शेळी : (बकरी). शास्त्रीय दृष्ट्या स्तनी (सस्तन) प्राण्यांपैकी समखुरी गणाच्या(पायांवरील खुरांची संख्या सम असते अशा पाण्यांच्या आर्टिओडॅक्टिला गणाच्या) बोव्हिडी कुलातील पोकळ शिंगांच्या व रवंथ करणाऱ्या प्राण्यांपैकी शेळी हा एक प्राणी आहे. माणसाळलेल्या शेळीची (कॅप्रा हिरकस हिरकस) उत्पत्ती कशी झाली याचा फारसा इतिहास उपलब्ध नसला, तरी माणसाळलेल्या शेळ्यांचे पूर्वज कॅप्रा प्रजातीतील (मेंढीच्या प्रजातीशी वा वंशाशी बरीच मिळतीजुळती प्रजाती) तीन मुख्य रानटी जाती असाव्यात, असे मानतात. आशिया मायनर (तुर्कस्तान), पर्शिया (इराण) व अरेबिया (सौदी अरेबिया) मधील कॅप्रा हिरकस ओगॅगस, हिमालयाच्या भागातील कॅप्रा फाल्कोनेरी व भूमध्य समुद्राच्या भोवतालच्या भागांतील कॅप्रा प्रिस्का या त्या जाती होत. यूरोप, गीस व कीट बेट येथील बहुसंख्य शेळ्या कॅप्रा ओगॅगस या जातीपासून, तर काश्मीरी व चेघू या कॅप्रा फाल्कोनेरी जातीपासून आणि अंगोरा या वरील दोन्हींच्या संकराने आलेल्या आहेत. शेळीचा अगदी पुरातन नामनिर्देश पर्शियामधील आहे. पुरातत्त्वविद्येतील उत्खननात मिळालेल्या पुराव्यांवरून शेळी सु. ९००० वर्षांपूर्वी बहुधा नैऋर्त्य आशियामध्ये माणसाळली गेली असावी व तेथूनच तिचा प्रसार इतरत्र झाला [→ प्राणि माणसाळविणे]. शेळ्यांच्या काही रानटी जाती अद्याप अस्तित्वात आहेत. रानटी जातीच्या शेळ्यांची शिंगे लांब असून त्यांचा आकार तलवारीसारखा असतो. पासंग (कॅप्रा हिरकस ओगॅगस) ही रानटी शेळ्यांची जात आशिया मायनरच्या ४,००० मी. उंचीवरील डोंगराळ भागात आढळते. ⇨ आय-बेक्स (कॅप्रा आयबेक्स) ही आल्प्स पर्वताच्या भागामध्ये तर तुर (कॅप्रा कॉकेसिका) ही कॉकेशस पर्वताच्या भागामध्ये आढळते. या रानटी जातीच्या नरांच्या शिंगांवर गाठी असलेले कंगोरे दिसतात, तर मारखोर (कॅप्रा फाल्कोनेरी) ह्या हिमालयाच्या भागात आढळणाऱ्या रानटी जातीच्या नरांची शिंगे वलयाकृती आहेत. माणसाळलेल्या पण पुन्हा रानटी बनलेल्या काही शेळ्या उत्तर अमेरिकेत व मध्यपूर्वेकडे आढळतात.

भावप्रकाश या वेदकालीन वैदयकीय गंथामध्ये शेळी सर्व तऱ्हेचा झाडपाला खात असल्यामुळे तिचे दूध रोगनाशक, विशेषत: क्षयरोगावर गुणकारी, आहे असा उल्लेख आहे. जैमिनी सूत्रा त यज्ञामध्ये बळी देण्याविषयी विशिष्ट पशूचा उल्लेख नसल्यास बोकड (अजापुत्र) हा प्राणी  बळी देण्याचा आहे असे मानावे असे लिहिले आहे. शेळीच्या दुधापासून लोणी काढीत असत असा उल्लेख कौटिलीय अर्थशास्त्रा त आहे. शेळी हे अग्निदेवतेचे वाहन आहे.

उष्ण किंवा थंड हवामान शेळ्यांना सारखेच मानवत असले तरी कोरड्या हवामानात त्या चांगल्या वाढतात. जगातील एकूण शेळ्यांपैकी ६७ टक्के शेळ्या दक्षिण व उत्तर ३० अक्षांशांदरम्यानच्या प्रदेशात आढळतात. ओसाड रानातील खुरट्या झाडाझुडपांच्या पानांवर त्यांची उपजीविका चालते. मात्र त्यांच्या या सवयीने जमीन ओसाड बनते, असा समज आफिका व आशियात झालेला आहे. खरे तर हा दोष त्यांच्या पाळण्याच्या पद्धतीचा आहे. पाकिस्तानात तर शेळ्या पाळण्यावर काही कायदेशीर  बंधने घातली आहेत. केंबिजच्या रॉबिन डनवार यांच्या मते अन्नपाण्याची टंचाई असणाऱ्या प्रदेशात जगण्याची व प्रजोत्पादनाची क्षमता या दोन गुणांमुळेच शेळ्यांना अशी बरीवाईट कीर्ती लाभली आहे. थोडीफार झाडे-झुडपे उगवणाऱ्या जमिनीचे शेळ्या वाळवंट करतात या आरोपात थोडेफार तथ्य जरूर आहे, पण वाळवंटासारख्या प्रदेशांत शेळीइतके उपयुक्त दुसरे कोणतेही जनावर तग धरू शकणार नाही. अशा प्रदेशांत त्या चांगल्या तऱ्हेने गुजराण करू शकत असल्यामुळे त्यांचे नाव वाळवंटाशी निगडित झाले आहे.

जागतिक अन्न व शेती संघटनेच्या आकडेवारीनुसार १९७७ च्या सुमारास भारतात सर्वाधिक शेळ्या होत्या. मात्र १९८२ साली जगात  ४७ कोटी २७ लाख शेळ्या होत्या. त्या मुख्यतः आफ्रिका, इराण, भूमध्य समुद्रालगतचे प्रदेश व भारतीय उपखंडातील प्रदेश येथे होत्या. त्या वर्षी शेळ्यांची संख्या जास्त असणारे देश व तेथील शेळ्यांची संख्या अशी होती : चीन ७ कोटी ८४ लाख, भारत ७ कोटी २० लाख, तुर्कस्तान १ कोटी ८९ लाख, नायजेरिया १ कोटी ५६ लाख, इराण १ कोटी ३८ लाख वगैरे. २००३ सालच्या आकडेवारीनुसार भारतात १२ कोटी ४३ लाख शेळ्या होत्या.

दरवर्षी ४२ टक्के शेळ्यांची कत्तल होऊनही १९५१७७ दरम्यान दरवर्षी शेळ्यांची संख्या १० लाखांनी वाढत गेलेली दिसते. उलट मेंढ्यांची संख्या तीच राहिली. प्रजोत्पादनाचा जास्त वेग (जुळी व तिळी होण्याचे जास्त प्रमाण), उत्तम रोगप्रतिकारक्षमता आणि शेळीचे मांस व दूध यांना सतत असलेली मागणी या कारणांनी त्यांची संख्या वाढत गेली. सरासरीने शेळीचे करडू देण्याचे प्रमाण १५० टक्के (मेंढीचे ७५ टक्के) असते. तसेच शेळी दूध देण्याच्या १५० ते २०० दिवसांत (दुग्धकालात) रोज अर्धा ते एक लिटर दूध देते, तर मेंढीचा दूध देण्याचा काळ १०० ते १५० दिवसांचा असून ती दररोज जास्तीत जास्त अर्धा लिटरच दूध देते. मेंढ्या व अन्य मोठया जनावरांपेक्षा शेळ्या जीवाणू व कृमी यांना अगदी कमी बळी पडतात. पर्जन्यमान व चाऱ्याची विपुलता या भौगोलिक कारणांनी शेळ्यांची संख्या झपाटयाने वाढते उदा., भारताचा ईशान्य प्रदेश.

शेळ्यांची पैदास घरगुती वापराचे दूध, तसेच मांस, केस (उदा., पश्म) व प्रजोत्पत्ती यांसाठी केली जाते. उदा., लडाख व लेह येथील झंस्कर, रूपशू व चॅनथाँग आणि हिमाचल प्रदेशातील लाहोल व स्पिती या निर्जन व निर्जल खोऱ्यांमध्ये पश्म देणाऱ्या सु. १ ५ लाख पश्मिना शेळ्या  पाळलेल्या आढळतात. हरयाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग, तसेच गुजरात, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर यांचा काही भाग या सिंधु  गंगा खोऱ्याच्या पट्यात जमनापारी, बीटल, बारबारी, अलवरी व सिरोही या दुधाळ शेळ्या आढळतात. दक्षिण भारतात मांस व दूध  (उदा., केरळातील मलबारी) यांसाठी शेळ्या पाळतात. बिहार, ओरिसा, बंगाल, आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, नागालँड व सिक्कीम येथे जास्त करडे देणाऱ्या शेळ्या मांसोत्पादनासाठी पाळतात. पैकी आसाम हिल बीड (गोट) व ब्लॅक बेंगॉल नावाच्या शेळ्या लहान चणीच्या असून बहुधा त्यांना वर्षातून दोन वेळा जुळे वा तिळे होते.

चीन, यूरोपातील देश व उ. अमेरिका येथे शेळ्या मुख्यतः दुग्धोत्पादनासाठी पाळतात. अमेरिकेत दुग्धशाळेत ४०० पर्यंत शेळ्या असतात. मात्र सर्वसाधारणपणे त्या दुधाची कौटुंबिक गरज भागविण्यासाठीच पाळण्याची प्रथा जगभर आढळते. दुग्धोत्पादनाच्या बाबतीत गायीपेक्षा शेळी कमी प्रतीची असली तरी शारीरिक आकारमानाचा विचार करता दुधाळ शेळ्या गायीपेक्षा किती तरी अधिक दूध देतात. समशीतोष्ण कटिबंधातील शेळ्या पचण्याजोग्या दर १०० किग्रॅ. अन्नापासून १८५ किग्रॅ. दूध तयार करू शकतात तर गायी एवढ्या अन्नापासून १६२ किग्रॅ. दूध तयार करतात. शिवाय ओसाड निर्जल प्रदेशांत त्या गायीपेक्षा सरस आहेत. मात्र वर्षभर सतत दुग्धोत्पादन करण्याच्या दृष्टीने शेळी कमी प्रतीची आहे. १९८२ साली शेळ्यांच्या दुधाचे जागतिक उत्पादन ७६,९५,००० मेट्रिक टन तर भारतातील उत्पादन ९,५०,००० मेट्रिक टन झाले होते. मध्य व्हेनेझुएला, ईशान्य कोलंबिया, अरब देश व भारतीय उपखंड येथे शेळ्या दूध व  मांस यांसाठी पाळल्या जातात. भारतात बंगाल,उत्तर प्रदेश, केरळ, तमिळनाडू  , मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र इ. राज्यांत शेळ्या अधिक प्रमाणात पाळल्या जातात.


शारीरिक माहिती व सवयी : शेळीला जात्याच डोंगराळ प्रदेश आवडतात. उंच अवघड जागी उगवलेली लहान झाडेझुडपे खाण्याची त्यांची सवय असते. शेळ्यांच्या चमचासारख्या आकाराच्या खुरांचे तळ खोलगट व त्यांच्या कडा धारधार असल्याने त्यांना जमिनीवर चांगली पकड मिळते. यामुळे डोंगरकड्याच्या टोकांवर पाय रोवून त्या सहजपणे फिरू शकतात. वरच्या ओठाची स्वैर हालचाल, पकड घेणारी जीभ व पायांची चपखल चपळाई यांमुळे त्यांच्या अंगी आखूड गवत खुडून खाण्याची क्षमता असते. तसेच इतर जनावरे खाणार नाहीत अशा झाडाझुडपांचा पाला खाऊन शेळ्या चांगल्या जगू शकतात.

शेळीच्या वरच्या जबड्यात गायीप्रमाणे कुरतडणारे (कृंतक) दात व सुळे नसतात. शेळीचे दंत्यसूत्र २ (कृंतक दात ०/३, सुळे ०/१, उपदाढा ३/३, दाढा ३/३) असे असते. तिला एकूण ३२ दात असतात. शेळीच्या दुधातील वसेचे (चरबीचे) गोलक लहान व तरल रचनेचे आणि पायसाच्या (एकमेकांत न मिसळणाऱ्या दोन द्रवांच्या मिश्रणाच्या) रूपात असतात. त्यामुळे शेळीचे दूध पचनास हलके असते. पचनकियेत दुधाचे क्लथन  (रासायनिक कियेने द्रवाचे गुठळ्यांसारख्या घन पदार्थात रूपांतर)  झाल्यावर गायीच्या दुधापेक्षा शेळीच्या दुधातील गुठळ्या कमी कठीण व लवकर मोडणाऱ्या असल्याने प्रथिनांचे विघटन (मोठे रेणू असलेल्या पदार्थाचे लहान रेणू असलेल्या अनेक पदार्थांमध्ये रूपांतर होण्याची क्रिया) करणाऱ्या पाचक रसातील ⇨ एंझाइमांचा परिणाम पूर्णपणे व लवकर होऊ शकतो. त्यामुळे पचन चांगले होते. हिप्पॉक्राटीझ (इ. स. पू. ४५०) या ग्रीक वैदयांनी माणसाच्या कित्येक आजारांत शेळीच्या दुधाचा उपयोग सांगितला होता. शेळीच्या दुधापासून बनविलेले चीजही पचायला हलके असते. यूरोपमध्ये अनेक देशांत लहान मुलांना शेळीचे दूध आईच्या दुधाऐवजी देतात. म्हणून तेथे शेळीला  ‘ वेटनर्स ’ म्हणतात. शेळीच्या दुधात गायीच्या दुधापेक्षा लवणे आणि जीवनसत्त्व-ब यांचे प्रमाण अधिक असते.

शेळीच्या दुधाला एक प्रकारचा उग दर्प येतो. मात्र दूध देणाऱ्या शेळ्या बोकडांपासून ४०५० मी. दूर ठेवल्यास असा वास येत नाही. तसेच बोकडाच्या शिंगांच्या मागील बाजूस असलेल्या स्रवणाऱ्या गंथींना डाग दिल्यास बोकडाचा उग दर्प मारता येतो.

वर्गीकरण : ढोबळपणे शेळ्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांनुसार त्यांचे वर्गीकरण करतात. यानुसार दुग्धोत्पादक व मऊ लोकरीसारख्या केसांचे उत्पादन करणाऱ्या असे त्यांचे दोन मुख्य वर्ग करतात. मांस व कातड्याचा विचार करता वरील दोन वर्गांत विशेष फरक आढळत नाही. स्विस, न्यूबियन व अंगोरा असेही शेळ्यांचे वर्गीकरण करतात. स्विस वर्गातील शेळ्यांचे कान टोकदार व उभे असतात. टोगेनबर्ग व सानेन या सदर वर्गातील प्रसिद्घ जाती होत. फान्स, जर्मनी, नॉर्वे, स्वीडन, स्वित्झर्लंड इ. यूरोपीय देशांतील शेळ्यांच्या अनेक जातींची उत्पत्ती या वर्गातील शेळ्यांपासून झाली आहे. आफिकेतील, विशेषत: ईजिप्तमधील, शेळ्या न्यूबियन वर्गात मोडतात. या वर्गांतील शेळ्या सामान्यपणे मोठया  चणीच्या, आखूड केसांच्या असून त्यांचे कान लोंबते असतात. त्यांच्या नाकाचे हाड गरूडासारखे उठावदार (रोमन नोज) असते व त्या एकरंगी किंवा ठिपके असलेल्या असतात. भारतातील शेळ्यांच्या बऱ्याच जाती या वर्गात मोडतात. या वर्गातील जमनापारी बोकड १८९६ मध्ये इंग्लंडमध्ये आयात केला गेला. तसेच इतर न्यूबियन जातींच्या शेळ्यांची आयातही इंग्लंडमध्ये १८५० पासून होत होती. यांच्या संकरातून याच वर्गातील अँग्लो-न्यूबियन ही जात उत्पन्न झाली. अंगोरा वर्गातील शेळ्यांचे केस मऊ असल्याने त्या मेंढरासारख्या दिसतात. मात्र त्यांचे डोके अरूंद असते, नराला हनुवटीस दाढी असते, बुंधे जवळजवळ असणारी शिंगे एकदम वर आणि मागे वळलेली व वळी असलेली असतात त्यांच्या शेपट्या वर वळलेल्या असतात.

मध्य आशियातील डोंगराळ प्रदेशांत शेळ्यांची वाढ झाली आणि तेथून त्यांचा सर्वत्र प्रसार झाला. ज्या डोंगराळ भागात त्यांची वस्ती होत गेली तेथील एकूण पर्यावरणाचे परिणाम होऊन त्यांचे आकारमान, रंग इत्यादींमध्ये फरक पडत जाऊन त्यांच्या निरनिराळ्या जाती निर्माण झाल्या. मॅसन यांनी अशा १४० पेक्षा अधिक जातींची नोंद केली आहे. यांपैकी ५५% जाती उष्णकटिबंधामधील प्रदेशांत आढळतात. या सर्व जातीस्विस,न्यूबियन व अंगोराया वर्गांतील शेळ्यांच्या उपजाती आहेत.

भारतीय जाती : भारतातील बहुसंख्य शेळ्या संमिश्र जातींच्या आहेत. तथापि सर्वसाधारणपणे भारतात सुस्पष्ट अशा १३ प्रादेशिक जाती अस्तित्वात आहेत. हिमालयाच्या आसपासचा डोंगराळ भाग, भारताचा उत्तरेकडील भाग, मध्य भाग, दक्षिणेकडील भाग व पूर्वेकडील भाग असे पाच विभाग त्यांच्या वर्णनासाठी कल्पिले आहेत.

हिमालयाच्या आसपासच्या भागात जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तर प्रदेशाचा काही भाग येतो. लोकरीसारख्या मऊ केसांसाठी येथील शेळ्या प्रसिद्घ असून त्यांचे केस बहुतांशी पांढऱ्या रंगाचे असतात. चंबा, गद्दी व काश्मीरी या स्थानिक नावांनी त्या ओळखल्या जातात आणि त्या हिमाचल प्रदेशातील कांगा, कुलू खोरे, चंबा, सिरमूर व सिमला आणि जम्मू काश्मीरच्या डोंगराळ भागांमध्ये आढळतात. काश्मीरी जातीच्या काही शेळ्या पश्म देणाऱ्या (पश्मिना) आहेत व त्या चणीने लहान, पांढऱ्या रंगाच्या आहेत. पश्म म्हणजे या शेळ्यांच्या अंगालगतची मऊ  लव असून या शेळ्या पश्मिना म्हणूनच जगप्रसिद्घ आहेत. या हिमालयातील ३ किमी. उंचीवरील प्रदेशांत, तिबेटच्या पठारावरील भागात तसेच  गिलगिट, लडाख व लाहोल आणि स्पिती खोऱ्यांमध्ये मोठया संख्येने आढळतात. श्रीनगर येथील पश्मापासून हातांनी विणलेल्या शाली प्रसिद्घ झाल्यामुळे या अतितलम धाग्याला इंग्रजीमध्ये काश्मेरे म्हणून संबोधतात. तिबेटमधील निर्वासित भारतामध्ये येण्यापूर्वी लडाखमध्ये या जातीच्या ५०,००० शेळ्या होत्या व त्यानंतर त्यांची संख्या १ लाख ८० हजारांवर गेली आहे. लडाखमधील चॅनथाँग भागामध्ये ३.६ ते ४.२ किमी. उंचीवरील प्रदेशांत या शेळ्यांचे कळप आढळतात. एका शेळीपासून २०० ते ३०० गॅम पश्म दर वर्षी मिळू शकते. केसांमध्ये ही अतितलम लव मिसळलेली असते व ती कष्टाने वेचून वेगळी करावी लागते. चेगू नावाची आणखी एक पश्म देणाऱ्या शेळ्यांची जात याकसर, स्पिती व काश्मीर या भागांतील हिमालयाच्या उंच पर्वतांच्या रांगांमध्ये आढळते.

भारताच्या वायव्य भागातील कोरडे हवामान असलेल्या प्रदेशामध्ये (पंजाब, हरयाणा व उत्तर प्रदेशाचा काही भाग या ठिकाणी) जमनापारी, बीटल व बारबारी या महत्त्वाच्या जाती आहेत. उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील भागात आणि यमुना व चंबळ या नदयांदरम्यानच्या भागात आढळणारी जमनापारी जात दुग्धोत्पादनासाठी प्रसिद्घ असली, तरी मांसोत्पादनातही सरस आहे. या जातीच्या शेळ्या थोराड, उंच (नर सरासरीने १२७ सेंमी. व मादी १०२ सेंमी.), लांबसडक पाय, बहिर्वक चेहरा, गरूडनाक, सुरळीसारखे लोंबते कान असे त्यांचे थोडक्यात वर्णन आहे. सामान्यपणे त्यांचा रंग पांढरा असून चेहरा व मान यांवरचा रंग तपकिरी असतो. कधीकधी यांच्या अंगावर तांबूस किंवा काळ्या रंगाचे मोठे डाग असतात पुठ्ठ्यावर व फऱ्यांवर लांब व दाट चमकदार केस असतात. एका दुग्धकालात (२५० दिवस) त्या ३.५% वसा असलेले ३६०४५० लि. दूध देतात. बोकड व शेळी यांचे वजन अनुकमे ६५ ते ८६ किग्रॅ. व ४५ ते ६१ किग्रॅ. असते. ब्रिटिश गोट सोसायटीच्या वार्षिकाप्रमाणे (१९४०) सेडगेमेर चॅन्सेलर व बुचेस्ट कॉस या आयात केलेल्या दोन जमनापारी (१८९६ व १९०४) बोकडांचा अँग्लो-न्यूबियन जात निर्माण करण्यात बराच सहभाग होता.


जमनापारीसारख्या दिसणाऱ्या परंतु चणीने लहान असलेल्या बीटल जातीच्या शेळ्या पंजाबमध्ये आढळतात. नरांना बहुधा दाढी असते. या जातीच्या शेळ्यांच्या पांढऱ्या रंगावर तांबड्या किंवा तांबूस रंगाचे मोठे ठिपके असतात. सरासरीने त्या रोज १.८ लि. दूध देतात. एका दुग्धकालात (१८० दिवस) या जातीच्या शेळीने जास्तीत जास्त ५९० लि. दूध दिल्याची नोंद आहे. शेळीचे सरासरी वजन ४५ ते ५० किग्रॅ. व बोकडाचे ५६ ते ८० किग्रॅ. असते.

बारबारी ही  पूर्व  आफिकेतील  सोमाली  प्रजासत्ताक  राज्यामधील बरबोआ येथील मूळची जात आहे. या शेळ्या चणीने लहान असून त्यांच्या अंगावरील केस आखूड असतात. उभी शिंगे व सामान्यत: पांढऱ्या, पांढऱ्या रंगावर तांबडे किंवा तांबूस रंगाचे ठिपके असलेल्या या शेळ्या दिहल्ली, आग्रा, अलिगढ, मथुरा व हरयाणा राज्यातील गुरगाव, कर्नाल व पानिपत या भागांमध्ये सर्रास आढळतात. यांच्या दुधामध्ये  ५ टक्क्यांपर्यंत वसा असू शकते व त्या रोज १ ते १ ५ लि. दूध देतात. शेळीचे सरासरी वजन २५ ते ३० किग्रॅ. व बोकडाचे ३५ ते ४५ किग्रॅ. असते. या शेळ्यांना चरण्याला न सोडता दावणीला बांधून ठेवले तरी चालते, यामुळे शहरी वस्तीमध्ये त्या पाळता येण्यायोग्य असतात.

मध्य भारतामध्ये राजस्थान, गुजरात व मध्य प्रदेशाच्या काही भागांत आढळणाऱ्या मारवाडी, मेहसाण व झेलवाडी या शेळ्या जमनापारी व स्थानिक डोंगराळ भागातील शेळ्या यांच्या संकराने तयार झालेल्या  जाती आहेत. या चणीने लहान असून विविध रंगी असतात व रोज त्या पाऊण ते एक लिटर दूध देतात. जोधपूर येथे स्थापन झालेल्या सेंट्रल एरीडझोन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या प्राणी अध्ययन विभागाने वाळवंटी प्रदेशा-तील शेळ्यांचा सखोल अभ्यास हाती घेतला आहे. दुष्काळी परिस्थितीला समर्थपणे तोंड देण्याची क्षमता इतर कुठल्याही जनावरांपेक्षा शेळीत सरस असल्याचे दिसून आले आहे आणि म्हणूनच १९५० नंतरच्या २५ वर्षांत राजस्थानात शेळ्यांच्या संख्येमध्ये १६० टक्क्यांनी वाढ झालेली आहे. नागूर जिल्ह्याच्या परबटसर तालुक्याच्या आसपासच्या ५० किमी.च्या परिसरात असलेल्या शेळ्या दुधाच्या बाबतीत मारवाडी या माहीत असलेल्या जातीपेक्षा सरस असल्याचे आढळून आले आहे. या जातीला परबटसर असेच नाव देण्यात आले आहे. या भागातील शेळ्यांना आठवडयातून दोनदा पिण्याचे पाणी मिळाले तरी त्यांच्या वजनामध्ये घट होत नाही तसेच त्यांची प्रजननक्षमताही नेहमीप्रमाणे राहते. बेरारी व काठियावाडी या आणखी दोन जातींच्या शेळ्या या भागात आढळतात. महाराष्ट्राच्या नागपूर व वर्धा जिल्ह्यांमध्ये बेरारी शेळ्या आढळतात. या उंच असून रंगाने काळ्या आहेत व त्या रोज अर्धा लिटर दूध देतात. काठियावाडी शेळ्याही काळ्या रंगाच्या असून त्या कच्छ, गुजरातचा उत्तरेकडील भाग व राजस्थानमध्ये आढळतात. या शेळ्या रोज १ ते १.२५ लि. दूध देतात.

दक्षिण भारतामध्ये मध्य व दक्षिण महाराष्ट्र, गुजरातचा काही भाग, आंध प्रदेश, तमिळनाडू व केरळ या भागांत सुरती, दख्खनी, उस्मानाबादी व मलबारी या शेळ्यांच्या जाती आढळून येतात. अरबस्तानातील लहान चणीच्या दुधाळ शेळ्यांपासून सुरती शेळ्यांची उत्पत्ती झाली  असावी. मुंबईच्या आसपासच्या भागात, नासिक व सुरत या भागांमध्ये आढळणाऱ्या या शेळ्या बेरारी शेळ्यांसारख्या दिसतात. त्यांचे पाय आखूड व पांढरे असतात. या शेळ्या दुग्धोत्पादन करणाऱ्या असून त्या रोज २.२५ लि. दूध देतात. मलबारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व केरळ राज्याच्या उत्तरेकडील भागात आढळणाऱ्या शेळ्या सुरती  शेळ्यांपासून उत्पन्न झाल्या असाव्यात. त्यांचा ठराविक असा रंग असत नाही व दिवसाला त्या १ ते २.८ लि. दूध देतात. दख्खनी व उस्मानाबादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेळ्या सपाटीवर आढळणाऱ्या अनेक जातींच्या संकराने उत्पन्न झाल्या असाव्यात. पांढऱ्या काळ्या, पांढऱ्या तांबड्या अशा रंगांच्या या शेळ्या चांगल्या दूध देणाऱ्या असून  त्या दिवसाला २.२५ लि. दूध देतात.

भारताच्या पूर्व भागामध्ये (यात बंगाल, आसाम, त्रिपुरा, ओरिसा व बिहार राज्याचा काही भाग यांचा समावेश आहे) बंगाली शेळी म्हणून ओळखली जाणारी एकच जात प्रामुख्याने आढळते. या शेळ्या काळ्या, पांढऱ्या व तपकिरी रंगांच्या असून मुख्यत्वे मांसोत्पादन व कातडी यांसाठी पाळल्या जातात. यांची कातडी ‘ बेंगॉल गोटस्किन ’ म्हणून प्रसिद्घ आहे व त्यांना पादत्राणे बनविण्यासाठी परदेशातूनही मागणी आहे. नरांचे वजन १४ ते १६ किग्रॅ. तर माद्यांचे ९ ते १४ किग्रॅ. असते. काळ्या रंगाच्या बंगाली शेळ्यांमध्ये (ब्लॅक बेंगॉल) जुळी व तिळी जन्मण्याचे प्रमाण बरेच आहे. आसामच्या डोंगराळ भागातील शेळ्यांचे कांग्रा व कुलू खोऱ्यांतील शेळ्यांशी साम्य आहे, तरी आसाम हिल ब्रीड (गोट) ही स्वतंत्र जात आहे असे मानतात.

विदेशी जाती :  अंगोरा : तुर्कस्तानातील आशिया भागातील  अंगोरा प्रांत हा अंगोरा जातीच्या शेळ्यांचा मूळ प्रदेश मानतात व तेथे या शेळ्या हजारो वर्षांपासून पाळल्या जातात. भारताच्या उत्तरेकडील शिवालिक टेकडयंत आढळलेल्या अतिनूतन (रिसेंट) कालातील या शेळ्यांच्या जीवाश्मांवरून (शिलाभूत अवशेषांवरून) त्यांचे मूलस्थान हिमालयातील प्रदेश असावा व काश्मीरी शेळ्या यांचे पूर्वज असावेत, असे मानण्यास जागा आहे. यांच्या अंगावरील मऊ, चमकदार, लांब धाग्याच्या लोकरीसारख्या केसांना मोहेअर म्हणतात आणि या धाग्या-साठीच त्या जगप्रसिद्घ आहेत. बव्हंशी या शेळ्या पांढऱ्या रंगाच्या असतात. अंगोरा शेळ्या चणीने लहान असून त्यांचे पाय बरेच आखूड असतात. चपटे टोकदार व लोंबते कान, करड्या रंगाची शिंगे (नरामध्ये ती पिळदार, मागे व बाहेर वळलेली असतात), लहान व उभी शेपटी आणि बऱ्याच प्रमाणात मेंढीसारखी दिसणारी ही शेळी आहे. अंगावरील मोहेअर पांढरे, चमकदार, कुरळे असून ते लांब सैलसर व लडीसारखे लोंबते असतात. प्रत्येक शेळीपासून वर्षाला १ ६ ते ३ १ किग्रॅ. मोहेअर मिळतात. मोहेअर बहुधा वर्षातून दोनदा कातरतात. कातरण सहा  महिन्यांनी केल्यास त्यांची लांबी १० ते १५ सेंमी. व वर्षाने केल्यास २० ते ३० सेंमी. असते. मोहेअरच्या उत्पादनासाठी अमेरिकेतील टेक्सस व न्यू मेक्सिको येथे शेळ्यांची आयात १८४९ मध्ये करण्यात आली, तर १८३६ मध्ये त्या दक्षिण आफिकेमध्ये आणल्या गेल्या. मोहेअरचे जागतिकवार्षिकउत्पादन२.२५ कोटी किग्रॅ.च्या आसपास आहे आणि त्यातील ४० टक्के अमेरिका व तुर्कस्तानमध्ये होते. उरलेल्यापैकी बरेचसे दक्षिण आफिकेमध्ये होते. अद्यापि उत्कृष्ट दर्जाचे मोहेअर तुर्कस्तानातील अंकारा, बेपझरी, इस्किशहिर आदी शहरांच्या आसपासच्या भागात होते. मोहेअर धागा चांगल्या तऱ्हेने रंग घेतो, विटत नाही. त्यामुळे इतरधाग्यां- बरोबर त्याचा वापर करून कापड दिखाऊपणात सुबक करता येते.विशेषत: स्त्रियांच्या वापरात येणारे जाळीदार, झालरीवजा पिळदार विणीच्या लोकरी कापडामध्ये मोहेअरचा वापर करतात.


न्यूबियन : ही जात मूळची आफिकेतील विशेषत: ईजिप्तमधील असून या शेळ्या अंगाने थोराड आहेत (नराचे वजन ६५ ते ८० किग्रॅ. व मादीचे ५० ते ६० किग्रॅ. असते). इतर विदेशी जातींपेक्षा या शेळ्यांचा चेहरा निराळा आहे. गरूडासारखे नाक, लोंबते सुरळीसारखे कान व अंगावरील आखूड केस असे त्यांचे वर्णन आहे. इंग्लंडमध्ये १८५० पासून या शेळ्यांची आयात करण्यात आली व त्यांचा स्थानिक शेळ्यांशी तसेच भारतातून १८९६ मध्ये आयात केलेल्या जमनापारी जातीच्या शेळ्यांशी संकर करून अँग्लो-न्यूबियन ही निराळी जात निर्माण करण्यात आली. या जातीतील नर व माद्या दोहोंनाही शिंगे असतात. या शेळ्या दररोज ६.५ लि.पर्यंत दूध देतात व दुधातील वसेचे प्रमाण ४ ते ५ टक्के असते. अमेरिकेमध्ये १९१० मध्ये अँग्लो-न्यूबियन शेळ्यांची आयात केली गेली व त्यांना नुसते न्यूबियन म्हणण्यात येऊ लागले. इंग्लंड व अमेरिकेमध्ये दुग्धोत्पादनाच्या बाबतीत या जातीच्या शेळ्यांनी उच्चंक प्रस्थापित केले आहेत (३६५ दिवसांत १,९२५ किग्रॅ. व ३०५ दिवसांत१,९२५ किग्रॅ.).शेळीचे वजन ४० किग्रॅ.व बोकडाचे ६० किग्रॅ. असते.

सानेन : ही मूळची स्वित्झर्लंडमधील जात असून अमेरिका व इंग्लंडमध्ये दुग्धोत्पादनासाठी ह्या शेळ्यांचा प्रसार बराच झाला आहे. शिंगे नसलेली, बारीक लांब मान, उभे टोकदार कान, आखूड पण मऊ केस असे त्यांचे वर्णन आहे. या आकारमानाने लहान असून त्यांचा रंग फिकट पिवळा बिस्किटासारखा असतो. त्या दररोज २ ते ५ लि.पर्यंत सतत ८ ते १० महिने दूध देतात. दुधातील वसेचे प्रमाण ३ ते ४ टक्के असते. एका दुग्धकालात या जातीच्या शेळीने अमेरिकेमध्ये (३०५ दिवसांत) २,२२० किग्रॅ., तर बिटनमध्ये (३६५ दिवसांत) २,९०० किग्रॅ. दूध दिल्याची नोंद आहे. शेळीचे सरासरी वजन ५० ते ६० किग्रॅ. व बोकडाचे ६५ ते ८० किग्रॅ. असते.

टोगेनबर्ग : ही मूळची स्वित्झर्लंडमधील टोगेनबर्ग खोऱ्यातील जात दुग्धोत्पादनाबद्दल जगप्रसिद्घ आहे. या जातीच्या शेळ्यांना शिंगे नसतात. त्या लहान चणीच्या, बारीक व लांब मान, उभे किंवा पुढे झुकलेले कान, आखूड केस क्वचित पाठीवर व पुठ्ठ्यांवर लांबट केसांचे झुबके असे  यांचे वर्णन आहे. यांचा रंग मळकट असून डोळ्यांपासून तोंडापर्यंत, कानांची टोके, तसेच गुडघ्यापासून व ढोपरापासून खाली पायापर्यंत आणि शेपटीच्या बुंध्याभोवती पांढरा रंग असतो. सरासरीने या दररोज ५ ते ६ लि. दूध देतात. शेळीचे सरासरी वजन ४५ किग्रॅ. आणि बोकडाचे ६० किग्रॅ. असते.

संगोपन व संवर्धन : शेळ्या मुख्यत्वे दूध व मांस यांच्या उत्पादनासाठी पाळल्या जातात. अलीकडे मोहेअर व पश्म यांच्यासाठीही त्या पाळल्या जातात. इंग्लंड, अमेरिका, यूरोपातील बहुतेक देश व चीन या देशांमध्ये त्या मुख्यत्वे दुग्धोत्पादनासाठी पाळण्यात येतात. भारतामध्ये दूध व मांस यांसाठी त्या पाळल्या जातात. गायीम्हशींप्रमाणे त्यांचे दुग्धोत्पादन मोठया प्रमाणावर होत नसले, तरी कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी ते पुरेसे असते. एका वेळी एक कोकरू जन्मणे हा मेंढीच्या बाबतीत सर्वसामान्य नियम, तर एकाहून अधिक करडांना जन्म देणे हे शेळीचे वैशिष्ट्य आहे. गायीगुरे खात नसलेली कुठल्याही तऱ्हेची झाडेझुडपे, कोवळी पाने, तृण, बाभळीसारख्या काटेरी झुडपांचा पाला, फळांची टरफले, कोवळ्या फांद्या व इतर झाडपाला खाऊन त्यांचे दूध व मांस यांसारख्या पाणिज प्रथिनांमध्ये त्या रूपांतर करतात. सामान्यपणे शेवरी, धावडा, ऐन, बाभूळ, बोर, वड, पिंपळ, अंजन, चंदन वगैरे झाडांचा पाला शेळ्यांना घालतात. त्यामुळे ओसाड निर्जल प्रदेशात त्या आपली उपजीविका चांगल्या तऱ्हेने करू शकतात. स्वभावत: शेळ्यांना ५०-६० सेंमी. उंच उगवणारे गवत आवडत नाही. त्यामुळे अशा गवतांच्या कुरणामध्ये चरणे त्यांना पसंत नसते. चरण्यापेक्षा खुडून खाणे त्या अधिक पसंत करतात. पुढच्या दोन पायांमध्ये झुडपाची फांदी पकडून कोवळी पाने, कोंब खात त्या दूरवर प्रवास करतात. गायीगुरांपेक्षा त्यांना पाणी कमी लागते. याशिवाय वाळवंटी प्रदेशातील शेळ्यांमध्ये  जरूर पडल्यास त्यांच्या मूत्रातील पाणी अंशतः पुन्हा शोषून घेण्याची त्यांची कार्यक्षमता असते.

गाय आणि मेंढी यांच्या तुलनेने शेळी चांगलीच खादाड आहे. ती आपल्या वजनाच्या ६.५ ते ११ टक्के शुष्क खाद्य खाऊ शकते, तर गाय व मेंढी २.५ ते ३ टक्केच खाऊ शकते. वजनाच्या तुलनेत ४५ किग्रॅ. वजनाची शेळी गायीच्या जवळजवळ दीडपट खाद्य खाऊ शकते. खास दुग्धोत्पादनासाठी व प्रजननासाठी पाळलेल्या शेळ्यांना खुराक देण्याची जरूरी आहे. खुराकाचा विचार केल्यास ६३ किग्रॅ. खुराक खाद्यामागे त्या गायीपेक्षा १० लि. अधिक दुधामध्ये रूपांतर करतात.

भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये शेळ्यांना खुराक क्वचित देतात. नुसत्या झाडपाल्यावरच त्यांची उपजीविका होते. शेळ्यांची खुराक मिश्रणे निरनिराळ्या उपलब्ध भरडलेल्या धान्यांची बनवितात. भरडलेला मका ७५ किग्रॅ., ज्वारी ७५ किग्रॅ., गव्हाचा कोंडा २५ किग्रॅ., भुईमुगाची पेंड २५ किग्रॅ., हाडाची भुकटी १.५ किग्रॅ., मीठ २ किग्रॅ., चुनखडी १ किग्रॅ. या प्रमाणात मिसळून खुराक मिश्रण बनवितात. मिश्रणामध्ये प्रथिनांचे प्रमाण १२ ते १५ टक्के असणे आवश्यक आहे. वरील मिश्रणात ते १४ टक्केआहे. सर्वसाधारणपणे शेळीचा रोजचा आहार लसूणघास अगर बरसीम (गवत) १.५ किग्रॅ., कंदमुळे (गाजर वगैरे) १ किग्रॅ. व वरील मिश्रण ०.५ किग्रॅ. असतो. दूध देणाऱ्या शेळ्यांना खुराक मिश्रण ०.५ किग्रॅ. आणि ओला चारा ५ किग्रॅ. देतात व प्रत्येक ३ लि. दुग्धोत्पादनाला आणखी अर्धा किलोगॅम खुराक देतात. वळू बोकडाला रोज १.८ किग्रॅ. मिश्रण देतात.

करडू जन्मल्यावर एक-दोन तासांत त्याला चीक देतात. त्याला ५६ ते ११२ गॅ. चीक दिवसातून चार ते पाच वेळा पहिले तीन दिवस देतात. त्यानंतर त्याला सकाळ-संध्याकाळ २०० मिलि. दूध देण्यास सुरूवात करतात. ते दोन आठवडयांचे झाल्यावर त्याला थोडा थोडा (५० गॅ.पासून सुरू करून) खुराक, कोवळा पाला, रसाळ गवत देणे सुरू करतात. करडांना देण्याच्या खुराकामध्ये अ, ड ही जीवनसत्त्वे, तसेच प्रतिजैव औषधे काही प्रमाणात घालतात. हळूहळू दुधाचे प्रमाण कमी करतात व ती चार महिन्यांची झाल्यावर त्यांना तोडतात म्हणजे आईच्या अंगावरचे पिणे बंद करतात.


मोठ्या प्रमाणावर बांधलेल्या प्रशस्त गोठयांची शेळ्यांना गरज नसते. ऊन, पाऊस व वारा यांपासून संरक्षण मिळेल व खेळती हवा असलेले  साधे स्वच्छ कोरडे गोठे त्यांना चालतात. भारतामध्ये ग्रामीण भागात शेळ्यांना सामान्यत: वृक्षांच्या छायेत अगर राहत्या घराच्या एका बाजूला पाखेवजा गोठा हीच राहण्याची व्यवस्था असते. चिबड, दलदलीची जमीन शेळ्यांना आवडत नाही व जास्त आर्द्रता असल्यास त्यांची वाढ चांगली होत नाही. सर्वसाधारणपणे घराच्या एका बाजूच्या भिंतीला लागून १.५ मी. रूंद व ३ मी. लांबीचे कौलारू अगर गवताचे छप्पर असलेल्या गोठयात ४ शेळ्या राहू शकतात. भिंतीकडील छपराची उंची २.३ मी. व दुसऱ्या बाजूची १.७ मी. ठेवल्यास योग्य उतार मिळू शकतो. तथापि कोनी लोखंड, ॲस्बेस्टस पत्र्याचे छप्पर, बाजूंना लोखंडी जाळी व मुरूमाची जमीन असलेले गोठे बांधणे त्यांच्यापासून वाढीव उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने हितावह आहे. वळू बोकडासाठी २.५ मी.  २ मी. आकारमानाची जागा लागते. ठाणबंद शेळ्यांना प्रत्येकी २ चौ. मी. जागा लागते. अमेरिकेत दुग्धशाळेमध्ये १.१ मी.  १.३ मी. आकारमानाचे गाळे बांधून एका गाळ्यात दोन शेळ्या बांधतात. याप्रमाणे एका छपराखाली ५० गाळे असतात.

प्रजनन : सर्वसाधारणपणे शेळ्या विशिष्ट ऋतूमध्ये माजावर येत असल्या, तरी त्यात बराच अनियमितपणा दिसून येतो. काही जातींत तर  त्यांचे प्रजनन वर्षातील कोणत्याही ऋतूमध्ये होऊ शकते. समशीतोष्ण कटिबंधामध्ये विशिष्ट ऋतूत त्या माजावर येण्याचे प्रमाण अधिक असते, तर उष्ण कटिबंधातील शेळ्या वर्षातील कोणत्याही ऋतूत माजावर येतात. बोकड १० महिन्यांचा झाल्यावर तर शेळी ६ महिन्यांनंतर प्रजननक्षम होते. तरीसुद्धा बोकड २ वर्षांचा व शेळी १२ ते २० महिन्यांची झाल्याशिवाय प्रजननासाठी वापरत नाहीत. शेळीचे ऋतुचक तीन आठवडयंचे आहे व ऋतुकाल १८ ते २४ तास टिकतो. गर्भावधी १४५ ते १५६ दिवसांचा आहे. सामान्यत: शेळी १४ महिन्यांतून दोन वेळा विते. प्रत्येक वेळी ती बहुधा दोन करडांना जन्म देते. पहिलारू बहुधा एकाच करडास जन्म देते व दुसऱ्या वेतापासून ती दोन करडांना जन्म देते. एका कळपाच्या अभ्यासात असे दिसून आले की, ३५ टक्के शेळ्यांना एक करडू झाले ५४.४ टक्के शेळ्यांना जुळी, ६.३ टक्के शेळ्यांना तिळी तर ०.४ टक्के  शेळ्यांना चार करडे झाली. एका बोकडाचा एका वर्षामध्ये ८० ते १०० शेळ्यांशी संयोग करतात व तो १२ वर्षांचा होईपर्यंत संयोगासाठी वापरतात. शेळी व्याल्यानंतर १.५ ते २ महिन्यांनी पुन्हा माजावर येते. तथापि दुग्धोत्पादन करणाऱ्या शेळ्यांच्या दुग्धोत्पादनात फारसा खंड पडू नये यासाठी व्याल्यानंतर ७ ते ८ महिन्यांनी तिचा नराशी संयोग करतात. शेळीचे आयुर्मान ८ ते १२ वर्षे आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये (रशिया, फान्स, इंग्लंड) शेळ्यांच्या प्रजननासाठी कृत्रिम वीर्यसेचन [→ वीर्यसेचन,  कृत्रिर्में पद्धतीचा सर्रास अवलंब केला जातो. भारतामध्ये १९७५ नंतर शेळ्यांच्या बाबतीत ही पद्घत मर्यादित प्रमाणात वापरात असून तिचा हळूहळू प्रसार होत आहे. अलीकडे सुरू केलेल्या काही प्रकल्पांमध्ये  उदा., दुग्धोत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने सानेन/अल्पाइन या विदेशी जातीतील बोकडांचे रेत शीतशुष्क अवस्थेत आयात करून ते कृत्रिम वीर्यसेचन पद्धतीने वापरण्यात येते. इंग्लंड व अमेरिकेसारख्या देशांमध्ये दुग्धोत्पादनासाठी शेळ्यांचे प्रजनन करताना उभयलिंगता ही समस्या आढळल्याचे दिसून आले. तसेच मधूनमधून शिंगे असलेल्या मातापितरांना उत्परिवर्तनाने शिंगे नसलेली प्रजा झाल्याचे आढळले. लुधियाना (पंजाब) येथील भारतीय दुग्धोत्पादक शेळी संघ या संस्थेने दुग्धोत्पादक शेळ्या व बोकड यांच्या बाबतीत वंशावळी तयार केल्या आहेत.

भारतीय कृषि अनुसंधान परिषदेमार्फत भारतामधील विविध केंद्रांमध्ये संकर प्रजननाव्दारे दूध, मांस, पश्म व मोहेअर या शेळीपासून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ करण्याच्या व त्यांची प्रत वाढविण्याच्या दृष्टीने काही प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. भारतामध्ये अस्तित्वात असलेल्या काही विशिष्ट अभिजातींचे विशुद्घ स्वरूपात प्रजनन करणे तसेच अंगोरा, अल्पाइन, टोगेनबर्ग, सानेन, प्रेडॉनस्काय व गोरोटिस्काय या विदेशी जातींचे नर उपयोगात आणून संकर प्रजननाने उत्पादनात वाढ करणे, ही प्रकल्पांची उद्दिष्टे आहेत.

दुग्धोत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, कर्नाल (हरयाणा) व केरळ ॲगिकल्चरल युनिव्हर्सिटी, त्रिचूर  (केरळ) पश्मिना व मोहेअर उत्पादनांसाठी महात्मा फुले कृषि विदया-पीठ, राहुरी (महाराष्ट्र), इंडियन व्हेटेरिनरी रिसर्च इन्स्टिट्यूट, मुक्तेश्वर  (उत्तर प्रदेश) व ॲनिमल हजबंडरी डिपार्टमेंट, उपशी, लेह (लडाख) आणि मांसोत्पादनासाठी राजेंद्र ॲगिकल्चरल युनिव्हर्सिटी, छोटा नागपूर (बिहार),  सेंट्रल  शीप  अँड  वुल  रिसर्च  इन्स्टिट्यूट,  अविकनगर  (राजस्थान) व आसाम ॲगिकल्चरल युनिव्हर्सिटी, खानपारा (आसाम) येथे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत.

अलीकडे मथुरा येथे शेळ्यांच्या विविध समस्यांवर अभ्यास करण्यासाठी सेंट्रल गोट रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये नारायणगाव येथे इझ्राएलमधून सानेन जातीच्या शेळ्यांची आयात करून दुग्धोत्पादनात वाढ करण्याचे प्रयत्न खासगी क्षेत्रामध्ये चालू असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

भटक्या जमातीचे लोक शेळ्या-मेंढ्यांचे कळप वर्षातील ठराविक काळात हिवाळी प्रदेशातून उन्हाळ्यात खूप गवत असणाऱ्या कुरणाच्या भागात नेतात. असे शेळीसंवर्धन पुरातन काळापासून प्रचलित आहे. भारताच्या ईशान्य भागात विपुल वनराईमुळे शेळ्यांचे संवर्धन करणे  सोयीस्कर झाले आहे. तेथे आसाम हिल गोट व ब्लॅक बेंगॉल या शेळ्यांच्या बहुप्रसव जाती पाळल्या जातात. उसाभोवतीच्या शेवरीच्या पाल्यावर साखर कारखान्यांच्या प्रदेशांत शेळ्यांचे संवर्धन करणे सोयीस्कर ठरू शकते. येथे शेळ्यांना जुळी कोकरे होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे. भारतात पुष्कळ शेतकऱ्यांकडे दूध देणाऱ्या २-३ शेळ्या घरगुती वापरासाठी पाळण्याची प्रथा रूढ झालेली दिसते.


शेळ्यांचे रोग : इतर पाळीव जनावरांच्या मानाने शेळ्या काटक असतात व त्यांना फारसे आजार होत नाहीत. सूक्ष्मजंतू व व्हायरस यांपासून होणारे काही सांसर्गिक रोग शेळ्यांना होतात व या रोगांच्या साथीमुळे पुष्कळदा हानी होते. काही महत्त्वाच्या रोगांची माहिती पुढे दिली आहे. शेळ्यांना क्षय होत नाही असा सर्वसामान्य समज आहे, पण तो खरा नाही. मात्र त्या बऱ्याच प्रमाणात क्षयप्रतिरोधी आहेत.

मायकोप्लाझ्मा जातीच्या सूक्ष्मजंतूमुळे शेळ्यांना काही साथीचे रोग होतात. मायकोप्लाझ्मा मायकॉइड व्हार कॅप्री या सूक्ष्मजंतूंमुळे सांसर्गिक परिफुप्फुसशोथ (फुप्फुसावरील द्रवयुक्त आवरणाला सूज) व फुप्फुसशोथ (फुप्फुसाची सूज) आणि मायकोप्लाझ्मा ॲगॅलॅक्शिया यांमुळे सांसर्गिक दुग्धन्यूनता हे रोग होतात.

सांसर्गिक परिफुप्फुसशोथ व फुप्फुसशोथात शिंका, ताप, खोकला, कष्टमय श्वासोच्छ्वास व विस्तृत प्रमाणात फुप्फुस व परिफुप्फुस यांना सूज येऊन शेळी एका आठवडयाच्या आत मृत्यू पावते. उत्तर आफिका, स्पेन, भूमध्य समुद्राच्या आसपासचे देश व भारत येथे हा रोग आढळला आहे. प्रतिबंधक उपाय योजण्यासाठी भारतामध्ये दोन प्रकारच्या पुढील लशी उपलब्ध आहेत. एक क्षीणन केलेल्या रोगकारक सूक्ष्मजंतूंपासून तर दुसरी फॉर्मॅलिन वापरून तीव प्रकारच्या सूक्ष्मजंतूंना मारून तयार केलेली. पहिली लस कळपात साथ सुरू होण्यापूर्वी निरोगी शेळ्यांना टोचतात, तर दुसरी लस साथ सुरू झाल्यावर कळपातील निरोगी शेळ्यांना टोचतात. टोचलेल्या शेळ्यांमध्ये उत्पन्न होणारी रोगप्रतिकारक शक्ती १८ महिने टिकते. ऑक्सिटेट्रासायक्लीन व टायलोसिन या औषधांच्या वापराने आजारी शेळ्या बऱ्या होतात.

सांसर्गिक दुग्धन्यूनता या रोगात (काँटेजियस ॲगॅलॅक्शिया ) तीव स्तनशोथ (स्तनांची सूज), डोळे येणे व सांध्यांना सूज येणे ही प्रमुख लक्षणे दिसतात. गाभण शेळ्या गाभडतात. करडांमध्ये साथ आल्यास ३० टक्के करडे मरण पावतात. आजारी शेळीच्या रक्ताची प्रसमूहन परीक्षा  (रक्त व रोगकारक सूक्ष्मजंतू एकत्रित केल्यास रक्तातील प्रतिपिंडामुळे सूक्ष्मजंतूंच्या गुठळ्या बनण्याची प्रक्रिया) करून रोगनिदान करता येते. यासाठी रोगप्रतिबंधक लस उपलब्ध आहे.

ब्रूसेला मेलिटेन्सिस या सूक्ष्मजंतूमुळे ब्रूसिलोसिस हा संसर्गजन्य रोग होतो. बिटन, स्वीडन, नॉर्वे हे देश सोडल्यास जगातील सर्व देशांत हा रोग आढळून आला आहे. रोगाने पछाडलेल्या शेळ्यांच्या दुधामध्ये रोगजंतू असतात व असे दूध पिण्यात आल्यास मनुष्यामध्ये आजार होतो व त्याला माल्टाफीव्हर म्हणतात. गाभण शेळ्या गाभडतात हे या रोगाचे प्रमुख लक्षण आहे. रक्ताची प्रसमूहन परीक्षा केल्यास रोगनिदान होऊ शकते. या रोगावर उपाय नाही, पण रोगप्रतिबंध करण्यासाठी निरोगी शेळ्यांना टोचण्यासाठी प्रतिबंधक लस उपलब्ध आहे.

इतर बहुतेक पाळीव जनावरांप्रमाणे शेळ्यांनाही देवी येतात व देवीचे फोड बहुधा स्तनावर दिसतात. दूध पिणाऱ्या करडांना संसर्गामुळे देवी येतात व देवीचे फोड तोंडाभोवती येतात. सल्फानिलॅमाइडासारखे जंतुनाशक मलम फोडांवर लावल्यास खपली धरून फोड बरे होतात. व्हिब्रिओसिस हा व्हिब्रिओफीटस या सर्पिल आकाराच्या जंतूं मुळे शेळ्यांना होणारा गुप्तरोग असून संयोगाच्या वेळी त्याचा प्रसार होतो. स्ट्रेप्टोमायसीन हे औषध यावर गुणकारी आहे. लेप्टोस्पायरा पोमोना या सूक्ष्मजंतूमुळे शेळ्यांना लेप्टोस्पायरोसिस हा सांसर्गिक रोग होतो. पेनिसिलीन व एरिथ्रोमायसिन  ही प्रतिजैव औषधे यावर उपयुक्त आहेत.

यांशिवाय पर्णाभकृमी (पट्टकृमीचा प्रकार), गोलकृमी व फीतकृमी  (चपटे जंत) यांच्या अनेक जातींमुळे शेळ्यांमध्ये आजार उद्‌भवतात [→ पट्टकृमी ]. हे सर्व अंतर्गत जीवोपजीवी असल्यामुळे सर्वसाधारणपणे अशक्तता, रक्तक्षय, हगवण ही लक्षणे दिसतात. यकृत पर्णकृमीमुळे तीव स्वरूपाचा रक्तक्षय होतो. कार्बन टेट्राक्लोराइड हे औषध या कृमीवर उपयुक्त आहे.

कोटायलोफोरॉन जातीच्या पर्णाभकृमींच्या अपूर्ण वाढ झालेल्या अवस्थांमुळे उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांमध्ये शेळ्यांना पिट्टू किंवा गिलार नावाचा रोग होतो. पावसाळा संपल्यावर रोगोद्‌भव होतो आणि हगवण, कंबरेखालच्या भागाचा पक्षाघात, अशक्तपणा इ. लक्षणे दिसून येतात. कार्बन टेट्राक्लोराइड व हेक्झाक्लोरेथीन ही औषधे गुणकारी आहेत. तमिळनाडू , कर्नाटक, ओरिसा व पंजाब येथील शेळ्यांमध्ये पक्षाघात हा आजार बऱ्याच मोठया प्रमाणावर आढळून आला आहे. रोगाचे निश्चित कारण माहीत झालेले नाही तथापि मेंदूमध्ये वास्तव्य करणाऱ्या गोल-कृमींच्या एका प्रकारामुळे हा होत असावा असे अनुमान आहे. हा रोग संसर्गजन्य नाही. मागील पायांच्या हालचालींमध्ये समन्वय राहत नसल्यामुळे शेळीला चालता येत नाही व ती जमिनीवर आडवी होते. थायामिनाने आजार बरा होतो, अशी नोंद आहे. यांशिवाय पोटफुगी, ॲसिटोनीमिया, गर्भिणी  विषबाधा  वगैरे  नैमित्तिक  रोग  शेळ्यांना  होतात. शेळ्यांना  ⇨अस्थिभंगाचाही त्रास होऊ शकतो.

शेळ्यांना होणाऱ्या संसर्गजन्य काळपुळी, बुळकांड्या, लाळरोग, अलर्क रोग, आंदोलज्वर, धावरे, बदराणुजन्य रोग या रोगांची माहिती मराठी विश्वकोशा त त्या त्या रोगांच्या स्वतंत्र नोंदीमध्ये पहावी.

शेळीपासून मिळणारे पदार्थ : शेळीपासून दूध, मांस, केस  (मोहेअर व पश्म), कातडी, ⇨ तात व खत हे पदार्थ मिळतात. भारतामधील एकंदर संख्येच्या अंदाजे १७.५ टक्के शेळ्या दुग्धोत्पादन करीत असतात. भारत, चीन व आफिकेतील देशांमध्ये शेळ्यांचे मांस मोठया प्रमाणावर खाल्ले जाते. शेळीच्या वजनाच्या ४० ते ५० टक्के  मांस मिळते. इतर प्राण्यांच्या मांसापेक्षा शेळीच्या मांसामध्ये चरबीचे प्रमाण कमी असते. भारतामध्ये उत्पादन होणाऱ्या मांसापैकी (कोंबडयांचे मांस सोडून) ४७.६ टक्के मांस शेळ्यांचे आहे. २००४ मध्ये त्याचे ४ लाख ७५ हजार मेट्रिक टन उत्पादन झाले. शेळ्या व शेळ्यांचे मांस यांची  १९७५ नंतर आखाती देशांकडे निर्यात होऊ लागली आहे. [→ मांस उदयोग]. मोहेअरचे सर्वाधिक उत्पादन अमेरिकेमध्ये होते तर त्या खालोखाल तुर्कस्तान व दक्षिण आफिका यांचा क्रमांक आहे. पश्म केसांचे १९७५ मध्ये  भारतातील उत्पादन ४१ टन झाले [→ लोकर]. बंगाली शेळ्यांची कातडी ‘ कुस्तिया कातडी ’ म्हणून प्रसिद्घ आहे. मूर लोक फार पुरातन काळापासून शेळीच्या कातड्यावर प्रक्रिया करून ‘ मोरोक्को लेदर ’ तयार करीत आहेत [→ चर्मोद्योग]. अरब लोक शेळीपासून मिळणारे मऊ केस मेंढीच्या लोकरीमध्ये मिसळून त्यापासून तंबूचे कापड व दोर तयार करतात. भारतातील शेळ्यांपासून दर वर्षी ३४० दशलक्ष टन लेंडी खत मिळते.

पहा : आयबेक्स चमार्मोद्योग ताहर पाळीव प्राणि मांस उदयोग मेंढी लोकर.

संदर्भ : 1. Blood, D. C. Henderson, J. A. Veterinary Medicine, London, 1971.

2. Fraser, A. Stamp, J. Sheep Husbandry and Diseases, London, 1961.

3. Ghanekar, V. M. The Goat, Pune, 2002.

4. Mackenzie, David, Goat Husbandry, London, 1967.

५. पोखरकर, प्र. र. शेळीपालन, पुणे, २००२.

ढमाले, शं. पा. दीक्षित, श्री. गं.


जमनापारी शेळी सानेन बोकड  अंगोरा बोकड
जमनापारी बोकड बारबारी शेळी गद्दी बोकड
पश्चिना बोकड बीटल शेळी

उस्मानाबादी शेळी बोएर (दक्षिण आफ्रिका)
न्यूबियन (आफ्रिका) काश्मीरी (आशिया)
 अंगोरा (तुर्कस्तान) ला मंछ (मूळची स्पेनमधील अमेरिकेत विकसित)