साळमासा : या माशाचा समावेश टेट्राओडोंटिफॉर्मिस किंवा प्लॅक्टोग्नॅथी गणातील डायोडोंटिडी कुलात होतो. त्यास पॉर्क्युपाइन फिश असेही म्हणतात. त्याच्या डायोडॉन हिस्ट्रिक्स व डा. होलोकँथस या दोन जाती प्रामुख्याने आढळतात. त्याचा प्रसार अटलांटिक व पॅसिफिक महासागरांतील उष्ण भागात झालेला आहे. कधीकधी तो अमेरिकेतील क्वीन्सलँडमध्ये तर उन्हाळ्यात उत्तरेकडे आढळतो.

साळमासा : ( अ ) अस्थिकंटक मिटलेल्या स्थितीत, ( आ ) शरीर फुगवून अस्थिकंटक विस्फारलेले असतानासाळमाशाचे शरीर गोल व आखूड असते. शरीराची लांबी सर्वसाधारणपणे १८ सेंमी. असून ती ५४ सेंमी. पर्यंत वाढते. त्याचा रंग वरच्या बाजूस तपकिरी व खालच्या बाजूस मळकट पांढरा असून त्यावर तपकिरी पट्टे व ठिपके असतात. शरीरावरील कातडी हालणारी असून तीवर दोन प्रकारचे अस्थिकंटक ( हाडाचे काटे ) असतात. काहींना दोन मुळे असून ते हालणारे व इतरांना तीन मुळे असून ते न हालणारे असतात. या काट्यांमुळे त्याचे शत्रूपासून संरक्षण होते. त्यांना पुच्छपक्ष (शेपटीचे पर ), पार्श्वपक्ष ( बाजूचे पर ) व अधरपक्ष ( खालचे पर ) असतात. जबड्यामध्ये दात एकत्र झाल्याने तोंड चोचीसारखे दिसते. चोचीमध्ये सेवनी ( शिवण ) नसते. प्रच्छद ( माशांच्या क्लोम-दरणांची बाह्य छिद्रे झाकणारे अस्थिमय अथवा पातळ कलेचे झाकण ) व उपप्रच्छद कांडीसारखे असून प्रच्छद उपप्रच्छदाच्या अग्रभागाशी जोडलेले असते. क्लोम ( कल्ले ) तीन असतात. सर्व पूर्वपुच्छ कशेरुकांना ( मणक्यांना ) द्विभाजित कटक प्रवर्ध असतात. कशेरुक २१-२२ असतात. याचे भक्ष्य मुख्यत: लहान कवचधारी प्राणी, सागरी शैवले व पोवळे असते. साळमाशाच्या शरीरातील पिशव्यांत हवा भरुन मासा गोल बनतो व समुद्रपृष्ठावर फुग्यासारखा तरंगतो. जपानमध्ये त्याची कातडी दीप आच्छादनासाठी वापरली जाते.

साळमाशाचे मांस विषारी असते. त्यावर प्रकिया न करता खाल्ल्यास त्यातील विषाचा तंत्रिका तंत्रावर (मज्जासंस्थेवर ) परिणाम होतो.

पहा : मत्स्य वर्ग.

भोईटे, प्र. बा.