कृत्तक : (लॅ. क्‍लोन). एकाच व्यक्तीपासून (प्राणी अगर वनस्पती) अलिंग पद्धतीने शाकीय अवयवांद्वारे (एरवी फक्त पोषणाचे कार्य करणाऱ्‍या कंद, कळ्या, खोड इत्यादींसारख्या अवयवांद्वारे) किंवा अफलित अंड्यापासून उत्पन्न झालेल्या अनेक व्यक्तींना सामूहिक अर्थाने कृतक म्हणतात. उदा., एकाच झाडाची अनेक कलमे लावून किंवा बटाट्याच्या कोंब असलेल्या फोडी लावून वाढविलेल्या त्या त्या वनस्पतींचा गट तसेच नेच्याच्या अथवा पुदिन्याच्या भूमिस्थित (जमिनीतील) फांद्या अलग अलग लावून कृत्रिम रीत्या बनवलेल्या अनेक वनस्पती एका पट्टकृमीच्या अनेक खंडांपासून बनलेले अनेक कृमी किंवा एका ⇨ कोशिकेच्या (पेशीच्या) समविभाजनाने बनलेला अनेक कोशिकांचा समूह (ऊतक इत्यादी. क्लोन ही संज्ञा १९०३ मध्ये हर्बर्ट जॉन वेबर यांनी प्रथमतः उद्यानविद्येच्या संदर्भात उपयोगात आणली व हल्ली ती कृषिविज्ञान, वनस्पतिविज्ञान, प्राणिविज्ञान, वैद्यक इ. शास्त्रांत त्यातील मूलभूत कल्पना कायम ठेवून परंतु व्यापक रीतीने उपयोगात आणली जाते. वास्तविक या कल्पनेचे जनक इटालियन फलवैज्ञानिक कौंट गॅलेसिओ (१८१६) हे असून त्यांची विधाने, फक्त शाकीय उत्पादनापासूनच वनस्पतींची महत्त्वाची लक्षणे पिढ्यानुपिढ्या चालू राहतात ह्या माळ्यांच्या दीर्घ अनुभवावर आधारलेली होती. शाकीय पद्धतीने निर्मिल्यामुळे मूळ जनक वनस्पतीची किंवा प्राण्याची सर्व वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे संततीत सातत्याने आढळतात, त्याचे कारण ⇨ आनुवंशिकता होय ही समजूत कृत्तकाच्या व्याख्येत अभिप्रेत आहे. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी उपलब्ध झालेल्या कोशिकाविज्ञान व ⇨ आनुवंशिकी यांतील रंगसुत्रांविषयीच्या (एका पिढीतून पुढच्या पिढीत आनुवंशिक लक्षणे नेणाऱ्‍या सुतासारख्या सूक्ष्म घटकांविषयीच्या) माहितीमुळे या कल्पनेला शास्त्रीय आधार मिळाला. कृत्तकातील व्यक्तींमध्ये सामान्यपणे फरक फार कमी असले, तरी दीर्घकाळ असलेल्या कृत्तकातील व्यक्तींत उत्परिवर्तने (आनुवंशिक लक्षणांमध्ये होणारे बदल) आढळतात. कृत्तकात समावेश होणाऱ्‍या व्यक्ती परस्परांपासून अलग व शरीरव्यापाराच्या बाबतीत स्वावलंबी असतात.

पहा : केळ.

परांडेकर, शं. आ.