कायटॉन : हा समुद्री प्राणी मॉलस्का (मृदुकाय) संघाच्या अँफिन्यूरा वर्गातला आहे. कायटॉन हे वंशाचे नाव असले, तरी या वंशातील विविध जाती कायटॉन या नावानेच सामान्यतः ओळखल्या जातात. कायटॉन हे जिवंत मॉलस्कांपैकी आदिम (आद्य) प्राणी आहेत. हे समुद्र किनार्‍यावरील आणि बेताच्या खोल पाण्यातील खडकांवर राहतात पण काही ४,२०० मी. खोलीवरही आढळतात.

कायटॉन

शरीर दीर्घवृत्ताकार (लंबवर्तुळाकार), चपटे असून वरचे पृष्ठ उत्तल (बाह्यगोल) असते. या पृष्ठावर एकावर एक आलेले आठ कॅल्शियममय आडवे तुकडे असतात. कवच या तुकड्यांचे बनलेले असते. कवचाच्याभोवती जाड, मांसल मेखला (प्रावाराचा म्हणजे कवचाच्या लगेच खाली असणार्‍या त्वचेच्या घडीचा भाग) असते. हिच्यावर काही जातींत कंटक (काटे) असतात. उत्तर आणि पार्श्व पृष्ठ प्रावाराने झाकलेले असते. अधर पृष्ठाचा बराचसा भाग पादाने व्यापिलेला असतो. याच्या साहाय्याने हा मंद गतीने सरपटतो किंवा खडकाला घट्ट चिकटतो. खडकावरून जबरदस्तीने ओढून काढले तर हा अंगाचे वेटोळे करतो. पाद आणि प्रावार यांच्यामध्ये प्रावार-खातिका (पाय आणि प्रावार यांच्यामध्ये असणारी खाच) असते. प्रत्येक प्रावारखातिकेत श्वसनाकरिता ६-८० क्लोम (कल्ले, निरनिराळ्या जातींत) असतात. मेखलेच्या पुढच्या काठाखाली लहान शीर्ष असते. त्याच्यावर खालच्या बाजूला मुख असते. संस्पर्शक किंवा डोळे नसतात. मुखगुहेच्या (तोंडाच्या पोकळीच्या) तळावर बारीक दातांच्या पुष्कळ आडव्या ओळी असलेली रेत्रिका (दातांच्या ओळी असलेली कलेची म्हणजे पातळ पटलाची लहान पट्टी) असते. हिच्या साहाय्याने खडकावरील वनस्पती आणि सूक्ष्मजीव खरडून हा खातो. ग्रसनी (घसा) आखूड असून जठरात उघडते. पाचक ग्रंथी (यकृत) जठराला जोडलेल्या असतात. आंत्र (आतडे) वेटोळी पडलेले व लांब असून त्याचा शेवट मागच्या बाजूला प्रावार-खातिकेत असलेल्या गुदद्वाराने होतो.

हृदय पश्चोत्तर भागी (मागे वरच्या बाजूला) परिहृद्‌-गुहेत (एका पातळ कलेने बनलेल्या गुहेत) असते. ते दोन अलिंद (अशुद्ध रक्ताचे कप्पे) आणि एक निलय (शुद्ध रक्ताचा कप्पा) यांचे बनलेले असून त्यापासून अग्र महारोहिणी निघते. उत्सर्जनाचे कार्य दोन वृक्कक (शरीरातील निरुपयोगी द्रव्ये बाहेर टाकणार्‍या नलिका) करतात. तांत्रिका तंत्र (मज्‍जासंस्था) मुखाभोवती असलेले तंत्रिका-वलय आणि त्याच्यापासून निघणार्‍या अनुदैर्घ्य (उभ्या) तांत्रिकारज्ज्यूंच्या दोन जोड्या यांचे बनलेले असते. कवचाच्या तुकड्यांच्या पृष्टीय भागात विशिष्ट ज्ञानेंद्रिये असतात, त्यांना संवेदिका (संवेदी अंगे) म्हणतात. काही कायटॉनांमध्ये या दृक्‌-बिंदूंचे (डोळ्याचे कार्य करणार्‍या रंगीत ठिपक्यांचे) रूप धारण करतात. लिंगे भिन्न असतात. वृषण (शुक्राणुजनक इंद्रिय) किंवा अंडाशय एकच असून त्याच्यापासून दोन वाहिन्या निघून प्रत्येक बाजूला एक याप्रमाणे त्या प्रावार-खातिकेत मागच्या बाजूला उघडतात. मादी पाण्यात अंडी घालते आणि तेथे त्यांचे निषेचन (फलन) होते. जीवन-वृत्तात ट्रोकोफोर ही डिंभावस्था असते. [ → डिंभ].

कुलकर्णी, स. वि.