केमन : क्रोकोडिलिया गणातील हा सुसरीसारखा सरपटणारा प्राणी ⇨ॲलिगेटरचा अगदी जवळचा नातेवाईक असल्यामुळे दोहोंचाही या गणाच्या ॲलिगेटरिडी या कुलात समावेश केलेला आहे.

यांच्या पाठ आणि पोटावरील त्वचेच्या खाली अस्थि पट्ट (हाडांची तकटे) असून त्यांची जोरदार वाढ झालेली असते. केमनच्या शरीरावरील अस्थिकवच ॲलिगेटरच्या कवचापेक्षा जास्त परिपूर्ण असते. नासिका छिद्राचे (नाकपुडीचे) नासास्थीने (नाकातील हाडाने) विभाजन झालेले नसते.

केमन दक्षिण मेक्सिको, मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेचा बहुतेक सगळा उष्ण प्रदेश येथे आढळतात. कित्येक ठिकाणी ते मुबलक असून सामान्यतः त्यांचे मोठाले गट असतात.

काळा केमन (मेलनोसूकस नायजर) ही एक प्रसिद्ध जाती असून तिची सरासरी लांबी ३-४ मी. असते क्वचित ५ मीटरही असते. पावसाळ्यात नदीचे पात्र सोडून चिखल असलेल्या बाहेरच्या ठिकाणीही ते जातात.

 

मासे हे यांचे मुख्य भक्ष्य होय. शेपटीच्या तडाख्याने ते माशांना बेशुद्ध किंवा ठार करतात आणि नंतर खातात. सस्तन प्राणी व पक्षी यांना देखील पकडून खायला ते कमी करीत नाहीत. विणीच्या हंगामात माणसांवर देखील ते हल्ला करतात. कधीकधी आपली पाणथळ जागा सोडून रात्री शिकार करण्याकरिता ते जमिनीवर भटकतात आणि कुत्री, मेंढ्या इत्यादींना ठार मारतात.

विणीच्या हंगामात यांचे वर्तन ॲलिगेटरसारखेच असते.

लेखक : कर्वे, ज. नी.