कटला : अस्थिमत्स्यांच्या (ज्यांच्या शरीरातील सांगाडा हाडांचा बनलेला असतो अशा माशांच्या) सायप्रिनिडी कुलातील कटला वंशाचा हा मासा आहे.⇨कार्प या नावाने ओळखल्या जाणाऱ्या माशांच्या समूहातील तो आहे. याचे शास्त्रीय नाव कटला कटला असे आहे. कटला हे भारतीय नाव इंग्रजी भाषेतही रूढ झालेले आहे. महाराष्ट्रात या माशाला तांबरा म्हणतात पण काही ठिकाणी कटला हे नावही प्रचारात आहे.

कटला गोड्या पाण्यात राहणारा असून भारतात सगळीकडे आढळतो. कृष्णा नदीच्या दक्षिणेस हा पूर्वी दुर्मिळ असे पण हल्ली मत्स्य-संवर्धनामुळे दक्षिणेत याचा प्रसार फार झपाट्याने होत आहे.

याचे शरीर मजबूत असून लांबी १.८ मी. पर्यंत असते. पाठीकडचा रंग करडा आणि बाजूंचा रुपेरी असतो. पक्ष (हालचाल करण्यास वा तोल सांभाळण्यास उपयोगी पडणाऱ्या त्वचेच्या स्‍नायुमय घड्या, पर) गडद रंगाचे पण कधीकधी काळे असतात. पुच्छपक्षाचे (शेपटीच्या पराचे) खोल द्विशाखन (दोन भाग) झालेले असते. शरीरावरील खवल्यांचा केंद्रभाग गुलाबी किंवा ताम्रवर्णी असतो. पण उदरावरील खवले पांढुरके असतात. डोके रुंद असते मुख रुंद असून खालचा ओठ बराच बाहेर वळल्यामुळे दुघडी झालेला असतो.

कटला हा भारतातील एक अतिशय किफायतशीर खाद्य मत्स्य आहे. ६० सेंमी. लांबीपर्यंतचे मासे खायला चविष्ट असतात. यापेक्षा जास्त लांबीच्या माशांची चव चरबट असते. ५६ सेंमी. लांबी होण्याच्या सुमारास हे मासे पक्व होतात. अंडी घालण्याकरिता ते सपाट प्रदेशातील नद्यांत स्थलांतर करतात. अंडी वाटोळी व पारदर्शक असून बुडून तळाशी जातात. १६ — १८ तासांत अंडी फुटून ४⋅४ — ५⋅३ मिमी. लांबीचे डिंभ (भ्रुणानंतरची स्वतंत्रपणे जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी क्रियाशील अवस्था) बाहेर पडतात. सहा आठवड्यांत ते प्रौढरूप धारण करतात.

संवर्धनाकरिता नद्यांमधून आंगुलिक (साधारणपणे बोटा एवढ्या लांबीची पिल्ले) गोळा करून संवर्धन-पल्वलात (टाक्यांत) सोडतात. तेथे १० — १५ सेंमी. झाल्यावर ते तळ्यात साठवितात. संथ पाण्यात यांची फार झपाट्याने वाढ होते. भारतातील सर्व माशामध्ये कटला हा अतिशय जलद वाढणारा मासा आहे. एका वर्षात तो ३८ — ४६ सेंमी. वाढतो.

कटला (कटला कटला)

चाफेकर, मृणालिनी