जर्बोआ : कृंतक गणातील (कुरतडणाऱ्या प्राण्यांच्या गणातील) डायपोडिडी हे कुल फक्त जर्बोआंचेच कुल आहे. यांचे १० वंश आणि २५ जाती असून त्या उत्तर आफ्रिका, नैर्ऋत्य आशिया, मध्य आशिया, उत्तर चीन आणि दक्षिण मँचुरिया या प्रदेशांत आढळतात. याचे मूळ उत्पत्तिस्थान आशिया असावे, असा समज आहे.  ओसाड व निम-ओसाड प्रदेश आणि विस्तीर्ण माळराने यांत राहणारा हा प्राणी आहे. जर्बोआच्या काही जाती : वाळवंटी जर्बोआ, जॅक्युलस जॅक्युलस जाड शेपटीचा व तीन बोटांचा जर्बोआ, स्टायलोडायपस टेलम चार बोटांचा जर्बोआ, ॲलॅक्टागा टेट्राडॅक्टिला लांब कानांचा जर्बोआ, युकोऱ्यूटीस नॅसो.

वाळवंटी जर्बोआ (जॅक्युलस जॅक्युलस)

रुक्ष प्रदेशात जमिनीत बिळे करण्याची त्यांची सवय आणि लांब उड्या मारण्याकरिता झालेले त्यांच्या मागच्या पायांचे असामान्य अनुकूलन ही यांची विशेष लक्षणे होत. यांचे मागचे पाय पुढच्यांपेक्षा निदान चौपट तरी लांब असतात. मागच्या पायाची लांबी २–७ सेंमी. असते. त्यांवर बहुधा तीन बोटे असतात. मागच्या पायांवर जर पाच बोटे असली, तर पहिले आणि पाचवे अतिशय लहान असते आणि मधली तीनच बोटे पायाला आधार देतात. ॲलॅक्टागा टेट्राडॅक्टिला  या जर्बोआच्या मागच्या पायांवर चार बोटे असतात. रेताड जमिनीवर राहणाऱ्या जर्बोआंच्या मागच्या पायांच्या बोटांखाली व तळव्यांवर केसांचे झुपके असतात. वाळूतून चालताना या प्राण्यांना केसांच्या या झुपक्यांमुळे आधार मिळतो. रेताड प्रदेशात राहणाऱ्या जर्बोआंमध्ये आणखी एक अनुकूलन आढळून येते. जोराने वाहणाऱ्या वाऱ्याने उडालेली बारीक वाळू कानात शिरू नये म्हणून यांच्या कानाच्या भोकावर राठ केसांचा झुपका असतो.

जर्बोआचा रंग सामान्यतः करडा किंवा फिक्कट पिवळसर असते. केस मखमलीसारखे मऊ व गुळगुळीत असतात. डोक्यासकट शरीराची लांबी ४–१५ सेंमी. आणि शेपटीची ७–२५ सेंमी. असते. शेपटी शरीरापेक्षा लांब असून बहुतकरून तिच्या टोकावर पांढरा गोंडा असतो. हा प्राणी ताठ बसला असताना शेपटीचा आधार घेतो आणि उडी मारताना शरीराचा तोल सांभाळण्याकरिता तिचा उपयोग करतो. इतर रात्रिंचर प्राण्यांप्रमाणेच याचेही डोळे मोठे असतात. जमिनीवर हळूहळू पुढे जात असताना हा आपल्या चारही पायांचा उपयोग करून सशाप्रमाणे उड्या मारत चालतो किंवा फक्त मागच्या दोन पायांनी माणसांप्रमाणे चालतो. शत्रूपासून बचाव करण्याकरिता मागच्या दोन पायांनी तो लांब उड्या मारतो. एका उडीत ते साधारणतपणे १·५ ते ३ मी. अंतर तोडतो.

उन्हाळ्यात दिवसा बिळात गुडदी बसवून जर्बोआ बीळ बंद करून घेतो. कधीकधी रात्री बिळातून बाहेर पडताना तो अशाच तऱ्हेने बीळ बंद करतो. बाहेरच्या उष्णतेचा त्रास होऊ नये आणि बिळातील आर्द्रता कायम रहावी म्हणून तो हा उपाय योजतो. याच्या बिळापासून बोगदे तयार केलेले असतात आणि ते जमिनीवर निरनिराळ्या ठिकाणी उघडतात. शत्रूपासून बचाव करण्याकरिता तो या बोगद्यांचा उपयोग करतो.सामान्यतः एका बिळात एकच जर्बोआ राहतो, पण मादी आपल्या पिल्लांसह एका बिळात राहते. जर्बोआंच्या बहुतेक जाती हिवाळ्यात सुप्तावस्थेत असतात.

जर्बोआंच्या सगळ्या जाती वनस्पतींचे रसाळ भाग व बिया यांच्यावर उपजीविका करतात. ॲलॅक्टागासारख्या काही जाती कलिंगडे, खरबुजे, रबराची रोपे इत्यादींचे बरेच नुकसान करतात. हे प्राणी किडेदेखील खातात. जर्बोआंना पाणी पिण्याची विशेषशी गरज भासत नाही.

जर्बोआच्या बहुतेक जातींच्या माद्यांची एका वर्षात एकापेक्षा अधिक वेळा वीण होते. काही जातींत गर्भावधी २५–३० दिवसांचा, तर काहींत ते ४२ दिवसांचा असतो. मादीला एका खेपेस २–६ पिल्ले होतात.

यार्दी, ह. व्यं.