जेलीफिश : सीलेंटेरेटा संघाच्या सिफोझोआ वर्गातील हे प्राणी छत्रीच्या आकाराचे, पारभासी (कमी अधिक प्रमाणात पारदर्शक) व श्लेषी (रंग, वास, चव नसलेल्या दाट डिंकासारखे, जिलेटिनसारखे) असतात. ते समुद्रात राहणारे व मुक्तप्लावी (मोकळे पोहोणारे) आहेत. याच संघाच्या ⇨हायड्रोझोआ  वर्गातील कित्येक प्राण्यांची लैंगिक अवस्था जेलीफिशांसारखीच असते, पण तिला ‘मेड्युसा’ म्हणतात.

सामान्य जेलीफिश (ऑरेलिया ऑरिटा) : पार्श्व दृश्य, छत्राचा एक चतुर्थांश भाग कापून टाकला आहे. (१) जठर, (२) जठरकोष्ठ, (३) जठरतंतू, (४) जनन ग्रंथी, (५) अंतरा अरीय नाल, (६) वर्तुल नाल, (७) संस्पर्शक नाल, (८) अधोजनन गर्त, (९) मुख, (१०) मुखबाहू, (११) प्रांत-पल्लव, (१२) संस्पर्शक, (१३) जनन ग्रंथी.

जेलीफिशाच्या छत्राचा व्यास ३ सेंमी. पासून ३ मी. पर्यंत असतो. शरीर बशीच्या, वाडग्याच्या किंवा घंटेच्या आकाराचे असते. त्याला ‘घंटा’ म्हणतात. शरीराची वरची बाजू उत्तल (बहिर्गोल) व खालची अवतल (अंतर्गोल) असते. घंटेच्या काठावर अगदी जवळजवळ संस्पर्शक (स्पर्शज्ञान व इतर कामी उपयोगी पडणारी लांब, सडपातळ व लवचिक इंद्रिये) असतात. काठावर सारख्या अंतराने आठ खाचा असतात. प्रत्येकीत दोन पल्लवांच्या (पदरांच्या) मध्ये ज्ञानेंद्रिय असते. ज्ञानेंद्रियांत दृक्-बिंदू (प्रकाशाला संवेदनशील असलेल्या रंगद्रव्याचा लहानसर पुंज), संतुलनपुटी (शरीराचा तोल सांभाळणारी ज्ञानेंद्रिये) व दोन संवेदनशील, रसायनग्राही (रसायनामुळे उद्दीपित होणारे) गर्त (खळगे) असतात. काठावर वर्तुळ स्नायुतंतू आणि तंत्रिका-जाल (मज्जांचे जाळे) असते. अवतल मुखपृष्ठाच्या मध्यभागी, चार मुखबाहूंच्या मध्ये, आखूड हस्तकाच्या (लोंबणाऱ्या मुखाच्या भागाच्या) टोकावर तोंड असते. प्रत्येक मुखबाहूच्या लांबीभर एक खाच असून तिच्या कडांवर ⇨दंशकोशिका  असतात. हस्तकामध्ये असलेल्या ग्रसिकेमधून मुख पचन गुहेत (पचनाचे कार्य होणाऱ्या पोकळीत) उघडते हिच्यापासून चार जठरकोष्ठ निघतात व त्यांत दंशकोशिकायुक्त  जठरतंतू असतात. घंटेच्या काठावर एक वलयाकृती नाल (वर्तुल नाल) असतो, त्यात कोष्ठांपासून निघालेले अरीय नाल उघडतात. प्रत्येक जठरकोष्ठाच्या तळावर घोड्याच्या नालाच्या आकृतीची एक जनन ग्रंथी असते.

यांचे थवे किंवा एकटेदुकटे प्राणी समुद्रावर तरंगत असतात. घंटेच्या लयबद्ध आकुंचन-प्रसरणाने ते हळहळू पोहू शकतात परंतु मुख्यतः समुद्रातील प्रवाह आणि लाटा यांच्याबरोबरच ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. लहान अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेले) प्राणी हे यांचे भक्ष्य होय. मुखबाहूंवरील दंशकोशिकांनी प्राणी अर्धमेले करून त्यांना पकडून ते तोंडात खुपसतात. जठरतंतूंवरील दंशकोशिकांमुळे प्राणी पूर्णपणे मरतात. पचन गुहेत अन्नाचे पचन होते. पचलेले अन्न अरीय आणि वर्तुळ नालात जाते व तेथे ते शोषले जाते. न पचलेले अन्न मुखावाटे बाहेर पडते. श्वसनाचे व उत्सर्जनाचे (शरीरातील निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकण्याचे) काम शरीराचे पृष्ठ करते.

नर आणि मादी सारखेच दिसतात. नराचे शुक्राणू (पुं-प्रजोत्पादक पेशी) मुखावाटे बाहेर पडून मादीच्या पचन गुहेत शिरतात आणि अंडाणूंचे (स्त्री-प्रजोत्पादक पेशींचे) निषेचन (फलन) करतात. निषेचित अंडी मुखबाहूंना चिकटतात, तेथेच त्यांचा विकास सुरू होऊन पक्ष्माभिकामय (हालचालीस उपयुक्त असे तंतूंसारखे अवयव असलेला) प्लॅन्यूला डिंभ (भ्रूणानंतरची व स्वतंत्रपणे जागणारी परंतु प्रौढाशी साम्य नसलेली प्राण्याची पूर्वावस्था) तयार होतो. मादीच्या शरीरापासून अलग होऊन तो एखाद्या आधाराला चिकटतो, पक्ष्माभिका नाहीशा होतात व पॉलिपसारखा (प्राणि-निवहातील म्हणजे वसाहतीतील एका व्यक्तीसारखा) सिफिस्टोमा डिंभ तयार होतो. याला मुख व संस्पर्शक असतात. याच्यापासून मुकुलनाने हायड्रासारखा पॉलिप उत्पन्न होऊ शकतो. हिवाळ्यात सिफिस्टोमाच्या शरीराचे आडवे तुकडे पडू लागतात, यामुळे ते एकावर एक बश्या ठेवल्याप्रमाणे दिसते. हे भाग नंतर वेगवेगळे होतात, प्रत्येक भागाला एफिरा डिंभ म्हणतात व त्याचे जेलीफिशामध्ये रुपांतर होते.

पहा : सिफोझोआ सीलेंटेरेटा.

जोशी, मीनाक्षी