton, G.Mental Handicap, London, 1975.

            2. Heaton Ward W.A. Mental Subnormality Bristol ,1975.

            3. Kaplan, H.I.Sadock, B.J.Modern Synopsis of Comprehensive Text-book of Psychilatry ,III Baltimore, 1981.

            4. Kirman, B.H. The Mentully Handicapped Child, London, 1972.

 शिरवैकर, र.वै.