कोआला : स्तनि-वर्गाच्या मार्सुपिएलिया गणातील फॅलँजरिडी कुलातला प्राणी. हा फॅस्कोलॅर्‍क्टॉस वंशाचा असून त्याची फॅस्कोलॅर्‍क्टॉस सिनेरियस ही एकच जाती आहे. पूर्व ऑस्ट्रेलियातील यूकॅलिप्टसच्या अरण्यात हा राहतो.

कोआला

शीर्षासह शरीराची लांबी ६०–८५ सेंमी. असते शेपटीचा केवळ अवशेष असतो वजन ४–१५ किग्रॅ. असते शरीरावर दाट लोकरीसारख्या फरचे आच्छादन असून पाठीवर तिचा रंग करडा आणि खाली पांढरा असतो. कानांवर पांढऱ्या केसांची झालर असते.मोठे शीर्ष, मोठे केसाळ कान व मोठे नाक यांमुळे याचे एकंदर स्वरूप मोठे गंमतीदार दिसते. हा पूर्णपणे वृक्षवासी असून याचे हात व पाय झाडावर चढण्याकरिता आणि फांद्यांवर हिंडण्याकरिता अतिविशेषित झालेले असतात सर्व बोटांवर मजबूत नखर (नख्या) असतात याच्या पाच बोटांपैकी पहिली दोन बोटे बाकीच्या तीन बोटांसमोर आणता येत असल्यामुळे तो फांद्यांवर आतिशय घट्ट पकड घेऊ शकतो. याच्या सगळ्या हालचाली मंदगतीने होतात. हा मधूनमधून जमिनीवर उतरतो. याच्या अंगाला यूकॅलिप्टससारखा वास येतो. हा एक निरुपद्रवी प्राणी असून हे एकेकटे असतात किंवा यांचे लहान गट असतात.

कोआला फक्त यूकॅलिप्टसची पाने खातो, प्रौढ कोआला दररोज एक-दोन किग्रॅ. पाने खातो. याला कपोल-कोष्ठ (गालात असलेली पिशवी) असते आणि १·८-२·५ मी. लांबीचा उंडुक (बंद पिशवी सारखा भाग) असल्यामुळे पाला पचविण्यास फार मदत होते. हा प्राणी कधीही पाणी पीत नाही. कोआला या नावाचा अर्थच पाणी न पिणारा असा आहे.

प्रजोत्पादनाचा काळ सप्टेंबर-डिसेंबर हा असतो. गर्भावधी २५–३० दिवसांचा असून मादीला दर खेपेस एकच पिल्लू होते. ते सहा महिने शिशुधानीत (पिल्लू ठेवण्यासाठी मादीच्या उदरावर असलेल्या पिशवीत) असते व नंतर बाहेर पडून आईच्या पाठीला चिकटते. ते एक वर्षाचे होईपर्यंत आईबरोबरच असते. पिल्लाचे दूध तोडण्याच्या सुमारास मादी पिल्लाला महिनाभर पचन झालेल्या यूकॅलिप्टसच्या पानांचा विशिष्ट प्रकारचा रस्सा पाजते. हा रस्सा मादीच्या गुदद्वारातून पिल्लू चोखून घेते. पिल्लाला ३-४ वर्षांत प्रौढावस्था येते. कोआला सु. २० वर्षे जगतो.

निरनिराळ्या रोगांमुळे व माणसाने केलेल्या हत्येमुळे यांची संख्या अतिशय कमी झालेली आहे, परंतु यांच्या शिकारीवर कायद्याने बंदी घातली असल्यामुळे यांची संख्या हळूहळू वाढत आहे.

कुलकर्णी, स. वि.