टार्डिग्रेडा : टार्टिग्रेडा अथवा ‘पाणअस्वले’ हे सूक्ष्म प्राणी जगाच्या सर्व भागांत मुबलक आढळतात. यांच्या सु. ४०० जाती आहेत. यांच्या वर्गीकरणाबाबत एकवाक्यता नाही. सर्वसाधारणपणे त्यांचा समावेश आर्थ्रोपोडा (संधिपाद) संघातील ॲरॅक्निडा (अष्टपाद) वर्गात केला जातो पण ते संधिपाद आहेत की नाहीत, याविषयीच शंका आहे.

टार्डिग्रेड प्राणी (मॅक्रोबायोटस ह्यूफेलँडाय), अंतर्रचना : (१) मुखगुहा, (२) दात, (३) लाला ग्रंथी, (४) मलाशय, (५) साहाय्यक ग्रंथी, (६) उत्सर्जन नलिका, (७) अंडाशय, (८) जठर, (९) ग्रसनी.

टार्डिग्रेडा दमट शेवाळ किंवा वाळू आणि गोडे अथवा खारे पाणी यांत राहणारे आहेत. या प्राण्यांपैकी काही चालतात, तर काही सरपटतात पण ते पोहू शकत नाहीत. शरीर एक मिमी. पेक्षा जास्त लांब नसते. ते चार खंडांच्या सायुज्यनाने (एकत्रीकरणाने) बनलेले असून काहींत डोके स्पष्ट दिसते. शरीरावर उपत्वचेचे आवरण असते पण काही काळानंतर ते नाहीसे होऊन बाह्यत्वचाच शिल्लक राहते. काही कुलांतील प्राण्यांत रंगद्रव्येही आढळली आहेत. शरीरावर सांधे नसलेल्या आखूड व जाड पायांच्या चार जोड्या असून त्यांपैकी शेवटली जवळजवळ मागच्या टोकावर असते. प्रत्येक पायावर ४–९ टोकदार नखर असतात.

मुख पुढच्या टोकाशी असून ते पिंडिकांनी वेढलेले असते. मुखामध्ये सोंड (शुंड) असते. मुखगुहेत केराटिनाचे (शृंगी द्रव्याचे) बनलेले किंवा अंशतः कॅल्सीभूत (कॅल्शियम कार्बोनेटयुक्‍त) असलेले दोन टोकदार दात असतात. त्यांच्या साहाय्याने ते वनस्पतींना भोके पाडून सोंडेने त्यांतील रस शोषून घेतात. लाला ग्रंथी (लाळेचे पिंड) दोन असून त्यांच्या वाहिन्या मुखगुहेत उघडतात. ग्रसनी (घसा) स्नायुमय, ग्रसिका (ग्रसनी व जठर यांच्यातील अन्नमार्गाचा भाग) बारीक व जठर विस्तृत असते. गुदद्वार पायांच्या मागच्या जोडीच्या थोडे पुढे असते. आंत्राच्या (आतड्याच्या) शेवटच्या भागात दोन नलिका उघडतात त्या बहुधा उत्सर्जन नलिका (निरुपयोगी पदार्थ शरीराच्या बाहेर टाकून देणाऱ्‍या नलिका) असाव्यात, असा समज आहे. शरीरातील सगळे स्नायू अरेखित (आडव्या पट्ट्यांनी न बनलेले) व अनैच्छिक असतात. श्वसनेंद्रिये, हृदय आणि रक्तवाहिन्या नसतात. तंत्रिका तंत्राचा (मज्जासंस्थेचा) चांगला विकास झालेला असून ते मेंदू आणि अधर (खालील) तंत्रिका रज्जूचे (मज्जारज्जूचे) बनलेले असते तंत्रिका रज्जूवर चार गुच्छिका (ज्यांच्यापासून तंत्रिका तंतू निघतात अशा तंत्रिका कोशिकांचे समूह) असतात. शरीराच्या पुढच्या टोकाजवळ असलेल्या दोन दृक्-बिंदूंखेरीज (प्रकाशाला संवेदनशील असणाऱ्‍या रंगद्रव्याच्या लहान पुंजांखेरीज) इतर ज्ञानेंद्रिंये नसतात.

लिंगे भिन्न असतात. नर आणि मादी यांच्या जनन ग्रंथी कोशाकार असून त्या आंत्राच्या अंतिम भागात उघडतात. अंडी मोठी असून त्यांतून बाहेर पडणाऱ्‍या पिल्लांना कधीकधी पायांच्या फक्त तीनच जोड्या असतात. टार्डिग्रेडांच्या दोन जातींत अनिषेकजनन (नराच्या शुक्राणूचा मादीच्या अंड्याशी संयोग न होता अंड्यापासून प्रजोत्पत्ती होणे) आढळते.

उन्हाळ्यात डबक्यातील किंवा तलावातील पाणी आटल्यावर या प्राण्यांच्या शरीरातील पाणी नाहीसे होऊन ते वाळतात, पण मरत नाहीत. या शुष्कावस्थेत ते चार-पाच वर्षेदेखील राहू शकतात. पावसाळ्यात डबकी व तलाव पाण्याने भरल्यावर पाणी शोषून घेऊन हे प्राणी सक्रिय होतात.

कुलकर्णी, सतीश वि.