टेरोडॅक्टिल : मध्यजीव महाकल्पाच्या जुरासिक व क्रिटेशस कल्पांतील (सु. १८·५ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) निर्वंश झालेल्या उडणाऱ्‍या सरीसृपांच्या (सरपटणाऱ्‍या प्राण्यांच्या) गणाचे नाव. याचे तांत्रिक नाव टेरॉसॉरिया किंवा ऑर्निथोसॉरिया आहे. उडणारे असे हे पहिले पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेले) प्राणी सु. १८ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर अवतरले व पुढील ८ कोटी वर्षे ते पृथ्वीवर होते. मात्र क्रिटेशस कल्पानंतर ते आढळले नाहीत. यांचा प्रसार जगभर झालेला असून यूरोप, उत्तर अमेरिका व पूर्व आफ्रिका या भागांत यांचे बरेच जीवाश्म (शिळारूप अवशेष) सापडले आहेत. जर्मनीतील झोलेनहोफेनच्या निक्षेपात (खडकात) आणि अमेरिकेतील कॅनझसच्या चॉक खडकांच्या निक्षेपात यांचे विपुल जीवाश्म व यांच्या अवयवांचे ठसे आढळले आहेत.

शरीरवर्णन : यांचे शरीरवर्णन १८८४ साली प्रथम करण्यात आले. हे आटोपशीर म्हणजे चिमणीपासून ते टर्कीपर्यंतच्या आकारमानाचे त्यांच्या पंखांचा पसारा ३० सेंमी. ते ७·७ मी. आणि वजन काही ग्रॅ. ते ११ किग्रॅ. पर्यंत असावे.

शरीराच्या बाजू व बाहू तसेच लांब झालेले चौथे बोट यांच्यामध्ये कातडीचे अखंड पटल पंखरूपात पसरलेले असे, यामुळे टेरो (पंख) आणि डॅक्टिलॉस (बोट) या ग्रीक शब्दांवरून टेरोडॅक्टिल हे नाव पडले आहे. त्यांचे पंख वटवाघळाच्या पंखांसारखे असावेत. पंखांच्या स्नायूंना उरोस्थीचा (छातीच्या हाडाचा) आधार नसे. मात्र पंखांच्या आतील भागांना आधार नसे. पंखाला एखाद्या ठिकाणी अपाय पोहोचल्यास संपूर्ण पंखावर त्याचा परिणाम होत असावा. त्यांचे पंख पक्ष्यांच्या पंखांइतके लवचिक व टिकाऊ नसावेत. पंखांची लांबी व रचना तसेच पायांची ठेवण पाहता जमिनीवर व पाण्यावर उतरल्यावर ते पुन्हा कसे उडत असावेत, हे कळत नाही. बहुधा कड्यावर वा झाडावर चढून ते झेप घेत असावेत. म्हणजे पंखांचा त्यांना फडफडण्याऐवजी भराऱ्‍या मारण्यासाठी व विसर्पणासाठीच (ग्लायडिंगसाठीच) उपयोग होत असावा. त्यांना जास्त दूरपर्यंत उडता येत नसावे. उड्डाणाचे नियंत्रण पायांनी व काहींच्या बाबतीत शेपटीनेही होत असावे.

त्यांच्या हाताची पहिली तीन बोटे बारीक, आखूड आणि नखरयुक्त (नख्यायुक्त) असून आधार पकडण्यासाठी त्यांचा उपयोग होत असावा. चौथे बोट जादा लांब झालेले होते. त्यांचे मागील पाय सापेक्षतः दुबळे व त्यांची बोटे एकसारखी व लहान असत. विशेषतः लहान प्राणी वटवाघळाप्रमाणे पायांनी उलटे  टांगून घेत असावेत. चालण्यासाठी पायांचा उपयोग होत नसावा. काहींना शेपटी असे. काहींच्या शेपट्या टोकाशी शंकरपाळ्याप्रमाणे पसरट असत. शेपट्यांची लांबी ८ ते १३ सेंमी.पर्यंत असे.

त्यांच्या कवट्या मोठ्या, हलक्या व त्यांतील  घटक हाडे जोडली जाऊन मजबूत झालेल्या असत. त्यांचा मेंदू मोठा व वरवर पाहता पक्ष्यांप्रमाणे असे. प्रमस्तिष्क गोलार्ध (अग्रमस्तिष्काचा म्हणजे पुढच्या मेंदूचा भाग) व दृक्-खंड मोठे आणि गंध-खंड लहान असत म्हणजे दृक्-संवेदना गंध-संवेदनेपेक्षा महत्त्वाची होती. त्यांचे डोळे मोठे व नेत्रगोल अस्थिवत द्रव्याच्या पट्ट्यांमुळे मजबूत बनलेले असत. त्यांची मान मध्यम लांबीची व लवचिक असून उडताना ती ताठ उभी आणि डोके आडवे राहत असावे. काहींना बारीक, लांब चोच तर काहींना तुरा असे. त्यांची हाडे पातळ, पोकळ व हलकी असत. जिवंतपणी हाडांमध्ये हवा राहत असावी. छातीचे हाड मोठे व वक्षाखालील सर्व भागांवर पसरलेले असे. श्रोणी-अस्थी (धडाच्या तळाशी असणारे हाड) चांगली विकसित झालेली असे. तिच्यामुळे मागील पायांना आधार मिळून प्रत्यक्ष उडण्यास मदत होत असावी.

त्यांचे दात विविध प्रकारचे असत. ऱ्‍हँफोऱ्‍हिंकस या प्राण्याचे दात मजबूत, तीक्ष्ण व पुढे आलेले असत. मासे व लहान पक्षी पकडण्याच्या दृष्टीने ते असे बनले असावेत. टेनोचास्मांना सुईसारखे अनेक दात असत, त्यावरून ते कीटकभक्षक असावेत. ऑर्निथोंडेस्मसांना अनेक, तर सुंगारिप्टेरसाच्या जबड्याच्या फक्त मागील भागात दात असत.

त्यांच्या शरीरावरील आवरणाविषयी पूर्ण माहिती नाही. मात्र त्यांची कातडी गुळगुळीत असावी पंखावर पिसे नसत, परंतु इतर सरीसृपांप्रमाणे पंखांवर शृंगमय खवले असावेत. काहींच्या डोक्यावर केसासारखी वाढ आढळली आहे.

हे बहुधा रात्रिंचर असावेत. यांचे बहुतेक जीवाश्म सागरी निक्षेपात आढळले आहेत. काहींच्या पोटातील अवशेषांत आढळलेली माशांची हाडे व दातांत झालेल्या सुधारणा हे विचारात घेतल्यास बहुधा ते मासेखाऊ असावेत. माशांशिवाय कीटक, छोटे प्राणी (पक्षी, जलचर इ.) ते सबंध गिळत असावेत.

आ. १. ऱ्हँफोऱ्हिंकस : जुरासिक कल्पातील टेरोसॉराच्या कंकालाचे मूल निरूपण.

चांगला विकसित मेंदू व वायवीय सांगाडा यांवरून ते नियततापी (शरीराचे तापमान परिसराच्या तापमानापेक्षा उच्च असून स्थिर असलेले) असावेत. इतर सरीसृपाप्रमाणे ते अंडज असावेत. ते अंडज नसते, तर एखाद्या जीवाश्मात तरी भ्रूण (अपक्व अवस्थेतील जीव) आढळला असता. त्यांच्या श्रोणीतील अस्थी जवळजवळ व जोडलेल्या असत. त्या अस्थींच्या फटीतून कोंबडीच्या अंड्याएवढीच वस्तू जाऊ शकेल. इतक्या लहान आकारमानाचा प्राणी जन्मल्यानंतर तो जगण्याची शक्यता वाटत नाही.

प्रकार :शास्त्रज्ञांच्या मते यांचे वीस वंश असावेत. त्यांचे दोन मुख्य गट पडतात. (अ) उत्तर जुरासिक काळातील ऱ्‍हँफोर्ऱ्‍हिंकॉयडिया उपगणातील प्राण्यांच्या शेपट्या बारीक, लांब आणि टोकाशी पसरट असत. ऱ्‍हँफोर्ऱ्‍हिंकस हा यांचा प्रातिनिधिक प्राणी असून त्याचे जीवाश्म किमररिज मृत्तिकेत झोलेनहोफेन निक्षेपात आढळतात. यातील प्राण्यांचे आकारमान जवळजवळ सारखे व पंखांचा पसारा सु. ६० सेंमी. असे. त्यांचे दात तीक्ष्ण व मजबूत, तसेच बोटांना आधार देणाऱ्‍या करभास्थी सापेक्षतः आखूड असत. (आ) उत्तर जुरासिक व क्रिटेशस काळातील प्राणी या गटात येतात. चिमणी एवढा टेरोडॅक्टिलस प्राणी हा आधीच्या काळातील प्रतिनिधी असून त्याचे दात कमी व लहान, तसेच शेपूट आखूड

आ. २. टेरॅनोडॉन : क्रिटेशस कल्पातील उडणाऱ्‍या प्रचंड सरीसृपाच्या कंकालाचे मूल निरूपण.

आणि करभास्थी मोठ्या असत. झोलेनहोफेन येथे त्याचे जीवाश्म आढळतात. क्रिटेशस काळातील प्राणी अधिक मोठे असत. टेरॅनोडॉन हा त्यांचा प्रतिनिधी आहे. कॅनझसच्या चॉकमध्ये त्याचे शेकडो जीवाश्म आढळले आहेत. त्याला दात व शेपटी नसे. त्याचे शरीर टर्कीएवढे व पंखांचा पसारा ७·७ मी. असे. त्यामुळे तो ज्ञात असा सर्वांत मोठा पंखधारी ठरतो. त्याचा जबडा मोठा, उरोस्थी लहान व तुऱ्यासह कवटी ८४ सेंमी. लांब असे. कवटी व शरीर जेथे जोडलेली असत, तेथून मागेपर्यंत जाणारा व वाऱ्याची दिशा दाखविणाऱ्या बाणाप्रमाणे लांब तुरा त्याला असे. त्याला शृंगमय चोच असावी.

क्रमविकास : (उत्क्रांती). उडणारे सरीसृप ही निसर्गाचा फसलेला प्रयोग आहे. कारण पक्षी त्यांच्यापासून आलेले नाहीत. त्यांची उड्डाणक्षमता पक्ष्यांकडून आलेली नाही. ती त्यांच्यातच विकसित झाली असावी अथवा कदाचित थिकोडोंट पूर्वजांकडून आली असावी. परंतु ज्याच्यापासून पक्षी आले व ज्याच्यात डायनोसॉर व सुसरींचा समावेश होतो, त्याच आर्कोसॉरिया उपवर्गात टेरोडॅक्टिल येतात. मात्र हल्लीच्या सुसरी व सरडे यांच्यापेक्षा टेरोडॅक्टिल वेगळे आहेत.

संदर्भ :

1. Breebower, J. R. Search for the Past : An Introduction to Paleontology, Englewood Cliffs, N. J., 1960.

2. Romer, A. S. Vertebrate Paleontology, Chicago, 1966.

ठाकूर, अ. ना.