खेकडा, नारळखाऊ : शंखवासी खेकडा ज्या उपगणातील आहे त्याच ॲनोम्यूरा उपगणातील पण सीनोबायटिडी कुलातील हा खेकडा आहे. हा मोठा असून त्याची लांबी बहुधा ३० सेंमी. पेक्षाही जास्त असते. हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागरातील प्रवालद्वीपांत हा आढळतो. तो जमिनीत बिळे करून त्यांत राहतो. हा रात्रिंचर असून नारळाच्या झाडांवर चढून तो नारळ खाली पाडतो. नारळावरील सोडण काढून आपल्या मोठ्या नखराने (नखीने) नारळाच्या डोळ्यांवर घाव घालून तो फोडतो व आपला लहान नखरपाद (नखर असलेले उपांग अथवा पाय) आत घालून नारळातील खोबरे बाहेर काढून खातो. सोडणांचा उपयोग तो आपल्या बिळाला अस्तर लावण्याकरिता करतो. चोरून नारळ खाण्याच्या याच्या सवयीमुळे याला चोर-खेकडाही म्हणतात.

नारळखाऊ खेकडा

सीनोबायटिडी कुलातील काही खेकडे शंखवासी असले, तरी हा शंखात राहत नाही. हा खेकडा भूचर असल्यामुळे याचे क्लोम-कक्ष (कल्ल्यांचे कक्ष) अतिपरिवर्तित (अतिशय रूपांतरित झालेले) असून त्याचे दोन भाग झालेले असतात. कक्षाच्या वरच्या भागाच्या अस्तरावर कंगोरे आणि घड्या असून त्यांत रक्तवाहिन्या असतात. याचा उपयोग वायुश्वसनाकरिता फुप्फुसासारखा होतो. कक्षाच्या खालच्या भागात अल्पविकसित (थोडी वाढ झालेले) क्लोम असतात. अंडी फुटण्याच्या सुमारास जेव्हा हा समुद्रात जातो तेव्हा या क्लोमांचा श्वसनाकरिता उपयोग होतो.

वक्षाचे आणि वक्षावरील उपांगांचे स्वरूप शंखवासी खेकड्यासारखेच असते, पण उदराची संरचना असाधारण असते. खालच्या बाजूने पाहिले असता पुच्छाच्या टोकावर तीन लहान कॅल्सीभूत (कॅल्शियममय भाग) पट्ट दिसतात. हे पाचव्या व सहाव्या पृष्ठकांचे (शरीराच्या खंडांच्या वरच्या पृष्ठांचे) आणि पुच्छखंडाचे निदर्शक असतात. सहाव्या खंडावर अल्पविकसित प्लवपाद (सामान्यतः पोहण्याकरिता उपयोगी पडणारी उपांगे) असतात. मादीच्या उदराच्या डाव्या बाजूवर पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या खंडांचे प्लवपाद असून त्यांचा उपयोग अंडी नेण्याकरिता होतो. उदर सममित (ज्यांचे दोन सारखे भाग पडू शकतात असे) असले, तरी हे तीन प्लवपाद असममित असतात. यावरून हे खेकडे, ज्यांच्या शरीरावरील उजव्या बाजूचे प्लवपाद नाहीसे झालेले आहेत अशा शंखवासी खेकड्यांचे वंशज असावेत, असे अनुमान करणे चूक ठरणार नाही. नरामध्ये ही उपांगे मुळीच नसतात. उदराच्या अधर (खालच्या) पृष्ठावर वळ्या आणि गुठळ्या असतात. उदरात पुष्कळ तेल साठविलेले असल्यामुळे ते बिलबिलीत असते. एका खेकड्यापासून सु. एक लिटर तेल मिळते. उदराच्या पहिल्या  चार खंडांच्या पृष्ठावर प्रत्येकावर एक याप्रमाणे चार मोठे कठीण पट्ट असतात. पाचव्या आणि सहाव्यावरील लहान असतात. या पट्टांमुळे उदराचे संरक्षण होते. यांशिवाय प्रत्येक खंडाच्या दोन्ही बाजूंवर कित्येक लहान पट्ट असतात.

या खेकड्यांचा खाण्याकरिता मोठ्या प्रमाणावर उपयोग करतात. चिनी लोकांचे हे एक विशेष आवडते खाद्य आहे. शिवाय या खेकड्यांपासून तेल मिळते. या दोन्ही कारणांमुळे या खेकड्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. काही  बेटांवरील खेकडे तर समूळ नाहीसे झाले आहेत.

पहा : खेकडा, शंखवासी.

कर्वे, ज. नी.