सरडगुहिरा : सरडयांच्या शॅमिलिओनिडी (शॅमिलिओंटिडी) कुलातील प्राणी सरडगुहिरा या नावाने ओळखले जातात. या कुलात सु. ८० जातींचा समावेश होतो. शरीराचा रंग बदलण्याची असाधारण क्षमता या प्राण्यांच्या अंगी असते. हा सरडा मुख्यत: उत्तर आफिका, सिरिया, आशिया मायनर, मादागास्कर व दक्षिण स्पेन येथे आढळतो. रंग बदलण्याची क्षमता असलेला अमेरिकेतील ॲनोलिस प्रजातीतील ॲनोलिस कॅरोलेन्सिस (इग्वानिडी कुल) व आग्नेय आशियातील कॅलोटीस प्रजातीतील कॅलोटीस व्हर्सिकलर (ॲगॅमिडी कुल) या जातींच्या सरडयांना चुकीने सरडगुहिरा म्हटले जाते.

सामान्य सरडगुहिऱ्याचे शास्त्रीय नाव शॅमिलिओ शॅमिलिओन असून तो ४५-६० सेंमी. लांब असतो. त्याचे शरीर दोन्ही बाजूंनी पसरट असते. बाजूने त्याचे डोके त्रिकोणी दिसते व त्यावर टोकदार शिखा किंवा त्वचेच्या घडया असतात. त्याची शेपटी लांब व परिगाही (पकड घेणारी) असते. त्याची मागच्या व पुढच्या पायांना असलेली दोन बोटे चिमटयाप्रमाणे इतर तीन बोटांच्या समोर येतात. तो वृक्षवासी असून झाडाझुडपांच्या फांदयांवर कसरत करताना दिसतो. या कामी तो आपल्या पायांचा पकडीसारखा व परिगाही शेपटीचा उपयोग करतो. त्याचे डोळे मोठे असून प्रत्येक डोळ्याने तो सर्व दिशांना स्वतंत्रपणे पाहू शकतो. डोळ्यांवर एकजीव झालेल्या पापण्यांचे आच्छादन असते पण डोळ्यांच्या मध्यभागी असलेले छिद्र उघडे असते. त्याची जीभही परिगाही असते व ती तो आपल्या शरीराच्या लांबीएवढया अंतरापर्यंत बाहेर काढू शकतो. जिभेचे टोक मोठे व चिकट आणि तिचा तळभाग स्थितिस्थापक व नलिकाकृती असतो. अन्न मिळविण्याच्या कामी तो जिभेचा वापर करतो. दाताची रचना ॲकोडॉन्ट पद्धतीची असते [→दात]. नाकतोडे, रातकिडे, कोळी वगैरे कीटक हे त्याचे भक्ष्य होय. भक्ष्य मिळविण्याच्या वेळी तो भक्ष्याकडे शांतपणे एकटक पाहतो व आपली लांब जीभ भक्ष्यावर फेकतो व क्षणार्धात ती आखडून घेऊन भक्ष्य तोंडात घालतो. मग तीक्ष्ण दातांनी चावून ते गिळून टाकतो. मोठे सरडगुहिरे पक्षीदेखील खातात.

सरडगुहिऱ्याच्या रंगात बदल होण्यास कारणीभूत असलेल्या कोशिका (पेशी) त्याच्या त्वचेत असतात. त्या कोशिकांना वर्णकी लवक म्हणतात. वर्णकी लवक हे विविध रंगांचे रंगद्रव्य कण असून त्यांचा रंग काळा, लाल किंवा पिवळा असतो [→ वर्णकी लवक]. तंत्रिका तंतूंच्या (मज्जातंतूंच्या) उद्दीपनाने या कोशिकेच्या शाखा प्रसरण पावतात आणि त्या प्रसरण पावलेल्या भागात रंगद्रव्य पसरून दिसू लागते व त्वचेच्या रंगात बदल घडतो. कोशिका आकुंचन पावल्या म्हणजे रंगद्रव्य एका ठिकाणी जमते व अनिश्चित आकाराचे रंगाचे ठिपके दिसू लागतात. रंगातील बदलामुळे सरडगुहिऱ्याला संरक्षण मिळते. कारण तो भोवतालच्या परिसराप्रमाणे शरीराचा रंग बदलू शकतो व त्यामुळे तो ओळखू येत नाही.

पाळलेले सरडगुहिरे ५-६ महिन्यांपेक्षा जास्त काळ जगत नाहीत. पिंजऱ्यातील झाडांना घातलेले पाणी ते पितात. ते मनापासून अन्न खात नाहीत व बरेच दिवस उपाशी राहतात. मात्र या काळात ते नियमितपणे पाणी पितात. पन्नासातील एखादाच नियमित अन्न खातो.

बहुसंख्य सरडगुहिरे अंडी घालतात. त्यावेळी मादी जमिनीवर येते व एक लहान खळगेवजा घरटे तयार करते. त्यात ती २-४० अंडी घालते व ती सर्व मातीने झाकते. अंडी फुटून पिले बाहेर पडण्यास लागणारा काळ तापमानाप्रमाणे कमी-जास्त होतो व तो कमीतकमी चार महिने व जास्तीतजास्त दहा महिनेही असतो. पूर्व आफिकेतील शॅमिलिओ बायटिनिएटस ही जाती डोंगराळ भागात आढळते. तिची मादी अंडी उत्पन्न करते आणि ती उबविण्याची व अंडयांतून पिले बाहेर पडण्याची क्रिया तिच्या शरीरातच घडते. विकासावस्था पूर्ण झाल्यावर सु. सहा पिले जन्माला येतात.

मुस्कटावर शिंगे असलेला सरडगुहिरा (जॅक्सन्स शॅमिलिओन )

मादागास्करातील सशस्त्र सरडगुहिऱ्यात (लिअँड्रिया परआर्मेटा ) डोक्यावरील शिखेऐवजी मुस्कटावर एक ते तीन शिंगे असतात. त्याच्या शरीराच्या दोन्ही बाजूंवर प्रत्येकी एक याप्रमाणे काटयांची एक ओळ असते. तसेच त्याच्या पाठीवर काटेरी शिखा असते. त्याच्या मानेच्या काटयावर अस्थिमय कवच असते व डोळ्यांच्या पातळीपर्यंत दंतुर शिखा असते. या संरक्षक व आक्रमक साधनांमुळे त्याला सशस्त्र सरडगुहिरा म्हणतात.

शॅमिलिओ डायलेपिस जातीचा वरचढ नर त्याच्यावर हल्ला करणाऱ्या दुसऱ्या नराला पाहून आपले शरीर फुगवितो, फूसफूस आवाज काढतो व कपाळाच्या मागील भागावरील घडया ताठ करतो किंवा थरथरा हलवितो. हल्ला करणाऱ्याने धैर्याने तोंड दिले नाही, तर वरचढ सरडगुहिरा त्याच्यावर चाल करून जातो, त्याला जमिनीवर लोळवून सामान्यत: हुसकावून लावतो. सरडगुहिऱ्याची शॅमिलिओ झेलनिकस ही जाती श्रीलंका व दक्षिण भारतात आढळते.

पाहा : सरडा.

जमदाडे, ज. वि.