पिकळी : ज्या ⇨गोगलगाईच्या कवचाचा (शंखाचा) ऱ्हास होऊन एक आंतरिक तकट किंवा कणिकांची  एक श्रेणी (माला) तयार झालेली असते अथवा कवच पूर्णपणे नाहीसे झालेले असते, तिला पिकळी म्हणतात. सामान्यत: ही संज्ञा भूचर मृदूकाय प्राण्यांना (मॉलस्कांना) लावतात. पिकळ्या ⇨गॅस्ट्रोपोडा वर्गातील पल्मोनेटा गणाच्या स्टायलोम्मॅटोफोरा या उपगणातील प्राणी आहेत; पण⇨न्यूडिब्रॅंकिया गणातील सागरी मृदुकायांना समुद्री पिकळ्या म्हणतात. पिकळ्यांच्या अंगावर सामान्यत: तपकिरी, करडे, हिरवे किंवा पिवळसर तपकिरी रंगाचे ठिपके असतात; परंतु काही जातींत नारिंगी, जांभळ्या किंवा पिवळ्या रंगाची चकचकीत चिन्हे असतात. त्याची लांबी ८ मिमी.—१५ सेंमी. असते. शरीर मध्यभागी व पुढच्या टोकाकडे उंचावलेले असते. या ठिकाणी एका पुढे आलेल्या वाटोळ्या प्रावाराने (आच्छादक त्वचेच्या मऊ घडीने) फुप्फुसाचा भाग आच्छादिलेला असतो. प्रावाराच्या मागच्या टोकाजवळ श्वसनरंध्र (श्वासोच्छ‌्वासाचे छिद्र) असते. संस्पर्शक (स्पर्शेंद्रिय) फार आखूड असून डोळ्यांचे देठ (वृंत) मात्र सापेक्षतेने लांब असतात. पिकळ्या मोठ्या प्रमाणात श्लेष्मा (चिकट बुळबुळित स्राव) बाहेर टाकतात.

पिकळी (लिमॅक्स) : (१) श्वसनरंघ्र, (२) डोळा (लांब देठावर असलेला), (३) संस्पर्शक. पिकळ्या अगदी दमट जागी राहतात. सर्वसाधारणपणे त्या फक्त रात्री व दिवसा आकाश अभ्राच्छादित असेल तेव्हा हालचाल करतात.त्यांची अंडी मातीत पुरलेली असतात. त्या एक ते चार वर्षे जगतात. सगळ्या जाती उभयलिंगी (पुं- व स्त्री-जननेंद्रिये एकाच व्यक्तीत असणार्‍या) असून काहींमध्ये एक जनन रंध्र असते, तर इतर काहींमध्ये दोन असतात. बहुतेकांत बाह्य श्वसन रंध्र व उत्सर्जन रंध्र (निरुपयोगी द्रव्य शरीराबाहेर टाकण्याचे छिद्र) ही दोन्ही एकवटलेली असतात. पिकळ्यांचा समावेश ॲरिओनिडी (उदा., ॲरिओलिमॅक्स), लिमॅसिडी (उदा., लिमॅक्स) आणि फिलोमायसिडी (उदा., फिलोमायकस) या कुलांत होत असून त्यांच्या सु. ३०० जाती आहेत. त्यांचे एकमेकींशी जवळचे नाते नाही कारण गोगलगाईच्या क्रमविकासात (उत्क्रांतीत) बाह्य कवच अनेक वेळा नाहीसे झालेले आहे.

समशीतोष्ण कटिबंधातील शेते, अरण्ये, बागा व काचगृहे (विशिष्ट नियंत्रित परिस्थितीत काही वनस्पती वाढविण्याचे बंदिस्त ठिकाण) यांतील सामान्य पिकळी कवके (हरितद्रव्यरहित बुरशीसारख्या वनस्पती), कुजणाऱ्या वनस्पती व कधीकधी वनस्पतींची व झुडपांची पाने खाते. बऱ्याच वेळा त्यांचा बागांत व काचगृहात उपद्रव होतो, म्हणून त्यांच्या बंदोबस्तासाठी राख पसरतात किंवा तीस भाग कोंड्यात एक भाग मेटा आल्डिहाइड मिसळून तयार केलेल्या आमिषाच्या गोळ्या ठेवतात. इतर शाकाहारी पिकळ्या मेलानीशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांतील अवशेषी (ऱ्‍हास पावलेल्या) ॲथोरॅकोफोरिडी कुलातील आहेत. यूरोपातील टेस्टॅसेलिडी कुलातील, दक्षिण आफ्रिकेतील अॅपेरिडी कुलातील व मलेशिया—इंडोनेशियातील रॅथुइसिइडी कुलातील पिकळ्या इतर गोगलगाई व गांडुळे खातात.

सागरी पिकळ्या शैलमालांतील उथळ पाण्यात किंवा खडकांतील डबक्यात राहतात व तेथील सूक्ष्म शैवले खातात. शरीर अर्धपारदर्शक व शरीराचे रंग नाजूक आणि सुंदर असल्यामुळे यांचा समुद्रातील अत्यंत सुंदर प्राण्यांमध्ये समावेश होतो.

पहा : पल्मोनेटा.

जमदाडे, ज. वि.