कॅशलॉट : देवमाशाची एक जात. यालाच ‘स्पर्म व्हेल’ म्हणतात. स्तनी वर्गातली सेटासिया गणाच्या फायझिटेरिडी कुलातला हा देवमासा आहे. याचे शास्त्रीय नाव फायझिंटर कॅटोडॉन असे आहे. फायझिंटर वंशात ही एकच जाती आहे.

जगातील उष्ण, समशीतोष्ण आणि उत्तर ध्रुवीय महासांगरात हा आढळतो. नर मादीपेक्षा जवळजवळ दुप्पट मोठा असतो. नराची लांबी १५–१८ मी. व मादीची १०–११ मी. असते. शरीराचा एकतृतीयांश भाग डोक्याने व्यापिलेला असतो. डोके अवजड व काहीसे चौकोनी असून त्यात कवटीच्या वर एका आशयात द्रवरुप ‘स्पर्मासेटी’ (चकचकणारे मेण)साठविलेली असते. तुंडाच्या (मुस्कटाच्या) टोकाकडे एका बाजूला एकच नाकपुडी असते. वरच्या जबड्याच्या मानाने खालचा जबडा बराच लहान असून त्यावर ३२—६० मोठे दात असतात. तोंड बंद केल्यावर ते टाळ्यावर असलेल्या लहान लहान खळग्यात बसतात. पृष्ठपक्ष (वरच्या किंवा पाठीकडच्या बाजूवर असणारा पर म्हणजे हालचालीस वा तोल सांभाळण्यास उपयुक्त असणारी स्नायुमय घडी) नसतो. बाजूचे पक्ष सु. दोन मी. लांब आणि शेपटीवरील चार–पाच मी. रुंद असतात. शरीर काळ्या रंगाचे पण वेगवेगळ्या छटा असलेले असते. खालची बाजू फिक्कट असते.

कॅशलॉट (वसातिमी)

दात असलेल्या देवमांशामधे हा सर्वात मोठा आहे. यांचे लहान लहान थवे असतात. हिवाळ्यात ते उष्ण सागरात असतात पण उन्हाळ्याच्या सुरुवातीला समशीतोष्ण प्रदेशात स्थानांतर करतात. काही नर तर ध्रुवीय प्रदेशात जातात. पाण्यात सुरकांडी मारण्यात हा प्रवीण असून एक तासापेक्षा जास्त वेळ पाण्याखाली राहू शकतो. शीर्षपाद(माखली व लोलिगो )हे याचे भक्ष्य असून ते तो फार खोल पाण्यात (सु. ३६० मी. खोलीवर) मिळवितो. पाच मी. किंवा त्यापेक्षाही जास्त लांबीचे शीर्षपाद तो सहज गिळतो. मोठे मासे देखील तो खातो.

कॅशलॉट बहुपत्नीक आहे. याच्या प्रजोत्पादनाचा काळ उत्तर गोलार्धात मार्च ते मे आणि दक्षिण गोलार्धात सप्टेंबर ते डिसेंबर असतो . याचा गर्भावधी १२–१६ महिने असतो. एका वेळी एकच (क्वचित दोन) पिल्लू जन्मते व त्याची लांबी पाच मी. असते. नर सु.३२ वर्षे व मादी निदान ३३ वर्षे जगते.

कॅशलॉटचे व्यापारी दृष्टया बरेच महत्त्व आहे. याच्या वसेपासून (चरबीपासून) मिळणाऱ्या उत्कृष्ट तेलापासून उत्तम वंगण करतात. सूक्ष्मजंतूच्या क्रियेने याच्या बृहदांत्रात(मोठया आतडयात)उदी अंबर (आतड्यात आढळणारा व उग्र वास असणारा चरबीयुक्त पदार्थ, ॲबरग्रीस) तयार होते. अतिशय मौल्यवान सुगंधी द्रव्ये तयार करण्याकरिता याचा उपयोग करतात. [→ अंबर, उदी].

भट, नलिनी