कुत्रामासा : (डॉगफिश). बेलोनिडी मत्स्यकुलातील गोड्यापाण्यात राहणारा मासा. हा भारत, श्रीलंका व ब्रह्मदेश येथे आढळतो. शास्त्रीय नाव झेनेंटोडॉन कॅन्सिला. ह्याचे शरीर लांब, जाड पण किंचित चेपटलेले असते. वरची बाजू हिरवट करडी, खालची पांढुरकी व दोन्ही बाजू हिरवट रुपेरी असतात. शरीराच्या वरच्या अर्ध्या भागावर अगदी बारीक काळे ठिपके असतात.

कुत्रामासा (प्रौढ नर)

नेत्रकोटरापासून (डोळ्याच्या खोबणीपासून) एक रुपेरी पट्टा निघून पुच्छपक्षापर्यंत (शेपटीच्या परापर्यंत म्हणजे हालचाल व तोल सांभाळण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या त्वचेच्या स्नायुमय घडीपर्यंत) गेलेला असतो. याच्या कडा काळसर असतात. शरीराची लांबी ३०–४८ सेंमी. असते. शीर्षाच्या उत्तरपृष्ठावर (डोक्याच्या वरच्या भागावर) एक खोल अनुदैर्घ्य (उभी) खोबण असते. मुस्कट लांब चोचीसारखे असून दोन्ही जबड्यांत दातांच्या प्रत्येकी दोन ओळी असतात. आतल्या ओळीतले दात मोठे व तीक्ष्ण असतात. बाहेरच्या ओळीत अनेक बारीक दात असतात. शरीरावरील खवले अतिशय लहान असून त्यांची मांडणी काहीशी अनियमित असते. पृष्ठपक्ष व गुदपक्ष (अधर, मध्य व पश्चपक्ष) फार मागे असून एकमेकांसमोर असतात. नरात त्यांचे पश्च काठ खोल व काळे असतात. अंसपक्ष (छातीच्या प्रदेशातील पर) व अधरपक्ष सापेक्षतेने लहान आणि पुच्छपक्ष रुंडित (टोकाशी छाटलेला) असतो. लहान मासे व बेडूक हे यांचे भक्ष्य होय. या माशांचे मांस स्वादिष्ट असते. डॉगफिश य नावाने सागरी शार्क माशांच्या काही जाती व बो–फिश हा गोड्या पाण्यातील मासाही ओळखण्यात येतात.

कर्वे, ज. नी.