जरायु : उल्बी प्राण्यांच्या (ज्या प्राण्यांच्या भ्रूणांत उल्ब ही भ्रूणकला म्हणजे भ्रुणाला वेढणारा पातळ पेशीमय थर असते अशा प्राण्यांच्या) कित्येक भ्रूणबाह्य कलांपैकी सर्वांत बाहेरची आणि भ्रूण व त्याच्या इतर सर्व कलांना वेढणारी कला. जरायु दोन स्तरांचे बनलेले असते. बाहेरचा स्तर बाह्यस्तर-कोशिकांचा (पेशींचा) व आतला स्तर मध्यस्तर-केशिकांचा बनलेला असते या दोन्ही स्तरांना मिळून आद्यकायास्तर हे नाव दिलेले आहे.  हे दोन्ही स्तर भ्रूणाच्या त्या त्या स्तरांशी अखंड असतात.  जरायू उल्बाला जोडूनच उत्पन्न होते. सरीसृप (सरपटणारे प्राणी), पक्षी व काही सस्तन प्राणी यांत आद्यकायास्तराला घड्या पडून त्यांचे भ्रूणाच्या वर सायुज्यन (एकीकरण) होते व अशा प्रकारे उल्ब तयार होते.  उल्ब आणि पीतक-कोश (भ्रूणाला चिकटलेली व आत पीतक म्हणजे पोषकद्रव्य असलेली अतिशय पातळ पिशवी) यांच्यापासून जरायू एका द्रवाने भरलेल्या जागेमुळे अलग झालेले असते. ही जागा भ्रूणबाह्य देहगुहा अथवा देहगुहा (आंतरांगाभोवती असणारी पोकळी) होय.  ज्या सस्तन प्राण्यांत उल्ब घड्यांच्या सायुज्यनाने उत्पन्न होण्याऐवजी कोशिकांच्या पुंजांत कोटरीभवनाने (कोशिकांचे समूह अलग होऊन पोकळी तयार होण्याने) उत्पन्न होते, त्यांत जरायू प्रत्यक्ष बीजपोषक (ट्रोफोब्लास्ट) संपुटापासून तयार होते.

कोंबडीच्या पिल्लाच्या भ्रूणबाह्य कलांच्या विकासातील एक अवस्था (चौथा दिवस) : कवच व कवच कला दाखविलेली नाहीत अनुदैर्ध्य छेद : (१) उल्ब गुहा, (२) अपरापोषिका, (३) पीतक-कोश, (४) पीतक, (५) उल्ब, (६) जरायू.

सरीसृप व पक्षी यांत जरायू अपरापोषिकेशी (भ्रूणाच्या आहारनालाच्या म्हणजे अन्नमार्गाच्या मागच्या भागापासून निघणाऱ्या पातळ पिशवीशी) सायुज्यित होऊन जरायू-अपरापेषिका बनते व ती कवचकलांच्या लगेच खाली असते. या संयुक्त कलेच्या मध्यस्तरात एक विस्तीर्ण रुधिरवाहिका तंत्र (रक्त वाहून नेणारी यंत्रणा) उत्पन्न होऊन त्याचा श्वसनाकरिता आणि उत्सर्जनाकरिता (निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकून देण्यासाठी) आद्य अथवा प्राथमिक अंग म्हणून उपयोग होतो. शिशुधान-स्तनींपेक्षा (मादीच्या पोटावर पिल्लू ठेवण्याकरिता पिशवी असणाऱ्या सस्तन प्राण्यांपेक्षा) वरच्या दर्जाच्या सगळ्या सस्तन प्राण्यांत जरायूपासून विशेष प्रकारचे बोटांसारखे प्रवर्ध (विस्तार) अथवा जरायु-अंकुरिका उत्पन्न होतात आणि त्या पृष्ठावरून बाहेर पसरलेल्या असतात. सस्तन प्राण्यांच्या निरनिराळ्या जातींत जरायूच्या अंकुरी क्षेत्राचे कमीअधिक प्रमाणात मातेच्या गर्भाशयाच्या श्लेष्मकलेशी (एक प्रकारचा गिळगिळीत स्त्राव उत्पन्न करणाऱ्या कलेशी) अथवा गर्भाशयाच्या अस्तराशी दृढ संयोग होऊन अपरेचे (वारेचे) विविध प्रकार तयार होतात.

पहा: अपरापोषिका उल्ब गर्भकला.                                      

कर्वे ज. नी.