ॲनेलिडा : (वलयी प्राणिसंघ). या संघातील प्राण्यांचे शरीर लांब, खंडयुत असून हे खंड वलयाकार आणि सारखे असतात. खंडीभवन बाह्य आणि आंतरिक असते. स्नायू, तंत्रिका (मज्जातंतू), परिवहन, उत्सर्जन आणि जनन या तंत्रांचेही खंडीभवन झालेले असते. या संघात ⇨नीरीज, ⇨गांडूळ, ⇨जळू, नेरिल्ला,पॉलिगॉर्डियस इ. प्राण्यांचा समावेश होतो. दमट माती, गोडे पाणी व समुद्रकिनारा या जागी हे आढळतात. काही मुक्तजीवी असतात पुष्कळ बिळांत किंवा नलिकांत राहतात. इतर काही जलीय प्राण्यांवर सहभोजी (दुसऱ्या प्राण्याबरोबर राहून त्याच्या अन्नात वाटेकरी होणारे प्राणी) म्हणून राहतात, तर काही बाह्यपरजीवी (अन्न किंवा संरक्षण या बाबतीत स्वत:चा फायदा करून घेण्यासाठी दुसऱ्या प्राण्याच्या शरीरावर राहणारे) किंवा अंत:परजीवी (दुसऱ्या प्राण्याच्या शरीराच्या आत राहणारे) असतात.
बाह्य आणि आंतरिक खंडीभवन हे या प्राण्यांचे प्रमुख लक्षण आहे. सममिती द्विपार्श्विक (एकाच प्रतलाने शरीराचे दोन एकसारखे भाग होणे) जळवांखेरीज सर्व प्राण्यांच्या शरीरावर कायटिनी शूक (ताठ, आखूड व कठीण केसासारख्या रचना) असतात. पॉलिकीटांच्या (ॲनेलिडा संघातील पॉलिकीटा गणातील प्राण्यांच्या) डोक्यावर मांसल संस्पर्शक (स्पर्शेंद्रिय) आणि पार्श्वपादांवर (शरीरखंडांच्या बाजूंवर जोडीने असणाऱ्या व पोहण्याकरिता उपयोगी पडणाऱ्या लहान स्नायुमय अवयवांवर) शूक असतात. शरीरावर ओलसर उपत्वचेचे (त्वचेच्या बाहेरच्या स्तराचे) आच्छादन असून त्याच्याखाली संवेदी (ज्याच्या योगाने बाह्य वस्तूचे ज्ञान होते) कोशिका (पेशी) आणि एककोशिक (एका कोशिकेची बनलेली) ग्रंथी असलेली स्तंभाकार उपकला (अस्तरासारखा असणारा समान कोशिकांचा स्तर) असते. देहगुहा (शरीरातील पोकळी) विकास पावलेली असून ऑलिगोकीटांत (ॲनेलिडा संघातील ऑलिगोकीटा गणातील प्राण्यांत) व पॉलिकीटात तिचे अनेक खंड पडलेले असतात. आहारनाल (अन्ननलिका) शरीराच्या अग्रटोकापासून पश्चटोकापर्यंत गेलेला असतो. परिवहन तंत्र संवृत (बंद किंवा कोंडलेले) असून अनुदैर्घ्य (आडव्या) रक्तवाहिन्यांचे बनलेले असते आणि यांच्यापासून प्रत्येक कायखंडात (शरीराच्या खंडात) पार्श्विक (बाजूवर असणाऱ्या) वाहिन्या गेलेल्या असतात. रक्तप्लाविकेमध्ये (रक्तातील द्रवरूप पदार्थामध्ये) विरघळलेले हीमोग्लोबिन (तांबडा रंग उत्पन्न करणारे लोहयुक्त प्रथिन) आणि मुक्त अमीबीय (अमीबासारखा आकार असणाऱ्या किंवा हालचाल करणाऱ्या) कोशिका असतात. श्वसन बाह्यत्वचेच्या साहाय्याने होते पण नलिकांत राहणाऱ्या काही प्राण्यांचे क्लोमांनी (कल्ल्यांनी) होते. प्रारूपिकतेने प्रत्येक कायखंडात वृक्कांची (शरीरातील निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकणाऱ्या नळीसारख्या इंद्रियांची) एक जोडी असून त्यांच्या द्वारा देहगुहेतील व रक्तातील उत्सर्गद्रव्ये (निरुपयोगी पदार्थ) बाहेर पडतात. प्रमस्तिष्कगुच्छिकांची (मेंदूचे कार्य करणाऱ्या तंत्रिका कोशिकांच्या पुंजांची) एक जोडी, त्यांचे संयोजक (जोडणारे) व मध्य अधर रेखेवर असलेली तंत्रिकारज्जू (तंत्रिकांची बनलेली दोरी) यांचे तंत्रिका तंत्र (मज्जासंस्था) बनलेले असते. ऑलिगोकीटा आणि हिरूडिनिया उभयलिंगी (नर आणि मादी यांची जननेंद्रिये एकाच प्राण्यात असणारे) असून विकास सरळ असतो पॉलिकीटा व ऑर्किॲनेलिडा एकलिंगी असून त्यांच्या विकासात ट्रोकोफोर डिंभावस्था (काही प्राण्यांची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी क्रियाशील पूर्वअवस्था) असते. काहींचे जनन मुकुलनानेही (कळ्या किंवा अंकुर फुटून त्यांच्यापासून नवीन प्राणी तयार होण्यानेही) होते.
बाह्यत्वचेच्या स्रावापासून उत्पन्न झालेल्या उपत्वचेने आच्छादिलेले खंडयुत शरीर, तंत्रिका तंत्राची संरचना आणि विशिष्ट भ्रूणकोशिकांपासून झालेली मध्यस्तराची उत्पत्ती या बाबतींत ॲनॅलिडांचे आर्थ्रोपोडांशी साम्य आढळते [→ आर्थ्रोपोडा]. काही बाबतींत दोहोंत फरकही आहे. ॲनेलिडात देहगुहा विशाल असते, उपांगे असंधित (सांधे नसलेली) असतात आणि कायखंडांचे विशिष्टीकरण फारसे नसते. डोळ्यांची संरचना, सखंड वृक्कक आणि पक्ष्माभिकामय (बारीक केसासारखे तंतू असलेली) युग्मकवाहिनी (अंडाणू व शुक्राणू नेणाऱ्या नळ्या) ही ॲनेलिडांची लक्षणे ऑनिकॉफोरातही आढळतात [→ ऑनिकॉफोरा].
ऑलिगोकीट प्राण्यांची लांबी एक मिमी.पासून सव्वादोन मी.पर्यंत असते. काही पॉलिकीट प्राणी सूक्ष्म असतात, तर काही दीड ते पावणेदोन मी. लांब असतात. जळवा एक सेंमी. पासून वीस सेंमी.पर्यंत लांब असतात.
ॲनेलिडा संघाचे तीन वर्ग पाडलेले आहेत : कीटोपोडा, हिरूडिनिया आणि आर्किॲनेलिडा. कीटोपोडा वर्गात पॉलिकीटा आणि ऑलिगोकीटा हे दोन गण आहेत. पॉलिकीटाचे एरॅन्शिया आणि सीर्डेंटेरिया असे दोन उपगण केलेले आहेत. हिरूडिनिया वर्गाचे ॲकँथॉब्डेलिडा, ऱ्हिंकॉब्डेलिडा, ग्रॅथॉब्डेलिडा आणि हर्पॉब्डेलिडा असे चार गण केलेले आहेत. आर्किॲनेलिडा वर्गात एकंदर पाच कुले आहेत.
पॉलिकीटा गणामध्ये सगळ्या समुद्री ॲनेलिड प्राण्यांचा आणि ऑलिगोकीटा गणात सगळ्या गांडुळांचा समावेश होतो.
पॉलिकीटा आद्य, चमत्कारिक सवयींचे आणि तऱ्हेतऱ्हेच्या रंगांचे प्राणी आहेत. त्यांच्या मानाने इतर ॲनेलिड प्राणी मळकट दिसतात. काही वाळूत नलिकावर बिळे करून राहतात त्यांचे पिसाऱ्यासारखे संस्पर्शक बाहेर पसरलेले असल्यामुळे ते फुलांसारखे दिसतात. काही स्वसंरक्षणासाठी चुन्याची नलिकाकार बिळे करतात. कीटॉप्टेरस चर्मपत्रासारख्या पदार्थाचे बीळ तयार करतो बिळाची दोनही टोके उघडी असून त्यांतून पाण्याचा प्रवाह येतजात असतो. यामुळे श्वसन चालू राहते व प्रवाहाबरोबर आलेले अन्नकण याला मिळतात.
या प्राण्यांचे डोके स्पष्ट असून त्यावर डोळे व संस्पर्शक असतात. पर्याणिका (कातडीचा फुगलेला ग्रंथिमय भाग) कधीही नसते. अंडाशय व वृषण (शुक्राणू निर्माण करणाऱ्या ग्रंथी) अनेक असतात. विकासात ट्रोकोफोर डिंभावस्था आढळते. रूपांतरण (डिंभावस्थेपासून प्रौढ अवस्था तयार होत असताना रूप आणि संरचना यांत होणारे बदल) असते. काहींचे जनन अलैंगिक असते, तर काहींचे तुकडे पडून प्रत्येक तुकड्यापासून नवीन प्राणी तयार होतो. उदाहरणे : एरॅन्शिया-ॲफ्रोडाइट, युनिस, नीरीज वगैरे सीडेंटेरिया-कीटॉप्टेरस, ॲरेनिकोला, सर्प्युला, स्पायरॉर्बिस.
ऑलिगोकीटा प्रामुख्याने दमट जमिनीत व पाण्यात राहतात. उदाहरणे : गांडूळ, नाइस, कीटोगॅस्टर, ट्युबिफेक्स.
ऑलिगोकीटांचे शरीर पॉलिकीटांसारखेच लांब व खंडयुक्त असते डोके स्पष्ट नसते प्रत्येक कायखंडावर थोडे साधे शूक असतात पार्श्वपाद नसतात पर्याणिका सामान्यत: असते हे प्राणी उभयलिंगी असून अंडाशय आणि वृषण यांच्या प्रत्येकी फक्त दोनच जोड्या असतात. रूपांतरण नसते.
गांडुळे जमिनीत बिळे करून राहतात. बिळे करताना उकरलेली माती ते खातात आणि तिच्यात मिसळलेल्या जैव द्रव्याचा अन्न म्हणून उपयोग करून माती गुदद्वारातून बाहेर टाकतात. यामुळे जमिनीवर सुपीक मातीचे नवे थर हळूहळू तयार होतात. मासे पकडण्यासाठी आमिष म्हणून गांडुळांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. गांडुळांच्या अंगी पुनरुत्पादनाची शक्ती असते. आयसेनिया फिटीडा या गांडुळाची वलये लालभडक व पिवळ्या रंगाची असतात. काही ऑलिगोकीट प्राणी कित्येक परजीवी प्राण्यांच्या जीवनचक्रात मध्यस्थ (दोन पोषकांच्या मध्ये असणारा) पोषक असतात. ऑलिगोकीटा गणात २४०० च्या वर जाती आहेत.
हिरूडिनिया वर्गात सगळ्या जळवांचा समावेश होतो. कायखंडांची संख्या ठराविक असून बाह्यभागावर गौण वलये असतात. शरीराच्या पुढच्या व मागच्या टोकांशी एकेक चूषक असतो. मुख अग्रचूषकात व गुदद्वार पश्चचूषकाच्या लगेच पुढे वरच्या पृष्ठावर असते. देहगुहा जवळजवळ नाहीशी झालेली असून लहान-मोठी रक्तकोटरे (रक्त असणाऱ्या पोकळ्या, खळगे वगैरे) तिची द्योतक असतात. रक्तवाहिन्यांच्या भित्ती स्नायुमय असतात. वृषण अनेक असून त्यांची व वृषकांची रचना खंडयुक्त असते. अंडाशयांची एकच जोडी असते. बहुसंख्य जळवा गोड्या पाण्यात राहणाऱ्या आहेत, पण काही दमट मातीत राहतात. मॉलस्क व पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांचे रक्त शोषून घेऊन त्या आपली उपजीविका करतात. काही बाह्यपरजीवी तर काही अंतःपरजीवी आहेत.
आर्किॲनेलिडा वर्गातील प्राण्यांचे बाह्य खंडीभवन स्पष्ट नसते पण आतले अनुप्रस्थ पटांमुळे (आडव्या पडद्यांमुळे) स्पष्ट असते पार्श्वपाद व शूक नसतात. प्रोस्टोमियमावर (मुखाच्या पुढे असणाऱ्या डोक्याच्या भागावर) संस्पर्शकांची एक जोडी असते. तंत्रिका तंत्र बाह्य त्वचेत असते. हे उभयलिंगी किंवा एकलिंगी असतात. या समूहातले प्राणी समुद्रकिनाऱ्यावर राहतात. हा वर्ग आद्य किंवा उपत्कृष्ट (ऱ्हास झालेला) असावा असे दिसते. पॉलिगॉर्डियस,नेरिल्ला ही या वर्गाची उदाहरणे होत.
पहा : आर्किॲनेलिडा ऑलिगोकीटा कीटोपोडा पॉलिकीटा हिरूडिनिया.
जोशी, मीनाक्षी
ॲनेलिडांचे जीवाश्म : ॲनेलिडांची शरीरे सर्वस्वी किंवा जवळजवळ सर्वस्वी, मऊ पदार्थांची बनलेली असल्यामुळे यांचे जीवाश्म (अवशेष) विरळाच आढळतात व आढळतात ते बहुतेक पॉलिकीटांचे असतात. पॉलिकीटांपैकी कित्येक त्यांच्याच स्रावाने तयार झालेल्या व कॅल्शियम कार्बोनेटाच्या किंवा कायटिनाच्या किंवा वाळूचे कण एकत्र जुळवून तयार झालेल्या नळ्यांत राहतात. नळ्या सुट्या किंवा एखाद्या बाह्य परक्या वस्तूला चिकटलेल्या असतात. अशा नळ्यांचे कधीकधी विपुल जीवाश्म आढळतात. कित्येक पॉलिकीटा नळ्यांत राहत नाहीत, पण त्यांच्यापैकी कित्येकांना लहान कायटिनमय जबडे असतात व त्यांचे जीवाश्म कधीकधी विपुल प्रमाणात ऑर्डोव्हिसियन व सिल्युरियन कालीन (सु. ४९ ते ४२ कोटी वर्षांपूर्वीच्या) खडकांत आढळतात.
जीवाश्मी ॲनेलिडांपैकी प्रमुख गोत्र म्हणजेसर्प्युला होय. या गोत्राच्या प्राण्यांची नळी कॅल्शियम कार्बोनेटाची असून ती सामान्यत: किंचित वक्र, लांब व गोलसर किंवा चापट गोलसर असते व ती एका टोकास बंद असते. नळीच्या पृष्ठाचा काही भाग एखाद्या बाह्य वस्तूस चिकटलेला असतो. गोत्राचा आयु:काल सिल्युरियन काळापासून आधुनिक कालापर्यंत आहे.
ॲनेलिडांचे सर्वांत जुने जीवाश्म म्हणजे कँब्रियन (सु. ६० ते ५१ कोटी वर्षांपूर्वीच्या) कालातले होत. पण त्याच्या आधीच्या कालातही ते अस्तित्वात असावेत, असे मानण्यास जागा आहे.
समुद्राच्या तळाशी असलेल्या चिखलाच्या पृष्ठावरून सरपटत व सरकत जाणाऱ्या कृमींच्या वाटचालीच्या खुणा, त्यांच्या शरीरांचे चिखलात उठलेले ठसे, त्यांनी चिखलात पोखरलेली भोके किंवा त्यांच्या विष्ठेचे पुंजके इत्यादींसारखे हुबेहूब दिसणारे जीवाश्मही वारंवार आढळतात. पण ते कृमींचेच असतील असे नाही. अशा प्रकारचे जीवाश्म कँब्रियन काळाच्या पूर्वीच्या खडकांतही आढळलेले आहेत.
ठाकूर, अ. ना.
संदर्भ : 1. Hickman, C. P. Integrated Principle of Zoology, Saint Louis, 1966.
2. Shipley, A. E. Harmer, S. F. Ed·The Cambridge Natural History, New Delhi, 1968.