पुराप्राणिविज्ञान : पूर्वीच्या भूवैज्ञानिक काळातील प्राण्यांसंबंधीचे विज्ञान. हे विज्ञान ⇨पुराजीवविज्ञानाची एक शाखा असून त्याच्यासारखी दुसरी शाखा म्हणजे ⇨ पुरावनस्पतिविज्ञान होय आणि अनुक्रमे प्राण्यांच्या व वनस्पतींच्या जीवाश्मांपासून (शिळारूप झालेल्या अवशेषांपासून) मिळणाऱ्या माहितीवर ही विज्ञाने रचलेली आहेत. त्यांची मूलतत्त्वे, हेतू व उपयोग सारखेच आहेत. प्राण्यांच्या जीवाश्मांचे परीक्षण करून त्यांचे शरीर व राहणी यांविषयी माहिती मिळविणे, त्यांचे वर्गीकरण करणे, त्यांच्या साहाय्याने खडकांची भूवैज्ञानिक वये ठरविणे, खडकांच्या राशीत आढळणाऱ्या जीवाश्मांचा अनुक्रम पाहून प्राण्यांचे निरनिराळे प्रकार कोणत्या क्रमाने पृथ्वीवर अवतरले व त्यांचा कसा विकास झाला यांविषयी माहिती मिळविणेइ. गोष्टींचा समावेश या विज्ञानात होतो [→ जीवाश्म स्तरविज्ञान]. या विज्ञानाच्या विकासासंबंधी इतिहास ‘पुराजीवविज्ञान’ या नोंदीमध्ये दिलेला आहेत.

प्रस्तुत नोंदीत पुराप्राणिविज्ञानाची माहिती प्रथम कालानुक्रमे दिलेली असून नंतर प्राणिगटांनुसार प्रथम अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांची आणि तदनंतर पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांची माहिती देऊन शेवटी भारतीय संशोधन कार्याची थोडक्यात माहिती दिली आहे. ज्यांच्यात निःसंशय व विपुल जीवाश्म असतात असे सर्वांत जुने खडक म्हणजे कँब्रियन कल्पाच्या (सु. ६० ते ५१ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या) प्रारंभी व सु. साठ कोटी वर्षांपूर्वी साचलेल्या गाळांचे खडक होत. पुराप्रणिविज्ञानाची ओळख पटण्यासारखे अभिलेख (नोंद) नोंदले जाण्यास तेव्हापासून सुरुवात झाली, असे म्हणण्यास हरकत नाही. त्यापूर्वी काळातील खडकांत कृमींच्या वाटचालीसारख्या खुणा किंवा त्यांनी केलेल्या बिळांसारखी भोके असलेले खडक व स्पंजांच्या कंटिकांसारखे (लहान काट्यांसारखे) आकार असलेले अवशेष इ. प्रकारचे जीवाश्म क्वचित आढळतात पण ते इतके विरळ असतात की, कँब्रियनच्या पूर्वीच्या काळातील खडकांत प्राण्यांचे जीवाश्म जवळजवळ नसतात, असे म्हटले तरी चालेल.

परंतु कँब्रियनच्या आधीच्या कल्पातही प्राणी राहत असले पाहिजेत, एवढेच नव्हे तर ते विपुल व विविध प्रकारचे असले पाहिजे असे मानण्यास पुढील कारणे आहेत : (१) कँब्रियन कल्पाच्या प्रारंभीच्या खडकांत समुद्रात राहणाऱ्या अपृष्ठवंशी प्राण्यांच्या बहुतेक सर्व प्रमुख संघांचे जीवाश्म आढळतात. व ते कित्येक खडकांत विशेष विपुलतेने आढळतात. म्हणजे कँब्रियनच्या प्रारंभीसुद्धा भिन्नभिन्न प्रकारचे विपुल प्राणी राहत असत. त्यांचे पूर्वज त्या काळाच्या पूर्वीही अस्तित्वात असेलच पाहिजेत व ते बरेच विकासही पावले असले पाहिजेत. कँब्रियन कालिन प्राण्यांइतके विकसित व विविध प्राणिप्रकार निर्माण होण्याला दीर्घ कालावधी लागला असला पाहिजे कँब्रियनच्या बऱ्याच आधीच्या (सु. एक अब्ज वर्षांपूर्वीच्या) काळातील समुद्रातही कोणते ना कोणते प्राणी राहत असले पाहिजेत, असा तर्क आहे पण कँब्रियन कालिन प्राण्यांच्या पूर्वजांचे जीवाश्म का सापडू नयेत, हे कोडेच आहे. त्या पूर्वजांना टिकाऊ सांगाडे नसल्यामुळे त्यांचे जीवाश्म होऊ शकले नसावेत. त्यांचा विकास होऊन कँब्रियनच्या सुरुवातीस सांगाडे असणारे प्राणी निर्माण झाले व तेव्हापासून जीवाश्म होण्यास सुरुवात झाली असावी. (२) गाळात पुरल्या गेलेल्या जैव (सेंद्रिय) अवशेषांपासून तयार झालेले ज्या प्रकारचे कार्बन असणारे पदार्थ कँब्रियन कल्पाच्या व त्यानंतर खडकांत आढळतात तशाच प्रकारच्या पदार्थाच्या प्रचंड राशी कँब्रियनच्या पूर्वीच्या खडकांतही आढळतात व त्याही जैव पदार्थांपासून तयार झाल्या असाव्यात. 

जीवाश्मांपासून मिळालेल्या माहितीवरून प्राणिकोटीचा जो इतिहास जुळविण्यात आलेला आहे, त्याचे सार सोबतच्या आकृतीस आरेखरूपाने दिलेले आहे. त्याच्यावरून असे कळून येईल की, कवचे असणारे बहुतेक सर्व संघ कँब्रियनच्या सुरुवातीस होते व उरलेले ऑर्डोव्हिसियन कल्पात (सु. ४९ ते ४४ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) अवतरले. म्हणजे प्राण्यांचा इतिहास जीवाश्मारूपाने नोंदला जाण्यास सुरुवात झाली तेव्हासुद्धा त्यांचे विविध संघ पृथ्वीवर होते. त्यांचे कित्येक वर्ग व गण ऑर्डोव्हिसियन कल्पात किंवा त्यानंतर अवतरले व पुराजीव महाकल्पाच्या (सु. ६० ते २४. ५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या) अखेरीअखेरीपर्यंत त्यांचा विकास व वाढ होत गेली. पुराजीव महाकल्पाच्या अखेरीस पूर्वी प्रमुख असलेले काही गट निर्वंश झाले, पण इतर काहींचा विकास होऊन नवे गट अवतरले व त्यांची वाढ होत गेली. तशाच घटना मध्यजीव महाकल्पात (सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) व त्या महाकल्पांच्या अखेरीस प्राणिकोटीच्या स्वरूपात महत्त्वाचे फेरबदल घडून आले व आधीच्या कित्येक प्राण्यांच्या जागी नवे प्राणी आले. पुराजीव माहाकल्पाच्या उत्तरार्धात जमिनीवर राहणारे प्राणी अवतरले व पृथ्वीवरील प्राण्यांत त्यांचीही भर पडली. पुराजीव महाकल्पाच्या सुरुवातीचे सर्व प्राणी अपृष्ठवंशी होते. पुढे मत्स्य अवतरले. त्या महाकल्पाच्या उत्तरार्धात मत्स्यांची वाढ झाली व प्रथम उभयचर (जमिनीवर पाण्यात राहणारे) व नंतर सरीसृप (सरपटनारे) हे जमिनीवरील प्राणी अवतरले. मध्यजीव महाकल्पात सागरात राहणारे ॲमोनाइट व जमिनीवरील सरीसृप हे प्रमुख प्राणी होते पण त्या महाकल्पाच्या अखेरीस ॲमोनाइट पूर्णपणे व सरीसृप जवळजवळ निर्वंश झाले. मध्यजीव महाकल्पात पक्षी व सस्तन प्राणी अवतरले होते पण ते अतिशय लहान व आदिम (आद्य) प्रकारचे होते. नवजीव महाकल्पात (गेल्या सु. ६.५ कोटी वर्षांत) पृथ्वीतलावर (जमिनीवर) सस्तन प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा विकास व वाढ झाली. सागरात एकिनॉयडिया, फोरॅमिनीफेरा, गॅस्ट्रोपोडा (शंखधारी) यांची खूप वाढ झाली व ह्याबरोबरच मत्स्य व

बायव्हाल्व्हिया (शिंपाधारी) यांचीही बरीच वाढ होत गेली व प्राणिकोटीला आजच्यासारखे स्वरूप प्राप्त झाले.

केळकर, क. वा.


आ. १. कँब्रियन कल्पाच्या सुरुवातीपासून प्राण्यांचे भूवैज्ञानिक वितरणः(१) टॅब्यूलेट(२) टेट्राकोरल, (३) हेक्झॅकोरल,(४) भूचर गोगलगाय, (५) नॉटिलॉइ, (६) अमोनाइट,(७) बेलेम्नाइट,(८)ट्रायलोबाईट,(९) यूरिप्टेरिड, (१०) कोळी, (११) डेकॅपॉड, (१२) ऑस्ट्रॅकॉड, (१३) ऑफियूरॉइड,(१४) तारामीन, (१५) शार्क, (१६) अस्थिमत्स्य,(१७) कोॲनिक्धीस (१८) लॅबिरिथोडोंट.

येथे जीवाश्मांविषयीची माहिती अपृष्ठवंशी व पृष्ठवंशी अशा दोन भागांत दिलेल्या असून अपृष्ठवंशी जीवाश्मांचे प्रमुख आणि गौण गट अशी आखणी विभागणी केली आहे. 


अपृष्ठवंशी जीवाश्म-प्रमुख गट : स्ट्रोमॅटोलाइट व अक्रिटार्क : (कँब्रियन-पूर्व म्हणजे सु. ६० कोटी वर्षांच्या आधीचे जीव). जीवाश्म ज्या जीवांचे आहेत दिसते असे त्या जीवांच्या प्रकाराच्या संदर्भात जे निश्चितपणे ओळखू येऊ शकतात व जीववैज्ञानिक वर्गीकरणातील ज्यांचे योग्य स्थान समजू शकते, असे सर्वांतजुने जीवाश्म पुष्कळ देशांमधील कँब्रियन कल्पाच्या अगदी सुरुवातीच्या काळातील खडकांमध्ये आढळले आहेत. तथापि या काळातील ट्रायलोबाइट, स्पंज, ब्रॅकिओपोडा, शैवले इ. जीवांच्या क्रमविकासाची (उत्क्रांतीची) व विभेदनाची (भिन्नभिन्न विशेष प्रकार निर्माण होण्याची) अवस्था इतकी प्रगत झालेली ढळते की, पृथ्वीवर कँब्रियन-पूर्व काळात खूप आधीपासूनच जीव होते. हे मान्य करण्यावाचून गत्यंतर राहत नाही. नंतर या जींवांचा हळूहळू क्रमविकास व विभेदन होत जाऊन कँब्रियन कल्पाच्या अगदी प्रारंभीच्या काळात आढळणाऱ्या विविध गटांच्या अवस्थेपर्यंत ते पोहोचले असले पाहिजेत. 

कँब्रियन-पूर्व कालीन खडकांमधील जीवाश्मरूपी अवशेषांचा अभाव लक्षात घेतला, तर त्या खडकांमध्ये विस्तृतपणे आढळणारे सारेच चुनखडक रासायनिक अवक्षेपनाने (साका खाली बसून त्याच्या रूपात साचण्याने) बनले आहेत असा खुलासा करणे अथवा तशी कल्पना करणे शक्य नाही. कँब्रियन-पूर्व कालीन पुष्कळ खडकांच्या स्वरूपाविषयी आपल्याला असलेल्या माहितीवरूनही ते खडक जीवाश्म टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने योग्य आहेत, असे आपण म्हणू शकतो. काही प्राणिगटांमध्ये सांगाडे अथवा कवच यांच्यासारखे टिकून राहण्यायोग्य असे कठीण भाग (अवयव) निर्माण होऊ शकले नसावेत. हल्लीच्या पुष्कळ प्राण्यांच्या बाबतीतही अशी स्थिती आहे.  

कँब्रियन-पूर्व काळातील खडकांमधील जीवाश्मांची उणीव हे १९३० च्या सुमारापर्यंत पुराजीववैज्ञानिकांपुढील एक कोडेच होते. मात्र तेव्हापासून कँब्रियन-पूर्व खडकांमध्ये स्ट्रोमॅटोलाइट नावाचे जीव आढळल्याच्या वार्ता निरनिराळ्या देशांमधून येण्यास सुरुवात झाली. प्राचीन खडकांमध्ये स्ट्रोमॅटोलाइट असल्याचे एकोणिसाव्या शतकातही माहिती होते परंतु तेव्हा त्यांना क्रिप्टोझून म्हणजे संशास्पद जैव अवशेष अथवा आभासी (छद्म) जैव रचना असे संबोधिले जात होते.

स्ट्रोमॅटोलाइट कँब्रियन पूर्व काळाच्या उत्तर (नंतरच्या) भागात मोठ्या प्रमाणात आढळतात, तसेच ते कँब्रियन व ऑर्डोव्हिसियन काळांतही होते परंतु डेव्होनियन (सु. ४० ते ३६.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळापासून) त्यांचा जलदपणे ऱ्हास होत जाऊन कार्‌बॉनिफेरस व पर्मियन (सु. ३५ ते २४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळांत ते दुर्मिळ झाले. 

आ. २. स्ट्रोमॅटोलाइट : (१) कोलेनिया, (२) कोनोफायटॉन.

स्ट्रोमॅटोलाइट गुच्छ वा समूहरूपात आढळत असून त्यांचे कोलेनिया, कोनोफायटॉन, बैकालिया, मिंजारिआ इत्यादींसारखे स्थूल संरचनात्माक वर्ग किंवा रूपवंश असे गट करण्यात आले आहेत. स्थूल स्तरवैज्ञानिक सहसंबंध (थरांचे परस्परसंबंध) ठरविणे व कँब्रियन-पूर्व काळातील शैलसमूहांचे (खडकांच्या राशींचे) पोटविभाग पाडणे यांकरिता ते उपयुक्त मानले गेले आहेत. 

आताच्या समजुतीनुसार स्ट्रोमॅटोलाइट म्हणजे सामूहिक गटांत राहणाऱ्या विविध नील-हरित शैवलांद्वारे [→ शैवाले] तयार झालेल्या  जैव-अवसादी संरचना आहेत.  रीसेंट म्हणजे गेल्या सु. ११ हजार वर्षांच्या काळातील स्ट्रोमॅटोलाइट हे बंदिस्त सागरी द्रोणीतील स्वच्छ पाण्यामध्ये आंतरा-वेलीय (भरती-आहोटीच्या) पट्ट्यात १० मी. खोलीपर्यंत आढळतात आणि अधूनमधून ज्यावर पाणी  येऊन जाते त्या पंक-मैदानावरही (ओहोटीच्या वेळी उघड्या पडणाऱ्या मंद उताराच्या व चिखलाने आच्छादलेल्या भागावरही) ते आढळतात. अशा प्रकारे स्ट्रोमॅटोलाइटांना ज्याप्रमाणे स्तरवैज्ञानिक सहसंबंधाच्या दृष्टीने महत्त्व आहे त्याचप्रमाणे त्यांच्या हल्लीच्या अधिवासांच्या (राहण्याच्या नैसर्गिक ठिकाणांच्या) दृष्टीने त्यांच्याकडे   पाहिल्यास ते ⇨ पुरापरिस्थितिविज्ञानाच्या संदर्भांतही महत्त्वाचे आहेत. स्ट्रोमॅटोलाइट  पुष्कळदा फॉस्फेटी निक्षेपांच्या (साठ्यांच्या) समवेत आढळतात, हा त्याच्यासंबंधीचा आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचा मुद्दा म्हणता येईल.  

दक्षिण ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व इंग्लंड या प्रदेशांतील उत्तर कँब्रियन-पूर्व काळातील निक्षेपांत सीफोझोआ व हायड्रोझोआ यांचे छत्रिक (व्यक्तिगत प्राणी मेड्युसा) म्हणता येतील असे जीवाश्म आढळले आहेत. ॲक्रिटार्क म्हणून ओळखली जाणारी कोशिकीय (पेशीसारखी) स्वरूपाची चिन्हे ही जीवाश्म असल्याचे मानतात. ते विविध प्रदेशांमधील कँब्रियन-पूर्व काळातील खडकांमध्ये आढळल्याचे वृत्त अधूनमधून येत असते. तथापि त्यांच्या उपयुक्ततेची अद्यापि खातरजमा झालेली नाही. 

स्ट्रोमॅटोलाइट, सीलेंटेरेटा, ॲनेलिडा व ॲक्रिटार्क यांच्या साहाय्याने कँब्रियन-पूर्व काळातील जीवांविषयीच्या आपल्या माहितीत भर पडते. त्याचप्रमाणे त्या खडकांमध्ये आढळणारे मार्ग-चिन्ह (वाटचालीच्या खुणांच्या स्वरूपाचे पथ-चिन्ह) जीवाश्म त्या काळातील जीवांविषयीच्या माहितीत विशेषकरून ते ज्या शैलसमूहांत आढळतात ते शैलसमूह कोणत्या पर्यावरणीय स्थितीत बहुतकरून निक्षेपित झाले (साचले) असावेत, या विषयीच्या माहितीत भर घालण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील. 


ट्रायलोबिटा : सर्वांत आधी अवतरलेले आर्थ्रोपोडा आणि जीवाश्मांच्या रूपात सर्वांत चांगल्या रीतीने माहीत असलेल्या कवचधारींच्या (क्रस्टेशियनांच्या) दोन गटांपैकी एक गट म्हणजे ट्रायलोबाइटी प्राण्यांचा गट होय. ट्रायलोबाइटांचे जीवाश्म फक्त सागरी निक्षेपांतच आढळले आहेत. ट्रायलोबाइटांच्या बाह्यकंकालाचे (आधार वा संरक्षण देणार्याप बाह्य कठीण संरचनेचे) पुढील तीन प्रमुख भाग असतात : (१) अग्रभागी फलकासारखे शीर्ष व त्याच्या मध्यभागी भ्रूमध्य, (२) बरगडीसारखे कायखंड असलेले वक्ष आणि (३) ज्यावर सामान्यपणे कायखंड दिसतात ते अवसानक [→ ट्रायलोबाइट]. बाह्य कवचावरील दोन उभ्या सीतांमुळे (खोबणींमुळे) पूर्ण शरीर तीन खडांचे बनल्यासारखे दिसते. ट्रायलोबाइटांमध्ये सर्वसामान्यपणे पुढील संरचनात्मक परिवर्तने झालेली आढळतात : शीर्ष व अवसानक यांचे आकारमान वाढणे, उदा., ॲग्नॉस्टस भ्रूमध्य अग्र बाजूस रुंद होणे व भ्रूमध्यीय सीता नाहीशी होणे, उदा., फॅकॉप्स शीर्षावरील कपोलकोन व कायखंडांची टोक मागील बाजूस कंटकरूप होणे, उदा., पॅराडॉक्साइड व कायखंडांची संख्या २९ पासून (उदा., हारपीज) २ पर्यंत (उदा., ॲग्नॉस्टस) घटणे. बऱ्या, चदा हे आकारवैज्ञानिक (प्राण्याचा आकार व संरचना यांच्या दृष्टीने होणारे) बदल एकमेकांशी निगडित नसत. या बदलांच्या संयोगांतून ट्रायलोबाइटांच्या एकानंतर दुसरी अशा अनेक वंश-शाखा उत्पन्न होत गेल्या. या प्रत्येक शाखेचा  कालावधी बहुधा मर्यादित असून ट्रायलोबाइटांचा एक गट म्हणून विचार केला, तर त्यांच्या क्रमविकासाचा ओघ अतिशय जटिल असल्याचे दिसते. ट्रायलोबाइटांचे एकेकटे  वंश किंवा वंशांचे गट विविध थरांमध्ये विशिष्ट समुच्चयाने आढळत असल्याने थरांच्या मालिकेची ठळक स्तरवैज्ञानिक एककांत (घटकांत) विभागणी करण्यासाठी त्यांची मदत झाली. ट्रायलोबाइट हे निश्चितपणे चलनक्षम प्राणी असून त्यांचे विस्तृत भागांत स्थलांतर झाले होते. अशा प्रकारे दूरवर उघड्या पडलेल्या शैलसमूहांचे सहसंबंध ठरविण्यासाठी ट्रायलोबाइटांचे जीवाश्म उपयुक्त आहेत. ट्रायलोबाइट मोठ्या प्रमाणावर नितलस्थ (सागराच्या तळावर राहणारे) व इतस्ततः रांगणारे असून काही ट्रायलोबाइट सागरी तळाजवळ किंवा उघड्या समुद्रात पोहू लागले होते, असा निष्कर्ष पुढील गोष्टींवरून काढता येतो : पोहण्याच्या दृष्टीने योग्य (अनुकूल) शरीराकृती, संतुलनाचे अवयव म्हणून असलेल्या फुगीर कंटिका, तरंगण्यास उपयुक्त असा मोठा व फुग्यासारखा भ्रमध्य आणि रेमोप्ल्युराइड, इंग्लिना, डायकॉन इ. वंशांमध्ये आढळणारी जटिल व अग्रभागी असलेली दृष्टीअंगे. ॲग्नास्टस, मायक्रोडिस्कस इत्यादींसारख्या काही वंशांतील ट्रॉयलोबाइट तळावरील गाळात खणण्याच्या व गाळ उकरून त्याच्या खालून हिंडण्याच्या सवयीमुळे आंधळे बनले होते, तर डाल्मॅँनाइट व ओलेनेलसारख्या काहींच्या शेपटीवर लांब काटा होता व बहुतकरून तो हल्लीच्या लिम्युलसप्रमाणे तळावरील गाळात स्वतःला खिळवून ठेवण्याकरिता व अन्न मिळवण्याच्या उद्देशाने आपल्या डोक्याने गाळ खणून उपसण्यासाठी ते वापरत असावेत. सिल्युरियन अखेरीपर्यंत (सु. ४२ कोटी वर्षांपूर्वीपर्यंत) ट्रायलोबाइटांची अतिशय भरभराट झाली, तदनंतर डेव्होनियनमध्ये त्यांचा जलदपणे ऱ्हायस झाला व पर्मियनअखेरीस (सु. २७ ते २४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या शेवटी) किंवा कदाचित ट्रायासिक (सु. २३ ते २० कोटी वर्षांपूर्वीच्या)काळाच्या सुरुवातीलाच कोणतीही वंशशाखा मागे न ठेवता ते निर्वंश झाले. 

आ. ३. काही ट्रायलोबाइट : (१) कॅलिमीन (ऑर्डोव्हिसियन-सिल्युरियन), (२) पॅराडॉक्साइड (मध्य कँब्रियन), (३) डायफॉन (सिल्युरियन), (४) फॅकॉप्स (ऑर्डोव्हिसियन-डेव्होनियन).

हेमिकॉर्डेटा-ग्रॅप्टोलिथिना : ग्रॅप्टोलाइट हे प्राणी कँब्रियन काळाच्या अखेरीस पृथ्वीवर अवतरले व सिल्युरियन काळाच्या शेवटी निर्वंश झाले [→ ग्रॅप्टोलाइट]. ते केवळ सागरी पर्यावरणातच आढळले आहेत. निर्वंश झालेल्या या प्राणिगटाच्या जीवविज्ञानातील स्थानाविषयी अल्पशीच माहिती आहे.  

मात्र कोझलोव्हस्की यांच्या संशोधनानुसार टेरोब्रॅंकच्या ऱ्हाब्डोप्ल्यूरा वंश हा ग्रॅप्टोलाइटांना सर्वांत जवळचा प्राणिगट आहे. ग्रॅप्टोलाइटांचे जीवाश्म सामान्यपणे शेल, शेली चुनखडक व सूक्ष्मकणी वालुकामय शेल या खडकांत आढळतात. हे जीवाश्म म्हणजे सूक्ष्म प्रावार वा कप्पे असलेले बारीक कार्बनीभूत दांडे (वृंत) असून त्यांना रॅब्डोसोम म्हणतात. ते ग्रॅप्टोलाइटच्या पॉलिपमध्ये (व्यक्तिगत जीवामध्ये) क्रमाने मांडलेले असतात व टेट्राग्रॅप्टसामधल्याप्रमाणे मध्य तबकडीला जोडलेले दांडे (रॅब्डोसोम) लोलकाप्रमाणे लोंबते असतात. ग्रॅप्टोलाइटांचा क्रमविकास प्रामुख्याने दोन दिशांनी झाला :  (१) दांड्यांची संख्या वाढत्या प्रमाणात ३२ पासून (उदा. क्लोनोग्रप्टस) एकापर्यंत (उदा., मोनोग्रॅप्टस) घटली आणि (२) रॅब्डोसोमांची ठेवण अधिकाधिक अपसारी होत जाऊन ती लोंबती होती त्याऐवजी आरोही किंवा उत्पन्न होत गेली [आ. ४ (आ)]. ज्यांच्या क्रमविकासात कमीअधिक प्रमाणात या दोन्ही दिशांनी सुसूत्र असे बदल झालेत ते ग्रॅप्टोलाइटांचे गट आसमंतातील परिस्थितीशी अधिक जुळवून घेणारे व प्रगतिशील असल्याचे दिसून आले. उलट ज्यांच्या क्रमविकासात वरीलपैकी एका दिशेतील बदल अधिक प्रमाणात झाले होते त्या वंशशाखांची अखेर लवकर  झाली व त्यांच्यापासून अगदी थोडेच भिन्न (परिवर्तित) प्रकार निर्माण झाले. वरील दोन दिशांतील सुसूत्र परिवर्तनाच्या जोडीने प्रावरभित्तींची संरचना हा परिवर्तनांमध्ये भर घालणारा तिसरा घटक होता. ग्रॅप्टोलाइट हे सवयीने उघड्या समुद्रात तरंगणारे व महासागरांतील प्रवाहांनुसार वाहत जाणारे गुच्छरूपातील निवह (समूहरूपी वसाहती) होते, असे त्यांच्यातील प्रावरभित्तींच्या संरचनांवरून सूचित होते. त्यांच्या अल्पायुष्याच्या इतक्या थोड्या कालावधीत त्यांचा एवढा विस्तृत प्रसार (फैलाव) कसा झाला, हे यावरून स्पष्ट होते. जलदपणे क्रमविकास होत जाऊन एकापाठोपाठ निर्माण झालेले प्रकार ऑर्डोव्हिसियन व सिल्युरियन कालीन थरांचे स्तरवैज्ञानिक उपविभाग पाडण्यास साहाय्यभूत ठरले,  कारण प्रत्येकातील ग्रॅप्टोलाइटांचे जीवाश्म-समूह वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ग्रॅप्टोलाइटांच्या या स्तरवैज्ञानिक उपयुक्ततेशिवाय त्यांच्या विस्तृत प्रसारामुळे दूरवर आढळणाऱ्या (उदा., स्कँडिनेव्हिया-स्कॉटलंड ते कॅनडापर्यंतचे ग्रॅप्टोलाइटयुक्त थर) शैलसमूहांचे सहसंबंध निश्चित करण्यास त्यांची मदत झाली आहे. ग्रॅप्टोलाइटांच्या जीवाश्मांमुळे पूर्वी ज्याला पूर्व सिल्युरियन (संघ) म्हणत असत त्याला ऑर्डोव्हिसियन संघ असा स्तरविज्ञानातील स्वतंत्र दर्जा प्राप्त झाला, कारण त्याच्यातील ग्रॅप्टोलाइट जीवाश्म हे मूळच्या उत्तर सिल्युरियन संघातील जीवाश्मांच्या मानाने अतिशय वेगळे आहेत. कँब्रियनच्या शेवटी व ऑर्डोव्हिसियन काळाच्या सुरुवातीस दांड्यांची संख्या कमी होण्याची व ते अपसारी होण्याची प्रवृत्ती ह्या ग्रॅप्टोलाइटांच्या क्रमविकासातील सर्वसाधारण पद्धती होत्या. उत्तर ऑर्डोव्हिसियन काळात दोन व चार शाखांचे आणि सिल्युरियन काळात दोन व एक शाखा असलेले वंश सामान्यपणे आढळत होते.  


प्रावारांच्या एक श्रेणी व द्विश्रेणी मांडणीची उपपत्ती अद्यापि चांगली कळलेली नाही, म्हणून ग्रॅप्टोलाइटांच्या  वंशामधील हल्ली  उल्लेखिले जाणारे जातिविकासाचे संबंध स्पष्ट झालेले नाहीत. 

आ. ४. (अ) काही ग्रॅप्टोलाइट : (१) मोनोग्रॅप्टस (सिल्युरियन), (२) डिप्लोग्रॅप्टस (ऑर्डोव्हिसियन), (३)डिप्लोग्रॅप्टस (एकत्रित जोडला गेलेला निवह) (आ) ग्रॅप्टोलाइटमधील रॅब्डोसोमांतील मांडणीत होत गेलेला क्रमवार (१ ते ५) बदल.

मेल्यानंतर ग्रॅप्टोलाइटांचे निवह बुडून समुद्रतळावर गेले. तेथे ते पुष्कळदा कार्बनयुक्त व पायराइटयुक्त काळ्या रंगाच्या खडकांत जोडीने आढळतात. त्यावरून तेथे अनॉक्सिजीवी (ऑक्सिजनरहित अवस्थेत जगण्याची) परिस्थिती सर्वसाधारणपणे अस्तित्वात होती, असे सूचित होते. ग्रॅप्टोलाइट प्राणिजातीच्या प्रसाराच्या दिशांचा काळजीपूर्वक अभ्यास केला, तर त्या प्राचीन काळातील महासागरी प्रवाहांच्या मार्गांचे नकाशे तयार करण्यास उपयुक्त ठरू शकतील. अशा तऱ्हेपने स्तरवैज्ञानिक उपयुक्ततेशिवाय ⇨ पुराभगोल आणि ⇨ पुरापरिस्थितिवाज्ञान यांच्या दृष्टीने ग्रेप्टेलाइट फार महत्त्वाचे आहेत. [→ ग्रॅप्टोलाइट]. 

सीलेंटेरेटा : (अँथोझोआ-झोअँथेरिया, पोवळे वा प्रवाळ). साध्या आधुनिक झोअँथेरियन पोवळ्याच्या [मॅड्रिपोरॅयन वा स्क्लेरॅरियन वा स्क्लेरॅक्टिनियन → पोवळे] चूर्णीय (कॅल्शियम कार्बोनेटयुक्त कॅल्केरिअस) संरचनेमध्ये बाह्य भित्ती वा अधिप्रावरक असते. त्या भित्तीची उदग्र दिशेत अरीय पद्धतीची सहा आद्य पटले मांडलेली असून ती सामान्यतः मध्यवर्ती कीलापर्यंत (स्तंभिकेपर्यंत) गेलेली असतात. त्यांच्यानंतर अधिकाधिक आखूड द्वितीयक, तृतीयक इ. पटले सहाच्या पटीत विकसित झालेली असतात आणि मध्यवर्ती पोवळीही क्षितिजसमांतर, कमीअधिक सपाट वा किंचित अंतर्गोल वा बहिर्गोल अशा व विविध प्रकारे मांडलेल्या भित्तीयोजिका (अपूर्ण, चूर्णीय क्षितिजसमांतर विभाजक पटले) या पत्रांच्या भागात कडेशी वाकलेल्या पटी (विभाजक पटले) व चक्रिका (चकती) हा बहिर्गोल पत्रांचा दुसरा जुडगा असतो. या सर्वांमुळे पुटिकामय संरचना निर्माण होते. सहा वा सहाच्या पटीत पटले असलेल्या पोवळ्यांच्या या गटाला हेक्झॅकोरॅलिया असेही म्हणतात.  

पुराजीवकालीन रूगोज (वलिवत) पोवळ्यांत मुख्य व विरोधी पटले विकसित झाल्यावर नंतरची पटाले दोन आद्य पटलांच्या दोन्ही बाजूंस जोडीजोडीने निर्माण झाली. त्यामुळे या प्रवाळांना द्विपार्थ सममिती (एकाच पातळीने शरीराचे दोन सारखे भाग होण्याची स्थिती) प्राप्त झाली. पार्श्विक मुकुलनाने म्हणजे जनकाच्या कटोरात मुकुल (कळीसारखा भाग) वाढून साध्या पोवळ्यांपासून संयुक्त पोवळी बनतात. जर एकेकटे प्रवाळ नाल (पोवळ्यातील व्यक्तिगत जीव स्वतःभोवती निर्माण करीत असलेले चषकासारखे कंकाल) एकमेकांपासून अपसारी असतील, तर त्यामुळे पोवळे डेंड्रोफायलमप्रमाणे शाखाकृती दिसते. प्रवाळ नाल एकत्रित येऊन घट्ट झाले असतील व प्रत्येकाची बाह्यरेखा टिकून राहिलेली असेल, तर संपुंजित प्रवाळ (उदा., थिकोस्मायलिया) बनते. संपीडनाने (दाबले जाऊन) अधिप्रावरक बहुभुजाकृती होतात (उदा., आयसॅट्रिआ). अधिप्रावरक नाहीसे झाल्यावर शेजारच्या प्रवाळ नालांची अरीय पटले व इतर संरचना एकमेकींमध्ये मिसळल्या जाऊन ताराकृती संरचना (उदा., थॅम्नॅस्टेरिआ) निर्माण होते.

आ. ५. काही पोवळी : (१) झॅफ्रेंटिस (डेव्होनियन), (२) लिथोस्ट्रॉशियन (कार्‌बॉनिफेरस), (३) ट्युबिपोरा (रीसेंट), (४) आयसॅस्ट्रिआ (ट्रायासिक-क्रिटेशस), (५) डेंड्रोफायलिया (तृतीय-रीसेंट), (६) को़डोनोफायलम (सिल्युरियन), (७) क्लॅडोकोनस (कार्‌बॉनिफेरस).

रूगोज पोवळ्यांपैकी झॅफ्रेंटिस गटाचे अतिशय तपशीलवार अध्ययन झाले आहे. अधिप्रावरक, पटले, पटी व चक्रिका यांसारख्या सांगाड्यातील घटकांचे संयोग आणि विकासाच्या स्वतंत्र अवस्था यांच्यामुळे पुराजीव काळात कित्येक वंशशाखा उदयास आल्या आणि त्यांची स्तरवैज्ञानिक उपयुक्तता मोठी असल्याचे आढळले आहे. अशा प्रकारे झॅफ्रेंटिसमध्ये पोवळ्याचा शंक्वाकार व पटले आणि पटी यांचा विकास झाला परंतु भित्तियोजिका निर्माण झाल्या नाहीत. कॅनिनियामध्ये झॅफ्रेंटिसमधील शंक्वाकार टप्प्यांनंतर दंडगोलाकार निर्माण होतो आणि पटले, पटी यांची व भित्तीयोचिकांचीही चांगली वाढ होते. ऑलोफायलममध्ये झॅफ्रेंटिसकॅनिनिया टप्प्यानंतर कडेवरील पट्ट्यांत बहिर्गोल चक्रिकांचा विकास होतो. पॅलिओस्मायलियामध्ये  पटी अतिशय बर्हिगोल होतात व त्या चक्रिकेत मिसळून जाण्याची प्रवृत्ती आढळते. लिथोस्ट्रॉशियनमध्ये कील विकसित झालेला असतो परंतु पटी वा चक्रिका अल्पच विकसित झालेल्या असतात. या व सिस्टिफायलम, तसेच इतर संजातीमधील (वंशशाखांमधील) विकासाच्या इतर दिशांवरून रूगोज पोवळ्यांना पुराजीव स्तरविज्ञानात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. पुराजीव काळातील रूगोजांप्रमाणे सांगाड्यातील घटकांच्या संयोगांना अनुसरून मॅड्रेपोरॅरियांचा विकास कित्येक दिशांनी झाला आहे.


हेटरोकोरॅलिया हा झोअँथेरियन पोवळ्यांचा एक लहान गट असून तो केवळ कार्‌बॉनिफेरस (सु.३५ ते ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या ) काळात आढळतो आणि त्यातील पोवळ्यांची पटले रूगोजप्रमाणे अरीय मांडणीची असतात. त्यांच्यात अधिप्रावरक नसतात परंतु पटी अतिशय बहिर्गोल असून कडेच्या भागात त्या इतक्या उतरत्या असतात की, त्यामुळे लागोपाठच्या पटींच्या कडा एकमेकींत मिसळून अधिप्रावरकाच्या जागी पातळ बाह्यभित्ती तयार झालेली असते.

केवळ पुराजीव काळात आढळणाऱ्या पोवळ्यांमधील सुटे प्रवाळ नाल हे साधे अरुंद नळीसारख्या संरचना असून त्यांना खालील दिशेत असणाऱ्या नसराळ्यासारख्या पटी व झोअँथेरियन पोवळ्यांतील पटलांच्या ऐवजी अनुदैर्घ्य कटक(लांबीच्या दिशेने असलेले उंचवटे) असतात. पार्श्वी दिशेत प्रवाळ नाल क्षितिजसमांतर तटकांनी जोडलेले असतात. पुराजीव महाकल्पातील प्रवाळभित्ती मुख्यत्वे पटीयुक्त प्रवाळांच्या बनलेल्या आहेत.

पटीयुक्त प्रवाळांची संरचना पुष्कळशी ॲल्शिओनेरियाच्या (किंवा ऑक्टोकोरॅलियाच्या) संरचनेसारखी आहे. तथापि ॲल्शिओनेरियाचे जावाश्म विरळाच आढळतात व त्याची उपयुक्तताही थोडीच आहे. पटीयुक्त पोवळ्यांचे रूगोज व मॅड्रेपोरॅरिया यांच्याशी असलेले संबंधही अनिश्चित प्रकारचे आहेत.

झोअँथेरिया ऑर्डोव्हिसियन काळात अवतरल्याचा निश्चित पुरावा उपलब्ध आहे, तर रूगोज पुराजीव काळाच्या शेवटी निर्वंश झाले. मॅड्रेपोरॅरियांच्या ट्रायासिक काळातील नोंदी गोंधळात टाकणाऱ्या आहेत आणि रूगोज व मॅड्रेपोरॅरिया यांच्यातील संबंध अनिश्चित स्वरूपाचे आहेत. पुराजीवाची अखेर ते मध्यजीवाचा प्रारंभ या संक्रमण काळात रूगोजांच्या विविध शाखांपासून मॅड्रेपोरॅरिया उत्पन्न झाले असण्याची शक्यता आहे.

हल्ली एकेकटे मॅड्रेपोरॅरियन पोवळे बहुतेक सर्व अक्षांशांमध्ये व निरनिराळ्या खोलीच्या पट्ट्यांत आढळते. बहुसंख्य १०० ते २,००० मी. खोलीच्या पट्ट्यात व काही त्याच्या पलीकडे आढळतात. खोल सागरात राहणाऱ्या प्रकारांच्या संरचना नाजूक व भंगुर असून त्यांच्यापैकी थोडेच नवजीव काला इतक्या आधीच्या व त्यापेक्षाही थोडे मध्यजीव काळात आढळतात.

सध्याची भित्ती निर्मिणारी पोवळी सागरी आहेत (याला थोडेच अपवाद आहेत). ती सागराचा किनारा ते सु. ३० मी. खोलीपर्यंतच्या मर्यासदित भागात व काही ५० मी. खोलीपर्यंत आढळतात. या भागातील तापमान २५ ते ३० से. असून पाणी स्वच्छ असते, म्हणून आधुनिक प्रवाळभित्ती अटलांटिकचा उष्ण कटिबंधीय भाग, हिंदी व पॅसिफिक महासागरांचा मध्य व पश्चिम भाग आणि अरबी समुद्र या भागांतच आहेत. उष्ण प्रवाहांच्या परिणामामुळे उष्ण कटिबंधीय भागाच्या बाहेरही त्या तयार झालेल्या आढळतात उदा., बहामा, फ्लॉरिडा व दक्षिण जपान येथील प्रवाळभित्ती. भित्तीनिर्मिणारी आधुनिक पोवळी ज्या मर्यायदांमध्ये राहत आहेत, त्या मर्यादांना प्राचीन काळातील प्रवाळभित्तींच्या बाबतीत पुराभूगोलीय व पुरापरिस्थितिविज्ञानीय दृष्टीने फार महत्त्व आहे. [→ पोवळे].

आ. ६. काही ब्रॅकिओपोडा : (१) ऑर्थिस (ऑर्डोव्हिसियन-सिल्युरियन), (२) स्पिरिफर (दोन्ही शकलांचा अंतर्भाग सिल्युरियन-पर्मियन), (३) प्रॉडक्टस (कार्‌बॉनिफेरस-पर्मियन), (४) ओबोलस (कँब्रियन), (५) लिंग्युला (ऑर्डोव्हिसियन-रीसेंट), (६) सायक्लोथायरिस-ऱ्हिंकोनेलिड (उत्तर जुरासिक-रीसेंट), (७) टेरेब्रॅट्युला (इओसीन-प्लायोसीन).

ब्रॅकिओपोडा : सर्व ब्रॅकिओपोडा सागरात राहणारे आहेत. त्यांचे कवच पृष्ठीन व मुखीन अशा दोन कपाटांचे (शकलांचे) बनलेले असून त्यांपैकी मुखीन कपाट नेहमी थोडे मोठे असते. ब्रॅकिओपोडाच्या इनार्टिक्युलेटा या वर्गामध्ये दोन्ही कपाटे पश्च कडेवर केवळ स्नायूंनी तर आर्टिक्युलेटा या वर्गामध्ये मुखीन कपाटातील दोन दात व पुष्ठीन कपाटावरील दोन खोबणी (उखळी), यांच्या बनलेल्या बिजागरीने जोडलेली असतात. या दोन कपाटांतून बाहेर आलेल्या वृंताने (देठाने) प्राणी तळावरील खडकाला चिकटलेला असतो. वृंत ज्यातून बाहेर पडतो त्या छिद्रामध्ये क्रमविकास होताना परिवर्तने झाली आणि या परिवर्तनांच्या आधारावर इनार्टिक्युलेटाचे अट्रेमाटा व निओट्रेमाटा आणि आर्टिक्युलेटाचे पॅलिओट्रेमाटा, प्रोट्रेमाटा व टिलोट्रेमाटा असे पद्धतशीर विभाग केले जातात. आर्टिक्युलेचटामधील स्पिरिफेरॅसिया व टेरेब्रॅटयुलॅसिया यांच्यात बाहूंना आधार देण्याकरिता वेटोळेयुक्त चूर्णीय बाहु-कंकाल म्हणजे स्पायरॅलिया निर्माण झाले होते. ब्रॅकिओपोडांच्या जीवाश्मरूप कवचांतील या सर्व आकारवैज्ञानिक वैशिष्ट्यांचे कपाटांच्या  विकासांची पद्धती, कपाटाच्या आतील बाजूवर उमटलेल्या स्नायूंच्या चिन्हांची तऱ्हा व त्यांच्या सूक्ष्मरचना यांच्यानुसार अध्ययन करणे शक्य असते व या अध्ययनाची या गटांचा जातीविकास व क्रमविकासाचा ओघ यांचा मागोवा घेण्यास मदत होते. ब्रॅकिओपोडा प्राणी जरी खडकाला चिकटून राहणारे असले, तरी डिंभावस्थेच्या (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या आणि प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्थेच्या) दीर्घ काळामध्ये त्यांचा प्रसार झाला असला पाहिजे व त्यामुळे त्यांचा प्रसार विस्तृत झालेला दिसतो.

जरी विविधता व संख्या यांच्या दृष्टीने ब्रॅकिओपोडा पूर्ण पुराजीव काळात हळूहळू विपुल होत गेलेले दिसत असले, तरी काही स्थानिक व अगदी लहान प्रदेशांचा अपवाद वगळता ते सामान्यपणे स्तरवैज्ञानिक सहसंबंध ठरविण्याकरिता उपयुक्त ठरले नाहीत. तथापि स्पिरिफर सिरिंगोथायरिसप्रॉटक्टस आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या ब्रॅकिओपोडांचा विशेषतः टेथिस समुद्रातील आल्प्स-हिमालय पट्ट्यात कार्‌बॉनिफेरस व पर्मियन काळात फार विकास व प्रसार झाला होता आणि तेथील थरांचे सहसंबंध ठरविण्यासाठी ते उपयुक्त आहेत. ज्यांची पुराजीव काळात भरभराट झाली असे बहुतेक ब्रॅकिओपोडा प्राणी पर्मियन काळाअखेर निर्वंश झाले. त्यांपैकी काही थोड्याच वंशशाखा मध्यजीव काळात टिकून राहिल्या होत्या व टिलोट्रेमाटा हा त्यांपैकी प्रमुख गट होय. अगदी थोडे स्फिरिफर गटाचे काही वंशज ट्रायासिक काळात जगण्याची धडपड करीत होते. जुरासिक (सु. १८. ५ ते १५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) व क्रिटेशस (सु. १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात टेरेब्रॅट्युलॅसिया व ऱ्हिंकोनेलॅसिया हे प्रमुख गट होते. नवजीव महाकल्पात ब्रॅकिओपोडांचा र्‍‌हास जलद झाला व हल्ली त्यांचे जास्तीत जास्त ६० वंश असून त्यांपैकी बहुसंख्य आर्टिक्युलेटा गटातील आहेत. लिंग्यूला, क्रेनिया डिसिना हे इनार्टिक्युलेटाचे वंश हल्ली आढळत असून ते ऑर्डोव्हिसियन काळापासून आतापर्यंत इतका आश्चर्यकारक दीर्घकाळ टिकून राहिले आहेत.


ब्रॅकिओपोडा आढळण्याचे प्रदेश सामान्यतः मॉलस्कांच्या (मृदुकाय प्राण्यांच्या) प्रदेशांशी निगडित असतात. बहुसंख्य इनार्टिक्युलाटा ओहोटीच्या पातळीपासून २० मी. खोलीपर्यंतच्या पट्ट्यात व उरलेले थोडेच १०० मी. खोलीपर्यंत आढळतात. आर्टिक्युलेटा सामान्यपणे १५ ते १०० मी. खोलीच्या पट्ट्यात तर टेरेब्रॅट्युला गटाचे प्राणी किनाऱ्यापासून १०० मी. खोलीपर्यंत आढळतात. ऱ्हिंकोनेलिड गटाचे प्राणी सर्व अक्षांशांत आढळतात पण बहुसंख्यांना थंड पाणी अधिक पसंत असून ते १५ ते १०० मी. खोलीच्या पट्ट्यात आढळतात. अशा प्रकारे गॅस्ट्रोपोडा आणि लॅमेलिब्रँकिया (शिंपाधारी) प्राण्यांप्रमाणे ब्रॅकिओपोडाही सागरातील अनुगमीर (खोलीनुसार असणाऱ्या प्राण्यांच्या वितरणाच्या बॅथिमेट्रिक) दृष्टीने महत्त्वाचे आहेत. [→ ब्रॅकिओपोडा].

आ. ७. काही एकिनॉयडीया : (१) बोथ्रिओसिडारिस (ऑर्डोव्हिसियन), (२) सिडारिस (जुरासिक-रीसेंड), (३) फायमोसोमा (कायफोसोमा) (मध्य जुरासिक), (४) डिस्कॉयडिया (क्रटेशस), (५) क्लिपिॲस्टर (मायोसीन-रीसेंट), (६) न्युक्लिओलाइट (मध्य जुरासिक-मध्य क्रिटेशस), (७) हेमिॲस्टर (क्रिटेशस-रिसेंट).

एकिनॉयडीया : (एकायनोडर्माटा). आधुनिक एकायनोडर्म (रेग्युलॅरिया) उदा., सिडारिस प्राण्याचे कवच गोलसर असून ते परिवलयाचे बनलेले असते.  एकाआड एक अशी पाच चरणार-क्षेत्रे (ज्यांवर नालपाद-नळीसारखे पाय-असतात अशी क्षेत्रे) व पाच अंतराचरणार-क्षेत्रे यांच्यात मांडल्या गेलेल्या काहीशा षट्‌कोणी अशा अनेक तकटांचे परिवलय बनलेले असते. प्रत्येक क्षेत्रामध्ये तकटांचे दोन स्तंभ असून ते खालच्या पृष्ठाच्या मध्यावरील परिमुखापासून वरच्या शीर्षचक्रिकेपर्यंत पसरलेले असतात. शीर्ष चक्रिकेवर एकाआड एक पाच जननांग पट्ट व पाच अक्षीपट्ट (दृष्टीशी निगडित असलेले पट्ट) असून मध्यभागी परिगुद असते. अशा प्रकारे कवचाची सममिती पंचतयी (पाच सारख्या भागांनी तयार झालेली) असते. चर्वणाशी संबंधित असलेला ‘ॲरिस्टॉटलचा कंदील’ कवचाच्या आत परिमुखीय छिद्रालगत असतो व त्याच्याभोवती परिहु-मेखला (वलय अथवा कडे) असून तिला वरील कंदिलाचे स्नायू जोडलेले असतात. [→एकिनॉयडिया].


इंग्लंडमधील ऑर्डोव्हिसियन कालीन खडकांतील बोथिओसिडारिस (बोथ्रिओसिडारॉइडा गण) व ऑस्ट्रियातील उत्तर ट्रायसिक कालीन खडकांतील टायरेकिनस (प्लॅसिओसिडारॉइडा गण) हेच तेवढे असे माहीत असलेले प्राचीन एकिनॉयडीया प्राणी आहेत की, त्यांना आधुनिक एकिनॉयडियाप्रमाणे चरणार तकटांचे दोन स्तंभ आहेत परंतु बोथ्रिओसिडारिसमध्ये अंतराचरणार तकटांचा एक स्तंभ व टायरेकिनसमध्ये तीन स्तंभ होते. त्यांच्या परिहनु-मेखला व ॲरिस्टॉटलचा कंदील या अवयवांसंबंधी काहीच माहिती नाही.

प्राचीन एकिनॉयडीया गटातील दोन गणांपैकी एकायनोसिस्टाँयडा हा गण फक्त सिल्युरियनमध्येच आढळतो. यात चरणार तकटांचे २ ते ४ स्तंभ असतात परंतु अंतराचरणार तकटांची मांडणी उदग्रऐवजी क्षितिजसमांतर स्तंभांच्या रूपात झालेली असते. अशा तऱ्हेरने कवचाची सममिती पंचतयी नसते. पेरिशोएकिनॉयडा गणाच्या प्राण्यांमधील चरणार व अंतराचरणार तकटांची संख्या २ ते २० असते व कवचाची सममिती पंचतयी असते. हे प्राचीन एकिनॉयडियाचे प्रमुख गट असून हे सिल्युरियन ते पर्मियनअखेरपर्यंत होते आणि आर्किओसिडारिस, मीक्रेकिनस, हायटेकिनस इ. त्यांच्यातील विपुलपणे आढळणारे वंश होत. वरील दोन्ही गणांमध्ये बाजू कललेल्या असलेला ॲरिस्टॉटलचा कंदील असतो पण परिहनु-मेखला नसते.

आधुनिक एकिनॉयडियांपैकी सिडारॉइडा गणाची सुरुवात कार्‌बॉनिफेरस काळातील मायोसिडारिस वंशापासून झाली व सिडारिस हा त्याचा प्रातिनिधिक वंश होय. त्याच्या प्रत्येक अंतराचरणार तकटावर मोठी गुलिका असते व तिच्याभोवती कणिका असतात वा नसतात. शिवाय त्याला वर्तुळाकार परिमुख, अंतर्गत क्लोम (कल्ल्यासारखे अवयव) व मूळची परिवलयी तकटे वरच्या बाजूस वळून बनलेल्या परिहनु-मेखलेला क्रियाकारी स्नायूंनी  जोडल्याने उदग्र झालेला ॲरिस्टॉटलचा कंदील ही असतात. काहीसा अपरिवर्तनशील असलेला हा गण आतापर्यंत हळूहळू बदलत गेला असल्याने त्यापासून फारसे परिवर्तित प्रकार निर्माण झालेले नाहीत.  

ट्रायसिकच्या सुरुवातीस सिडारॉइडा गणापासून आलेला डायडेमॉइडा गण अतिशय जोमदार होता. त्यात परिहनु-मेखलेच्या अडथळ्यामुळे परिमुखीय क्लोम बाहेरील बाजूला गेले होते. परिणामी परिमुख दशकोनी झाले. दोन वा अधिक आद्य तकटे एकजीव होऊन चरणार तकटे संयुक्त होऊ लागली, अंतराचरणार तकटांची उंची कमी झाली आणि सर्व तकटांवर गुलिकांच्या कित्येक ओळी निर्माण झाल्या. परिवलयाची सममिती पंचतयी होती पण परिगुद पाठीमागे (कडेला) सरकल्याने शीर्ष चक्रिकेची सममिती द्विपार्श्व झाली. फायमोसोमा, डायप्लोपोडिया, स्यूडोडायाडेमा, सॅलेनिया, हेमिसिडारिस हे या गणातील काही प्रातिनिधिक वंश आहेत. हा गण विशेष करून जुरासिक व क्रिटेशस काळांत अतिविपुल होता. सिडारॉइडा व डायडेमॉइडा यांना मिळून रेग्युलॅरिया म्हणतात. त्यांचा नवजीव महाकल्पात काहीसा ऱ्हास झाला व ते हल्ली टिकून राहिलेले आहेत. 

जुरासिकच्या प्रारंभी होलेक्टिपॉयडानंतर न्यूक्लिओलिटॉइडा व कॅसिडयुलॉइडा, पूर्व क्रिटेशसमध्ये स्पॅटँगॉयडा आणि उत्तर क्रिटेशसमध्ये क्लिपिॲस्ट्रॉयडा हे गण अवतरले. या सर्वांचा मिळून इर्रेग्युलॅरिया गट होतो. त्यांची वैशिष्ट्ये पुढील होत : लंबगोलाकार ते बदामासारखा आकार, कधीकधी पंचकोनी व द्विपार्श्व सममिती, खालचे पृष्ठ किंचित बहिर्गोल ते सपाट असलेला सामान्य शंक्वाकार वा अर्धगोलाकार, सर्व पृष्ठांवरील गुलिका असंख्य व लहान, शीर्ष चक्रिका जवळजवळ मध्याशी व परिमुख जवळजवळ मध्याशी किंवा काही स्पॅटँगॉयडामध्ये (उदा., हेमिॲस्टर, शिझॅस्टर, एपिॲस्टर इ.) अग्राकडे सरकलेले असते. चरणार क्षेत्रे होलेप्टिपॉयडामध्ये साधी, पण न्यूक्लिओलिटॉइडामध्ये पाकळीसारखी आणि स्पॅटँगॉयडामध्ये फक्त युग्मित चरणार क्षेत्रे पाकळीसारखी आणि स्पॅटँगॉयडामध्ये फक्त युग्मित चरणार क्षेत्रे पाकळीसारखी (उदा., हेमिॲस्टर, शिझॅस्टर), माक्रॅस्टरमध्ये काहीशी पाकळीसारखी (उदा., मायक्रॅस्टर) किंवा साधीही (उदा., होलॅस्टर) आढळतात, मात्र अयुग्मित अग्र चरणार क्षेत्र या सर्वांमध्ये साधे असते. वरच्या पृष्ठावरील चरणार स्पर्शकाद्वारे हे श्वसन करतात. त्यांच्यात परिमुखिय क्लोम, ॲरिस्टॉटलचा कंदील व परिहनु-मेखला नाहीशी झालेली असतात फक्त क्लिपिॲस्ट्रॉयडा व काही होलेक्टीपॉयडा यांमध्येच ऱ्हासपावलेली मेखला व कंदील टिकून राहिलेली असतात. शीर्ष चक्रिका व परिरेखा (शीर्षाकडून पाहिले असता दिसणारी कवचाची बाह्य रेखा) यांच्या दरम्यान परिगुद असते व कोन्युलससारख्या काहींच्या बाबतीत ते परिरेखेच्याही खाली असते.

हे सर्व गण जुरासिक व क्रिकेटशसमध्ये विपुल होते आणि आता समुद्रात राहत आहेत. स्पॅटँगॉयडा गण नवजीव महाकल्पात विपुल होता. दीर्घकाल इतिहास असलेले एकिनॉयडिया सामान्यपणे थरांचे सहसंबंध स्थूलपणे ठरविण्यास उपयुक्त आहेत परंतु मायक्रॅस्टरसारखे काही एकिनॉयडीया जीवाश्म कालदर्शक आहेत, तर काही बाबतींत मर्यादित क्षेत्रांतील शैलसमूहांचे उपविभाग पाडण्यास ते उपयुक्त ठरु शकतात.

एकिनॉयडिया बहुतकरून उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय असून समुद्रतटीय व उपसमुद्रतटीय पट्ट्यात ते विपुल असतात, त्यांच्या काही जाती अधिक खोल पाण्यातही आढळतात. एकिनॉयडिया हे जात्याच नितलस्थ प्राणी असून ते सामान्यपणे गाळवटी व चिखलयुक्त पाणी टाळतात मात्र क्लिपिॲस्टर, एंकोप, एकायनोकार्डियम, स्पॅटँगस इत्यादींच्या काही जाती खडकांत बिळे करूनही राहतात. [→ एकिनॉयडीया].

बायव्हाल्व्हिया : (मॉलस्का). याला लॅमेलिब्रँकिया, पेलिसिपोडा किंवा शिंपाघारी वर्ग असेही म्हणतात. ट्रायलोबिटा, ब्रॅकिओपोडा, स्पंज इ. केवळ सागरी प्राण्यांच्या अवशेषांबरोबरच बायव्हाल्व्हियांचेही सुरुवातीचे अवशेष सागरी खडकांत आडकांत आढळतात. त्यावरून बायव्हाल्व्हियांचीही उत्पत्ती सागरी पर्यारवरणात झाली, हे उघड आहे. ते आतापर्यंत मुख्यत्वे सागरी प्राणी आहेत पण गॅस्ट्रोपोडाप्रमाणे त्यांनी मचूळ व गोड्या पाण्याच्या परिस्थितीशीही जुळवून घेतले आहे. अँथ्रॅकोमाया आणि कार्‌बॉनिकोला हे कार्‌बॉनिफेरस काळातील वंश गोड्या पाण्यातील सर्वात आधीच्या बायव्हाल्व्हियांच्या वंशापैकी आहेत.


तळावरील गाळातून नांगराप्रमाणे उरकत जाऊन आपला मार्ग काढणारे बायव्हाल्व्हिया हे मुख्यत्वे नितलस्थ प्राणी असून त्यांतील काही समुद्रतळानजीक पोहू लागले आणि उघड्या सागरांत काही तलप्लावी  (मध्यम खोलीवर व पृष्ठालगतच्या पाण्यात राहणारे) व प्लवकजीवरूपीही (पाण्यावर तरंगणाऱ्या प्राण्यांच्या प्रकारचेही) झालेले आढळतात. पुष्कळ नितलस्थ गटांनी आपली जीवनप्रणाली बदलली व ते तात्पुरते वा कायमचे स्थायी (स्थिर) प्राणी बनले काही अधिक खोल जागी जाऊन जमीन उकरून मार्ग काढण्याची जीवनप्रणाली अधूनमधून अनुसरतात. फोलॅडोमायासारख्या काही

प्रकारांत शिंपा पूर्णपणे न मिटता त्यांच्या पश्च भागी फट निर्माण झाली. काही तळावरील खडकांत बिळे करून राहू लागले. उदा., लिथोफॅगस चुनकडकांत तर ⇨ फोलॅससॅक्सिकाव्हा टणक वाळूत आणि ⇨ टेरेडो पाण्यातील झाडांच्या खोडांत वा गोदीमधील बांधकामातील लागडांत छिद्रे पाडतात. ⇨ ऑयस्टर आपले कवच (शिंपा) सरळसरळ कठीण खडकावर चिकटवितात व त्यातून ऑयस्टर किनारे तयार होतात. पिनिडी, मायटिलिडी, मॉडिओलिडी, टेरिइडी या कुलांतील प्राणी सूत्रगुच्छ रज्जूने (चिवट तंतूंच्या जुडग्याने) तळावरच्या खडकाला जखडले असतात.

आ. ८. काही बायव्हाल्व्हिया : (१) आर्का (जुरासिक-रीसेंट), (२) इनोसेरॅमस (जुरासिक-क्रिटेशस), (३) ऑस्ट्रिया (ट्रयासिक-रीसेंट), (४) ग्लायसेमेरिस (क्रिटेशस-रीसेंट), (५) ग्रिफीया(पूर्व जुरासिक), (६) एक्झोगायरा (उत्तर जुरासिक-क्रिटेशस), (७) पिन्ना(कारबॉनिफेरस-रीसेंट), (८) नायथिया (क्रिटेशस), (९) पेक्टेन (क्लॅमिस)(कारबॉनिफेरस-रीसेंट), (१०) मायटिलस (ट्रायसिक-रींसेंट), (११) हिप्प्युराइट (उत्तर क्रिटेशस), (१२) व्हेनेरिसार्डीया(क्रिटेशस-रींसेंट), (१३) ट्रायगोनिया (ट्रायसिक-रिसेंट), (१४) व्हीनस (ल्पायोसीन-रीसेंट), (१५) फोलॅस (इओसीन-रीसेंट), (१६) फोलॅडोमाया (जुरासिक-रीसेंट).

पेक्टिनिडीमधील प्राणी प्रथम असेच जखडवून घेणारे होते पण नंतर ते मुक्त पोहणारे झाले. मूलतः बायव्हाल्व्हियांच्या शिंपेला पश्च स्नायूपेक्षा किंचित लहान अग्रीय स्नायू असलेला अग्र भाग होता. विविध प्रकारच्या जीवनप्रणालींमुळे शिंपेत परिवर्तने होतात. अशा प्रकारे तळावरील गाळातून उकरत जाण्यामुळे शिंपेच्या अग्र भागाची तसेच त्याच्या जोडीने अग्रीय स्नायूची वाढ मर्यादित होते. त्यामुळे असममिती वाढत जाऊन काही जातींच्या बिळे करण्याच्या प्रवृत्तीमुळे ती अतीशय वाढते व फोलॅसप्रमाणे शिंपा जवळजवळ दंडगोलाकार होते. जखडून राहणाऱ्या प्रकारांत अग्र बाजूवर सारखी ओढ पडत असल्याने शिंपेची अग्र बाजू व तिच्या बरोबर अग्रीय स्नायूचा ठसा वाढत्या  प्रमाणात अस्पष्ट होत जाऊन शेवटी शिंपा पाचरीसारखी होते व अग्रीय स्नायूच्या ठशाचा ऱ्हास होत जातो उदा., मायटिलस, टेरीया, पिन्ना वगैरे. ऑयस्टरांमध्ये सामान्यपणे डावी शिंपा सरळ तळाच्या खडकांवर तयार होते व तिचा बाह्याकार अतिशय ओबडधोबड होतो. सुट्या शिंपेचा मूळचा बाह्याकार पुष्कळसा टिकून राहिलेला असून ती केवळ झाकण्यासारखी असते. फक्त पश्च स्नायू प्रत्यक्ष कार्यक्रम असतो व बिजागरीचे काहीच काम उरत नसल्याने ती पूर्णतया ऱ्हास पावते. शिंपेमधील या बदलांबरोबर बिजागरीचा अग्र भाग दबला जाऊन विरल-दंती व इतर कित्येक वैविध्यपूर्ण विषम-दंती बिजागरी बनते. त्याचप्रमाणे ज्यांचा अग्र स्नायू अधिकाधिक दुर्बल झालेला आहे, अशा द्वि-अभिवर्तनी (दोन स्नायु-ठसे असलेल्या) शिंपांपासून एक-अभिवर्तनी (एक स्नायु-ठसा असलेल्या) शिंपा निर्माण होतात. ग्रिफीयाएक्झोगायरा आणि त्यांच्याशी निगडित असलेल्या प्राण्यांमध्ये वरची शिंपा सपाट किंवा अंतर्गोलही असते, मात्र खालची शिंपा अतिशय बहिर्गोल झालेली असून ककुद (चोचीसारखा दिसणारा भाग) पिळवटलेला वा कुंडलित असतो. रूडिस्टेसमध्ये न हलणारी (अचल) शिंपा उलट्या शंकूप्रमाणे वरच्या दिशेत वाढते व ती पोवळ्यासारखी दिसते आणि मुक्त शिंपा ही केवळ झाकण म्हणून असते व तिचा मूळ आकार जसाच्या तसा टिकून राहिलेला असतो. हिप्प्युराइटरेडिओलाइट ही यांची नमुनेदार उदाहरणे होत.


या विविध जीवनप्रणाली सभोवतालच्या परिस्थितीशी निगडित असतात आणि त्या पर्यावरणात राहणाऱ्या  शिंपांची सर्वसाधारणतः आकार व इतर वैशिष्ट्ये महत्त्वाची असतात. अशा प्रकारे जे बायव्हाल्व्ह प्राणी तळावरील गाळावर रांगतात किंवा तो उरकत पुढे जातात त्यांच्या दोन्ही शिंपा एकसारख्या बहिर्गोल असून त्यांचा कमाल बहिर्गोलपणा सामान्यपणे उंचीच्या मध्याच्यावर असतो आणि गाळ कापीत पुढे जाणे सुलभ व्हावे म्हणून शिंपांच्या कडा पाचरीच्या आकाराच्या झालेल्या असतात. पेक्टेन, इनोसेरॅमस इत्यादींप्रमाणे जे बायव्हाल्व्ह एका वा दुसऱ्या बाजूवर तात्पुरते विसावतात, त्यांची एक शिंपा दुसरीपेक्षा अधिक बहीर्गोल असते. जोरदार प्रवाह असणाऱ्या  भागात राहणारे बायव्हाल्व्ह सूत्रगुच्छाद्वारे तळाला जखडून राहतात, खडकाळ किंवा अन्यथा कठीण तळ असणाऱ्या भागातील बायव्हाल्व्ह ऑयस्टराप्रमाणे आपल्या शिंपा दृढ खडकाला संयोजक द्रव्याने सरळ चिकटवून टाकतात (ऑयस्टर समुद्रतटीय व उपतटीय पट्ट्यात असेच चिकटून राहिलेले असतात व तेथे शिंपायुक्त विस्तृत किनारे निर्माण झालेले असतात). पेक्टिनिडी व ग्लायसेमेरिस यांच्यासारख्यांच्या जवळजवळ वर्तुळाकार शिंपा मुक्तपणे पोहण्यास सोयीच्या असतात. पातळ, सपाटसर व जवळजवळ सममित असलेल्या शिंपा आणि तरंगण्याची जीवनप्रणाली एकमेकांशी संबंधित असतात. निनाल (नलिकाकार अवयव). सभोवतालच्या पाण्याबाहेर ठेवून प्राणी तळावरील गाळात बीळ करीत गेल्याचे पश्च फट असलेल्या शिंपावरून दिसून येत. समुद्रतटीय भागात जे बायव्हाल्व्हिया तळाला न चिकटता राहतात त्यांची शिंपा गोल दंडाकार, जड असते कारण या जडपणामुळे येथील क्षुब्ध स्थितीत लाटेबरोबर लोळण्यास सुलभ असल्याने ती तग धरून राहते खंड-फळीवरील (खंडाच्या किनाऱ्यालगतच्या कमी उताराच्या भागावरील) अधिक खोल भागात व त्यापलीकडील भागात अन्न मिळविण्याच्या स्पर्धेत शिंप्यांच्या जडपणाचा अडथळा नको म्हणून त्या पातळ व हलक्या बनलेल्या असतात.

बायव्हाल्व्हिया कँब्रियन कल्पाच्या आधीच्या काळात अवतरले व नंतर ऑर्डोव्हिसियन व सिल्युरियनपर्यंत त्याचा जलद विकास झाला परंतु उत्तर पुराजीव काळात त्यांची वाढ खास डोळ्यांत भरण्याइतकी झाली नाही.

पुराजीवकालीन बिजागरी असलेले प्रकार हे दात व खोबणी स्पष्ट नसलेले आदिम पॉलिओकाँच (पुरावंश) होते. त्यांच्या टेनोडोंट, ॲक्टिनोडोंट व टॅक्सोडोंट (बहुदंती) या सर्व वंशजांमध्ये अविभेदित अनेक दात व खोबणी होत्या. प्रमुख बदल बहुतकरून ॲक्टिनोडोंटमध्ये झाला व तो म्हणजे दातांची संख्या घटणे व ते बळकट होणे हा होय. युनिऑड बिजागरी डेव्होनियन काळात प्रस्थापित झाली. तिच्यात युनिओ, कार्डिनिया, अँथ्रॅकोमाया, कार्‌बॉनिकोला इत्यादींप्रमाणे ४ ते ५ दात असतात. ककुदाखालील आणखी दोन दातांची घट झाल्याने दोन संभाव्य दिशांत विकास झाला. अप्रगतशील दिशेने झालेल्या विकासात ट्रयगोनियाइडीप्रमाणे विरल-दंती बिजागरी आढळते. दुसऱ्या दिशेतील विकासामध्ये मूळ दातांच्या दोन्ही बाजूंना ककुदाखाली एक किंवा दोन पार्श्वीय दातांची (यांना प्रमुख दात म्हणतात) भर पडली आणि त्यापासून ट्रायासिकमध्ये प्रगतशील विषमदंती (किंवा विविध-दंती) बिजागरी असलेले प्रकार निर्माण झाले व त्यांच्यापासून मध्यजीव व नवजीव काळांत कित्येक विविधतापूर्ण प्रकार निर्माण झाले. ही बिजागरी असलेला गट हल्ली प्रमुख आहे. अर्थात टेक्सोडोंट, अक्सिनोडोंट व टेनोडोंट हे अविशेषित प्रकारही हल्ली अस्तित्वात आहेत.

मेगॅलोडोंटिडी, ट्रायगोनिइडी, पिनिडी, पेक्टिनिडी, मायटिलिडी इ. बायव्हाल्व्हियांची मचूळ पाण्यातील कुले डेव्होनियनमध्ये अवतरली व तेव्हापासून आजपर्यंत अखंडपणे ती विपुल प्रमाणात टिकून राहीलेली आहेत. ट्रायगोनिइडी हे कुल याला अपवाद असून ते जलदपणे ऱ्हासपावत आहे. यापेक्षाही दीर्घ काळ असलेली दोन कुले म्हणजे ऑर्डोव्हिसियनपासून आतापर्यंत असलेले लेडिडी व सिल्युरियनपासून आतापर्यंत असलेले न्यूकुलिडी ही होत परंतु या दीर्घ काळात त्यांच्यात फारच थोडा बदल झालेला दिसून येतो. ट्रायासिस अखेरच्या खंडानंतर जुरासिक व पूर्व क्रिटेशसमध्ये बायव्हाल्व्हिया अतिशय विपुल व विविध प्रकारचे होते. तेव्हापासून गॅस्ट्रोपोडांची संख्या त्यांच्यापेक्षा जास्त झाली. मात्र असे असले, तरी हल्लीच्या मॉलस्का जीवांमधील बायव्हाल्व्हिया हा महत्त्वाचा घटक आहे.

बायव्हाल्व्हियांची बहुतेक कुले दीर्घकालीन आयुर्मर्यामदेची असल्याने स्तरवैज्ञानिक सहसंबंध निश्चित करण्याच्या दृष्टीने त्यांची उपयुक्तता कमी आहे. तथापि पुष्कळ वंशांची अशी चांगलीच उपयुक्तता आहे उदा., पर्मियन व कार्‌बॉनिफेरसमध्ये मेगॅलोडोंट पर्मीयनमध्ये ॲव्हिक्युलोपेक्टेन विशेषतः जुरासिक व क्रिटेशसमध्ये ट्रायगोनिया जुरासिकमध्ये ग्रिफीया उत्तर जुरासिक व क्रिटेशसमध्ये एक्झोगायरा पूर्व क्रिटेशस, ऑलिगोसीन (सु. ३.५ ते २ कोटी वर्षांपूर्वीचा काळ) व मायोसीन (सु. २ ते १.२ कोटी वर्षांपूर्वीचा काळ) यांमध्ये ऑस्ट्रियाच्या काही जाती आणि क्रिटेशसमध्ये रेडिओलाइट, हिप्प्युराइट, इनोसोरऐमस, नायथिमा, मायटिलस पिन्ना.

जीवाश्मरूप शिंपांमधील बिजागरीची वैशिष्ट्ये, स्नायु-ठसे व प्रवार-रेखा यांच्या आधारे एम्. न्यूमायर व वुड्‌स यांनी वर्गीकरणाची पद्धती तयार केली. या पद्धतीने क्रमसूचक पातळीवर पडणारे विभाग जिवंत बायव्हाल्व्हयांच्या मऊ भागांना अनुसरून केलेल्या प्राणिवैज्ञानिक वर्गीकरणाशी बहुतकरून जुळतात. [→बायव्हाल्व्हिया].

गॅस्ट्रोपोडा : (मॉलस्का). गॅस्ट्रोपोडाचे कवच म्हणजे शंख होय व तो मूलतः शंक्वाकार असतो. त्याची सुरुवात पूर्व कँब्रियन काळातील स्टेनोथिका,  स्केनेला, पॅलॅक्मिया इत्यादींमधील बसकट टोपीसारख्या शंखाने झाली. या टप्यानंतर मध्य पुराजीव काळातील बेलेरोफोन व त्याच्याशी संबंधित गॅस्ट्रोपोडांच्या सपाट-सर्पिल कुंडलाकार शंखाचा टप्पा आला. मळसूत्रज कुंडल हा यानंतर झालेला संरचनात्मक विकास असून मळसूत्रज कुंडल हे शंखाचे सर्वांत सामान्यपणे आढळणारे स्वरूप आहे. शंखांचा आकार सामान्यपणे बिंबाभापासून (उदा., प्लॅनॉर्बिस) ते अतिशय निमूळता घुमटाकार (उदा., टरिटेला, एरिथियम, नेरिनिया) अशा व्यापक आकारमालिकेत आढळतो. शंखाचा आकार पुढीलप्रमाणेही असू शकतो : नॅटिकाटर्बोमध्ये गोलाकार, ट्रॉकसप्लुरोटोमॅरियामध्ये शंक्वाकार, कोनसमध्ये द्विशंक्वाकार, फ्यूसस आणि म्यूरेक्समध्ये चातीच्या आकाराचा, सायप्रियामध्ये संवलित, मर्चिसोनियालोक्सोनिमामध्ये बुटक्या मनोर्यामप्रमाणे. शंख बहुतकरून दक्षिणावर्ती (उजव्या तोंडाचा) कुंडलित असून फायसाप्लॅनॉर्बिसच्या काही जातींमधल्याप्रमाणे काही वामावर्ती (डाव्या तोंडाचा) प्रकारही माहीत आहे पण ते शंख विरळाच आढळतात. शंखामध्ये विकुंडलनाची (वलयांचा ऱ्हास होण्याची) प्रवृत्तीही आढळते. उदा., स्कॅफँडर, क्रेपिड्युला, हेलिओटिस, कॅलिप्ट्रिया, व्हर्मिट्स इत्यादी. वरवर पाहता पटेलांचा शंख जरी एखाद्या साध्या आद्य शंकूसारखा दिसत असला, तरी तो पूर्णपणे विकुंडलन झालेला शंख आहे.

स्पंज, ट्रायलोबाइट, ग्रॅप्टोलाइट, ब्रॅकिओपोडा इ. सर्वस्वी सागरी प्राण्यांच्या जोडीन आढळणारे गॅसट्रोपोडा हे सागरी जीव म्हणून कँब्रियनच्या प्रारंभी अवतरले. मुख्यत्वे सागरी असलेल्या गॅस्ट्रोपोडांनी मचूळ व गोडे पाणी या अधिवासांशी जुळवून घेतले आहे, तसेच विविध जलवायुमानीय (दीर्घकालीन सरासरी हवामानाची) स्थिती असलेल्या जमीन या अधिवासाशीही त्यांचे अनुकूलन झाले आहे. डेव्होनियन काळातील डेंड्रोप्युपा हा गोड्या पाण्यातील सर्वांत आधीच्या गॅस्ट्रोपोडांपैकी एक वंश असून फायसाअँप्यूलॅरिया यांचे आधीचे नातेवाईक हे कार्‌बॉनिफेरस काळातील गोड्या पाण्यातील गॅस्ट्रोपोडा होत.

सागरी पर्यावरणामध्ये गॅस्ट्रोपोडा हे मुख्यत्वे सागरी तळावर रांगणारे व तळावरील गाळ उरकत पुढे जाणारे नितलस्थ प्राणी आहेत. सागराच्या तळाजवळ ते पोहतात व उघड्या समुद्रात  ते तलप्लावी व प्लवकजीव म्हणूनही आढळतात. जीवनप्रणालीला अनुरूप असा जड किंवा हलका शंख निर्मिण्याची त्यांची प्रवृत्ती असते, तर हल्लीच्या न्यूडिब्रँकियांना शंखच नसतो.


सागरी पर्याणवरणामध्ये गॅस्ट्रोपोडा समुद्रतटीय पट्ट्यात अतिशय विपुल असून भरती-ओहटीच्या व प्रवाहांच्या तेथील जोरदार हालचालींमध्ये टिकून राहण्याच्या दृष्टीने त्यांचे शंख जड व बळकट झालेले असतात. नॅसा,  नॅसारिया, लिटोरिना, नेपच्यूनिया, स्ट्रॉँबस हे येथील सामान्य प्रकार असून खडकाला चिकटून राहणाऱ्या लिंपेट गटाच्या पटेलासारख्या प्रकारांचा शंख टोपीसारखा असतो व त्यामुळे लाटांनी ते वाहून नेले जात नाही. खंड-फळीवरील वरच्या सु.१५ ते ५० मी. खोलीपर्यंतच्या पट्ट्याला लॅमिनारियन व सु. ५० ते १०० मी. खोलीपर्यंतच्या पट्ट्याला नलिपोर पट्टा म्हणतात. तेथे जीवांची अतिशय गर्दी असून त्यांच्यात जीवन स्पर्धा फार तीव्र असते. अशा ठिकाणी अन्न मिळविण्याच्या स्पर्धेत जड शंख हा भारच होईल, तसेच या भागात लाटा व प्रवाह यांचे परिणाम फारच कमी होतात. त्यामुळे येथील गॅस्ट्रोपोडांचे शंख हलके बनलेले असतात. येथील सामान्य वंश पुढील होत : नॅसा, ट्रॉकस, रिसोला, टरिटेला, नॅटीका, बक्सिनम इत्यादी. येथे वारंवार आढळणाऱ्या प्राण्यांच्या प्रकारांमध्येही वाळू व चिखल यांविषयीची आवडनिवड स्पष्टपणे दिसू येते. खंड-फळीच्या पलीकडच्या वितलीय (साधारण २,००० ते ६,००० मी. खोलीच्या) भागात जीवांचे प्रमाण जलदपणे घटत जाते व येथील गॅस्ट्रोपोडांचे शंख अधिक पातळ व रंगहीन असतात.

आ. ९. काही गॅस्ट्रोपोडा : (१) बेलेरोफोन (सिल्युरियन-पर्मियन), (२) प्ल्युरोटोमारिया (ट्रायासिक-रीसेंट), (३) ट्रोकस (ट्रायासिक-रीसेंट), (४) नॅटीका (ट्रायासिक-रीसेंट), (५) टरिटेला (क्रिटेशस-रीसेंट), (६) सेरीथियम (क्रटेशस-रीसेंट), (७) म्यूरेक्स (इओसीन-रीसेंट), (८) फ्यूसस (क्रटेशस-रीसेंट), (९) कोनस (उत्तर क्रटेशस-रीसेंट), (१०) सायप्रिया (इओसीन-रिसेंट), (११) व्होल्युटा (इओसीन-रीसेंट), (१२) पटेला (जुरासिक-रिसेंट).

गॅस्ट्रोपोडा जरी अतिशय विविध प्रकारच्या संजातीचे असले, तरी त्यांचे शंख ज्या परिस्थितीत ते राहतात त्या परिस्थितीला अनूरूप अशा सामान्य आराखड्याचे असतात. म्हणून या दृष्टीने अभ्यास केला, तर शंखांना पर्यावरणीय महत्त्व आहे.

गॅस्ट्रोपोडांची संख्या व विविधता पुराजीव कल्पभर सावकाश पण सतत वाढत होती तरी प्रावारात पाणी येण्याजाण्याच्या मार्गासाठी असलेली प्रावारातील फट आणि तिच्याशी संबंधित अशी शंखांमधील द्वारकाच्या बाह्य ओष्ठातील खोबण (उदा., बेलेरोफोन, लोक्सोनिमा, प्ल्युरोटोमारिया, मर्चिसोनिया, यूओफॅलस इत्यादींमधील खोबणी) निर्माण होण्याच्या टप्प्यापलीकडे त्यांची प्रगती झालेली नव्हती. सध्याच्या सागरी कुलांपैकी ट्रोकिडी, लिटोरिनिडी, टर्बिनिडी, एपिटोनिइडी, टरिटेलिडी ही कुले उत्तर पुराजीव काळात अवतरली आणि ट्रायासिक काळानंतर त्यांची भरभराट झाली. ज्यांच्यात अग्र व पश्च नाल चांगले विकसित झाले आहेत असे सायफोनेट (निनालयुक्त) गॅस्ट्रोपोडा ट्रायासिकमध्ये आढळतात व तेव्हापासून गॅस्ट्रोपोडांतील हा प्रमुख गट बनलेला आहे.

आ. १०. नॉटिलॉइडिया : (१) नॉटिलस (ट्रायसिक-रींसेंट), (२) ॲट्युरिया (इओसीन).

सामान्यपणे दीर्घकालीन आयुर्मर्यादा असलेले गॅस्ट्रोपोडा स्तरवैज्ञानिक सहसंबंधांमध्ये उपयुक्त नसतात. तथापी काही वंश स्थानिक वा प्रादेशिक दृष्ट्या सूचक जीवाश्म म्हणून उपयुक्त असल्याचे आढळले आहेत. उदा., लोक्सोनिमा, प्ल्युरोटोमारिया, मर्चिसोनिया, यूओंफॅलस हे उत्तर पुराजीव काळात, अँथलिटा उत्तर जुरासिक काळात, फायसा उत्तर क्रिटेशस व इओसीन (सु. ५.५ ते ३.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात, गायसॉर्टीया इओसीनमध्ये, नेरिनिया उत्तर क्रटेशसमध्ये, गॅस्ट्रोपोडा बायव्हाल्व्हियांबरोबर अवतरले आणि त्यांच्याप्रमाणे गॅस्ट्रोपोडांची संख्या व विविधता यांत वाढ झाली परंतु मध्य क्रिटेशसरर्यंत गॅस्ट्रोपोडा बायव्हाल्व्हियांच्या मानाने गौण होते. तथापि तदनंतर गॅस्ट्रोपोडा मॉलस्कातील प्रमुख प्राणी होत गेले. नवजीव हा त्यांच्या विकासातील परमोत्कर्षाचा काळ असून प्लायोसीन (सु.१.२ कोटी ते ६ लाख वर्षांपूर्वीच्या) काळातील यांच्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त जाती असून अजूनही अस्तित्वात आहेत.

गॅस्ट्रोपोडा मुख्यत्वे उष्ण पाण्यात राहणारे असून जमिनीवरील व महासागरातील विशेषतः सध्याचे प्राणिजातींचे प्रदेश निश्चित करण्यासाठी त्यांची मदत होते. जुरासिक, क्रिटेशस व नवजीवन काळांतील गॅस्ट्रोपोडांची वाटणी पाहिल्यास ती अधिकाधिक प्रमाणात प्लायोसीन  अखेरीस प्रस्थापित झाली होती. ती आजच्या त्यांच्या प्रदेशासारखी होत गेलेली दिसते.

तंत्रिका वलयाचे (मज्जा-वलयाचे) स्वरूप, हृदयाचे स्थान व क्लोमांचे (कल्ल्यांचे) स्वरूप यांच्यावर गॅस्ट्रोपोडांचे मुख्य वर्गीकरण आधारलेले असते. त्यांपैकी कोणाचाच शंखांशी प्रत्यक्ष संबंध येत नाही. रेत्रिका (कायटिनी दातांच्या ओळी असलेली पट्टी) व प्रावारातील फटीचा विकास तसेच शंखांच्या मुखाची बाह्यरेखा बदलणाऱ्या पाण्याच्या मार्गासाठी असलेला निनाल आणि शंख न बनविण्याची प्रवृत्ती हे घटक गौण पातळीवरील मानले जातात. म्हणून गॅस्ट्रोपोडांच्या जीवाश्मांचा विचार करताना शंखाची सर्वसाधारण वैशिष्ट्ये आणि त्यावरील नक्षीकाम यांचा उपयोग वंश व जाती व या पातळ्यांवर काही अंशी कुलाच्या पातळीवर होऊ शकतो. [→ गॅस्ट्रोपोडा]

नॉटिलॉइडीया :  (सेफॅलोपोडा मॉलस्का). नॉटिलॉइडिया गटाचे प्राणी ऑर्डोव्हिसियन कल्पाच्या प्रारंभी किंचित वक्र व आखूड शंकूच्या रूपात अवतरले. या गटातील ⇨ नॉटिलसच्या फक्त दोन (कदाचित तीन) जाती हल्ली हिंदी-पॅसिफिक महासागरांच्या उष्ण कटिबंधीय भागात अस्तित्वात आहेत व त्यामुळे त्यांचे वर्गीकरण करणे अवघड झाले आहे. तथापि त्यांचे सामान्यतः पुढील तीन उपवर्ग मानले जातात : (१) एंडोसेरॅटॉयडिया व (२) ॲक्टिनोसेरॅटॉयडिया : हे दोन्ही ऑर्थोकोनिक ते सिर्टोकोनिक असून क्वचित त्यांचे कवच रुंद निनालिका व अंतर्गत चूर्णीय निक्षेप आणि निनालिकीय संरचना असणारे सैलसर कुंडलित असे असते आणि (३) नॉटिलॉइडिया : या उपवर्गातील कवच ऑर्थोकोनिक ते सिर्टोकोनिक असून ते सैलसर वा घट्टपणे कुंडलित असते. निनालिका जलदपणे अरुंद होत गेलेली असते आणि मुख्यत्वे मध्य पुराजीव काळातील गटांत अंतर्गत निक्षेप व निनालिकीय संरचना आढळतात. शेवटचा उपवर्ग नॉटिलॉइडियाचा प्रमुख गट असून त्यांपैकी काहींमध्ये शंखाच्या पृष्ठभागावर ओबडधोबड घड्या, फासळ्या व गाठी या रूपांत नक्षी निर्माण झालेली असते. साधी सीता हे एकूण नॉटिलॉइडियांचे वैशिष्ट्य असून ती सरळ अथवा ऑर्थोकोनिक व सिर्टोकोनिक कवचांतल्याप्रमाणे किंचित वक्र असते व नॉटिलससारख्या कुंडलित प्रकारांमध्ये स्थूलपणे एकसारखे एक-दोनच साधे खंड व पल्याण (खोगिराच्या आकाराचे भाग) पडलेले असतात. ॲट्युरिया, ॲट्युरॉइडियाहेर्कोग्लॉस या वंशांत खंड व पल्याण थोडेफार निमूळते असतात.


अरुंद कोटर, अंतर्गत व निनालिकीय संरचना यांच्यामुळे नॉटिलॉडियांच्या कवचाची उत्प्लावकतां (उद्धरणक्षमता) अल्प असते त्यामुळे ते मुख्यत्वे तरणक-नितवस्थ (सागराच्या तळालगत पोहणारे)  असले पाहिजेत आणि जीवश्मांवरून दिसणारा त्यांचा विसतृत प्रसार हा बहुधा त्यांच्या मृत्यूनंतर झाला असला पाहिजे. त्यांच्यापैकी पुष्कळ प्राणी वाहून दूर नेले जाऊन त्यांचा मूळ अधिवास जेथे नव्हता अशा तेव्हाच्या एखाद्या द्रोणीमध्ये साचले असावेत. म्हणून ते स्तरांचे सहसंबंध केवळ स्थूलपणे ठरविण्यासाठीच उपयुक्त असू शकतील व त्यांच्यापैकी काही प्राणी मर्यादित क्षेत्रांतील सहसंबंधासाठी अधिक उपयोगी ठरू शकतील.

अधिक रुंद कोटर आणि अंतर्गत निक्षेप व निनालिकीय संरचना यांचा अभाव यांच्यामुळे अधिक लांब ऑर्थोसेरॅटिड व उत्तर पुराजीव काळातील पुष्कळ कुंडलित नॉटिलॉइडिया यांची कवचे उत्प्लावक होती व त्यामुळे हे प्राणी पोहणारे असले पाहिजेत म्हणून त्यांच्या विस्तृत प्रसारामुळे ते दूरदूरच्या विविध द्रोणींमधील थरांचे सहसंबंध ठरविण्यासाठी उपयुक्त ठरले आहेत.

मध्य पुराजीव काळातील फ्रॅग्मोसेरस, गाँफोसेरस इत्यादींसारख्या काही आखूड ऑर्थोकोनिक नॉटिलॉइडांमध्ये अनुकूलता परिणामी यांचे द्वारक (मुख) लहान झाले आहे व ते तरंगत राहणारे प्राणी असले पाहिजेत. लिट्युआइट आणि ट्रोकोसेरससारख्या काही नॉटिलॉइडांमध्ये विकुंडलनाची प्रवृत्ती दिसून येते. शेवटच्या मलसूत्रज कुंडलित प्रकारांपैकी काही बहुधा नितलस्थ होते.

बहुतेक नॉटिलॉइडिया डेव्होनियन कल्पाच्या शेवटीच नष्ट झाले, काहींची कार्‌बॉनिफेरस व पर्मियन काळांत भरभराट झाली. उदा., ऑर्थोसेरस, फूर्डिसेरस, मेटॅकोसेरस, टेम्नोकायलस, व्हेस्टिनॉटिलस. त्यांच्यापैकी बहुतेक पुराजीव काळाच्या शेवटी निर्वंश झाले. ऑर्थोसेरॅटिडींपैकी ऑर्थोसेरसमिचेलिनोसेरस आणि टेनोसेरॅटिडी, ग्रिपोसेरॅटिडीलायरोसेरॅटिडी हे ट्रायासिकमध्ये आलेले कुंडलित नॉटिलॉइडिया होत. ग्रिपोसेरस, टेनोसेरस, पॅरानॉटिलस, क्लायडोनॉटिलस, प्ल्युरोनॉटिलसनॉटिलस या वंशांचा ट्रायासिक काळात विस्तृत प्रसार झालेला आहे. ट्रायासिकमध्ये अवतरलेला नॉटिलस वंश जुरासिक व क्रिटेशस काळांत जवळजवळ जगभर पसरला होता आणि पॅरासोनोसेरस, पॅरासायमॅटोसेरस, हेर्कोग्लॉसा, ॲट्युरॉइडियाहेमिनॉटिलस हे क्रिटेशस काळांतील काही प्रमुख प्रकार आहेत. नवजीव महाकल्पाच्या आधिच्या काळात नॉटिलॉइडियांचा अतिशय जलदपणे ऱ्हास झाला. ॲट्युरिया, सायमॅटोनॉटिलस, हेर्कोग्लॉसा, डेल्टॉइडोनॉटिलसनॉटिलस हे त्या काळातील सामान्यतः आढळणारे वंश होते. 

चतुर्थ (गेल्या सु. ६ लाख वर्षांच्या ) काळात केवळ नॉटिलस वंश जिवंत राहीला . त्याच्या दोन (कदाचित तीन) जाती हल्ली हिंदी-पॅसिफिक महासागरांच्या उष्ण कटिबंधीय भागातील ईस्ट इंडीज ते फिजी बेटांपर्यंतच्य प्रदेशात आढळतात. [→ नॉटिलॉइडिया].

  

ॲमोनॉइडिया : (सेफॅलोपोडा मॉलस्का). सरळ कवच अललेले बॅक्ट्रायटिस किंवा सैलसरपणे कुंडलित असे बॅरँडीओसेरस ज्या नॉटिलॉइड शाखेतील होत तिच्यापासून सिल्युरियनअखेरीस किंवा डेव्होनियन काळाच्या सुरुवातीस ॲमोनॉइड अवतरले. त्यांचे प्रारंभीचे कवच साधी सीता असलेले, सैलसर कुंडलित, साधे व नितळ होते व सीतांचे स्थूलपणे सारखे दोन खंड (मागील दिशेत बाक असलेले) व एक पल्याण (पुढील दिशेत बाक असलेला) असत (उदा., मायमोसेरस, ॲनार्सेस्टिसअगोनियाटाइट) अगोनियाटाइटात मात्र खंड व पल्याण बोथट टोकाचे असतात. मायमोसेरस अपरिवर्तनशील होते. ॲनार्सेस्टिस अगोनियाटाइट संजातींपासून आरारवैज्ञानिक (शारीरिक) वैशिष्ट्यांच्या विविध संयोगांद्वारे पुराजीव काळातील सर्व ॲमोनाइट उदयास आले. कवचाच्या घट्ट कुंडलनाने नाभी लहान होत गेली खंडांची संख्या वाढून खंड व पल्याण अधिक खोल होत गेले मंडलाचा (वलयाचा) छेद वर्तुळाकाराचा विवृत्ताकार ते अधर बाजूला निमूळता होत गेला व यामुळे डेव्होनियनच्या मध्यासच ॲमोनॉइड प्राण्यांत पुष्कळ विविधता आली होती. आर्सेस्टिस ग्लोयफिओसेरस अगोनियाटाइट प्रोलेकॅनाइट हे डेव्होनियनमधील अधिक महत्त्वाचे वंश होत. मेडलिकॉटिया, गोनियाटाइट, सायक्लोलोबस, पोपॅनोसेरस, टार्नाइट, ॲगाथिसेरस हे कार्‌बॉनिफेरस व पर्मियन काळांत अवतरलेल्यांपैकी महत्त्वाचे वंश होते. उत्तर पुराजीव काळात हे ॲमोनॉइड विपुल झाले व त्यांच्या विविध प्रकारांमुळे ते काळाच्या प्राणिजीतींपैकी प्रमुख गट होते.  

या सर्वांमध्ये व वस्तुतः बहुसंख्य अमोनॉइडांमध्ये नवीन खंड व पल्याण मंडलाच्या नाभीकडील (पृष्ठीन) कडेजवळ निर्माण झाले व अशा तऱ्हेने सर्वांत जुने व मोठे खंड व पल्याण अधर बाजूच्या जवळ असतात. तथापि जेफ्युरोसेरसबेलोसेरस शाखेत नवीन खंड व पल्याण नाभीच्या तसेच मुखीन कडेच्याही जवळ निर्माण होतात व  अशा प्रकारे सर्वांत जुने व मोठे घटक मंडलाच्या मध्य बाजूला असतात. अशा तऱ्हेने ही सीता बहुसंख्य ॲमोनॉइडांतील सीतांच्या तऱ्हेहून अतिशय वैशिष्ट्यपूर्ण तऱ्हेने वेगळी आहे. केवळ उत्तर डेव्होनियनमध्ये आढळणाऱ्या क्लायमेनिइडी कुलातील प्राण्याचे कवच फासळीदार, सामान्यतः अधर बाजूस अरुंद व निमूळते आणि बहुतेक ॲमोनाइडांमधल्याप्रमाणे मध्य स्थितीपासून मुखीन बाजूकडे जाण्याऐवजी निनालिका पृष्ठीन बाजूला असते. हयातीच्या या सुस्पष्ट आणि थोड्या कालावधीमुळे हे कुल स्तरवैज्ञानिक सहसंबंधनिश्चितीमध्ये फार उपयुक्त आहे.

पुराजीव काळातील बहुतेक ॲमोनॉइड पर्मियनच्या अखेरीस निर्वंश झाले फक्त पुढील तीन वंशशाखा व संजाती ट्रायसिकमध्ये टिकून राहिल्या : (१) प्रोलेकॅनाइट : हा अपरिवर्तनशील गट होय, (२) जेफ्युरोसेरस : हा गट प्रगतशील असून त्याची सीता-तर्हाल वैशिष्टपूर्ण होती आणि (३) ग्लायफिओसेरस : हा गट खूप जोमदार ठरला व त्यापासून संपूर्ण ट्रायसिक काळामध्ये विविध वंशशाखा उदयास आल्या. जेफ्युरोसेरस-बेलोसेरस : या शाखेची प्रवृत्ती कवचेचे अधर बाजूला निमुळती असणे आणि झालरयुक्त अनेक खंड व पल्याण निर्मिणे यांकडे होती. या शाखेचा परामोत्कर्ष उत्तर ट्रायसिक काळातील पिनॅकोसेरस या वंशात झालेला दिसतो. प्रोलेकॅनाइट :  या संजातीपासून मुख्यत्वे तीन  वंशशाखा निर्माण झाल्या. सेराटाइट-टोयरोलाइट-शास्टाइट गटातील प्राण्याचे कवच खडबडीतपणे फासळीदार व त्याचे मंडल बाजूने कमीअधिक चापट झालेले आणि पुष्कळ खंड व पल्याणामध्ये पल्याण पूर्णतया किंवा कधीकधी अल्प प्रमाणातच भेगा असलेले व खंड दंतुरित असतात. एकूण हा गट अपरिवर्तनशील होता. लेकॅनाइट-जिम्नाइट गटातील कवचे सामान्यतः नितळ होती. सीतांच्या तळभागामुळे खंड व पल्याण यांचे विभाजन झालेले होते. ट्रॅचिसेरस हा तिसर्याव शाखेचा नमुनेदार प्रतिनिधी असून या शाखेत सीतांच्या तळभागामुळे जटिलता निर्माण झाली होती कवचांवर नक्षी होती व मंडल-छेद विविध प्रकारचा होता. अशा प्रकारे हा गट सेराटाइटलेकॅनाइट गटांना तुलनेने अधिक प्रगतशील होता.


ग्लायफिओसेरस : ही संजाती प्रोलेकॅनाइटपेक्षा अतिशय जोमदार व प्रगत होती आणि तिच्यापासून प्रोलेकॅनाइटच्या शाखांना समांतर तीन वंशशाखा निर्माण झाल्या होत्या. अशा तऱ्हेने टिकायटीजची कवचे कमी प्रमाणात फासळीदार होती पण त्यांच्यातील सीतांची तऱ्हा जटील होती, ते मध्य व उत्तर ट्रायसिक काळाचे वैशिष्ट्य असून ते लेकॅनाइट-जिम्नाइट गटाशी तुल्य होत. ट्रॉपाइट हेही मध्य व उत्तर ट्रायासिक काळातील वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहेत. त्यांची कवचे अतिशय विविधतापूर्ण असून त्यांच्यामधील सीतांची जटील तर्हाह ही ॲमोनाइटातील वैशिष्टपूर्ण तऱ्हा आहे. त्यामुळे ते प्रोलेकॅनाइट संजातीमधील ट्रॅचिसेरस गटाशी तुल्य आहेत. आर्सेस्टिस शाखेतील कवचाचे सेराटाइटप्रमाणे कमी नक्षीदार होती. व त्यांच्यातील सीत जरी जटील होत्या, तरी त्या ट्रॉपाइटटिकयटीज गटांपेक्षा साध्या होत्या.  

आ. ११. काही ॲमोनॉइडिया : (१) गोनियाटाइट (कार्‌बॉनिफेरस), (२) सेराटाइट्स (ट्रायासिक), (३) फायलोसेरस (जुरासिक-क्रियेशस), (४) टरिलाइट (उत्तर क्रिटेशस), (५) हिल्डोसेरस (उत्तर ट्रायासिक), (६) हार्पोसेरस (उत्तर ट्रायासिक), (७) ॲकॅथोसेरस (उत्तर क्रिटेशस) (८) होप्लाइट (मध्य क्रिटेशस), (९) स्कॅफाइट (मध्य क्रियेशस).

ट्रायासिकमध्ये बहुसंख्य ॲमोनॉइडियांची अशी निरनिराळ्या दिशांनी भरभराट होत असताना काही अपरिवर्तनशील संजाती आणि प्रत्यावर्तन दर्शवीणाऱ्या शाखाही होत्या उदा., कोरिस्टोसेरस, काँक्लोसेरस, ऱ्हॅब्डोसेरस, पेरिप्ल्युराइट इत्यादींमधील विकुंडलनाची प्रवृत्ती अशा सर्व प्रवृत्ती ज्यात आढळतात तो ट्रयासिक कल्प ‘अमोनॉइडियांचे युग’ मानतात.

ट्रायासिक कळातील ॲमोनॉइडियांची बहुतेक कुले नष्ट झाली व ट्रायासिकनंतरचे ॲमोनाइडिया हे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मुख्यतः मोनोफायलाइट सिंबाइट-नॅनाइट या संजातींपासून निर्माण झाले.      

      मोनोफायलाइट संजातीपासून जुरासिक काळात उदयास आलेली अधिक महत्त्वाची कुले म्हणजे सायलोसेरॅटिडी, लायटोसेरॅटिडी आणि फायलोसेरॅटिडी ही होत. सायलोसेरॅटिडी कुलातील प्राण्यांच्या कवचावरील सीतांची तऱ्हा मोनोफायलाइटसारखी असून अधर बाजू गोलसर असलेला सायलोसेरस व चापट बाजूला असलेला श्लोथायमिया या वंशांत कवचावर फासळ्या व घड्या यांची नक्षी निर्माण झालेली आढळते. ते फक्त पूर्व जुरासिकमध्येच आढळतात. लायटोसेरॅटिडी कुलातील सीतांची तऱ्हाही मोनोफायलाइटसारखी असते पण पल्याण आणि खंड साधे होताना दिसतात कवचावर बारीक फासळ्यांची नक्षी होती व बदलत्या पण कमी तऱ्हेने नाभी अधिकाधिक मोठी होत गेली. जुरासिकमध्ये व विशेषकरून पूर्व व मध्य क्रिटेशस काळांत पुष्कळ अकुंडलित वंश या कुलापासून उदयास आल्याचे मानतात आणि मॅकोस्कॅफाइट, स्कॅफाइट, क्रायोसेरस, हॅमाइट, टरिलाइटबॅक्युलाइट हे त्यांपैकी अधिक लक्षात ठेवण्यासारखे वंश होत. फायलोसेरॅटिडी कुलात द्विचषकी पल्याण विकसित झाले. या कुलात पुष्कळ पल्याण व खंड होते अस्पष्ट फासळ्या किंवा पुसट घड्या व लहान नाभी होती. हे कुल क्रिटेशसच्या अखेरीपर्यंत टिकून होते व ते अपरिवर्तनशील असल्याने त्यात अत्यल्पच बदल झालेला आढळतो.

बहुतकरून नॅनाइटसारख्या संजातीपासून निर्माण झालेले ट्रायासिक नंतरचे इतर ॲमोनॉइडिया जगण्यासाठी पिरिस्थितीशी अतिशय दक्षपणे जुळवून घेण्याचा सतत प्रयत्न करीत होते व त्यांनी एकापाठोपाठ एक अशा  तऱ्हेने अनेक कुलांना जन्म दिला. या प्रत्येक कुलाचे आयुष्य अल्प होते व या थोडक्या कालावधीत त्यांचा विस्तृत प्रसार झाला. यामुले जुरासिक व क्रिटेशस काळांचे अल्प कालावधीचे व विशिष्ट प्राणिसमूह असलेले उपविभाग पाडण्याच्या दृष्टीने ही कुले सुयोग्य ठरली आणि त्यामुळे विविध द्रोणींमधील स्तरांचे निकटचे सहसंबंध ठरविणे शक्य झाले. त्यांच्यामधील विविधता ही त्यांच्यातील पुढील घटकांच्या कित्येक संयोगांमुळे आली होती. कवचावरील नक्षीचे प्रकार, मंडल-छेद, सीतांचे पल्याण व खंड यांचे निरनिराळ्या अनुक्रमाने होणारे विभाजन व त्यापासून बनलेले विविध प्रकार अशा अनेक घटकांच्या  संयोगामुळे या काळातील ॲमोनॉइडियांमध्ये इतकी विविधता आली होती.

या गटांचे पूर्व लायसमधील (जुरासिक कल्पाच्या सर्वांत आधीच्या विभागातील) अधिक महत्त्वाचे कुल एरिटिडी हे असून यातील परिवलयी ते चौकोनी प्रकारचे मंडल बदलून अरुंद वा अधर बाजूस निमुळते होत गेलेले होते. याच्यानंतर एकोसेरॅटिडी, डेरोसेरॅटिडी व पॉलिमॉर्फिडी ही कुले उदयास आली त्यांच्या कवचावरील फासळ्यांची वाढ आणि मंडल-छेदाचा उठावदारपणा ही सीतांच्या तऱ्हांपेक्षा अधिक ठळक होती. मध्य लायसमध्ये गोलसर मंडलाचे लिपारोसेरॅटिडी व तदनंतर दोरीसारखा विविष्ट कणा आणि कवचावर बळकट फासळ्या असलेले अमल्थिइडी हे कुल अवतरले.


हिल्डोसेरॅटिडी हा मध्य जुरासिक काळातील ॲमोनॉइडीयांचा प्रमुख गड होता. त्यांच्चा कवचावरील फासळ्या दात्राकार (चंद्रकोरीच्या आकाराच्या), कधीकधी मंडलाच्या मध्य बाजूवर छोटासा खळगा व अधर बाजूस कणा खोबण किंवा दोन्ही बाजूंना खोबणी असलेला कणा असे मंडल-छेद बहुधा जवळजवळ सपाट किंवा किंचित बहिर्वक्राकार होता. मध्य व उत्तर जुरासिक काळामध्ये स्फेरोसेरस, कॅडोसेरसपेरिस्फिंक्टिस आणि त्यांच्याशी संबंधित असलेले ॲमोनॉइडीया सर्व सामान्य होते त्यांच्या कालावधी पूर्ण जुरासिक कालीन ॲमोनॉइडियाच्या कालावधीपेक्षा काहीसा जास्त होता. स्फेरोसेरसकॅडोसेरस गटांतील प्राण्यांची कवचे अधर बाजूस रुंद आणि नाभी खोल व लहान होती. पेरिस्फिंक्टिस गटामधील कवचांची नाभी उथळ, मोठी होती व त्यावरील फासळ्यांचे अधर बाजूस फुटून दोन वा अधिक भाग झालेले होते तसेच मधूनमधून पुष्कळदा कवचांचे संकोचन झालेले आढळते.

होप्लिटिडी व ऑल्कोस्टेफॅनिडी ही पूर्व क्रिटेशस काळातील प्रमुख कुले होती. ऑल्कोस्टेफॅनिडी कुलामध्ये मंडल गोलसर, फासळ्या बळकट व नाभी रुंद होती. होप्लिटिडी कुलात कवचे विविध प्रकारची होती परंतु सर्वांच्या फासळ्या बळकट, साध्या वा दुभागलेल्या असून पुष्कळदा त्यांच्यावर गुलिकांच्या एक वा दोन ओळी असत बाजू किंचित बहिर्गोल आणि अधर बाजूवर बहुधा खोबणी, पण कधीकधी कणा असे.

ॲकँथोसोरॅटिडी हा मध्य क्रिटेशसमधील अतिशय प्रसार पावलेला व प्रमुख गट होता. यातील कवचावर अनेक बळकट फासळ्या व गुलिकांच्या कित्येक ओळी होत्या आणि पुष्कळदा मंडलाचा आडवा छेद चौकोनी व नाभी लहान होती. लायटोसेरॅटिडी कुलापासून आलेले अंकुडलित ॲमोनॉइडियाही मध्य क्रटेशसमध्ये सर्वसामान्यपणे होते. हे निरनिराळे अल्पकालीन ॲमोनॉइडिया गट होते, त्याच काळात बहेतेक सर्व क्रिटेशस काळभर आढळणारे डेस्मोसेरॅटिडी कुल अस्तित्वात होते. त्यांच्यातील कवचे मोठी, अधर बाजूस गोलसर व कमी नक्षीकाम असलेली होती. प्लॅसेंटिसेरॅटिडी हे जवळजवळ सर्व पूर्व व उत्तर क्रिटेशस काळात आढळणारे दुसरे महत्त्वाचे कुल असून त्यातील कवचाच्या बाजू किंचित बहिर्गोल, मंडल-छेद अधर बाजूस निमूळता होत जाणारा, अनेक जटिल खंड व पल्याण आणि पुष्कळदा पुसट व बुटक्या घड्यांची अस्पष्ट नक्षी त्यावर आढळते.

क्रिटेशसमध्ये ॲमोनाइडियांच्या कित्येक शाखा विविध दिशांनी विकसित होत असताना कमीअधिक प्रमाणात निगडित असलेल्या पुष्कळ संजातींमध्ये झालरी नष्ट होऊन व विभाजक रेषा अस्पष्ट होत जाऊन सीतांची तऱ्हा साधी होण्याकडे प्रवृत्ती होती. परिणामी या सर्व ॲमोनॉइडियांचे रूप ट्रायासिक काळातील सेरॅटिटॉइड या अपरिवर्तनशील गटातील शंखाप्रमाणे एकसारखे होत गेले. त्यांच्या एकत्रित गटाला स्यूडो-सेरॅटिटॉइड असे म्हणतात.

आ. १२. बेलेम्नाइट

अशा प्रकारे जुरासिक व क्रिटेशस काळांत विपुल व विविध प्रकारचे ॲमोनॉइडिया होते. ते जेथे साचत त्या द्रोणींदधील परिस्थितीत जलदपणे बदल होत गेल्याचे पुढील गोष्टींवरून दिसते. अल्पजीवी कुले व एकापाठोपाठ आलेले गट हे झपाट्याने बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचे प्रयत्न करित होते, हे निश्चित आहे. कवचाच्या विकुंडलनाची किंवा कमी घट्ट कुंडलनाची प्रवृत्ती आणि स्यूडो-सेरॅटिटॉइडांमध्ये ठळकपणे दिसून येणारी सीतांच्या तऱ्हा साध्या होत जाण्याची प्रवृत्ती यांच्यावरूनही परिस्थितीत सतत व झपाट्याने बदल होत गेल्याचे दिसून येते.

डेव्होनियनमध्ये (किंवा सिल्युरियनच्या शेवटी) अवतरल्यापासूनचा ॲमोनॉइडियांचा दीर्घकालीन इतिहास समृद्ध व विविधतापूर्ण आहे. तथापि क्रिटेशसच्या अखेरच्या काळात ते जलदपणे ऱ्हास पावत गेले आणि क्रिटेशसच्या अखेरीस निर्वंश झाले. त्यामुळे नवजीवन महाकल्पात पदार्पण करणारा त्यांचा वंशज शिल्लक राहिला नाही. [→ ॲमोनॉइडिया].

 

बेलेम्नॉइडिया : (सेफॅलोपाडा मॉलस्का). ऑक्टोपस, लोलिगो, सेपिया, स्पायरूला हे टेट्राब्रँकिएट सेफॅलोपाडा (शीर्षपाद) प्राण्यांचे हल्लीचे प्रतिनिधी असून जीवश्मांच्या दृष्टीने फक्त बेलेम्नॉइडिया गट महत्त्वाचा आहे. बेलेम्नॉइडियांच्या बाबतीत पश्चकवच (गार्ड) हा गजासारखा घटक भागच बहुतेक वेळा जीवश्मरूपात आढळतो. हे पश्चकवच अक्षाभोवतीच्या अरीय मांडणीच्या तंतुमय कॅल्साइटाच्या समाक्ष थरांचे बनलेले असते. याची पश्चबाजू निमुळती असते व त्याच्या अग्रस्थ टोकाजवळ शंकूच्या आकाराची पोकळी असते, तिला गर्त म्हणतात. तिच्यात आवृत्ती शंकू म्हणजे प्राण्याचे कोटरयुक्त कवच असते.

ट्रायासिकमध्ये किंवा पर्मियनअखेरीस ऑर्थोसेरॅटन संजातीपासून उत्पन्न झालेले ॲट्रॅक्टाइट आणि ओलॅकोसेरस हे वंश ट्रायासिक काळातील बेलेम्नाइटांचे प्रतिनिधी असून केवळ लांब आवृतशंकूच्या आदिकवचाचे म्हणजे प्राक्‌शंखाचे रक्षण करणारे छोटे पश्चकवच त्यांना होते. एका वंशशाखेत पश्चकवच जलदपणे वाढून जवळजवळ संपूर्ण कठीण संरचना त्याचीच बनली, तर लहान झाला. स्थूलमानाने यालाच बेलेम्नाइट म्हटले जाते. जुरासिक व क्रिटेशस काळांत याचा विस्तृत प्रसार झाला होता व स्थानिक किंवा मर्यादित भागांत त्यांची इतकी दाटी झालेली आढळते की, त्यावरून तेथिल निक्षेपाला बेलेम्नाइट शेल, बेलेम्नाइट मार्ल इ. नावे पडली आहेत. ते क्रिटेशसअखेर निर्वंश झाले.

बेलेम्नॉइडियाच्या नवजीव महाकल्पातील बेलोसेपियास्पायरूलिरोस्ट्रा या शाखांतील पश्चकवच हे आदिकवच आच्छादण्याइतके लहान झाले होते. ते जीवाश्मांच्या  दृष्टीने महत्त्वाचे नाही. ऑक्टोपसच्या शाखेमध्ये कवच किंवा पश्चकवच निर्माण झाले नाही म्हणून त्याच्या पूर्वेतिहासाचा पुरावा जीवाश्मरूपात टिकून राहिला नाही. [→ बेलेम्नाइट].

फोरॅमिनीफेरा : (प्रोटोझोआ-जिम्नोमाक्सा किंवा सार्कोडिना). बहुतेक फोरॅमिनीफेरा सागरात राहणारे आहेत. बहुसंख्य नितलस्थ असून पुष्कळ तलप्लावी प प्लवकजीव आहेत, ते मुख्यत्वे उष्ण व उपोष्ण कटिबंधातील राहणारे असून त्यांचा प्रसार मोठ्या प्रमाणात तापमान व पाण्याची खोली यांवर अवलंबून असतो. बहुसंख्य फोरॅमिनीफेरांना चोल (कवच) असतो. चोल कायटिनमय, वालुकामय, सिलिकामय किंवा चूर्णीय असतो. कायटिनमय चोल जीवाश्मरूपात टिकून राहत नाही. सभोवतालच्या वाळूचे कण अथवा फुटलेल्या शंखशिंपाचे बारीक कण विविक्षित तऱ्हेने चिकटविले जाऊन रचिलेले असे वालुकामय चोल बनलेले असतात. स्रवणाद्वारे बनलेला चूर्णीय चोल सर्वांत सामान्यपणे आढळणारा असून सिलिसिनिडी कुलातील, तसेच मचूळ पाण्यात किंवा समुद्रात खोल जागी राहणाऱ्या मिलिओलिडी कुलातील काही प्राण्यांचे सिलिकामय चोल स्रवणाने बनलेले असतात. अध्ययनाच्या सोयीसाठी फोरॅमिनीफेरांचे पुढील गट करता येतात.


(१) लॅगिनॉइड गट : या गटातील प्राण्यांच्या भित्तीमध्ये सूक्ष्म छिद्रे असतात व परावर्तित प्रकाशात पृष्ठभाग काचेसारखा दिसतो. लॅगिना हा एकपुटक वंश असून त्याचा चोल फुग्यासारखा किंवा नासपतीच्या आकाराचा असतो. अनेकपुटकी वंशातील पुटक किंवा कोटर नोडोसारिया वंशाप्रमाणे सरळपणे एकामागून एक निर्माण होत जातात किंवा किस्टलॅरियाप्रमाणे सपाट कुंडलाच्या रूपात निर्माण होतात अथवा रोटॅलियाप्रमाणे मळसूत्रजरूपात निर्माण होत जातात व त्यामुळे चक्राभ चोल बनतो व या चोलात आधीची सर्व कोटरे पृष्ठीन बाजूने दिसतात, तर फक्त शेवटचे मंडल मुखीन बाजूचे दिसते. हे सर्व प्रकार सूक्ष्म असून खडक निर्माण करणारे म्हणून ते महत्त्वाचे नाहीत. याला काही अपवाद आहेत. त्यांच्या विपुलतेमुळे हल्लीच्या खोल समुद्रातील ग्लॉबिजेरीना ऊझांसारखे निक्षेप बनले आहेत. उदा., उत्तर अमेरिकेतील उत्तर पुराजीव काळातील एंडोथायरा चुनखडक आणि उत्तर अमेरिका, रशिया, जपान, चीन इ. प्रदेशांतील उत्तर कार्‌बॉनिफेरस काळातील फ्युस्यूलिना चुनखडक.

आ. १३. काही फोरॅमिनीफेरा : (१) लॅगिना (उत्तर कँब्रियन-रीसेंट), (२) क्रिस्टलॅरिया (उत्तर क्रिटेशस-रीसेंट), (३) नोडोसारिया (सिल्युरियन-रीसेंट), (४) रोटॅलिया (मायोसीन-रीसेंट), (५) न्युम्युलाइट (इओसीन-ऑलिगोसीन), (६) स्पायरोक्लिपियस (इओसीन-पूर्व मायोसीन), (७) लेपिडोसायक्लिना (इओसीन-मायोसीन).

फोरॅमिनीफेरा कँब्रियनमध्ये अवतरले परंतु काही अपवाद वगळता त्यांच्या कार्‌बॉनिफेरस काळापर्यंत फारसा प्रसार झाला नव्हता. ट्रायासिकपासून ते विपुल होत गेले. पुराजीव काळात काचमय व वालुकामय प्रकारचे फोरॅमिनीफेरा हे मुख्य होत पण ज्यांना मोठे फोरॅमिनीफेरा म्हणतात त्यांची सुरुवात टेथिस समुद्रातील क्रिटेशस काळातील ऑपरक्युलिनासारख्या प्रकारापासून झाली व त्यांना जलदपणे महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले. त्यांचा विकास पुढील दोन शाखांत झाला : (न्युम्युलाइट ज्यापासून आले तो गट व (२) ऑर्बिटॉइड ज्यापासून आले तो गट.

ऑपरक्युलिनान्युम्युलाइटॲसिलिना गटात चोल सपाट कुंडलित रूपात विकसित होऊन त्यामुळे आधीची मंडले प्रथम कमीजास्त प्रमाणात व अखेरीस पूर्णपणे झाकली गेली. यातील पटले दुहेरी भित्तीची असून दोन्ही पत्रांच्या मध्ये नाल होता आणि स्तंभ या चूर्णी संरचनेतून नाल भागशः आरपार गेलेले नव्हते. हे स्तंभ बहुधा पृष्ठभागी सूक्ष्म गुलिकांच्या रूपात दिसतात आणि ते पृष्ठभागावरील नक्षीकामाचा एक घटक होतात. हे चोल बिंबाभ असतात. [→ फोरॅमिनीफेरा].  

फ्युस्युलिना, श्‍वागेरिना इत्यादीमधील कोटरे न्युम्युलाइट गटापेक्षा पुष्कळ रुंद असून आधीची बहुतेक कोटरे झाकलेली असून त्यामुळे तर्करूप (चातीच्या आकाराचा) चोल तयार होतो.

ऑपरक्युलिनाश्‍वागेरिनाहेटेरोस्टेगिनासायक्लोक्लपियस शाखेमध्ये कोटरांचे विविध आकारांच्या कोटरिकांमध्ये विभाजन झालेले असते. कोटरांची उंची परिधीय दृष्ट्या वाढत असतानाही त्यांचे कोटरिकांमध्ये विभाजन होते. त्यामुळे अधिक मोठ्या कोटरिकांच्या मध्य-चकतीच्या दोन्ही बाजूंना लहान कोटरिकांच्या मालिका तयार होतात.

उत्तर क्रिटेशस व तृतीय कल्पात विशेषतः मायोसीनपर्यंत न्युम्युलाइट ऑर्बिटॉइड गटांतील पुष्कळ मोठे फोरॅमिनीफेरा हे सूचक जीवाश्म आहेत व ज्या ठिकाणी खनिज तेलयुक्त थरांचे सहसंबंध ठरविणे अतिशय महत्त्वाचे आहे तेथील तेलाचा शोध घेण्याच्या दृष्टीने हे सूचक जीवाश्म म्हणून अतिशय महत्त्वाचे आहेत. न्युम्युलाइट, ॲसिलिना, ऑपरक्युलिना, र्बिटॉइड, ऑर्बिटोलिना, लेपिडोसायक्लिना, ग्लोबोरोटॅलिया, ग्लोबोट्रंकाना, डिक्टिओकोनायडीज, डिस्कोसायक्लिना, मायोजिप्सिना हे मोठ्या फोरॅमिनीफेरांचे अधिक महत्त्वाचे काही वंश होत.

(२) मिलिओलिड गट :  या गटातील फोरॅमिनीफेरांच्या भित्तींचे वैशिष्ट्य म्हणजे त्या अच्छिद्री (काही वंशांमध्ये आधीच्या अवस्थांत सच्छिद्र) असून त्यांचा पृष्ठभाग परावर्तित प्रकाशात पोर्सलीनसारखा दिसतो. कोटरे काहीशी रुंद आणि मिलीओला, ॲल्व्हिओलिना, ऑर्बिटोलाइट इत्यादींप्रमाणे आधीच्या कोटरांना जवळजवळ वेढणारी असतात. त्यामुळे एकूण चोल तर्करूप अथवा जाडसर बिंबाभ दिसतो. कार्नुस्पायरा या सपाट-सर्पिल कुंडलित नलिकेच्या टप्प्यापासून सुरुवात होऊन स्पायरोलॉक्युलिना, क्विंक्वेलॉक्युलिना, ट्रायलॉक्युलिना, बायलॉक्युलिना यांच्यामध्ये लांबट कोटरे थोड्या कालावधीने एकामागून एक निर्माण होत जातात. पेनेरोप्लिस-ऑर्बिक्युलिना-ऑर्बिटोलाइट या दुसऱ्या मालिकेत लॅगिना सजातींच्या ऑर्बिटॉइड गटाप्रमाणे कोटरिका निर्माण होतात, म्हणून या दोन शाखांच्या विकासाचे टप्पे सारखे आहेत. मिलिओलॉइड संजातीमधील प्राणीही सूचक जीवश्म म्हणून उपयुक्त असून मिलिओला, ऑर्बिटोलाइट, ॲल्व्हिओलीना हे खडक निर्माण करणाऱ्या (उदा., इओसीन काळातील ) वंशांपैकी अधिक महत्त्वाचे वंश होत.

(३) वालुकामय गट : क्वॉर्ट्‌झ, स्पंजांच्या कंटीका आणि इतर प्राण्यांच्या कवचांचे तुकडे यांचे कण एकत्रित आणले जाऊन व विशिष्ट प्रकारच्या रचना करून ते चिकटविले जाऊन, या गटातील फोरॅमिनीफेरांचे चोल बनतात. हे बाह्य कण निवडताना व त्यांची मांडणी करतानाही अनेक वेळा बरेच तारतम्य दाखविल्याचे दिसून येते. या कणांना एकमेकांशी जोडणारे संयोजक द्रव्य किंवा लुकण कायटिनमय, लोहमय, चूर्णीय अथवा सिलिकामय असते. उष्ण कटिबंधात उथळ पाण्यात राहणाऱ्या काही चोल प्रकारांत चूर्णीय लुकण असते, तर मचूळ व खोल पाण्यातील काही प्रकारांत (उदा., सिलिसिनिडी कुलातील) सिलिकामय लुकण असते.

जे. ए. कुशमन यांच्या विचारप्रणालीनुसार वालुकामय चोल आदिम (प्रिमिटिव्ह) वैशिष्ट्य आहे कारण हे प्रकार स्रवणाद्वारे चोल बनविण्यास असमर्थ होते, असे मानतात परंतु जे. जे. गॅलोवे यांच्या मतप्रणालीनुसार सॅकमिनिडी, ॲस्ट्रोऱ्हायझिडी इत्यादींसारख्या काही कुलांचे वालुकामय चोल हे आदिम वैशिष्ट्य असतेच. शिवाय पर्याजवरणाशी जुळवून घेण्यासाठी किंवा कवच स्रवण्याची क्षमता ऱ्हास पावली वा कमी झाली म्हणून प्रगत कुलांमध्येही वालुकामय चोल निर्माण झाल्याचे आढळते. अवशेष रूपात टिकून राहणाच्या दृष्टीने वालुकामय चोल अयोग्य असल्याने अधिक जुन्या शैलसमूहांमध्ये ते विरळाच आढळतात.


काही वालुकामय फोरॅमिनीफेरांमधील चोलांची संरचना ही लॅगिना संजातीमधील संरचनेसारखी असते. उदा., सॅकमिनातील लॅगिनासारखी, रिओफॅक्समधील नोडोसारियासारखी व ट्रोकॅमिनातील रोटॅलियासारखी असते. [→ फोरॅमिनीफेरा].

आ. १४. काही ऑस्ट्रॅकॉडा : (१) सायथेरिडिया (डाव्या बाजूला डावे शकल-बाह्य दृश्य व उजव्या बाजूला उजवे शकल-अंतर्गत दृश्य जुरासिक-रीसेंट), (२) सायथिरे (उजव्या बाजूला अधर दृश्य, डाव्या बाजूला उजवे शकल- अंतर्गत दृश्य जुरासिक-रीसेंट), (३) सायप्रिडिया (वरील बाजूस डावे शकल-अंतर्गत दृश्य, खालील बाजूस उजवे शकल-बाह्य दृश्य उजव्या बाजूला अधर दृश्य उत्तर जुरासिक-ऑलिगोसीन), (४) सायप्रिस (पृष्ठीय व पार्श्व दृश्य इओसीन-रीसेंट).

ऑस्ट्रॅकॉडा : (क्रस्टेशिया, आर्थ्रोपोडा). हे सूक्ष्म प्राणी पृष्ठवर्मात (ढालीसारख्या संरचनेत ) झाकले गेलेले असतात. पृष्ठवर्माची दोन शकले असून ती पृष्ठीन बाजूला लवचिक बंधाने किंवा दात व कटक यांच्या अंतर्बंधनाने एकमेकांना जोडलेली असतात. या शकलांची हालचाल त्यांच्या मध्यालगत अग्र बाजूला असलेल्या अभिवर्तनी स्नायूंद्वारे होते. पृष्ठवर्म चूर्णीय, फॉस्फेटी किंवा अचूर्णीय कायटिनमय द्रव्याचे असू शकते. ते सामान्यतः १ मिमी. पेक्षा कमी व क्वचित ५ मिमी.पर्यंत लांब असते. त्याची बाहेरची बाजू गुळगुळीत वा विविध प्रकारचे नक्षीकाम असलेली असते. ऑस्ट्रॅकॉडांच्या बहुतेक जीवाश्मांमध्ये बिजागरीची रचना, नक्षीकाम, अभिवर्तनी स्नायूंचे ठसे व कधीकधी ज्यांमुळे उपांगांची हालचाल होते त्या स्नायूंचे ठसे टिकून राहिलेले आढळतात. 

बहुतेक ऑस्ट्रॅकोडा जलचर असून त्यांचे जवळजवळ सर्व प्रकारच्या जलीय परिस्थितींशी अनुकूलन झालेले आढळते उदा., नदी, गोड्या पाण्याचे सरोवर व डबकी, तसेच समुद्र, नदीमुख, खारे सरोवर, पाणथळ भाग, शिवाय गंधकयुक्त झरे यांसारख्या विविध प्रकारची लवणता असलेल्या जलीय स्थितींत ते राहतात. काही जमिनीवरही राहणारे आहेत उदा., मेसोसायप्रिस टेरेस्ट्रिॲलिस (आफ्रिकेतील क्निस्नवन). हे बहुतेक रांगणारे वा बीळ करून राहणारे नितलस्थ प्राणी असून काही तलप्लावी आहेत, तर काही समुद्राच्या तळाजवळ व तेथील वनस्पतींमधून थोडे अंतर पोहून जाणारे आहेत. सूक्ष्मकणी गाळ व विपुल जैव अन्न असलेल्या भागांत हे सर्वसामान्यपणे आढळतात आणि भरड वाळू व जोरदारपणाने वाहणाऱ्या नद्यांसारख्या अस्थिर स्थितींमध्ये ते विरळच आढळतात. नदीमुखीय परिस्थितींमध्ये ते फोरॅमिनीफेरांच्या संदर्भात पूरक असे प्राणी असून अशा प्रकारे त्यांच्या साह्याने समुद्रकिनाऱ्याचे स्थान दाखविता येते आणि त्यामुळे समुद्राचे  आक्रमण व माघार यांची व्याप्ती दाखविण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रॅकॉड प्राणी उपयुक्त असतात. चूर्णीय फोरॅमिनीफेरा असलेल्या गाळात ते ऑस्ट्रॅकॉडा बहुधा नसतात आणि कोनोडांटा असलल्या गाळात ते आढळत नाहीत. विविध खोलींवर व भिन्नभिन्न अक्षांसामध्ये ऑस्ट्रॅकॉडांचे नियंत्रण बऱ्याच प्रमाणात तापमानाच्या मर्यादांद्वारे होत असते.  

अशा प्रकारे निक्षेपणाच्या परिस्थितीशी ऑस्ट्रॅकॉडांचा निकटचा संबंध असतो आणि पर्यावरणाद्वारे नियंत्रित होणाऱ्या ऑस्ट्रॅकॉडांच्या स्वरूपामुळे खनिज तेलाच्या पूर्वेक्षणाच्या दृष्टीने ऑस्ट्रॅकॉडा हा प्राणीगट अतिशय महत्त्वाचा असल्याचे आढळून आले आहे. [→ आर्थ्रोपोडा].

कोनोडोंटा : कोनोडोंटा अवशेष म्हणजे साध्या अथवा जटिल सूक्ष्म संरचना असून त्यांचे आकारमान ०.१ मिमी. पेक्षा कमी व ४ मिमी. पेक्षाही जास्त असू शकते. रासायनिक व प्राकृतिक झीज होण्याला हे अवशेष काहीसे कणखर असून ते दुधी काचेसारखे पारभासी व अंबराप्रमाणे उदी रंगाचे असतात. वातावरणाची क्रिया झाल्यावर ते अपारदर्शक व करडे ते काळे होतात. त्यांचे माशांच्या दातांशी खूप साम्य असून दीर्घ काळापासून त्यांचा अभ्यास तसेच मानून झाला होता. वलयी (ॲनेलिडा) प्राण्यांच्या जबड्याचा भाग, आर्थ्रोपोडाच्या कंटिका, कृमीसारखा प्राण्यांच्या मैथुन-कंटिका, शैवालांनी स्रवलेल्या दंतुरित संरचना, गॅस्ट्रोपोडांचे रेत्रिकीय दात व मिसूरी येथील ऑर्डोव्हिसियन कालीन आर्किओग्नॅथस या संभाव्य माशाचे दात म्हणजे कोनोडोंटा होत, असेही मानले गेले होते परंतु माशांचे दात [सी. एच्. पँडर (१८५६), के. ए. त्सिटेल व जे. व्ही. रोहन (१८८६)] व वलयी प्राण्यांच्या जबड्यांचे भाग [एच्. डब्ल्यू. स्कॉट (१९३४) एच्. श्मिट (१९३४ आणि एफ्. एच्. टी. ऱ्होड (१९५४)] ही दोन स्पष्टीकरणे अधिक संभाव्य समजली जातात.


आ. १५. काही कोनोर्डोटा : (१) स्कोलोपोडस, (२) ओझोर्कोडिना, (३) बेलोडिना, (४) स्यूडोपॉलीग्नॅथस.

कोनोडोंटा ह्या अंतर्गत किंवा बाह्य सांगाड्याच्या संरचना आहेत हेही अजून प्रस्थापित झालेले नाही परंतु बहुधा त्या कोणत्या तरी ऊतकांच्या (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांच्या) आत जडविलेल्या होत्या असे दिसते.

पुराजीव कालीन गाळात कोनोडोंटा विपुल असून ट्रायासिकमध्ये त्यांच्या ऱ्हासास सुरुवात झाली. क्रिटेशस काळानंतर ते आढळतात की नाही याविषयी निश्चित काही सांगता येत नाही. कोनाडोंटा चुनखडकांत विपुलपणे, शेलांमध्ये सामान्यपणे, पण गाळवटी खडकांत व  वाळूत विरळपणे आढळतात. ते ज्या खडकांत आढळतात त्याचा प्रकार व त्यांच्याबरोबर आढळणारे इतर जीवाश्म यांच्यावरून कोनोडोंटा हे सागरी, बहुतकरून तलप्लावी प्राण्याच्या शरीराचे भाग असावेत असे दिसते. ज्या समुदायांत ते आढळतात त्यांपैकी काहींमधील महत्त्वाच्या घटकांतील असममितीवरून (असमानतेवरून)ते ज्या प्राण्यांशी निगडित होते त्यांपैकी काही प्राणी तरंगत्या निवाहांच्या स्वरूपात राहत असावेत असे दिसते.

कोनोडोंटा कोणत्या प्राणिगटाशी संबंधित होते व त्यांनी त्या प्राण्याच्या शरीरात कोणते कार्य केले याची आपल्याला माहिती नसली, तरी विशेषकरून पुराजीव कालीन थरांमधील मुख्यत्वे समुदायाच्या रूपातील त्यांच्या विपुलता ही जैव स्तरवैज्ञानिक कार्या ला उपयुक्त आहे. ते ज्या संभाव्य तलप्लावी पर्यावरणातून बुडून समुद्रतळावर गेले ते पर्यावरण कोणते असावे, हे या विपुलतेद्वारे सूचित होते. रासायनिक विद्राव व प्राकृतिक अपघर्षण (झीज) यांना विरोध करण्याच्या गुणांमुळे त्यांचे पुनरावर्तन झाले असण्याची शक्यताही ते ज्या गाळात असतात तो साचण्याची परिस्थिती स्पष्ट करताना नेहमी लक्षात ठेवली पाहिजे.

चुनखडक, सूक्ष्मकणी शेल व ग्रॅप्टोलाइटयुक्त काळे शेल अशांसारख्या खोल पाण्यात साचणाऱ्या  खडकांत कोनोडोंटा सामान्यतः आढळतात, असे सूचित होते परंतु दगडी कोळशाचे थर असलेल्या चुनखडकांतही (उदा., इंग्लंडमधील कारबॉनिफेरसकालीन) ते आढळतात आणि त्यावरून ते उथळ पाण्यातही साचल्याचे दिसून येते. पायराइट, ग्लॉकोनाइट व फॉस्फोराइट ही खनिजे पुष्कळदा कोनोडोंटाबरोबर आढळतात व त्यांच्यावरून नितलस्थ प्राण्यांना प्रतिकूल अशी क्षपणकारी (ऑक्सिजन कमी प्रमाणात असणारी किंवा त्याचा अभाव असणारी) परिस्थिती त्या द्रोणीत असल्याचे सूचित होते.

आ. १६. मार्ग-चिन्ह जीवाश्म : (१) आर्थ्रोपोडिक्नस, (२) ऑनिस्कॉयडिक्नुआ, (३) स्कॅलॅरिट्युबा, (४) काँड्राइट. (१ व २ हे रआर्थोपोडांच्या पावलांचे ठसे असून ३ व ४ ही पष्ठाखालील स्तरणाला अनुसरुन असलेली बिळे आहेत).

मार्ग-चिन्ह द्रीवाश्म : जीवाश्मांच्या या गटात प्राण्यांच्या पावलांचे ठसे, वाटचालीच्या खुणा, बिळे, त्यांनी पाडलेली छिद्रे इ. येतात. प्राण्यांच्या कृतीचे प्रतीबिंब या जीवाश्मांत पडलेले दिसते. अगदी भिन्न गटांतील प्राण्यांकडून सारखे किंवा अगदी सारखे मार्ग-चिन्ह जीवाश्म निर्माण झालेले असू शकतात. त्यामुळे या गटातील जीवाश्मांचे अध्ययन करताना वापरलेल्या वंशवाचक व विशिष्ट नावाचा अर्थ वापरात असलेल्या जीवविज्ञानीय पद्धतीतील नावाप्रमाणेच असेल, असे नाही. त्यांचा उल्लेख रूपवंश व रूपजाती असा केला जातोच म्हणून यांचे मुख्य वर्गीकरण हे जगण्याच्या परिस्थिशी अनूरूप अशाच शब्दांत म्हणजे पावलांचे ठसे, वाटचालीच्या खुणा, बिळे व छिद्रे असेच असू शकते. मुख्यत्वे रूडोल्फ रिश्टेर यांनी सुरुवात केल्यावर ए. सैलाकेर व डब्लू. हेन्ट्‌शेल यांनी अतिशय काळजीपूर्वक अध्ययन करून (१) रेपिक्निया,  (२) पॅसिक्निया, (३) फोडिक्निया, (४) डोमिक्निया व (५) क्युबिक्निया यांसारख्या अशा जीवाश्मांचा अर्थ लावणारी जीवपरिस्थितिवाज्ञानीय (आसमंतातील परिस्थितीनुरूप होणाऱ्या प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या  विज्ञानाची) परिभाषा निर्माण केली.

पावलांचे ठसे, प्राण्यांच्या वाटचालीच्या खुणा व पृष्ठभागालगतची क्षितिजसमांतर अथवा जवळजवळ क्षितिजसमांतर बिळे ही नितलस्थ व कधीकधी नितल-तरणक प्राण्यांनी विविध खोलींवर तयार केलेली असतात परंतु जेथे लाटा व प्रवाह यांचे विनाशक परिणाम होत नाहीत तेथे हे जीवाश्म सर्वसामान्यपणे टिकून राहिलेले असतात शिवाय अशा ठिकाणचा गाळ, पावलांचे ठसे, वाटचालीच्या खुणा व बिळे निर्माण होण्याइतपत गाळाचा थर सूक्ष्मकणी (मऊ) असावा लागतो व त्यात अन्नघटकही असावे लागतात, कारण त्याकरिता प्राणी येथे वरचेवर येतात. अशा प्रकारे हे ठसे (वा चिन्हे) अधिवेलीय व विक्षुब्ध आणि समुद्रतटीय पट्ट्यांमध्ये टिकण्यासारखे नसतात, मात्र जेथे या विनाशक घटकांचा परिणाम होत नाही अशा खंड–फळीच्या भागात हे जीवाश्म आढळतात. टणक खडक व घट्ट जाड गाळ यांच्यातील जवळजवळ उदग्र (उभ्या) बिळात (छिद्रात) प्राणी बहुधा कायमचे घर करून राहतात व सभोवतालच्या पाण्यात निलंबित (लोंबकळत्या) स्वरूपात असलेले अन्न त्यांना मिळते. कठीण खडकांतील किंवा घट्ट गाळातील छिद्र स्थानबद्ध प्राण्यांना आधार मिळावा म्हणून केलेली असतात. परजीवी (इतर जीवांवर उपजीविका करण्याच्या) जीवनप्रणालीसाठीही प्राण्यांच्या कवचामध्ये अशी छिद्रे पाडली जातात अथवा केवळ सहभोजी (दोन जीवांत एकमेकांना फायदेशीर ठरेल असे बाह्य साहचर्य असणाऱ्या) जीवनप्रणालीचा आधार म्हणून व आश्रयी प्राणी जेथे जेथे जातो तेथे तेथे अन्न मिळविण्याकरिता अशी छिद्रे निर्माण केलेली असतात.

म्हणून या जीवाश्मांचा अभ्यास ते निर्माण करणाऱ्या  प्राण्यांची पर्यावरणीय परिस्थिती विशद करण्यासाठी करावा लागतो. स्तरवैज्ञानिक सहसंबंध ठरविणे किंवा शैलसमूहांची भूवैज्ञानिक वये काढणे यांसाठी हे जीवाश्म उपयुक्त ठरतील, अशी अपेक्षा नसते. हे मार्ग-चिन्हांचे अवशेष पाण्याच्या प्रवाहाने किंवा लाटांच्या माऱ्याने झिजून जाऊ शकतात परंतु शंखशिंपले किंवा इतर प्रकारची कवचे त्यांच्या मूळ स्थानापासून वाहून नेली जाऊन दुसरीकडे कोठे तरी साचू शकतात, तसे या मार्ग-चिन्हांच्या अवशेषांचे होऊ शकत नाही, हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. तथापि जर ज्यांमध्ये हे जीवाश्म आहेत असे दगडगोटेच वाहून नेले गेले असले, तर त्या दगडगोट्यांचे आणि त्यावरून त्यातील मार्गचिन्ह जीवाश्मांचे मूलस्थान माहीत होऊ शकते. [→ जीवाश्म].


 

अपृष्ठवंशी जीवाश्म गौण गट : रेडिओलॅरिया : (प्रोटोझोआजिम्नोमिक्सा किंवा सार्कोडिना). प्रोटोझोआतील रेडिओलॅरियागणाचे जीवाश्म एकूण प्राण्यांच्या जीवाश्मांमध्ये महत्त्वाचे नाहीत.

आ. १७. रेडीओलॅरिया : (१) लिथोकँपी (ऑर्डोव्हिसियन-रीसेंट), (२) ट्रोकोडिस्कस (कँब्रियन-रीसेंट), (३) पोडोसायर्टिस (क्रिटेशस-रीसेंट).

कँब्रियन-पूर्व काळातील त्यांच्या आढळाविषयी शंका आहेत मात्र कँब्रियन काळातील रेडिओलॅरियांचे जीवाश्म निश्चितपणे आढळले आहेत. या प्राण्यांचा सांगाडा सामान्यपणे कंटिकांचा किंवा विविध आकारांच्या नाजूक जालिकांचा बनलेला असतो. काहींचा सांगाडा स्ट्राँशियम सल्फेटाचा बनलेला असतो पण सामान्यपणे तो सिलिकेचा बनलेला असतो व तो जीवाश्मरूपात टिकून राहतो. सर्व रेडिओलॅरिया सागरात राहणारे असून बहुसंख्य तलप्लावी आहेत आणि ते ४०० मी. खोलीपर्यंत राहतात. प्राणी मेल्यावर हे सांगाडे सागरतळावर साचतात व रेडिओलॅरियन ऊझ नावाचे सूक्ष्मकणी सिलिकामय निक्षेप तयार होतात. उदा., हल्लीच्या हिंदी व पॅसिफिक महासागरांच्या उष्ण कटिबंधीय प्रदेशांतील अधिक खोल भागात आढळणारे रेडिओलॅरियन ऊझ. रेडिओलॅरियांच्या जीवाश्मांद्वारे पुष्कळदा उष्ण कटिबंधीय भागातील खोल सागरात निक्षेपण (साचण्याची क्रिया) झाल्याचे सूचित होते. [⟶रेडिओलॅरिया].

पोरिफेरा: (स्पंज). स्पंजाचे सांगाडे कंटिकाचे बनलेले असतात. कंटिका चूर्णीय वा सिलिकामय द्रव्याच्या बनलेल्या असू शकतात व त्यांवरुन स्पंजांचे (१) कॅल्केरिया (चूर्णीय) व (२) नॉन-कॅल्केरिया (अचूर्णीय) असे गट पडतात. पुष्कळदा हे सांगाडे दृढ नसतात व प्राण्यांच्या मृत्यूनंतर कंटिका सुट्या होतात. त्यामुळे असे जीवाश्म स्तरवैज्ञानिक दृष्टीने अतिशय निकामी व अल्प महत्त्वाचे ठरतात. मात्र जेव्हा एखाद्या ठिकाणी इतर जीवाश्म नसातात तेव्हा ते थोडेफार उपयुक्त असू शकतात तथापि काही संरचना टिकून राहतात. कॅल्केरिया गट ऑर्डोव्हिसियन काळात अवतरला आणि क्रिटेशस-जुरासिक काळातील स्पंजांचे चांगले प्रातिनिधिक वंश म्हणजे रॅफिडोनेमाबॅरॉइसिया हे होत. नॉन-कॅल्केरियांपैकी लिथिस्टीड स्पंजांचे सांगाडे बळकट असल्याने ते चांगले टिकून राहिले असून ते उत्तर कँब्रियन काळात अस्तित्वात होते, ते जुरासिक व क्रिटेशस काळांत विपुल झाले होते व तेव्हाचे माहीत असलेले वंश पुढील होत: सायफोनिया, जॅरिया, व्हेरुक्युलिना, डोरिडर्मा. हेक्झॅक्टिनेलिडातील काही प्राणी पूर्व कँब्रियनमध्ये होते व हेक्झॅक्टिनेलिडही जुरासिक व क्रिटेशस काळांत विपुल झाले, त्यांपैकी व्हेंट्रिक्युलाइट हा वंश अस्तित्वात असल्याची नोंद आहे.

 

मोनॅक्सोनिडचा अपवाद वगळता स्पाँजिल्ला वंश व त्याच्याशी संबंधित असलेले सर्व स्पंज सागरात राहणारे असून सध्या ते जगाच्या सर्व भागांत आढळतात. हे स्पंज किनाऱ्यापासून सु.४०० मी. खोलीपर्यंतच्या भागात अधिक विपुल आहेत. [⟶ पोरिफेरा].

सीलेंटेरेटा: (हायड्रोझोआ व सिफोझोआ). हायड्रोझोआ वर्गातील स्ट्रोमॅटोपोरॉयडिया गणातील प्राण्यांचे सांगाडे चूर्णीय असून ते एककेंद्री पटलांचे बनलेले असतात. ते ओबडधोबड किंवा गोलाभ पुंजक्यांच्या आणि पुष्कळदा लेपांच्या (पापुद्रयांच्या) रूपात आढळतात. पुराजीव काळात या प्राण्यांपासून खडक बनल्याचे माहीत असून डेव्होनियन काळात ते विशेष विपुलपणे आढळतात. स्ट्रोमॅटोपोरा. अँफिपोरा, ॲक्टिनोस्ट्रोमा. मध्यजीव काळातही आढळतात.

 

शंखवासी (हर्मिट) खेकडा राहत असलेल्या विशेषकरून गॅस्ट्रोपोडांच्या कवचांभोवती लेपरूपात असलेले जिग्नोब्लास्टिया गणाचे म्हणता येतील, असे कायटिनमय सांगाडे आढळले आहेत. या गणाचे काही जीवाश्म यूरोपमधील ट्रायासिक, जुरासिक व पूर्व क्रिटेशस काळांतील खडकांत आढळले आहेत.

 

कॅलिप्टोब्लास्टिया गणाचे म्हणता येतील असे कायटिनमय सांगाडे व्हिक्टोरियामधील कँब्रियन कालीन व न्यूयॉर्क येथील ऑर्डोव्हिसियन काळातील खडकांत आढळले असून एक प्लाइस्टोसीन (सु. ६ लाख ते ११ हजार वर्षांपूर्वीच्या) काळातील निक्षेपातही सापडला आहे.

 

हायड्रोकोरॅलिना गणातील प्राण्यांचे सांगाडे चूर्णीय होते व ते दंडाचे (कांड्यांचे) जाळे बनून तयार झालेले असतात. ते पापुद्यांच्या किंवा शाखायुक्त स्वरूपाचे असतात. खडकनिर्मितीच्या दृष्टीने हे प्राणी महत्त्वाचे आहेत. हल्लीचा मिलेपोरिडियम हा वंश पोवळ्यांशी निगडित असून तो मायोसीन काळातही आढळला आहे. स्ट्रँबर्ग येथील उत्तर जुरासिक कालीन खडकांत मिलेपोरिडियम आणि ईजिप्तमधील क्रिटेशस कालीन खडकांत मिलेस्ट्रोमा  हे वंश आढळले आहेत.

ज्यांमध्ये जेलीफिश येतात त्या सिफोझिआ प्राण्यांना कठीण अवयव नसले, तरी त्यांचे ठसे आढळतात उदा., बव्हेरियातील लिथोग्राफिक चुनखडकांतील ऱ्हायझोस्ट्रोमाइट व स्वीडनमधील कँब्रियन खडकांतील मेंडयुसिना. [⟶ सीलेंटेरेटा].

ॲनेलिडा: प्राचीन खडकांमधील बिळे, वाटचालीच्या खुणा ह्या कृमींमुळे निर्माण झाल्याचे कधीकधी मानतात परंतु त्यांच्या अनिश्चित स्वरुपांमुळे त्यांना पुष्कळदा मार्ग-चिन्ह जीवाश्म असे संबोधतात.

तथापि ॲनेलिडांपैकी पॉलिकीटांचे पुष्कळ जीवाश्म माहीत आहेत. हे जीवाश्म सरळ, वाकड्या, नागमोडी, सर्पिल वा इतर रीतीने कुंडलित अशा विविध प्रकारच्या नळ्यांच्या रूपात असतात. ते स्त्रवणाद्वारे बनविलेले (उदा.,कायटिनमय वा चूर्णीय) आणि बाह्यकण एकत्रित चिकटविले जाऊन बनलेले असू शकतात. त्यांच्या आढळाविषयी व प्रसाराबद्द्ल पुष्कळ माहिती उपलब्ध आहे. काही गोड्या व मचूळ पाण्यातही रहात असल्याचे माहीत असले, तरी ॲनेलिडा बहुतकरून सागरात राहणारे आहेत. ते उत्तर कँब्रियनमध्ये अवतरल्याचे निश्चितपणे माहीत आहे. ऑलिगोकिटा हा ॲनेलिडांचा दुसरा वर्ग कार्‌बॉनिफेरस काळापासून अगदी विरळाच आढळत असून शिवाय त्याचे जीवाश्म चांगले टिकून राहिलेले नाहीत.


कृमींपैकी सर्वांत चांगले माहीत असलेले जीवाश्म पॉलिकीटांचे आहेत, मात्र शैलसमूहांची भूवैज्ञानिक वये ठरविण्यासाठी खुद्द पॉलिकिटांचे जीवाश्म उपयुक्त असल्याचे अजून मानीत नाहीत परंतु जेव्हा इतर जीवाश्म उपलब्ध नसतात तेव्हा ते ज्यांत आढळतात त्या थरांचे भूवैज्ञानिक वय पॉलिकीटांच्या जीवाश्मांद्वारे स्थूलमानाने ठरविता येऊ शकते. [⟶ ॲनेलिडा].

आ. १८. एकायनोडर्माटा : (१) बॉट्रिओक्रायनस (सिल्युरियन-डेव्होनियन), (२) ऑरोफोक्रायनस (कार्‌बॉनिफेरस).

एकायनोडर्माटा: ( ॲस्टरोझोआ, होलोथूरोझोआ, क्रिनॉयडिया इ.). ॲस्टरोझोआंपैकी ॲस्टरॉयडिया (तारामीन) व ऑफियूरॉयडिया (भंगुरतारा) यांतील प्राण्यांचे बाहू मध्यवर्ती बिंबाच्या (तबकडीच्या) भोवती असतात. तारामिनांमध्ये बाहू आखूड व सापेक्षतः रुंद तर भंगुरता-यांत लांब व पातळ असतात. संपूर्ण संरचनेसारखा कोणत्याही एका रूपात ते क्वचित राहिलेले असतात. सामान्यपणे सुट्या झालेल्या घटक अस्थिका, सीमांत तकटे आणि कशेरुक (बाहूतील अस्थिका) हे जीवाश्मरूपात आढळतात. जीवाश्मांची ही असमाधानकारक परिस्थिती होलोथूरॉडिया (सागरी काकडी) मध्ये अधिकच वाईट झालेली दिसते. काळाइतक्या पूर्वीपासून आढळतात. ॲस्टरॉयडिया व ऑफियूरॉयडिया यांच्या हल्लीच्या प्रकारांशी अगदी सारखे असणारे प्रकार जुरासिक काळाइतक्या पूर्वीपासून आढळतात. ॲस्टरॉयडिया, ऑफियूरॉयडिया व होलोथूरॉयडिया कँब्रियन काळात अवतरले. हल्ली ते मध्यम खोल व बहुसंख्य ६० मी. पेक्षा कमी खोल पाण्यात राहत आहेत.

 

एकायनोडर्माटामधील पेल्मॅटोझोआंपैकी क्रिनॉयडिया (समुद्रनलिनी) सर्वांत महत्त्वाचे असून ते मुख्यत्वे पुराजीव कालीन आहेत. कँब्रियन ते पर्मियन काळातील सिस्टॉयडिया, ऑर्डोव्हिसियन ते पर्मीयन काळातील ब्लॅस्टॉयडिया व कँब्रियन ते कार्‌बॉनिफेरस काळातील एड्रिॲस्ट्ररॉयडिया यांच्या कटोरातील सममिती मूलतः पंचतयी असून बिंबाभतकटांनी बनलेल्या स्तंभाने कटोर समुद्रतळाला चिकटलेला असतो. क्रिनॉयडियामध्ये बाहू स्पष्ट असून सिस्टॉयडियामध्ये ते लहान झालेले असतात तर ब्लॅस्टॉयडिया व एड्रिॲस्टरॉयडिया यांच्यात ते नसतातच. उत्तर क्रिटेशसमधील यूईटॅकायनसमार्सुपाईंट यांसारख्या काही  क्रिनॉयडियामध्ये हा स्तंभ नसतो. ते तरंगणारे प्राणी असावेत. त्यांचा अल्पकालीन इतिहास व विस्तृत प्रसार यांमुळे ते उत्तर क्रिटेशस काळातील अतिशय उपयुक्त असे सूचक जीवाश्म ठरले आहेत. ट्रायासिकपासून क्रिनॉयडियांचा ऱ्हास होत असून आता त्यांचे सु. १०० वंश आहेत व ते बहुतेक उथळ पाण्यात राहत आहेत. पुराजीवमध्ये व विशेषतः कार्‌बॉनिफेरसमध्ये क्रिनॉयडिया हा एकायनोडर्माटांपैकी सर्वांत महत्त्वाचा गट होता. ॲक्टिनोक्रायनस, पोटेरिओक्रायनस, प्लॅटिक्रायनसऱ्होडोक्रायनस हे कार्‌बॉनिफेरसधील, तर पेंटॅक्रायनस, अँटेडॉनमिलेरिक्रायनस हे जुरासिक काळातील अधिक महत्त्वाचे वंश होत. कार्‌बॉनिफेरस काळात ते इतके विपुल होते की, त्या काळात त्यांच्यापासून मोठ्या प्रमाणात क्रिनॉयडी चुनखडक व संगमरवर बनले होते. सिस्टॉयडिया, ब्लॅस्टॉयडिया व एड्रिॲस्टरॉयडिया हे गट त्यांच्या आयुष्यात नेहमीच गौण होते व त्यांचे जीवाश्म कमी प्रमाणात आढळतात. [⟶ एकायनोडर्माटा].

आ. १९. काही पॉलिझोआ : (१) स्टोमॅटोपोरा (ऑर्डोव्हिसियन-रीसेंट), (२) एश्चेरोपोरा ऑर्डोव्हिसियन), (३) स्पायरोपोरा (जुरासिक-रीसेंट), (४) मेंब्रॅनिपोरेला (क्रिटेशस-रीसेंट), (५) मेंब्रॅनिपोरा (जुरासिक-रीसेंट), (६) पॉलिपोरा (सिल्युरियन-पर्मियन).

पॉलिझोआ : (ब्रायोझोआ). हे प्राणी मुख्यत्वे सागरात राहणारे व निवहजीवी (समुहांत राहणारे) आहेत. त्यांचे निवह पुढील स्वरूपांत आढळतात : वनस्पतीसारखी वाढ, खडक, दगडगोटे वा इतर प्राण्यांची मुख्यत्वे मॉलस्कांची कवचे यांच्यावरील लेप आणि लहान अथवा मोठे संधितरूपातील पिंड.प्रत्येक प्राण्याची राहण्याची जागा कायलोस्टोमॅटा गटात पेटीसारखी, क्रिप्टोस्टोमॅटा, सायक्लोस्टोमॅटा व ट्रेपोस्टोमॅटा यांच्या गटात नळीसारखी  किंवा टेनोस्टोमॅटाप्रमाणे पटलित थरांची बनलेली असते. सामान्यपणे ते चूर्णीय असतात परंतु कायलोस्टोमॅटा आणि टेनोस्टोमॅटा यांच्यातील काही शृंगी (केराटीन या प्रथिनाने युक्त ) असू शकतात. नलिकाकार प्रकारात द्वारके (छिद्रे) टोकाशी असतात. पॉलिझोआ ऑर्डोव्हिसियनमध्ये अवतरले. पर्मियनअखेरीस निर्वंश झालेले ट्रेपोस्टोमॅटा व क्रिप्टोस्टोमॅटा हे पुराजीव काळातील प्रमुख पॉलिझोआ प्राणी होते व ते बहुतकरून भित्ती बनण्याच्या स्थितीशी निगडित होते. सायक्लोस्टोमॅटा पुराजीव काळात थोडेच होते. मात्र मध्यजीव काळात ते जलदपणे विपुल झाले व विशेषतःउत्तर क्रिटेशसमध्ये त्यांचा परमोत्कर्ष झाला. स्टोमॅटोपोरा, इडमोनिया, एंटॅलोपोराहे उत्तर क्रिटेशसमधील महत्त्वाचे वंश होत. कायलोस्टोमॅटा जुरासिकमध्ये अवतरले आणि उत्तर क्रिटेशस व नवजीव काळांत ते अतिविपुल होते. मेंब्रॅनिपोरा. सेलोपोरा, मायक्रोपोरा, क्रिब्रिलिनाहे त्यांचे अधिक महत्त्वाचे वंश होत.

आ. २०. ग्रिफोकायटॉन (डावीकडे अग्र व मध्यस्थ शकले, उजवीकडे पश्च शकलाच्या अधर व पृष्ठीन बाजू कार्‌बॉनिफेरस).

कायलोस्टोमॅटाच्या प्लायोसीन काळात असलेल्या काही जाती हल्ली सागरात राहत आहेत. पॉलिझोआ सामान्यतःउथळ पाण्यात राहणारे आहेत कायलोस्टोमॅटा व टेनोस्टोमॅटांचे काही प्रकार अतिशय खोल ठिकाणीही आढळतात.

अँफिन्युरा  व स्कॅफोपोडा (मॉलस्का) :  सर्व अँफिन्युरा प्राणी  सागरात राहणारे असून ते ऑर्डोव्हिसियन काळापासून पृथ्वीवर असल्याचे दिसून येते.

फक्त पॉलिप्लॅकोफोरा गणाचे  ऑर्डोव्हिसियनपासूनचे जीवाश्म आढळतात. हे मुख्यत्वे उथळ पाण्यात राहणारे आहेत, हल्लीच्या काही जाती मात्र खोल पाण्यातही राहतात. या प्राण्यांचे कवच आठ तकटांचे असून तकटे किंचित एकमेकांवर आलेली व अग्र-पश्च दिशेत सरळ मांडलेली असतात. त्यांच्यावर नक्षीकाम असते व ती द्विपार्श्वसममित असतात.हेल्मिंथोकायटान, कार्‌बॉनिफेरसमधील ग्रिफोकायटॉन व नवजीवातील ⇨ कायटॉन हे अधिक सामान्यपणे माहीत असलेले वंश म्हणता येतील.

उर्वरित भाग वाचा