सांडशी : अस्थिमत्स्यांच्या (अस्थींचा सांगाडा असतो अशा माशांच्या)सायप्रिनिडी कुलातील एक मासा. याचे शास्त्रीय नाव लेबिओ बोगट आहे. त्यास सांड व कोलीस अशी स्थानिक नावे आहेत. हा मासा प.बंगाल, मध्यभारत, दख्खनचे पठार, जबलपूर, कच्छ व चेन्नई या भागांतील नद्यांत आढळतो. तसेच तो तुंगभद्रा, कृष्णा, हुगळी नद्यांच्या निस्सारण क्षेत्रांत व दक्षिण काठेवाडमधील ओढ्यानाल्यांतही आढळतो.

सांडशी(लेबिओ

लेबिओ प्रजातीतील ही सर्वांत बारीक जाती असून लांबी सु. २० सेंमी.पर्यंत असते. हिच्या वरच्या बाजूचा रंग रुपेरी असून जास्त गडद असतो. पर (पक्ष) नारिंगी रंगाचे असतात. काही माशांमध्ये दोन्ही बाजूंस फिकट रेषा किंवा निळसर पट्टे आढळतात. शेपटीकडील पराच्या बुडाशी एक काळसर ठिपका आढळतो. कधीकधी पार्श्विक रेषेच्या वर व छातीच्या मागच्या भागावर असा ठिपका आढळतो.

पाठीवरील पराची (पृष्ठपक्ष)उंची शरीराएवढी असून वरची कड बहिर्गोल असते. छातीवरील पराची (अंसपक्ष) लांबी डोक्याएवढी असते परंतु तो खालच्या अधर परापर्यंत पोहोचू शकत नाही. अधर पर गुदपरापर्यंत जात नाही. तसेच गुदपरही शेपटीच्या परापर्यंत जात नाही. शेपटीचा पर खूप दुभंगलेला असतो. पार्श्विक रेखा व अधर पराचे बूड यांमध्ये खवल्यांच्या ८ ते ९ रांगा असतात. त्याचे मुस्कट पुढे आलेले असून त्यावर छिद्रे असतात. ओष्ठ जाड असून खालचा ओष्ठ झालरयुक्त असतो. त्याच्या आतील बाजूवर शिंगयुक्त आवरण असते. कल्ल्याच्या कर्षणी आखूड असतात.त्यामध्ये बरेच अंतर असते. स्पृशा (मिशा) आखूड असतात.हुगळी नदीत आढळणाऱ्या माशाच्या स्पृशा अतिशय लहान असतात.तलावामध्ये पैदाशीसाठी याचा वापर केला जातो.

पाटील, चंद्रकांत प.