उंदीर : उंदराचा स्तनिवर्गातील रोडेन्शिया गणात (कृंतकगणात) समावेश होतो. हा म्युरिडी कुलातला आहे. ज्याचा उंदीर म्हणून नेहमी उल्लेख करतात तो सामान्य अथवा घर-उंदीर होय. याचे शास्त्रीय नाव मस मस्क्युलस आहे. मस वंशात सु. पंधरा जाती आहेत. उंदरांचे आणखीही वंश व जाती आहेत. हा मूळ मध्य आशियाचा रहिवासी असून हल्ली जगभर पसरला आहे. भारतात तो सगळीकडे आढळतो.

उंदराच्या शरीराची लांबी ५–८ सेंमी. व शेपटीची जवळजवळ तितकीच असते. रंग फिक्कट  तपकिरीपासून काळ्यापर्यंत कोणताही असतो. खालची बाजू फिक्कट असते. अंगावरचे केस मऊ किंवा राठ असून शेपटीवरचे अगदी बारीक असतात.

घरात राहणारा असला तरी गावांच्या आणि खेड्यांच्या लगतच्या बागा आणि शेते यांतही तो आढळतो. उंदीर सर्व व्यवहार रात्री करतात व दिवसा बिळात लपून बसतात. हा चपळ असतो. सरळ उभ्या भिंतीवर तो चढू शकतो; त्याला पोहता येते.

उंदीर सर्वभक्षी आहे; खाता येण्यासारखे सर्व पदार्थ ते खातात, पण खाण्यापेक्षा पदार्थांची नासाडीच ते जास्त करतात. बिळात किंवा आडोशाच्या जागी असताना ते चूं चूं  आवाज करतात.

मऊ पदार्थ वापरून उंदीर जमिनीतल्या अथवा भिंतीतल्या बिळांत किंवा अडगळीत घरटे बांधतो. वर्षातून ३–५ वेळा यांची वीण होते. गर्भावधी १८–२१ दिवसांचा असतो. प्रत्येक खेपेला ४–८ पिल्ले होतात. जन्मतः त्यांच्या अंगावर केस नसून डोळे बंद असतात. दहा दिवसांत त्यांच्या अंगावर केस येतात व चौदाव्या दिवशी डोळे उघडतात. तीन आठवड्यांत ती स्वतंत्र होतात. जन्मल्यापासून एक वर्षाच्या आत उंदीर जननक्षम होतात.

उंदरांच्यामुळे ⇨ प्रलापक संनिपात ज्वर (टायफस ज्वर), ⇨ प्‍लेग इ. रोगांचा प्रादुर्भाव होतो. प्रयोगशाळेत प्रयोगांकरिता  पांढऱ्या उंदरांचा उपयोग करतात.

शेतातील काटेरी उंदीर (मस प्लॅटिथ्रिक्स)

उंदरांच्या आणखी काही सामान्य जाती : (१) शेतातला उंदीर : शास्त्रीय नाव मस बूडुगा; रंग भुरा किंवा तपकिरी; खालची बाजू पांढरी; लांबी ५–८ सेंमी.; शेपटी सु. ५ सेंमी. लांब. (२) काटेरी उंदीर : नेहमी शेतात व रानात आढळतो; शास्त्रीय नाव मस प्‍लॅटिथ्रिक्स; पाठ भुरी किंवा गर्द तपकिरी; खालची बाजू पांढरी; अंगावरचे सगळे केस सपाट काट्यांसारखे असतात; हे उंदीर बिळाचे तोंड खड्यांनी बंद करतात; बिळात खड्यांची बिछायत असते. (३) वृक्षवासी उंदीर : शास्त्रीय नाव व्हँडेल्यूरिया ओलेरॅशिया; हा नेहमी झाडाझुडुपांवर राहणारा देखणा उंदीर आहे; लांबी ५–९ सेंमी.; शेपटी बरीच लांब ८–११ सेंमी. असते, झाडावर हिंडताना पकड घेण्याकरिता शेपटीचा उपयोग करतो. याला जमिनीवर नीट चालता येत नाही. पिल्ले जन्मण्याच्या सुमारास मादी झाडावर मोठे घरटे बांधते, पण त्यात फक्त मादी व पिल्ले राहतात. नर आपल्याकरिता निराळे घरटे बांधतो.

पहा : कृंतकनाशके; घूस.

क्षीरसागर, वि. गो.