बेस्ट, चार्ल्‌स हर्बर्ट : (२७ जानेवारी १८९९-३१ मार्च १९७८). कॅनेडियन शरीरक्रियावैज्ञानिक व वैद्यकीय संशोधक. ⇨इन्शुलीन  या महत्वाच्या हॉर्मोनाच्या [ → हॉर्मोने ], शोधामध्ये त्यांनी  ⇨ सर फ्रेडरिक ग्रांट बॅंटिंग यांच्याबरोबर सहकार्य केले आणि त्याबद्‌दल बॅंटिंग यांनी त्यांना १९२३ मध्ये मिळालेल्या नोबेल पारितोषिकाची अर्धी रक्कम बेस्ट यांना दिली.

बेस्ट यांचा जन्म वेस्ट पेम्ब्रोक (मेन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने) येथे झाला. १९१६ मध्ये त्यांनी टोरॉंटो विद्यापीठात शिक्षणास प्रारंभ केला पण शिक्षण मध्येच थांबनत्रवून ते पहिल्या महायुद्धात कॅनेडियन लष्करात भरती झाले व रणगाडा पथकात चालकाचे काम करून नंतर सार्जंट हुद्‌दा मिळविला. युद्धसमाप्तीनंतर लष्करी सेवेमुळे त्यांना कॅनेडियन नागरिकत्व मिळाले. त्यांनी टोरॉंटो विद्यापीठाच्या बी. ए. (१९२१) व एम. ए. (१९२२) या पदव्या मिळविल्या. नंतर वैद्यकीय शिक्षण घेऊन त्यांनी एम.डी. पदवी १९२५ मध्ये मिळविली. १९२८ मध्ये ते इंग्लंडला गेले व तेथे लंडन विद्यापीठात डी. एस्‌सी. पदवी मिळवली. १९२२-२५ या काळात ते कॉनॉट लॅबोरेटरीजच्या इन्शुलीन विभागाचे प्रमुख होते आणि नंतर त्यांनी या प्रयोगशाळेत साहाय्यक संचालक (१९२५-३१), सहसंचालक (१९३१-४१) व सन्माननीय सल्लागार (१९४१ पासून) म्हणून काम केले. टोरॉंटो विद्यापीठात १९२३ मध्ये `बॅंटिंग व बेस्ट वैद्यकीय संशोधन विभाग’ स्थापन ढाल्यावर बेस्ट यांनी तेथे १९२३-४१ या काळात सहसंशोधक म्हणून व बॅंटिंग यांच्या मृत्यूनंतर १९४१-६७ मध्ये संचालक म्हणून काम केले. बेस्ट टोरॉंटो विद्यापीठात १९२६-२८ मध्ये शरीरक्रियावैज्ञानिक आरोग्याचे साहाय्यक प्राध्यापक आणि १९२९-६४ या काहीत शरीरक्रियाविज्ञान विभागात १९२१ साली बॅंटिंग अग्निपिंडाच्या कार्यावर संशोधन करीत होतके. त्यांना रासायनिक प्रक्रियासंबंधी मदत करण्याकरिता विभाग प्रमंख  जॉन जेम्स रिकार्ड मॅकलाउड यांनी नुकत्याच पदवीधर झालेल्या चार्लस्‌ बेस्ट यांना पाठविले.

सर फ्रेडरिक ग्रांट वँटिंग (डावीकडील) व चार्लस हर्बट बेस्ट प्रयोगशाळेस काम करीत असताना.

बॅंटिंग व बेस्ट यांनी कुष्यांवर प्रयोग केले. काही कुष्यांमधील अग्निपिंड काढून त्यांच्या रक्त व मुत्राची तपासणी केली, तसेच एकूण शरीरक्रियांवरील परिणामांचाही अभ्यास केला. अग्निपिंडविरहित कुयांमध्ये कृत्रिम⇨ मध्युमेहासारखी  अवस्था त्यांना आढळली. दुसऱ्या एका कुष्यावरील अग्निपिंडवाहिनी काही दिवस बंधनाने बांधून ठेवली. त्यामुळे त्या अग्निपिंडाचा अपकर्ष झाला. हा अपकर्षित अग्निपिंड त्यांनी शस्त्रक्रियेने काढून घेतला व त्याचे द्रुतशीतील खलामध्ये बारीक बारीक तुकडे केले. हे तुकडे गोठवलेल्या मिठाच्या पाण्यात ठेवले. नंतर हा सर्व गोळा १०० मिली. मिठाच्या पाण्यात मिसळला. त्यातून ५ मिली. द्रावण घेऊन ते कृत्रिम मधुमेह उत्पन्न केलेल्या कुष्यास नीलेतुन अंतःक्षेपनाने (इंजेक्शनाने) दिले व तयाचे रक्त दर अर्ध्या तासाने तपासावयास घेतले. तेव्हा त्यांना त्याच्या रक्तातील शर्कराप्रमाण ०.२०० टक्के वरून ०.११ टक्के वर आल्याचे आढळले.

अग्निपिंडातील लांगरहान्स (पाउल लांगरहान्स या जर्मन विकृतिवैज्ञानिकांच्या नावाने ओळखण्यात येणारी) द्वीपके नावाच्या कोशिकासमूहापासून (पेशींच्या समूहापासून) मिळणारा विशिष्ठ पदार्थ वरील परिणामास कारणीभूत असतो व अग्निपिंडवाहिनी बंद करून इतर ऊतक (समान रचना व कार्य असलेले कोशिकांचे समूह) अपकर्षित झाले, तरी या द्वीपकातील ऊतकावर परिणाम होत नाही, असे त्यांना आढळले. यानंतर ऍसिटीन व अल्कोहॉल वापरून त्यांनी अग्निपिंडाचा अर्क मिळविला. त्यातील क्रियाशील पदार्थ क्लारोफार्म किंवा ईथर यात नाश पावत नसल्याचेही त्यांना आढळले.

  या अर्काचा पहिला मानवावरील प्रयोगात्मक चिकित्सात्मक उपयोग ११ जानेवारी १९२२ रोजी टोरॉंटो जनरल रूग्णालयातील मधुमेहाच्या रूग्णावर करण्यात आला. त्याचे रक्तशर्कराप्रमाण ताबडतोब घटल्याचे आढळले परंतु अंतःक्षेपणाच्या जागी गळवे झाल्याचे आढळले.

बॅंटिंग व वेस्ट यांच्या येथपर्यंतच्या संशोधनातील प्रगतीने मॅकलाउड प्रभावित झाले व स्वतःचे संशोधनकार्य बाजूस सारून आपले एक सहकारी जीवरसायनशास्त्रज्ञ जें. बी. कॉलिप यांच्यासहित अग्निपिंडाच्या कार्यांसंबंधीच्या संशोधनात सहभागी झाले. बॅंटिंग, वेस्ट च इतर सहकाऱ्यांनी लांगरहान्स द्वीपकल्पांतील या क्रियाशील पदार्थाला `आयलेटीन’ असे नाव दिले होते परंतु मॅकलाउड यांच्या आग्रहावरून या पदार्थाला `इन्शुलीन’ म्हणावयास सुरूवात केली व हे नाव आजही रूढ आहे. १९२२ मध्ये वेस्ट यांना मोठ्या प्रमाणात व अधिक शुद्ध स्वरूपात इन्शुलीन मिळविण्यात यश आले.

बॅंटिंग व मॅकलाउड यांना इन्शुलिनच्या शोधाबद्‌दल १९२३ चे वैद्यक किंवा शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. बॅंटिंगप्रमाणेच मफकलाउड यांनीही आपल्या पारितोषिकाची अर्धी रक्कम कॉलिप यांना दिली.

इन्शुलिनाशिवाय त्यांनी हिस्टामिनेज या ⇨ हिस्टामीन  या संयुगाच्या अपघटनास (रेणूचे तुकडे होण्याच्या क्रियेस) कारणीभूत असणाऱ्या एंझाइमावर (जीवरासायनिक विक्रिया घडून येण्यास मदत करणाऱ्या प्रथिनावर) संशोधन केले. वाहिनी क्लथन प्रतिबंधक (रक्तवाहिनीत रक्त साखळून होणारी गुठळी रोहिणीत वा नीलेत अकस्मात अडकून रक्तप्रवाह बंद पडण्यास प्रतिबंध करणाऱ्या) म्हणून हेपारीन या रक्तक्लथनरोधक (रक्त साखळण्यास रोध करणाऱ्या) औषधाचा उपयोग त्यांनी प्रथम केला.

अग्निपिंडविरहित कुष्यामध्ये इन्शुलीन देऊनही त्याचे यकृत वसासंचयामुळे (स्निग्ध पदार्थाच्या संचयामुळे) वृद्धिगत होते, असे त्यांना आढळले. या वसासंचयजन्य विकृतीला कोलीन नावाचे नैसर्गिक अमाइन [ ब गटातील एक जीवनसत्व कोलीन] प्रतिरोध करते असा त्यांनी शोध लावला. कोलीनन्यूवता, वसासंचय आणि यकृतसूत्रण (यकृतातील कोशिकांचा नाश करणारा व संयोजी म्हणजे जोडणाऱ्या ऊतकाचे प्रमाण वाढविणारा विकार) यांचा जवळचा संबंध असल्याचे दिसून आले.

वेस्अ यांना १८ विद्यापीठांनी सन्माननीय पदव्या दिल्या. यांशिवाय अनेक पदके व पारितोषिके त्यांना मिळाली होती. लंडनची रॉयल सोसायटी, कॅनडाची रॉयल सोसायटी व रॉयल कॉलेज ऑफ फिजिशिअन्स ऍन्ड सर्जन्स आणि अमेरिकेची नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थांचे ते सदस्य होते. वैद्यकीय नियतकालिकांतुन त्यांचे अनेक निबंध प्रसिद्ध झाले. बॅंटिंग यांच्यासमवेत त्यांनी इंटर्नल सिक्रिशन्स ऑफ द पॅक्रिआज (१९२२) हा ग्रंथ लिहिला. नॉर्मन बह. टेलर यांच्याबरोबर त्यांनी शरीरक्रियाविज्ञानावर द फिजीऑलॉजिकल बेसिस ऑफ मेडिकल प्रॅक्टिस (९वी आवृत्ती १९७३ जे. आर्‌. ब्रोबे्रेक यांनी सुधारलेली ), द ह्युमन बॉडी (४थी आवृत्ती १९६३) आणि द लिव्हिंग बॉडी (४थी आवृत्ती १९५८) ही तीन पाठ्यपुस्तके लिहिली. त्यांचे काही निवडक निबंध टोरॉंटो विद्यापीठाने १९६३ मध्ये प्रसिद्ध केले. ते टोरॉंटो येथे मृत्यू पावले.

भालेराव, य. ष्यं.